फॉन्ट साइज वाढवा

‘कृष्णा नी बेगने बरो, बेगने बरो मुखवन्नु तोरो’ हे कृष्णगीत आळवण्याची टी. बालसरस्वती अम्माची ती काही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी तिने कितीदा तरी हे गीत गायलं होतं आणि त्यावरच्या तिच्या अभिनयाने रसिक कितीदा तरी मंत्रमुग्ध झाले होते. अन् तरीही त्या दिवशीची गोष्ट काही निराळीच होती… दीर्घ आजारपणानंतर टी. बालसरस्वती (तंजाऊर बालसरस्वती) पुन्हा एकदा नृत्य करण्याच्या मनःस्थितीत होती. मात्र पुन्हा रसिकांसमोर जाण्याआधी तिला कर्नाटकातील उडुपी येथील कृष्णाचं दर्शन घ्यायचं होतं. तशीही बालम्मा कृष्णभक्त होतीच, परंतु या वेळी तिला कुणीतरी मुद्दामच सांगितलं होतं, की तू उडुपी कृष्णाला जाऊन ये. बघ, त्याच्या दर्शनाने तू पुन्हा एकदा उभारी घेशील… आणि अगदी तसंच झालं. १९६१ सालातला तो कुठलातरी दिवस होता आणि त्या दिवसाची ती भावरम्य सकाळ. अनेक भक्तांप्रमाणेच टी. बालसरस्वती अम्मा उडुपी कृष्णाच्या अगदी सन्निध होती. गाभाऱ्यातील कृष्णाच्या त्या रेखीव मूर्तीवर साऱ्याच भक्तांचे डोळे खिळलेले होते. कृष्णाचं ते रूप किती डोळ्यांत साठवू अन् किती नको, असंच प्रत्येकाला झालेलं… एकप्रकारे सारेच असे नादावले गेलेले असताना, अचानक गाभाऱ्यासमोरून पुरंदरदासांच्या प्रसिद्ध गाण्याचे सूर उमलतात- ‘कृष्णा नी बेगने बरो, बेगने बरो मुखवन्नु तोरो’… म्हणजे यशोदा म्हणते आहे, ‘कृष्णा लवकर ये रे, मला तुझं मुख दाखव बघू…’ गाणं कानावर पडताच साऱ्यांच्याच नजरा त्या सुरांच्या दिशेने वळतात आणि तिथेच खिळतात. कारण हिरव्या काठाची आणि मोतिया रंगाची साडी नेसलेली टी. बालसरस्वती कृष्णपद म्हणत असते आणि त्या पदातील आशयाला साजेसं अलवार नृत्यही सादर करत असते. खरंतर त्या वेळी बालम्माचं वय होतं चाळीस-पंचेचाळीस आणि ती तेव्हा बऱ्यापैकी थोराडही दिसू लागली होती. पण त्या क्षणी तिचं वय किंवा तिचं दिसणं महत्त्वाचं नव्हतंच. उडुपी कृष्णाकडे भावभक्तीने पाहत असताना अचानकच तिची तंद्रा लागली होती आणि तिलाही काही कळण्याआधीच तिच्या मुखातून गाणं उमटलं होतं नि शरीर डोलायला लागलं होतं.

त्या वेळी बालम्माच्या गाण्यात आणि नृत्यात अशी काही आर्तता, व्याकूळता भरून राहिली होती, की कुणाच्याही नजरा तिच्यावरून हटायला तयारच नव्हत्या. इतकी तिच्या गाण्याची-नृत्याची भूल उपस्थित भक्तांना पडली होती. अगदी मंदिरातील पुजारीही अवाक् होऊन तिच्याकडे पाहत होते. तो नजाराच काही वेगळा होता… सगळ्यांची भावसमाधी लागली होती.

… इतक्यात त्या भावसमाधीचा भंग करणारा कुणाचातरी कर्कश्श सूर सगळ्यांच्या कानावर पडला- ‘मंदिरात गाणं आणि नृत्य करण्यावर कायद्याने बंदी आहे, हे ठाऊक नाही का तुम्हाला? चला आधी बाहेर व्हा बघू…’ परंतु त्या व्यक्तीचं वाक्य पूर्ण होण्याआधीच मंदिरातील भक्तांनी त्या व्यक्तीला अलगद वर उचललं आणि त्याला मंदिराबाहेर नेऊन सोडलं. जणू काही तो वाट चुकलेला प्राणी होता… अन् इकडे बालम्माचं गाणं आणि नृत्य अखंड सुरूच असतं… पायात तोडे, कंबरेला मेखला, संपूर्ण अंगाला चंदन उटी लावलेल्या आणि पीतांबर नेसून बासरी वाजवणाऱ्या बाळकृष्णाला ती नाना तऱ्हेने आळवत असते… शेवटी तो येतो, तर त्याचं तोंड मातीने माखलेलं असतं. तेव्हा ती त्याला रागावते आणि तोंड उघडायला सांगते. तो ही हसत हसत तोंड उघडतो, तर तिला त्याच्या तोंडात संपूर्ण विश्वाचं दर्शन घडतं… ते पाहून अवाक् झालेली ती यशोदा म्हणते- बाळा तू तुझ्या आईला विश्वाचं दर्शन घडवलंस… तू ‘जगदोद्धारका नम्म… उडुपी कृष्णा…’ म्हणजे जगाचा उद्धार करणारा माझा उडुपी कृ्ष्ण आहेस… हे सारं बालम्माने आपल्या गाण्यातून-अभिनयातून त्या वेळी इतकं समरस होऊन सादर केलं की क्षणभर मंदिरातल्या भक्तांनाही वाटलं की आता गाभाऱ्यातला हा दगडाचा उडुपी कृष्ण खरोखरच तिच्या कुशीत शिरून तिला बिलगतो की काय…

म्हणूनच म्हटलं की यापूर्वीही बालसरस्वती अम्माने किती तरी वेळा हे कृष्णपद आपल्या भरतनाट्यमच्या कार्यक्रमात सादर केलं होतं आणि प्रत्येक वेळी तिला त्यासाठी दादही मिळालेली होती. तरीही उडुपी कृष्णमंदिरात तिने सादर केलेलं ‘कृष्णा नी बेगने बरो, बेगने बरो मुखवन्नु तोरो’ काही वेगळंच होतं. आणि ती काही तरी वेगळीच अनुभूती असल्याची जाणीव खुद्द बालम्मालाही झाली होती. म्हणूनच उडुपी श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन ती घाईघाईत पुन्हा मद्रासला (आता चेन्नई) आपल्या घरी परतली. मंदिरातला आपला अनुभव कधी एकदा आपल्या आईला सांगतोय असं तिला झालं होतं. त्या वेळी बालम्मा मद्रासला एगमोर परिसरात राहत होती. आणि खरोखरच घरात शिरताच आणि समोर आई म्हणजे जयाम्माळ दिसताच बालम्मा तिला म्हणाली- ‘आई, कोणत्या शब्दांत सांगू, मंदिरातला त्या दिवशीचा अनुभव. मी तशी अनुभूती त्यापूर्वी कधीही घेतली नव्हती. मी ‘कृष्णा नी बेगने बरो…’ गायला सुरुवात केली आणि मला वाटलं तो उडुपी श्रीकृष्ण खरोखरच माझ्यासमोर प्रकटला आहे. आई, किती छान झालं असतं ना त्याच वेळी कृष्णाने मलाही त्याच्यासोबत नेलं असतं तर…’

हे सांगतानाचे बालम्माच्या चेहऱ्यावरील भाव पाहून हरखून गेलेल्या जयाम्माळ आपल्या लाडक्या लेकीला म्हणाल्या- ‘हो मलाही तसंच वाटतं, उडुपी श्रीकृष्णाने तसं करायला हवं होतं. किती भाग्यशाली बाब ठरली असती ती…’

देवाप्रतीची ही पराकोटीची समर्पणाची भावना कुठून आली असेल या मायलेकींमध्ये? तर याचं उत्तर अगदी सोपं आहे – त्यांच्या देवदासी प्रथेतून! बालम्मा काय, तिची आई जयाम्माळ काय किंवा तिची आजी वीणा धनम्माळ काय… साऱ्याजणी देवदासी परंपरेतीलच होत्या. खरंतर मंदिरातील नृत्य-गायन सोडूनही बालम्माच्या मातृपरंपरेला खूप वर्षं झाली होती. तिची आजी वीणा धनम्माळ या तंजवरच्या भोसलेराजांच्या दरबारातल्या प्रसिद्ध वीणावादक होत्या. तर वीणा धनम्माळ यांची आजी कामाक्षीअम्माळ आणि कामाक्षीअम्माळ यांची आजी पापम्माळ या देखील तंजावरच्या दरबारात गायिका-नर्तिका म्हणून प्रख्यात होत्या. मात्र या कलांचं मूळ त्यांच्या देवदासी असण्यात होतं आणि म्हणूनच त्यांच्या कलेचा आत्मा देवाच्या समर्पणातच दडलेला होता. त्या राजा व इतर दरबारी लोकांसमोर नृत्य-गायन सादर करीत असल्या, तरी त्यांच्या मनात, आपण देवासाठी हे सादर करतोय, हीच भावना असायची. उडुपी श्रीकृष्ण मंदिरात बालम्माच्या मनात याच भावनेचा परमोत्कर्ष साधला गेला आणि तिला श्रीकृष्णभेटीची अनुभूती आली.

तसंही बालम्मा आणि श्रीकृष्णाचं नातं, तिच्या अगदी लहानपणापासूनचं. त्या वेळी बालम्माच्या कुटुंबाचं वास्तव्य तत्कालीन मद्रासमधील संगीताची पंढरी असलेल्या जॉर्ज टाऊन येथे होतं. बालम्मा आणि तिच्या कुटुंब वास्तव्य पहिल्या मजल्यावर होतं, तर घरमालकाचं तळमजल्यावर. या घरमालकाची बायको म्हणजे कामकोटीअम्माळ कृष्णभक्त होत्या. त्यांच्या घरात वेगवेगळ्या भिंतींवर तंजावरच्या नामांकित कलाकारांनी रेखाटलेली कृष्णाची वेगवेगळ्या रूपातली चित्रं होती आणि या सगळ्या कृष्णांना जागवण्यासाठी कामकोटीअम्माळ यांना लहानगी बालम्मा लागायची. बालम्मा तेव्हा अवघी चार-पाच वर्षांची असेल. पण सकाळ झाली की खालून कामकोटीअम्माळची बालम्माच्या नावाने हाकाटी सुरू व्हायची. मग बालम्मा खाली जाऊन आपल्या बोबड्या गीतांनी आणि नृत्याने कृष्णाला उठवत असे. पण केवळ सकाळीच उठवणं नाही, बालम्मा दिवसातून सहा वेळा कामकोटीअम्माळच्या कृष्णाची पूजा करायच्या. लहानपणापासून कृष्णभक्तीचा झालेला हा सारा संस्कारच पुढे बालम्माच्या ‘कृष्णा नी बेगने बरो…’ या गाण्यात नि नृत्यातत उतरत असे. त्यामुळे या कृष्णपदाव्यतिरिक्त शकडो पदं त्यांना यायची आणि त्या पदांवर त्या सुरेख नृत्य करायच्या, तरीही ‘कृष्णा नी बेगने बरो…’ हा कायमच बालम्माच्या सादरीकरणातला कंठमणी होता. जिथे कुठे तिचा कार्यक्रम असेल, तिला ‘कृष्णा नी बेगने बरो…’ सादर करावंच लागायचं.

बालम्माच्या घरात कलावारसा असला, तरी हा कलावारसा प्रामुख्याने गायन-वादनाचा होता. नृत्यापेक्षाही गायनाला त्यांच्या मातृवारशाने झुकतं माप दिलं होतं. साहजिकच बालम्मा यांच्यावरही पहिले संस्कार झाले ते गाण्याचेच आणि ते आजीपेक्षाही त्यांच्या आईने जयाम्माळ यांनी केले होते. कारण जयाम्माळ या त्या काळात गायिका म्हणून प्रख्यात होत्या. मुळात आवाजही चांगला असल्यामुळे बालम्मा गाण्यातच चमकदार कामगिरी करतील असं सगळ्यांना वाटत होतं. परंतु बालम्मा यांचा ओढा गाण्याबरोबरच नृत्याकडेही होता. वीणा धनम्माळ, जयम्माळ यांच्या प्रमाणेच देवदासी परंपरेतून आलेल्या मइलापूर गौरीअम्माळ यांचा एकमेकांशी चांगला घरोबा होता. गौरीअम्माळ या नर्तिका म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांचं नृत्य लहानग्या बालम्मा यांना आवडत असे आणि त्या तसं करण्याची प्रयत्नही करत असत. यातूनच जयम्माळ यांना आपल्या लेकीच्या अंगातील नृत्याचं कसबही जाणवलं. मात्र लेकीला नृत्य शिकवायचं की नाही, या द्विधावस्थेत त्या सापडल्या. कारण वीणा धनम्माळ यांचा ओढा नृत्यापेक्षाही संगीताकडे अधिक होता आणि घरात त्यांचाच शब्द अंतिम मानला जायचा. मग एकदा बालम्मा यांची नृत्यातील आवड बघून, खुद्द गौरीअम्माळ आणि तेव्हा बालम्मा यांच्या शेजारीच राहत असलेले प्रसिद्ध नृत्यगुरू कंदप्पा पिल्लई या दोघांनी मिळून वीणा धनम्माळ यांच्याकडे विषय काढला, तेव्हा वीणा धनम्माळ यांनी साफच नकार दिला. पण तो विषय तिथेच संपला नाही. काही दिवसांनी मग हिंमत करून जयाम्माळ यांनी स्वतःच तो विषय वीणा धनम्माळ यांच्याकडे काढला, तेव्हा बालम्मा गाणं सोडणार नाही, या अटीवर वीणा धनम्माळ यांनी त्यांच्या नृत्य शिकण्याला परवानगी दिली… आणि सहा वर्षाची बालम्मा कंदप्पा पिल्लई यांच्याकडे भरतनाट्यम नृत्याचे धडे गिरवू लागली.

कंदप्पा पिल्लई यांची नृत्यपरंपरा थोर होती. ज्या काळात तंजावरच्या दरबारात वीणा धनम्माळ यांच्या आई-आजी संगीतकार म्हणून कार्यरत होत्या, त्याच काळात दरबारात चिन्नय्या, पोन्नय्या, सदाशिवम् आणि वाडिवेलू हे चार भाऊ नृत्यगुरू म्हणून प्रसिद्ध होते. आज सादर होत असलेल्या भरतनाट्यमची मूळ रूपरेखा या चार भावांनीच तयार केलेली आहे. या चार नृत्यगुरुंचाच वारसा कंदप्पा पिल्लई यांना लाभलेला होता. त्यामुळे त्यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवण्याची मिळालेली संधी ही बालसरस्वती अम्मा यांच्यासाठी मोठीच उपलब्धी होती आणि बालम्मा यांनी या संधीचं सोनं केलं. परंपरेनं चालत आलेलं सारं नृत्यकौशल्य बालम्मानी आपल्या नृत्यगुरूकडून शिकून घेतलंच, पण त्याशिवाय गौरीअम्माकडे त्यांनी नृत्यातील अभिनयाचे धडेही गिरवले. सोबतच त्यांच्याकडे आईचा-आजीचा संगीताचा वारसाही होता. आई-आजीकडे बालम्मांनी गाण्याचं रीतसर शिक्षण घेतलेलं असल्यामुळेच आपल्या बहुतेक कार्यक्रमात त्या स्वतःच पदं म्हणायच्या आणि त्यावर नृत्य करायच्या. महत्त्वाचं म्हणजे आई-आजीकडून त्यांना भरतनाट्यमसाठी म्हणायच्या असंख्य नृत्यपदांची देणगी मिळालेली होती. भक्तिपर आणि शृंगारिक अशा दोन्ही प्रकारच्या पदांचा त्यांच्याकडे अक्षऱशः खजिना होता. नृत्याबरोबरच गाण्यावर असलेली ही हुकुमत बालम्मासाठी फायद्याची ठरली आणि त्या जणू भरतनाट्यमच्या अलम दुनियेत एकमेवाद्वितीय ठरल्या.

टी. बालसरस्वती रुढार्थाने दिसायला सुंदर नव्हत्या. किंवा त्यांचं शरीरही एखाद्या नर्तिकेला साजेसं कमनीय नव्हतं. परंतु त्या जेव्हा नृत्य करायच्या, तेव्हा रंगमंचाचा सारा अवकाश त्यांच्या नृत्याने उजळून निघायचा. त्यांच्यावरून नजरच हटवू नये, अशी अवस्था त्यांचं नृत्य पाहणाऱ्या प्रत्येकाची होत असे आणि त्याचं कारण होतं, बालसरस्वती यांच्या नृत्यात असलेली अजब लय. एकप्रकारचा सुरेख डौल त्यांच्या नृत्यात साधला जायचा आणि तो अतिशय आकर्षक असायचा. त्यामुळेच साधारणपणे 1930-35 च्या आसपासच्या एका कार्यक्रमाची आठवण सांगताना प्रसिद्ध लेखक आर. के नारायण यांनी एके ठिकाणी लिहून ठेवलंय की- ‘भरतनाट्यम ही किती समृद्ध कला आहे, त्याची जाणीव बाला यांनीच युवावर्गाला करून दिली. रंगमंचावर इतर कोणतंही सजावटीचं साधन नसताना केवळ मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात ती जे काही नृत्य सादर करत असे, ते म्हणजे एक जादूच होती. तिच्या नृत्याची जादू बघताना प्रेक्षागृहात बसलेल्या प्रेक्षकांचं रूपांतर कलेच्या प्रशंसकांमध्ये कधी होत असे, तेच कळत नसे…’

संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष राहिलेले डॉ. नारायण मेनन तर काही वर्षांपूर्वी थेटच म्हणाले होते- ‘टी. बालसरस्वती यांच्यासारखी दुसरी नृत्यांगना होऊच शकत नाही. तिला नृत्यासंदर्भात जे शिस्तबद्ध धडे आणि प्रशिक्षण मिळालेलं होतं, नृत्यातील बारीक काटेकोर तपशील जे तिने आत्मसात केले होते ते आणखी कुणी आत्मसात करणं अशक्य आहे. बाकी नृत्यांगना कदाचित अधिक आकर्षक असतील, अधिक चपळाईने नृत्य सादर करत असतील… आणि कदाचित त्यांची इतर काही वैशिष्ट्य असू शकतील. पण बालसरस्वतीला भरतनाट्यमचं जे खरं सार उमगलं होतं, ती दैवी देणगीच होती.’

प्रसिद्ध इंग्रजी कवी आणि समीक्षक निस्सीम इझिकेल यांनीही ‘टाइम्स ऑफ इंडिया’त लिहिलेल्या लेखात टी. बालसरस्वती अम्मा यांचं खूपच कौतुक केलं होतं. ‘मातब्बर’ हा शब्द तिच्याशिवाय इतर कुणालाच शोभून दिसत नाही, असं त्यांनी आपल्या या लेखात म्हटलं होतं आणि ते खरंच होतं. कारण अभिनयात त्यांच्या इतकं सरस आजही कुणी नाही किंवा शारीर हावभावांतून त्यांच्या इतकं सुरेख नृत्य कुणीच करू शकत नाही, असंच आजही म्हटलं जातं. किंबहुना आजही भरतनाट्यमच्या रंगमंचावरील जादुगारीण म्हणूनच टी. बालसरस्वती अम्मा ओळखल्या जातात.

सुरुवातीच्या तरुण वयातील आपल्या नृत्याने टी. बालसरस्वती यांनी समस्त रसिकांना, नृत्याच्या अभ्यासकांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं होतं. मात्र त्यांच्या नृत्याची वाहव्वा सर्वदूर पसरण्याआधीच त्या काहीशा आजारी पडल्या आणि त्यात त्यांची अनेक वर्षँ वाया गेली. त्या आजारातून बऱ्या झाल्यावरच त्या कर्नाटकातील उडुपी श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायला गेल्या होत्या. त्या दर्शनाने त्यांचा खरोखरच कायापालट झाला. त्यानंतरच त्यांनी खऱ्या अर्थाने साऱ्य़ा जगावर राज्य केलं…

… अजूनही करताहेत. आजही भरतनाट्यम म्हटलं की सगळ्यात आधी करंगळीवर त्यांचंच नाव येतं आणि जे कालिदासाच्या संदर्भात म्हटलं जातं, तेच टी. बालसरस्वती यांच्याबाबत म्हणावं लागतं-

‘पुरा कवीनां गणना प्रसंगे, कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास:

अद्यापि तद्तुल्य कवेर्भावादि, अनामिका सार्थवती बभूव।’

म्हणजे पूर्वी कवींची गणना करताना, पहिल्याच बोटावर म्हणजे करंगळीवर कालिदासाचं नाव विराजमान झालं. मात्र नंतर त्याच्या तोडीचा कुणीच कवी न झाल्यामुळे बाजूच्या बोटाने आपलं अनामिका हे नाव सार्थ केलं. ‘कवीनां’ ऐवजी ‘नर्तिकानां’ असा बदल केला की हेच प्रशंसोद्गार टी. बालसरस्वतीअम्मा यांना तंतोतंत लागू पडतात!

– मुकुंद कुळे

RohanSahityaMaifaljpg-1-1

Sundarabai
या सदरातील लेख…

‘बाई’ सुंदराबाई

बाई सुंदराबाईंनी एवढं वैविध्यपूर्ण गायन केलं, तरी त्यांची आज जनमानसातली ओळख आहे ती, बैठकीची लावणी गाणारी गायिका म्हणूनच!

लेख वाचा…
देवकन्या!

ते केवळ गायन नव्हतं, तो सुब्बुलक्ष्मींचा सतत चाललेला रियाझ होता – आपलं गाणं देवाप्रति पोचवण्याचा!

लेख वाचा…


एकलीच बशिल्ली मेनकाबा

आयुष्याचं उत्तरपर्व गोव्यातील फोंड्याच्या शांतादुर्गा मंदिराजवळ असलेल्या स्नेहमंदिर वृद्धाश्रमात व्यतीत करणाऱ्या प्रसिद्ध गायिका-नर्तिका मेनकाबाई शिरोडकरही अशाच झुरल्या असतील का आपल्या माणसांसाठी?

लेख वाचा…


आर्यगंधर्व

बालगंधर्वांनाही ज्यांच्या लावण्या प्रिय होत्या, त्या कौसल्याबाई कोपरगावकर यांची नावनिशाणीच आज कालपटलावरून पुसली गेली आहे, जणू काही कौसल्याबाई झाल्याच नाहीत…

लेख वाचा…


विद्यासुंदरी

शरीराची गरज असेपर्यंत आश्रय द्यायचा आणि ती भागली की वाऱ्यावर सोडायचं, या पुरुषी वृत्तीचा तिला वीट आला नि संतापानेच तिने निश्चय केला- आता नागरत्नम्माला मोठी कलावंत करायचं !

लेख वाचा…


बैठकीच्या लावणीतलं मानाचं पान

भामाबाईंच्या कलेचं कोणत्याच प्रकारचं दस्तऐवजीकरण आज उपलब्ध नाहीय. परंपरेतील माणसं त्यांचं नाव घेताना आजही कानाला हात लावतात, हेच भामाबाईंचं मोठेपण! 

लेख वाचा…


बैठकीच्या लावणीतलं मानाचं पान

थोड्याच काळात रसूलन एखाद्या जाणत्या गायिकेसारखी गायला लागली. बघता बघता बनारस घराण्याची आन-बान-शान बनली! 

लेख वाचा…


बैठकीच्या लावणीतला टवटवीत ‘गुलाब’

…आणि अवघ्या बारा-तेरा वर्षांच्या गुलाबबाई ‘गुलाबबाई संगमनेरकर संगीतबारी’च्या मालकीण झाल्या.  

लेख वाचा…


जगन्नाथाची शेवटची धर्मपत्नी

…ती होती पुरीच्या जगन्नाथाची शेवटची देवदासी, त्याची अखेरची धर्मपत्नी… 

लेख वाचा…


गौरीअम्मा : कलेची गंगोत्री

तरीही आमच्या कलाजगताला गौरीअम्माविषयी फार काही ठाऊक नाही. असणार तरी कसं म्हणा? शेवटी गौरीअम्मा बोलूनचालून एक देवदासी तर होती…  

लेख वाचा…


विद्याधरीबाई : बनारसची शानो शौकत!

मुळात विद्याधरीबाईंच्या स्वभावात जात्याच मार्दव होतं. त्यामुळे गाणं असो वा व्यवहारातलं वागणं ते कधी एकमेकांपासून दूर गेलं नाही.  

लेख वाचा…


मुद्दुपलनी आणि तिचं शृंगारकाव्य…

भारतीय शृंगार साहित्यात मुद्दुपलनीचं ‘राधिका सांत्वनमु’ हे शृंगारकाव्य आगळवेगळं आहे, कारण ते पुरुषाऐवजी एका स्त्रीने लिहिलेलं आहे. 

लेख वाचा…


देवदासी नृत्याची तारणहारव्य…

देवदासीआटम ते भरतनाट्यम हे परिवर्तन होताना, मूळ कलावंतसमाजाचं अस्तित्वच पुसलं गेलं.. 

लेख वाचा…


बैठकीच्या लावणीची ‘मोहना’माया

बैठकीच्या लावणीचं हे कलामूल्य जपण्याचं काम गोदावरीबाई, भामाबाई, यमुनाबाई, गुलाबबाई यांच्यानंतर मोहनाबाईंनी एखाद्या तपस्विनीप्रमाणे केलं. 

लेख वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *