फॉन्ट साइज वाढवा

रात्रीची वेळ आहे… सगळा आसमंत शांत झोपला आहे… आपल्या श्वासाचं संगीत तेवढं ऐकू येतं आहे… आत शांत शांत वाटतं आहे… अशा वेळी शेजारचं आवडतं पुस्तक हाती घ्यावं… आधी त्यावरून हात फिरवून माया करावी… पानं चाळून जरा गुदगुल्या कराव्यात… मग एकदम मधलं कुठलं तरी पान उघडून खोलवर वास घ्यावा… त्या धुंदीत पुस्तक वाचायला सुरुवात करावी… आपल्या मन:चक्षूंसमोर त्या पुस्तकातलं सगळं पर्यावरण उभं राहतं. कोकणाचं वर्णन असेल, तर समुद्राची गाज ऐकू यायला लागते. हिमालयाचा उल्लेख असेल, तर त्या विराट भव्यतेच्या जाणिवेनं रोमांच उभे राहतात… भय असेल तर अंगावर काटा फुलतो, प्रणय असेल तर शिरशिरी दाटून येते… दु:ख असेल तर डोळे झरू लागतात, आनंद असेल तर चित्तवृत्ती फुलून येतात… बघता बघता काळाचं भान हरपतं. आपण कुठल्या तरी दुसऱ्या दुनियेत हरवून जातो… पहाटे कधी तरी पुस्तक संपतं आणि ते तसंच छातीवर ठेवून आपला डोळा लागतो…
अस्संच होतं ना अगदी! पुस्तकांचा आणि आपला रोमान्स हा असाच आहे. त्या छापील शब्दांनी आपलं जगणं समृद्ध केलंय. आपल्या प्रत्येक भावनेची चौकट शब्दांच्या महिरपीनं सजवली आहे. आपल्या जाणिवांच्या कक्षा रुंदावल्या आहेत. आपल्या दहा बाय दहाच्या खोलीत आपण जगाचे राजे असल्याचा फील दिलाय. स्मरणाच्या मखमली पेटीत जपून ठेवायला किती तरी आठवणी दिल्या आहेत. पुस्तकांनी आपल्याला शब्दांची श्रीमंती दिली, जाणिवांमधून येणारी शहाणीव दिली, अनुभवांची शिदोरी दिली, भोवतालाची जाण दिली आणि समष्टीचं भान दिलं.
सध्या दृकश्राव्य माध्यमांची विपुलता आहे. माणसाला दृकश्राव्य माध्यमांतून कुठल्याही कलेचं ग्रहण किंवा आस्वादन स्वाभाविकच सोपं जातं. माणसाचा कल साहजिकच सोप्या गोष्टींकडे असतो. त्यामुळे पुस्तकं वाचण्याऐवजी सिनेमा किंवा वेबसीरीज बघणं सहजसोपं वाटतं. मात्र, पुस्तकं मूकपणे आपल्याशी जो संवाद साधत असतात, तो प्रत्यय दृकश्राव्य माध्यमांतून येत नाही. पुस्तकाचं वाचन एकट्यानं करावं लागत असल्यानं हा एक वैयक्तिक सोहळाच होतो. आपल्या मनाची झेप फार मोठी असल्यानं हवा तेवढा मोठा कॅनव्हास मनाला निर्माण करता येतो आणि शब्दांच्या रूपानं दिसणारी चित्रं आपल्या आवडीच्या रंगांत रंगवून भव्य करून पाहता येतात. शब्दांमध्ये मूलत:च एक चित्र दडलेलं असतं. ते चित्र आपल्या मनाला हवं तसं रंगवता येतं. वर्णनातून येणारे तपशील त्या चित्रांत भरता येतात. लेखकासोबतच वाचकाच्याही सर्जनाला वाव असतो. म्हणूनच एका अर्थानं तो रोमान्स असतो. शब्दांशी असा रोमान्स करता येण्यासाठी वाचक म्हणून आपल्यातही एक प्रगल्भता असावी, अशी जरा पूर्वअट असते. ज्या भाषेत पुस्तक लिहिलंय ती भाषा आपल्याला अवगत असणं ही तर अगदी प्राथमिक पूर्वअट झाली; पण त्या पुस्तकांच्या दोन ओळींमध्ये न लिहिलेलाही आशय वाचता यायला हवा. त्यासाठीच ही प्रगल्भता लागते. महत्त्वाचं म्हणजे पुस्तकं वाचूनच ही प्रगल्भता आणि ही किमान पात्रता आपल्या अंगी येत असते. म्हणून तर आपण जसजसे प्रौढ होत जातो किंवा प्रगल्भ होत जातो तसतशी आपली वाचनाची आवडही बदलते. (किंवा, बदलायला हवी, असं म्हणू या!) आपली ग्रहणशक्ती वाढली, आकलन वाढलं, की मग मुरलेल्या लोणच्यासारखा हा रोमान्सही चवदार होतो. आपल्याला माणूस म्हणून घडवण्यात पुस्तकांचा असा जैव वाटा असतो. पुस्तकाचं कव्हर, बाइंडिंग, रूप, गंध या सर्वांसकट पुस्तक आवडावं लागतं. अगदी शब्दांचा फाँट किंवा टाइपही आपल्या ‘टाइप’चा नसेल, तर ते ‘स्थळ’ आपोआप नाकारलं जातं. पुस्तक आधी डोळ्यांना आवडावं लागतं, मग मनाला!
उत्तम बांधणी, उत्कृष्ट दर्जाचा कागद, सुबक छपाई आणि दर्जेदार मुद्रितशोधन असलं, की पुस्तक हातात घ्यावंसं वाटतं. मग ते आपोआप वाचलं जातं. नीट जपून ठेवलं जातं… अगदी बुकमार्कसह! पुस्तकवाचन ही एका अर्थानं नशाच आहे. एखादं चांगलं पुस्तक वाचून झालं, की कित्येक दिवस दुसरं काहीच वाचू नये, बघू नये असं वाटतं. त्याचं कारण आपल्याला त्यातलं अक्षर न् अक्षर आपल्यात मुरवून घ्यायचं असतं. मेंदूत गिरवून घ्यायचं असतं. एकदा का ती मेंदूतली छपाई पूर्ण झाली, की मग ते पुस्तक आपल्या स्मरणाच्या मखमली पेटीत रेशमी बांधणीत जाऊन बसतं. आयुष्यभर त्यातली वाक्यं सुविचारांसारखी आठवू लागतात. त्यातले शब्द, चित्रं, फाँट सगळं सगळं मेंदूच्या मेमरीकार्डमध्ये कायमचं सेव्ह होतं.
चला, या सदरातून आपल्या पुस्तकप्रेमाला उजाळा देऊ या. पुस्तकांविषयी, साहित्याविषयी, साहित्यिकांविषयी, साहित्य जगतातल्या घडामोडींविषयी गप्पा मारू या… बोलू या…

– श्रीपाद ब्रह्मे

या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
‘पेन’गोष्टी

या सदरातील लेख…

बोल्ड अँड हँडसम

वाचकांच्या मनात ‘पुढे काय होणार?’ हा तीनाक्षरी प्रश्न जन्माला येण्यातच हेरकथांचं, रहस्यकथांचं सार्थक असतं.

लेख वाचा…


लेख झाला का?

साधारणत: मृगाचा पहिला पाऊस पडून गेला, की दिवाळी अंक काढणारी संपादक मंडळी एकदम ‘चार्ज’ होतात.

लेख वाचा…


येणे स्वरयज्ञे तोषावें…

स्वरांच्या या परब्रह्माला साक्षात बघण्याचे, भेटण्याचे अगदी मोजके प्रसंग माझ्या आयुष्यात आले. माझ्या पत्रकारितेच्या पेशामुळंच हे शक्य झालं.

लेख वाचा…


कलेचा आस्वाद कसा घ्यावा?

कुठलीही सूक्ष्म, अमूर्त किंवा तरल भावना जाणण्याचा प्रयत्नच न करणं किंवा त्या गोष्टी हसून, चेष्टेवारी नेऊन सोडून देणं हे सध्या सर्रास होताना दिसतंय.

लेख वाचा…


कलंदराचे कैवल्यगान…

रसिक म्हणून आपल्या मनातला हा घनघोर अंधार ‘मी वसंतराव’ एखादी ज्योत होऊन उजळवतो.

लेख वाचा…


वऱ्हाड निघालंय उदगीरला…

रसिक म्हणून आपल्या मनातला हा घनघोर अंधार ‘मी वसंतराव’ एखादी ज्योत होऊन उजळवतो.

लेख वाचा…


उत्सव बहु थोर होत…

आपल्याला माणूस म्हणून जरा अधिक उन्नत व्हायचे असेल, तर या उत्सवाला पर्याय नाही!

लेख वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *