• प्रसंग १:

संगीतकार कल्याणजी-आनंदजी जोडीतले आनंदजी शाह एक दिवस प्रेमभंग झालेल्या आपल्या मित्राची कथा गीतकार इंदीवर यांना ऐकवत होते. प्रेमाच्या आणाभाका घेऊन एका मुलीने आनंदजींच्या मित्राला फसवलं होतं.

“ये कस्मे, ये वादे, ये प्यार वफा सिर्फ बाते होती है, और कुछ नहीं”, आनंदजी शेवटी हताश होऊन म्हणाले.

“व्वा आनंदजी, काय बोललात. तुमची हरकत नसेल, तर मी माझ्या गाण्यासाठी ही ओळ मुखडा म्हणून वापरू का?”, गीतकार इंदीवर यांनी विचारलं.      

आनंदजींनी होकार दिल्यावर गाणं लिहून इंदीवर यांनी कागद आनंदजींकडे सोपवला. ‘उपकार’ सिनेमातील ते गाणं होतं,  

‘कसमे वादे प्यार वफ़ा सब बातें हैं, बातों का क्या…’

  • प्रसंग २:

‘त्रिशूल’ सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यावर निर्माते गुलशन राय, दिग्दर्शक यश चोप्रा आणि लेखक सलीम-जावेद यांनी ‘त्रिशूल’ चा ट्रायल शो बघितला. ट्रायल शो बघून सगळ्यांनाच जाणवलं, की सिनेमा हवा तसा जमून आला नाहीये. “मेरे पिच्चर को बचाओ”, अशी गुलशन राय यांनी विनंती केल्यावर, सलीम-जावेद आणि यश चोप्रा यांनी काही नवीन प्रसंग सिनेमात समाविष्ट केले. 

अमिताभ अँब्युलन्स घेऊन गुंड माधोसिंगला मारायला जातो तो प्रसंग सिनेमा पूर्ण चित्रित झाल्यावर नव्याने टाकण्यात आला. चित्रपट बघतांना मात्र हे बिलकूल जाणवत नाही, कारण ती होती सिनेमा एडिटरची कमाल. या प्रसंगाची आठवण सांगताना लेखक सलीम खान म्हणतात, Most of the times movies are not made, they are re-made.

  • प्रसंग ३:

‘दो बिघा जमीन’ साठी बिमल रॉयनी शम्भूच्या मुख्य रोलसाठी बलराज साहनी यांना निश्चित केल्यावर, सिनेमाच्या लेखकानी नाकं मुरडली. हा सुटाबुटातला उच्चभ्रू नायक गरीब शेतकयाच्या भूमिकेत? कसं शक्य आहे हे? बलराजनी हे आव्हान स्वीकारलं. चित्रीकरण सुरु होण्याच्या आधी त्यांनी बिमलदांकडे थोडासा अवधी मागितला. 

या काळांत आपला अवतार बदलून ते कलकत्याच्या रस्त्यावर चक्क हात रिक्षा चालवू लागले. थोड्या दिवसांनी दाढीचे खुंट वाढवलेले, मळकट कपड्यातील बलराज बघून सगळ्यांना धक्का बसला. बिमलदांची निवड अचूक ठरली होती.

सिनेमा तयार होत असतांना काय काय रंजक गोष्टी घडतात त्याची ही काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. सिनेमानिर्मितीची प्रक्रिया ही सिनेमा बघण्याइतकीच मनोरंजक असते. 

Cinema is a matter of what’s in the frame and what’s out असं हॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसेने म्हटलंय. ‘सिनेमा’चं बहुसंख्य भारतीयांना अतोनात वेड आहे. अर्थातच मी देखील त्याला अपवाद नाही. कळत्या वयापासून सिनेमे बघायला सुरुवात केल्यापासून सिनेमा नावाच्या माध्यमाने मला पुरतं झपाटून टाकलं. काही सिनेमे खूप आवडले, काही नाही आवडले. सिनेमा नक्की का आवडला किंवा नाही आवडला या प्रश्नाचं उत्तर देणं जरासं अवघड काम आहे.

माझ्या मते, कुठलाही सिनेमा एकदम टाकाऊ असा कधीच नसतो. काही नावडत्या सिनेमांत सुद्धा असे काही प्रसंग किंवा उच्च दर्जाच्या तांत्रिक बाजू होत्या, की त्यांच्या प्रेमात न पडणं माझ्यासाठी निव्वळ अशक्य होतं.

या सिनेमाप्रेमातून सिनेमातील अशा विविध प्रसंगाचा धांडोळा घेणं, त्यांच्या निर्मितीमागची प्रक्रिया समजून घेणं, त्यावर आधारित लेख, व्हिडिओ, मुलाखती बघणं हा एक नवीन छंद मला जडला. 

प्रत्येक सिनेमाची आपली अशी एक स्वतंत्र अशी भाषा असते. आपल्या सिनेमातून लेखक-दिग्दर्शकाला नक्की कोणता संदेश द्यायचा आहे? सिनेमांत ध्वनी आणि संगीताचा पूरक वापर कसा गेला? एखादी जाडजूड कादंबरी तीन तासांच्या सिनेमाच्या कथा-पटकथेत कशी रूपांतरित केली गेली? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याची मला आपसूक एक आवड निर्माण झाली. “वाह! क्या सीन है” हे सदर लिहिण्यामागे ही आवडच  मुखत्वे कारणीभूत आहे.  

सिनेमाविषयक लेख हे माहितीच्या आधारे लिहिले जातात. ते लिहितांना कल्पनेची भरारी मारण्यास वाव नसतो. ती माहिती तुम्ही किती रंजक पद्धतीने लिहिता यावरून तिचा दर्जा ठरतो. मी कोणी चित्रपट समीक्षक नाही, पण या सदराद्वारे मला आवडलेल्या सिनेमांतील काही प्रसंगाविषयी, त्यांच्या तपशिलाविषयी रंजकपणे लिहिण्याचा मी यथाशक्ती प्रयत्न केला आहे. 

सिनेमाविषयक हे सदर लिहितांना मी Youtube, इंटरनेटवर प्रकशित सिनेमाविषयक ब्लॉग्स, पोस्ट्स तसेच सिनेमाविषयक काही पुस्तकांतून संदर्भ घेतला आहे. या सगळ्यांचे माझ्यावर अनेक ऋण आहेत. कुठल्याही ऐकीव माहितीच्या आधारे हे लेख न लिहिता, खात्रीलायक माहितीच्या आधारे हे लेख लिहिण्याचा माझा उद्देश होता. 

माझे लेख वाचून वाचकांना सिनेमांतील तो प्रसंग बघण्याची किंवा आधी बघितला असेल तर पुन्हा बघण्याची इच्छा होऊन त्यामागील निर्मिती प्रक्रियेतला आनंद अनुभवता आला तर हे सदर लिहिण्यामागचा माझा उद्देश सफल झाला असंच मी म्हणेन.                          

हे लेख लिहिण्यास मला प्रोत्साहन दिल्याबाबदल रोहन प्रकाशनच्या नीता कुलकर्णी तसेच वेळोवेळी अमूल्य अभिप्राय दिल्याबद्दल देविका गोखले आणि मुख्य प्रकाशक श्री. चंपानेरकर यांचा मी मनापासून खूप आभारी आहे.

– उन्मेष खानवाले.   

(लेखक Veritas Software पुणे येथे Principal SQA Engineer म्हणून कार्यरत आहेत. वाचन, सिनेमाविषयक लिखाण या विषयांमध्ये त्यांची रुची आहे.)

या लेखमालिकेत एकूण ८ लेख आहेत.
लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –


1.वाह! क्या ‘सीन’ है -ट्रॉय
2.वाह! क्या ‘सीन’ है – ‘स्वदेस’
3.वाह! क्या ‘सीन’ है – उस्ताद हॉटेल
4.वाह! क्या ‘सीन’ है – छोटी सी बात
5.वाह! क्या ‘सीन’ है – मी वसंतराव
6.वाह! क्या ‘सीन’ है – ‘तुंबाड’
7.वाह! क्या ‘सीन’ है – लक्ष्य
8.वाह! क्या ‘सीन’ है – कंपनी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *