फॉन्ट साइज वाढवा

पुट्टुलक्ष्मीने म्हैसूर संस्थान सोडलं, तेव्हा नागरत्नम्मा अगदीच अजाणती होती. अवघी सात-आठ वर्षांची. मात्र तेव्हाच पुट्टुलक्ष्मीने आपल्या मनाशी खूणगाठ बांधली होती- मला आणि माझ्या मुलीला मानाने बोलावतील तेव्हाच म्हैसूरमध्ये पुन्हा पाऊल ठेवेन!

… आणि पुट्टुलक्ष्मीला फार काळ वाट पाहावी लागली नाही. काळाचे फासे इतक्या जलद गतीने फिरतील असं खुद्द पुट्टुलक्ष्मीलाही वाटलं नव्हतं. नागरत्नम्मा जेमतेम सोळा-सतरा वर्षांची असतानाच तिच्या गाण्याची-नृत्याची ख्याती ऐकून तत्कालीन म्हैसूर संस्थानचे अधिपती जयचामराजेंद्र ओडियार यांनी राजनर्तकी म्हणून तिची आपल्या दरबारात नेमणूक केली. साहजिकच लेकीबरोबर पुट्टुलक्ष्मीही मानाने म्हैसूरमध्ये दाखल झाली.


हेही वाचून पहा : रोहन शिफारस

‘ती’चं अवकाश

या पुस्तकात बारा जणींच्या अशा बारा कहाण्या आहेत, ज्यातून स्त्रियांनी स्वत:चा वेगळा मार्ग तर शोधला आहेच, पण इतरांना विचारप्रवृत्त करणाऱ्या हकीगतीही सांगितल्या आहेत .

खरेदी करा


खरंतर पुट्टुलक्ष्मीसाठी म्हैसूर किंवा म्हैसूर संस्थान जुनं नव्हतं, किंबहुना म्हैसूरचा कलावारसा तिच्या रक्तातच होता. कलावंत देवदासी परंपरेतून आलेल्या तिच्या आई-आजी-पणजीने गायक-संगीतकार म्हणून या म्हैसूर संस्थानातच सेवा बजावली होती आणि ख्यातीही मिळवली होती. पुट्टुलक्ष्मी स्वतः एक उत्तम गायिका होती. मात्र म्हैसूर सोडण्याचं तिचं कारण वेगळंच होतं. थोडं खाजगी होती. म्हैसूर संस्थानातील नंजनगुडु येथील तेव्हाचे प्रसिद्ध वकील सुब्बा राव यांच्यापासून तिला नागरत्नम्मा झाली, ते साल होतं-१८७८. नागरत्नम्माच्या जन्माआधी सुब्बाराव यांची कसलीच तक्रार नव्हती. उलट पुट्टुलक्ष्मीवर त्यांचं प्रेमच होतं. मात्र नागरत्नम्माच्या जन्मानंतर काहीच दिवसांत त्यांनी पुट्टुलक्ष्मीचा त्याग केला. तिच्या डोक्यावरचं छतच काढून घेतलं. आता लहान मुलीला घेऊन कुठे जायचं, या विवंचनेत पुट्टुलक्ष्मी सापडली असतानाच, म्हैसूर संस्थानात संस्कृत पंडित असलेल्या गिरीभट्ट थिम्मय्या शास्त्री यांनी तिला आधार दिला. ते तिला आपल्या घरी घेऊन गेले. नागरत्नम्माचं बालपण गेलं ते या शास्त्रींच्या घरी. महत्त्वाचं म्हणजे शास्त्री संस्कृत पंडित आणि संगीताचे जाणकार असल्यामुळे, अगदी लहान वयात नागरत्नम्मावर संस्कृत आणि संगीताचा प्रभाव पडला. ती घडाघडा संस्कृत सुभाषितं-पदं आणि सोबत कर्नाटक संगीत परंपरेतील काही गाणीही म्हणायला लागली. नागरत्नम्माकडे आईकडून आलेलं गाणं होतंच, पण शास्त्रींनी त्या गाण्याला शास्त्राचीही जोड दिली. त्यामुळे अगदी लहान वयातच नागरत्नम्माने आपल्या कलागुणांनी सगळ्यांना आकर्षून घेतलं होतं.

तरीही नागरत्नम्मा अखेर होती एका देवदासीचीच मुलगी… त्यामुळे तिला तिची परंपरा चुकली नाही. वयाची पाच-सहा वर्षं उलटत नाहीत तोच नागरत्नम्माचा भोगम विधी करण्यात आला. म्हैसूरमधील स्थानिक मंदिरातील देवाशी तिचं लग्न लावून देण्यात आलं. अर्थात लहानग्या नागरत्नम्माला आपली देवदासी परंपरावगैरे काहीही ठाऊक नव्हतं. ती आपल्या शिक्षणात मग्न होती. तिला संस्कृत आणि संगीत दोन्हीत विशेष गती होती. त्यामुळे पुट्टुलक्ष्मी आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नं पाहायला लागली होती… इतक्यात गिरीभट्ट थिम्मय्या शास्त्री यांनीही या मायलेकींचा आधार काढून घेतला.

पुट्टुलक्ष्मीसाठी हा मोठाच धक्का होता. किंबहुना तिला हा आपला आणि आपल्या लेकीचा अपमानच वाटला. ती मनोमन दुखावली गेली. शरीराची गरज असेपर्यंत आश्रय द्यायचा आणि ती भागली की वाऱ्यावर सोडायचं, या पुरुषी वृत्तीचा तिला वीट आला नि संतापानेच तिने निश्चय केला- आता नागरत्नम्माला मोठी कलावंत करायचं आणि मगच अभिमानाने पुन्हा पाऊल ठेवायचं म्हैसूरमध्ये!

नागरत्नम्माला घेऊन पुट्टुलक्ष्मीने बेंगलोर (आताचं बेंगळुरु) गाठलं. तिथे नात्याने नागरत्नप्पाचे चुलते असणारे व्यंकटस्वामी अप्पा होते. त्यांच्याकडे दोघी आश्रयाला गेल्या. व्यकंटस्वामी कलावृत्तीचे होते. ते स्वतः प्रसिद्ध व्हायोलिनवादक होते आणि शिक्षणाबाबतीत पुढारलेले होते. साहजिकच त्यांच्या आश्रयाखाली नागरत्नम्माला शिकू तेवढं थोडं झालं. सगळ्यात आधी तिने व्यंकटस्वामींकडे व्हायोलिनचे धडे गिरवायला सुरुवात केली. कन्नड, तेलुगू आणि इंग्रजी भाषांचं शिक्षणही ती घेऊ लागली… सोबत गुरु-शिष्य परंपरेनुसार ती मुनुस्वामप्पा यांच्याकडे कर्नाटक संगीताचे धडेही गिरवू लागली. या सगळ्या शिक्षणात-कलांमध्ये ती एवढी रमली की अल्पावधीत ती त्यांत पारंगत झाली… आणि वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी तिने आपल्या गायन-वादन कलेचा पहिला आविष्कार घडवला. उपस्थित रसिक तिथेच तिच्यासमोर नतमस्तक झाले. नागरत्नम्मा गाणं आधी शिकली आणि नंतर आपलं परंपरागत नृत्य. पण तिचं नृत्यातलं कसब एवढं मोहक आणि आकर्षक होतं, की अल्पावधीतच तिच्या नृत्याची वार्ता म्हैसूर दरबारपर्यंत पोचली… नि कलेचे जाणकार व आश्रयदाते असलेल्या संस्थानाधिपतींनी, जयचामराजेंद्र ओडियार यांनी नागरत्नम्माला मोठ्या मानाने म्हैसूर दरबारची राजनर्तकी म्हणून घोषित केलं.

…वस्तुतः नंजनगुडु किंवा म्हैसूर ही नागरत्नम्माची जन्मभूमी. परंतु तिच्या व्यक्तिमत्त्वाला आणि कलागुणांना आकार मिळाला, तो बेंगलोरमध्ये. त्यामुळे ती इतिहासात प्रसिद्ध झाली- ‘बेंगलोर नागरत्नम्मा’ म्हणूनच!

‘बेंगलोर नागरत्नम्मा’ने राजनर्तकी म्हणून प्रसिद्ध म्हैसूर पॅलेसमध्ये पाऊल ठेवलं आणि पुट्टुलक्ष्मीच्या डोळ्यांतून ओघळलेले दोन मोती अगदी सहज म्हैसूरच्या मातीत मिसळले. तिचा म्हैसूरच्या या मातीवर कधीच राग नव्हता. उलट कधी काळी तिच्या कित्येक पिढ्या याच मातीत आणि याच दरबारात मानाने मिरवल्या होत्या, नांदल्या होत्या… पुट्टुलक्ष्मीला राग होता, इथल्या स्वार्थी पुरुषांचा… त्यातही स्त्रीला वापरून फेकून देणाऱ्या पुरुषी मनोवृत्तीचा. पण ते घाव सोसून पुट्टुलक्ष्मीने आपल्या लेकीला घडवलं आणि तिच्यासोबत मानानेच तिने पुन्हा म्हैसूरमध्ये पाऊल ठेवलं!

००

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात इन्कम टॅक्स भरणारी नागरत्नम्मा ही भारतातील पहिली स्त्री होती.

पुट्टुलक्ष्मी आणि तिची लेक बेंगलोर नागरत्नम्मा, दोघींच्या भागधेयात खूपच फरक होता. अंगामध्ये कला असतानाही पुट्टुलक्ष्मीला कायमच कुणाच्या ना कुणाच्या आश्रयाला राहावं लागलं. नागरत्नम्मा मात्र स्वयंप्रज्ञ आणि स्वयंप्रकाशी होती. नर्तिका म्हणून तर ती नावारूपाला आलीच, पण गायिका म्हणूनही तिने अल्पावधीतच मोठं नाव कमावलं… परिणामी तिच्या आश्रयदात्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत गेली. म्हैसूर दरबारची ती राजनर्तिका होतीच, पण त्याबरोबरच विजयनगरम, त्रावणकोर, बोब्बिली यांसारख्या तत्कालीन अनेक संस्थानांनी तिला पुरस्कृत केलं. त्यामुळे बघता बघता नागरत्नम्मा एक बडी असामी झाली. देवदासी परंपरेतली एक साधी मुलगी, एक नामांकित कलावंत तर झालीच, पण ती माणूस म्हणूनही मोठी ठरली. कारण तिच्या जाणिवा-संवदेना या केव्हाच ‘वैयक्तिक’तेच्या पल्याड जाऊन ‘सामूहिक’ झालेल्या होत्या. आपल्या कला जोपसतानाच इतरांना मदत करणं, त्यांच्या अडीअडचणीला धाऊन जाणं, हा तिचा स्थायी भाव होता. कोणावरही झालेल्या साध्यासुध्या अन्यायाने तिच्या डोळ्यांत पाणी येत असे. अगदी छोट्या वयात नागरत्नम्माने एक माणूस म्हणून गाठलेली ही उंची स्तिमित करणारी होती… आणि तिचं व्यक्तिमत्त्व असं प्रगल्भ व्हायला कारणीभूत ठरली एक व्यक्ती, जिचं नाव होतं- नरहरी राव… तत्कालीन म्हैसूर न्यायालयाचे तरुण आणि उमदे न्यायाधीश! नरहरी राव यांचं लग्न झालेलं होतं, परंतु ते नागरत्नम्माचे आश्रयदाते आणि चाहतेही होते. नागरत्नम्माला विविध कलांमध्ये आणि भाषांमध्ये असलेली गती त्यांना उमगली होती. देवदासी पंरपरेत उमललेलं हे एक अम्लान फूल आहे, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे त्यांनी कायमच नागरत्नम्माच्या व्यक्तिमत्त्वविकासाला महत्त्व दिलं. त्यांच्या सहवासामुळे नागरत्नम्माला विविध क्षेत्रांची माहिती मिळत गेली. नरहरी राव न्यायाधीश असल्यामुळे न्यायालयात येणाऱ्या अनेक प्रकरणांची माहितीही तिच्या कानावर पडू लागली. परिणामी एकीकडे लोकप्रिय कलावंत म्हणून घडत असतानाच, दुसरीकडे नागरत्नम्माचं सामाजिक व्यक्तिमत्त्वही आकाराला येत होतं.

त्यागराजांच्या प्रतिमेसह नागरत्नम्मा

आणि एका टप्प्यावर… नरहरी राव यांनी नागरत्नम्माला मोकळं केलं. म्हणजे पुट्टुलक्ष्मीला तिच्या आश्रयदात्यांनी वाऱ्यावर सोडलं, तसं नाही. त्यांनी नागरत्नम्मासाठी एक मोठा अवकाश खुला केला. तिची मोठ्या जगाशी ओळख करून दिली. त्यांनी नागरत्नम्माला म्हैसूरच्या छोट्या दुनियेतून कर्नाटकी संगीताची मक्का किंवा काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मद्रासचा (आता चेन्नई) मार्ग दाखवला.

००

मद्रास ही तेव्हा खरोखरच संगीताची पंढरी होती. दक्षिण भारतातले अनेक ख्यातनाम कलाकार यांचं वास्तव्य तेव्हा मद्रासमध्येच असायचं. साहजिकच संगीत-नृत्याचे मोठमोठे कार्यक्रम व्हायचे आणि कलावंताना पैसा व प्रतिष्ठा सारं काही मिळायचं. साहजिकच मद्रासमध्ये आल्यावर नागरत्नम्मा यांच्या कलेला आणि व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच धार आली. इथे त्यांचं गाणं अधिक बहरलं नि वाढलंदेखील. अगदी सुरुवातीच्या काळात देवदासी परंपरेतून चालत आलेल्या पदम् आणि जावळीसारख्या शृंगारिक संगीतरचना नागरत्नम्मा आपल्या कार्यक्रमात सादर करत. मात्र त्या रचना सादर करताना, त्या त्यांचा एखाद्या संगीताच्या मैफलीप्रमाणे कलात्मक आविष्कार घडवत. त्यांच्या कार्यक्रमात कुठेही उच्छृंखलपणाला वाव नसे. हळूहळू त्यांचं संपूर्ण दक्षिण भारतात नाव झालं. दक्षिण भारतातलं असं एकही शहर नसेल, जिथे नागरत्नम्माचं गाणं झालं नाही. त्यांनी आपल्या गाण्याने जणू दक्षिण दिग्विजयच केला. मद्रासला आल्यावर अगदी अल्पावधीत कर्नाटक संगीतात त्यांनी मोठं नाव कमावलं आणि भरपूर पैसाही गाठीशी बांधला. मात्र वय वाढत गेलं तसतसं त्या अधिक प्रगल्भ होत गेल्या. त्यांनी इतर कुठल्याही गायनप्रकारांऐवजी आपलं लक्ष हरीकथा सादर करण्यावर केंद्रित केलं. नागरत्नम्मा आधीही हरीकथा सादर करायच्या, मात्र जाणतेपणी त्यांच्या हरीकथेच्या सादरीकरणाला चिंतनाचीही डूब मिळाली आणि ते अधिक आकर्षक होऊ लागलं. ‘हरीकथा कलाक्षेपम’ हा दक्षिणेतील लोकप्रिय संगीत कलाप्रकार. याचं स्वरूप खरंतर आपल्याकडच्या कीर्तनासारखंच. मात्र हरिकथेच्या सादरीकरणात गायन असतंच, सोबतीला थोडंफार नृत्यही असतं. अर्थात हे नृत्य हरिकथेचा विषय अधिक खुलवण्यासाठी असतं आणि नृत्य म्हणजे फार नाचणं नव्हे, तर कथा सांगताना एकाच जागी उभं राहून केलेल्या हस्तमुद्रा आणि थोडा पदन्यास. तसंही दक्षिणेकडील कुठलाही कलाप्रकार घेतला, तर त्यात नृत्याचा अंश असतोच. तद्वतच नागरत्म्माच्या हरिकथेत गायन-नृत्य दोन्हीचा अजोड मिलाफ असायचा… साहजिकच बघता बघता रसिक नागरत्म्माच्या हरिकथेच्या गायनाने गारद होऊन जायचे. हे हरिकथेचं गायन म्हणजे एकप्रकारे ईश्वरसन्निध जाणं असायचं… त्यातूनच नागरत्नम्माचा कल हळूहळू आध्यात्मिकतेकडे झुकू लागला. तिचं गाणं लौकिकापेक्षा अलौकिकाचा ध्यास प्रकट करू लागलं. मग नागरत्नम्मा अंतर्बाह्य बदलली. पारंपरिक कर्नाटक संगीताला दिशा दाखवण्याचं काम ज्यांनी केलं, ते १८व्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेले महान संगीतज्ञ आणि भक्तिमार्गातील प्रसिद्ध कवी त्यागराज, यांच्याप्रति तिची भक्ती वाढत गेली आणि तिने एकप्रकारे त्यांचा ध्यास घेतला. संगीतातील आपल्या गुरूच्या मार्गदर्शनानुसार नागरत्नम्माने त्यागराज यांच्या थिरुवरुर येथील समाधीची दुरुस्ती तर केलीच, शिवाय त्या समाधीवर सुरेख मंदिरही बांधलं. नागरत्नम्माची पूर्वार्धातली कलाकारकीर्द झगमगाटी होती, मात्र उत्तरायुष्यात ती सात्विकतेकडे झुकलेली होती. आयुष्यात कमावलेला सारा पैसा तिने सामाजिक उपक्रमांसाठी दान करून टाकला. गावकऱ्यांच्या सोयीसाठी तलाव बांधणं असेल, धर्मशाळा बांधणं असेल, अशा धर्मादाय कामात तिने स्वतःला झोकून दिलं. सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात इन्कम टॅक्स भरणारी नागरत्नम्मा ही भारतातील पहिली स्त्री होती.

००

पण नागरत्नम्मा फक्त एवढीच नव्हती. तिचं व्यक्तिमत्त्व बहुपेडी होतं. नर्तकी, गायिका, समाजसेविका, पहिली स्त्री-मुक्तीवादी महिला, संपादिका, भाषातज्ज्ञ, प्रकाशिका… अशा अनेक भूमिका ती एकाच वेळी निभावत होती आणि म्हणूनच तिच्या या बहुप्रातिभ दर्शनाने दिपून जाऊन त्या काळात तिला ‘विद्यासुंदरी’ ही पदवी देण्यात आली होती. त्या अर्थाने नागरत्नम्मा हे त्या काळातलं दक्षिण भारतातील एक सळसळतं व्यक्तिमत्त्व होतं. सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी आपल्या नावाचा एक दबदबा निर्माण केला होता…

पण नागरत्नम्मा खरोखरच मोठ्याच धीराची आणि वकुबाची बाई होती. त्याशिवाय का तिने १८ व्या शतकाच्या पूर्वार्धात तंजावूरच्या भोसले राजवटीत होऊन गेलेल्या मुद्दुपलनी या कवयित्रीचं ‘राधिका स्वांत्वनमु’ पुनर्प्रकाशित करायचं धाडस केलं असतं? १९व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या पूर्वार्धात तत्कालीन शासन आणि तथाकथित परंपरावाद्यांच्या विरोधात लढणं सोपं नव्हतं. त्यात नागरत्नम्मा देवदासी परंपरेतली स्त्री, म्हणजे पुरुष विद्वानांच्या हातात आयतीच दुधारी तलवार सापडली होती- एकीकडे नागरत्नम्मा स्त्री होती आणि दुसरीकडे ती देवदासी होती. मग कावळ्यांनी टोचावं तसेच परंपरावादी तिला टोचत होते, बोलत होते. पण नागरत्नम्मा खंबीर राहिली. ती जराही डगमगली नाही.

THANJAVUR: 02/01/2010 SATURDAY FOR ARADHANA SPECIAL SUPPLEMENT The view of the Nagarathinammal Statue in Thayagarajar Samadhi in Thiruvaiyaru in Thanjavur on Saturday. Photo: M_Srinath

झालं असं होतं- तंजावरच्या प्रतापसिंह राजांच्या (राज्यकाळ – १७३० ते १७६३) दरबारी असलेल्या देवदासी परंपरेतील मुद्दुपलनीने ‘राधिका स्वांत्वनमु’ हे शृंगारिक काव्य रचलं होतं. एका स्त्रीने स्त्री-पुरुष संबंधांचं चित्रण करावं, हे त्या काळातही तत्कालीन समाजपुरुषांना रुचलं नव्हतंच. परिणामी मुद्दुपलनीच्या हयातीतच ते काव्य अलक्षित राहिलं. पुढे मूळ हस्तलिखित पोथीवरून ते पुस्तकरूपात छापण्यात आलं, तेव्हाही पैदिपती व्यकंटनरसू या तेलुगु पंडिताने संपादन करताना त्यातला काही भाग शृंगारिक म्हणून गाळून टाकला. योगायोगाने हे काव्य नागरत्नम्माच्या वाचनात आलं आणि तिला ‘राधिका स्वांत्वनमु’मधील आशय आणि काव्य दोन्ही भावलं. मात्र तिला त्यात काही अपूर्णत्वही जाणवलं. म्हणून ती मूळ हस्तिलिखित पोथीचा माग काढत गेली… आणि अखेर तिला ती सापडलीच. मग नागरत्नम्माने मुद्दुपलनीचं ‘राधिका स्वांत्वनमु’ १९०९मध्ये जसंच्या तसं छापलं. अगदी स्वतःच्या टिप्पणीसह. त्या टिप्पणीत ती म्हणते- ‘मुद्दुपलनीचं हे काव्य वाचण्याचा मला वारंवार मोह होतो. यात विविध रसांचं जे वर्णन करण्यात आलं आहे, ते फक्त मुद्दुपलनीच करू शकते, कारण ती देवदासी परंपरेतली होती. केवळ समृद्ध अनुभवामुळेच असं लेखन करता येऊ शकतं.’

मात्र एका स्त्रीने इतकं उघडउघड़ स्त्री-पुरुष संबंधांचं वर्णन करणं, हे त्यावेळच्या तथाकथित संस्कृतिरक्षकांना ते पुन्हा एकदा रुचलं नाही आणि त्यांनी या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी केली आणि नागरत्नम्मावरही प्रचंड टीका केली. ‘शशिलेखा’ नावाच्या अनियतकालिकात तर लिहिण्यात आलं होतं– ‘एका वेश्येने लिहिलेलं असं पुस्तक, दुसरी वेश्याच प्रकाशित करू शकते.’ त्यानंतर काही संस्कृतिरक्षकांनी तक्रार केल्यामुळे प्रकाशनाच्या कार्यालयावर छापा टाकून ‘राधिका सांत्वनमु’च्या प्रती तत्कालीन ब्रिटिश सरकारने जप्त केल्या आणि पुस्तकावर बंदी आणली.

‘राधिका सांत्वनमु’वरची ही बंदी भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत कायम होती. स्वातंत्र्यानंतर एक-दोन वर्षांनी मद्रासचे तत्कालीन मु्ख्यमंत्री व आंध्रकेसरी म्हणून प्रख्यात असलेले तंगुतरी प्रकाशम यांनी ही बंदी उठवली. ही बंदी उठवताना ते म्हणाले – ‘तेलुगु साहित्याच्या संपन्न मालेतील काही मोती या निमित्ताने मी पुन्हा स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.’

उमेद असेपर्यंत नागरत्नम्माने ‘राधिका सांत्वनमु’चा मुद्दा लावून धरला होता. मात्र त्या पुस्तकावरची बंदी उठली, तेव्हा नागरत्नम्मा थकलेली होती. योगायोग म्हणजे १९ मे १९५२ ला नागरत्नम्माचं निधन झालं. त्याच वर्षी वाविल्ला रामास्वामी शास्त्रुलु यांनी ‘राधिका सांत्वनमु’च्या नागरत्नम्मा संपादित दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन केलं. कारण मुद्दुपलनीची कला-साहित्य टिकवून ठेवण्यासाठी नागरत्नम्माने दिलेला लढा, किंवा उपसलेले कष्ट म्हणजे, एक मोठ धाडसंच होतं, हे त्यांना ठाऊक होतं.

मुद्दुपलनीने १८ व्या शतकात स्त्रीलाही आपल्या लैंगिक भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, हे आपल्या कलाकृतीतून सांगितलं आणि तिच्या या भूमिकेचा जणू पाठपुरावा करण्यासाठीच नागरत्नम्मा २० व्या शतकाच्या पूर्वार्धात सनातन्यांच्या विरोधात लढत राहिली…

एवढंच कशाला विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात देवदासींच्या हक्कांसाठी दक्षिणेत जी पहिली संघटना स्थापन झाली, तिची अध्यक्षही नागरत्नम्माच होती… बेंगलोर नागरत्नम्मा!

– मुकुंद कुळे


रोहन प्राइम

वाचकांसाठी एक खास सभासद योजना!

‘रोहन प्राइम’ म्हणजे भरघोस सवलती, विशेष कार्यक्रम आणि नाविन्यपूर्ण उपक्रम… फक्त सभासदांसाठी! मेंबरशिप घेतल्यावर रु.१००चे कूपन भेट…. हक्काची २५ टक्के सवलत आणि बरंच काही…

अधिक माहिती जाणून घ्या..

250.00Add to cart


Sundarabai
या सदरातील लेख…

‘बाई’ सुंदराबाई

बाई सुंदराबाईंनी एवढं वैविध्यपूर्ण गायन केलं, तरी त्यांची आज जनमानसातली ओळख आहे ती, बैठकीची लावणी गाणारी गायिका म्हणूनच!

लेख वाचा…




देवकन्या!

ते केवळ गायन नव्हतं, तो सुब्बुलक्ष्मींचा सतत चाललेला रियाझ होता – आपलं गाणं देवाप्रति पोचवण्याचा!

लेख वाचा…


एकलीच बशिल्ली मेनकाबा

आयुष्याचं उत्तरपर्व गोव्यातील फोंड्याच्या शांतादुर्गा मंदिराजवळ असलेल्या स्नेहमंदिर वृद्धाश्रमात व्यतीत करणाऱ्या प्रसिद्ध गायिका-नर्तिका मेनकाबाई शिरोडकरही अशाच झुरल्या असतील का आपल्या माणसांसाठी?

लेख वाचा…


आर्यगंधर्व

बालगंधर्वांनाही ज्यांच्या लावण्या प्रिय होत्या, त्या कौसल्याबाई कोपरगावकर यांची नावनिशाणीच आज कालपटलावरून पुसली गेली आहे, जणू काही कौसल्याबाई झाल्याच नाहीत…

लेख वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *