फॉन्ट साइज वाढवा

‘भारत न रह सकेगा हरगिज गुलाम खाना,

आजाद होगा होगा आया है वो जमाना।

खूँ खौलने लगा है अब हिन्दुस्तानियों का,

कर देंगे जालिमों के बंद बस जुर्म ढाना।

कौमी तिरंगे झंडे पर जाँ निसार उनकी,

हिन्दू, मसीह, मुस्लिम गाते हैं ये तराना।

परवाह अब किसे है इस जेल वो दमन की ,

एक खेल हो रहा है फाँसी पे झूल जाना।

भारत वतन हमारा भारत के हम हैं बच्चे,

माता के वास्ते है मंजूर सर कटाना।।’

आपल्या एका रंगलेल्या मैफलीत विद्याधरीबाईनी कोठीवर हा आजादीचा मुजरा गायला आणि उपस्थित सगळे सर्दगर्द झाले… किंबहुना त्यांच्यावर ‘तोबा तोबा’ म्हणण्याची पाळी आली. मैफलीला मोठमोठे जमीनदार, रईसजादे, धनदांडगे व्यापारी उपस्थित होते. त्यांच्यासाठी हे अनपेक्षित होतं. ते चक्रावूनच गेले. पण विद्याधरीबाई भारतीय स्वातंत्र्यलढ्याने भारावून गेली होती. आजवर ती रसिकजनांसाठी गात आली होती, आता तिला देशासाठीही गायचं होतं… तेव्हा भारतातील असं एक संस्थान नव्हतं, जिथे विद्याधरीबाईंच्या गाण्याचे जलसे झाले नसतील. त्यांचा आवाज आणि त्यांच्या गाण्याच्या हुकुमतीवर-अदेवर दिवाने झालेले तर लाखोंनी होते, तरीही सगळ्यांसाठी त्या होत्या- बनारसची एक कोठेवाली तवायफ! म्हणूनच जेव्हा मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली, त्यांनी हसतहसत या संधीला गळामिठी घातली. कुणी तरी त्यांना आवाहनच केलं होतं की, तू तुझ्या गाण्याबरोबर आजादीची गाणीदेखील गा… भारतीय स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी तुझ्या गाण्यातून-आवाजातून लोकांपर्यंत पोचू दे… आणि हे आवाहन करणारी व्यक्ती साधीसुधी नव्हती, तर ते होते महात्मा गांधी!

1930 चा सुमार असेल. महात्मा गांधी कामानिमित्ताने बनारसला गेले होते. स्वातंत्र्यलढ्यात महिलांचादेखील सहभाग असावा म्हणून ते प्रयत्नशील होते. त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून बनारसला त्यांनी बनारसच्या कोठेवालींनादेखील या लढ्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं. इतकंच नाहीतर तवायफ म्हणून करीत असलेला परंपरागत व्यवसाय सोडून द्या असंही त्यांनी आवाहन केलं. त्या आवाहनानुसारच त्यावेळी उत्तर भारतातील गाण्याच्या दुनियेतील शानोशौकत असलेल्या हुस्नाबाई आणि विद्याधरीबाई या दोघींनी गांधींना लगेच प्रतिसाद दिला. एवढंच नव्हे, तर हुस्नाबाईच्या अध्यक्षतेखाली ‘अखिल भारतीय तवायफ संघा’ची स्थापना देखील करण्यात आली. परंपरेनं चालत आलेली कोठासंस्कृती नाकारून तिथल्या महिलांनी बाहेर पडावं आणि चारचौघींसारखं आयुष्य जगावं, हा या संस्थेचा उद्देश होता. तो पुढील काळात किती साधला गेला शंकाच आहे. कारण तेव्हा स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या पांढरपेशा महिलांनीच जिथे या कोठेवाल्या महिलांच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाला विरोध केला होता, तिथे सर्वसामान्य समाज या महिलांना कसा स्वीकारणार होता, हा मोठाच सामाजिक प्रश्न होता.

अर्थातच विद्याधरीबाईंनीदेखील लगेच आपला कोठा बंद केला नाही. उलट त्या दणक्यात कार्यक्रम करू लागल्या आणि खोऱ्याने पैसा कमावू लागल्या. मात्र जे कमावून आणलं त्यातलं अर्ध्याहून अधिक त्यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी देणगी म्हणून दिलं. गांधींसारख्या महात्म्याने आपल्याला स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याचं आवाहन करावं आणि आजादीची गाणी गायला सांगावं, याचंच त्यांना कोण अप्रूप वाटलं होतं. म्हणूनच स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्या जिथे जिथे गायल्या, त्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी आजादीचा मुजरा जरूर गायला. एवढंच कशाला, गांधींच्या ‘परदेशी मालावर बहिष्कार’ या धोरणाला पाठिंबा देत विद्याधरीबाईनी आपल्याकडील परदेशी कपड्यांची देखील होळी केली होती म्हणे! पण विद्याधरीबाई काय, हुस्नाबाई काय किंवा त्यांच्यासारख्या आणखी कुणी काय, त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या कामाची दखल कुणी का घ्यावी? त्या थोड्याच मध्यमवर्गीय समाजातल्या गरत्या बायका होत्या?

पण प्रत्यक्षात गरत्या बायका निभावणार नाहीत, अशी आपल्या शेट-सावकाराप्रति निष्ठा आणि बांधिलकी तत्कालीन कोठ्यावरच्या या तवायफच नव्हे, तर भारतीय संगीतातील अनेक गायिका तेव्हा निभावत होत्या. नाही तर बनारसमधला आपला सारा तामझाम-डामडौल सोडून विद्याधरीबाई आपल्या मूळ गावी चंदोली तालुक्यातील जसुरीला कशाला गेल्या असत्या?

++++

विद्याधरीबाईंचा जन्म बनारसपासून चाळिसेक किलोमीटरवर असलेल्या जसुरीचा. त्यांच्या आईचं नाव – भुट्टी राय, तर वडिलांचं – बुझावन राय. जन्मसाल अंदाजे 1881, मृत्यूसाल मात्र 1971 अगदी पक्क, कारण बनारसमधल्या मुक्तिधामातल्या कागदोपत्री तशीच नोंदच आहे. उणी-पुरी नव्वद वर्षँ जगल्या विद्याधरीबाई. पण अपने उसुलोपर… त्यांनी कुणाला आपल्या तालावर नाचवलं नाही, पण त्या स्वतःदेखील कधी कुणाच्या तालावर नाचल्या नाहीत. आपल्या मनाला जे पटलं तेच त्या कायम करत आल्या.

खरंतर अगदी छोट्या वयातच त्या जसुरीहून बनारसला आल्या. गाणं तर तसंही त्यांच्या घरातच होतं. बापजाद्यांपासून त्यांच्या घरात संगीत वाहत आलं होतं. त्यात लहानपणीच विद्याधरीबाईंनी चांगलेच हात-पाय मारून घेतले आणि मग जेव्हा चांगलं वजनदार-घराणेदार-पेचदार गाणं शिकण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी बनारसमधील तत्कालीन प्रसिद्ध सारंगीवादक सुमेरू राम मिश्र आणि दरभंग्याचे उस्ताद नासिर खाँ, बशीर खाँ आणि दरगाही मिश्र यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. ख्याल, टप्पा, तराना, सरगम, ठुमरीमध्ये तेव्हा बनारसमध्ये त्यांचा हात धरणारा कुणी नव्हतं, असं म्हणतात. आवाज जात्याच गोड होता आणि गाण्याच्या कठोर रियाजानंतरही त्यात फरक आला नव्हता. त्यामुळे त्या काळात कंठकोकिळा नावानेच विद्याधरीबाई प्रसिद्ध होत्या. पण केवळ आवाजच नाही, तर विद्याधरीबाईंचा स्वभावही तेवढाच गोड आणि प्रेमळ होता. अतिशय शालीन वागणं होतं. तत्कालीन बनारस, म्हणजेच काशी दरबारच्या त्या राजगायिकाही होत्या. पण तो ताठा-ऐट त्यांच्या वागण्यात-बोलण्यात कधीच नव्हती. देशातली सगळी संस्थानं त्यांनी आपल्या गाण्याच्या बळावर काबीज केली. पण आपली मानमर्यादा कधीही ओलांडली नाही. त्या काळातल्या भारतातल्या सगळ्या मोठमोठ्या गायिकांशी त्यांचे प्रेमाचे-आदराचे संबंध होते. कोलकात्याची गोहरजान असो, मुंबईच्या अंजनीबाई मालपेकर किंवा सूरश्री केसरबाई केरकर असोत वा अगदी हुस्नाबाई-मैनाबाई-राजेश्वरीदेवी असोत सगळ्यांशीच त्यांचं चांगलं जमायचं. ख्याल असो वा ठुमरी, आपलं गाणं जसं त्या जमून गायच्या, नातंही तशाच निभावायच्या. त्यांच्या गाण्याची तर त्याकाळचे भलेभले गवयीहीदेखील नक्कल करत असत. भेंडीबाजार घराण्याच्या प्रसिद्ध गायिका अंजनीबाईंनी तर विद्याधरीबाईंचं अतिशय मनापासून कौतुक केलं आहे. ‘ठुमरीवर खऱ्या अर्थाने कुणी राज्य केलं असेल, तर ते केवळ विद्याधरीबाईंनी’ असं अंजनीबाईंनी म्हणून ठेवलं आहे. विशेष म्हणजे केवळ शास्त्रीय वा उपशास्त्रीय एवढ्यापुरतीच विद्याधरीबाईंची मजल नव्हती. त्या भजनं अतिशय सुरेख गायच्या. एक कोठेवाली एवढी आर्ततायुक्त भजनं कशी काय गाते, असा प्रश्न तेव्हा अनेकांना पडायचा. पण तेव्हाही फार कमी लोकांना ठाऊक होतं, की विद्याधरीबाईंनी गोस्वामी दामादोरलालजी यांच्याकडे कामसूत्राचे धडे जसे  गिरवलेत, तसेच जयदेवाच्या ‘गीत गोविंद’मधील रचनांचेही. त्यामुळेच तर काम आणि भक्ती यांचा त्यांच्या हृदयात सारखाच निवास होता.  

मुळात त्यांच्या स्वभावात जात्याच मार्दव होतं. त्यामुळे गाणं असो वा व्यवहारातलं वागणं ते कधी एकमेकांपासून दूर गेलं नाही. आपल्यापेक्षा ज्येष्ठ असो वा कनिष्ठ त्यांनी साऱ्यांना सारखाच आदर आणि प्रेम दिलं. कुणाच्याही मदतीसाठी तर त्या कायम तत्पर असायच्या. यासंदर्भातली प्रसिद्ध ठुमरीगायिका सिद्धेश्वरीदेवींची आठवण सांगण्यासारखी आहे. सिद्धेश्वरीदेवी विद्याधरीबाईना आई मानायच्या. नव्हे, त्यांना अम्मा असंच संबोधायच्या. कारण ऐन उमेदीत त्यांच्यावर कोसळलेल्या एका संकटात विद्याधरीबाईंनी मोठीच मदत केली होती. सिद्धेश्वरीदेवींची आई त्या लहान असतानाच वारली. त्यामुळे त्यांचं सांभाळ त्यांच्या मावशीनेच (बनारसची तेव्हाची प्रसिद्ध गायिका राजेश्वरीदेवी) केला. मात्र सिद्धेश्वरी मोठ्या होऊन मैफली गाजवू लागल्यावर एके दिवशी काही कारणाने बेबनाव निर्माण झाला आणि राजेश्वरीदेवींनी सिद्धेश्वरी देवींना अंगावरच्या कपड्यांसकट घराबाहेर काढलं. तेव्हा दुविधेत सापडलेल्या सिद्धेश्वरीदेवी विद्याधरीबाईंकडे गेल्या आणि विद्याधरीबाईंनी त्यांना आश्रय दिला. एवढंच नव्हे, तर त्यानंतर मैफलीत गाण्याची सुपारी मिळाली तेव्हा, सिद्धेश्वरीदेवींकडे मैफलीसाठी खास जो पेहराव केला जातो, तो पिशवाजच (मोठा घेर असलेला अंगरखा, ज्याला आता अनारकली म्हटलं जातं) नव्हता. तेव्हा विद्याधरीबाईंनीच आपला खास ठेवणीतला पिशवाज तेव्हा सिद्धेश्वरीदेवीना दिला होता… आणि ‘तो पिशवाज माझ्यासाठी भाग्याचा ठरला’ असं सिद्धेश्वरीदेवी नंतर कायमच सांगायच्या.

… पण विद्याधरीबाईंचे पिशवाज असायचेच खास. कारण ते खास डिझाइन केलेले असायचे. आजच्या मैफलीला विद्याधरी कोणता पिशवाज घालते आणि त्यावर कोणते जडावाचे अलंकार घालते, याकडे त्यावेळच्या तवायफच नव्हे, तर घरंदाज बायकाही लक्ष ठेवून असायच्या म्हणे… अतिशय बारीक कलाकुसर केलेले पिशवाज आणि वर त्याला शोभणारे नाजूक अलंकार घालून विद्याधरीबाई निघाल्या की पाहणाऱ्यांच्या नजरा त्यांच्यावरच थबकायच्या असं सांगतात. विद्याधरीबाईंच्या या आकर्षक पेहरावाचं आणि त्यावरील अलंकाराचं रहस्य त्यांच्या प्रेमप्रकरणात होतं म्हणतात. बनारसला तेव्हा दुर्गाशंकर जोशी नावाचे एक बडे जवाहिरे होते. विद्याधरीबाईंचे ते आश्रयदाते होते. ते मैफलींच्या निमित्ताने विद्याधरीबाईंसाठी खास जडावाचे बारीक कलाकुसरीचे दागिने घडवत. जेणेकरून ते अलंकार मैफलीला उपस्थित असलेल्या जाणकार-दर्दी रसिकांपर्यंत आणि पर्यायाने त्यांच्या बायकांपर्यंत पोचतील नि मग त्यामाध्यमातून आपल्याला ऑर्डर्स मिळतील. विशेष म्हणजे तसंच व्हायचंही. विद्याधरीबाईंच्या अंगावर जेव्हा ते अलंकार चढायचे, त्यातून बाईंचं सौंदर्य खुलून यायचं आणि मग जी तान त्यांच्या गळ्यातून उमटायची, ती अधिकच खुमासदार व्हायची. या प्रभावातून त्या दुर्गाशंकर जोशीना दागिन्यांच्या मोठमोठ्या ऑर्डर्स मिळत… मात्र दुर्गाशंकर जोशी आणि विद्याधरीबाई यांच्यातलं नातं या अशा देवाणघेवाणीपुरतं मर्यादित नव्हतं. त्यांचं नातं जिवाशिवाचं होतं. हयात असेपर्यंत दुर्गाशंकर यांनी कधीही विद्याधरीबाईंना अंतर दिलं नाही… दोघेही एकमेकांची सावली बनून राहिले… म्हणून तर दुर्गाशंकर जोशी यांचं निधन होताच, विद्याधरीबाईंचं आपल्या गाण्यावरचं-ऐश्वर्यावरचं मन उडालं. त्या एकदम अलिप्त झाल्या. बनारसमधला आपला सगळा संसार गुंडाळला आणि त्या निमूट जसुरीला निघून गेल्या. दुर्गाशंकर का त्यांचा लग्नाचा नवरा होता? पण आयुष्यात मोलाची साथसोबत त्यांनी एकमेकांना केली होती, जी धन-दौलतीच्या पलीकडची होती. देवा-धर्माच्या साक्षीने लग्न नसेलही झालं, पण कुठलंही नातं टिकवायचं, तर मनाचीच साक्ष तर महत्त्वाची असते. विद्याधरीबाईंनी तीच महत्त्वाची मानली.    

+++

बनारसहून जसुरीला गेल्या तेव्हा विद्याधरीबाईंचं वय साठ-पासष्टच्या आसपास होतं. जसुरीला त्या आपल्या भाच्याबरोबर आपल्याच घरात राहिल्या. मात्र जसुरीला आल्यावर त्यांनी कधीही ठुमरी किंवा अन्य कुठलं गाणं केलं नाही, केलं ते केवळ भजनच. कसुरीला गेल्याला पंधरा-वीस वर्षं झालेली असतानाच एकदा तेव्हाचे प्रसिद्ध लेखक अमृतलाल नागर एकदा सिद्धेश्वरीदेवींना सोबत घेऊन जसुरीला विद्याधरीबाईंना भेटायला गेले होते. ते म्हणतात- ‘त्यावेळी विद्याधरीबाई ऐंशी-नव्वदीच्या उंबरठ्यावर होत्या. मात्र त्यांच्या चेहऱ्यावर जे तेज होतं, ते कल्पनातीत होतं. संपूर्ण शरीर आणि चेहरा सुरकुत्यांनी भरलेला होता. मात्र त्या सुरकुत्या कुठेही लाचारी किंवा अगतिकता दर्शवत नव्हत्या, तर त्या सुरकुत्यांमधून आपलं आयुष्य आपल्या अटीवर सुखासमाधानात जगल्याची झाक दिसत होती.’’

प्रत्येकालाच आयुष्यात यापेक्षा वेगळं आणखी काय हवं असतं!

मुकुंद कुळे

RohanSahityaMaifaljpg-1-1
Sundarabai
या सदरातील लेख…

‘बाई’ सुंदराबाई

बाई सुंदराबाईंनी एवढं वैविध्यपूर्ण गायन केलं, तरी त्यांची आज जनमानसातली ओळख आहे ती, बैठकीची लावणी गाणारी गायिका म्हणूनच!

लेख वाचा…




देवकन्या!

ते केवळ गायन नव्हतं, तो सुब्बुलक्ष्मींचा सतत चाललेला रियाझ होता – आपलं गाणं देवाप्रति पोचवण्याचा!

लेख वाचा…


एकलीच बशिल्ली मेनकाबा

आयुष्याचं उत्तरपर्व गोव्यातील फोंड्याच्या शांतादुर्गा मंदिराजवळ असलेल्या स्नेहमंदिर वृद्धाश्रमात व्यतीत करणाऱ्या प्रसिद्ध गायिका-नर्तिका मेनकाबाई शिरोडकरही अशाच झुरल्या असतील का आपल्या माणसांसाठी?

लेख वाचा…


आर्यगंधर्व

बालगंधर्वांनाही ज्यांच्या लावण्या प्रिय होत्या, त्या कौसल्याबाई कोपरगावकर यांची नावनिशाणीच आज कालपटलावरून पुसली गेली आहे, जणू काही कौसल्याबाई झाल्याच नाहीत…

लेख वाचा…


विद्यासुंदरी

शरीराची गरज असेपर्यंत आश्रय द्यायचा आणि ती भागली की वाऱ्यावर सोडायचं, या पुरुषी वृत्तीचा तिला वीट आला नि संतापानेच तिने निश्चय केला- आता नागरत्नम्माला मोठी कलावंत करायचं !

लेख वाचा…


बैठकीच्या लावणीतलं मानाचं पान

भामाबाईंच्या कलेचं कोणत्याच प्रकारचं दस्तऐवजीकरण आज उपलब्ध नाहीय. परंपरेतील माणसं त्यांचं नाव घेताना आजही कानाला हात लावतात, हेच भामाबाईंचं मोठेपण! 

लेख वाचा…


बैठकीच्या लावणीतलं मानाचं पान

थोड्याच काळात रसूलन एखाद्या जाणत्या गायिकेसारखी गायला लागली. बघता बघता बनारस घराण्याची आन-बान-शान बनली! 

लेख वाचा…



बैठकीच्या लावणीतला टवटवीत ‘गुलाब’

…आणि अवघ्या बारा-तेरा वर्षांच्या गुलाबबाई ‘गुलाबबाई संगमनेरकर संगीतबारी’च्या मालकीण झाल्या.  

लेख वाचा…



जगन्नाथाची शेवटची धर्मपत्नी

…ती होती पुरीच्या जगन्नाथाची शेवटची देवदासी, त्याची अखेरची धर्मपत्नी… 

लेख वाचा…



गौरीअम्मा : कलेची गंगोत्री

तरीही आमच्या कलाजगताला गौरीअम्माविषयी फार काही ठाऊक नाही. असणार तरी कसं म्हणा? शेवटी गौरीअम्मा बोलूनचालून एक देवदासी तर होती…  

लेख वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *