READING TIME – 6 MINS

बँकेतील नोकरी सांभाळून अमोल पालेकर तासनतास सत्यदेव दुबेंच्या नाटकाच्या तालमीला पडीक असायचे, ते त्यांना अभिनयाची आवड होती म्हणून नव्हे, तर त्यांना आवडणारी मुलगी तिथे तालमीला यायची म्हणून. एके दिवशी दुबेंनी अमोल मधील कलाकाराला हेरलं आणि मग अभिनय काय असतो हे माहित नसतांना दुबेंच्या हाताखाली अमोल पालेकरांची शिकवणी सुरु झाली. “शांतता कोर्ट चालू आहे!” या दुबेंच्या नाटकातील अमोलच्या कामाचं खूप कौतुक झालं.

अमोल पालेकरांचं नाटकातील काम बघून बासू चॅटर्जी यांनी त्यांच्या हिंदी सिनेमात काम करण्याची ऑफर दिली, पण पुढे काही कारणास्तव त्यांच्यावर arrogant चा शिक्का बसून ती भूमिका अनिल धवनला मिळाली. अमोल पालेकरांना पहिल्यांदा ऑफर केलेला तो सिनेमा होता, जया बच्चनसोबतचा “पिया का घर”! त्यानंतर पुन्हा बासुदांनी त्याला मनू भंडारीच्या “यही सच है” या कादंबरीवर आधारित “रजनीगंधा” हा सिनेमा ऑफर केला.

या सिनेमात ड्रामा नव्हता, व्हिलन नव्हता, फक्त एका तरुणीची अचानक एका वळणावर गाठ पडलेला तिचा पूर्व प्रियकर आणि सध्या तिच्यावर प्रेम करत असलेला प्रियकर यांत निवड करण्यात होत असलेली घालमेल मांडली होती. १९७४ साली आलेला “रजनीगंधा” सुपर हिट ठरला. मग १९७६ सालच्या बासुदांच्याच पुढच्या “छोटी सी बात” सिनेमातून अमोल पालेकरला “स्टार”ची खऱ्या अर्थाने ओळख मिळाली.

१९६० सालच्या School for Scoundrels या ब्रिटिश सिनेमांवर बेतलेल्या “छोटी सी बात” ची कथा अतिशय साधी, कोणाच्याही आयुष्यात घडणारी अशी आहे. अरुण प्रदीप (अमोल पालेकर) असं दोन नाव असलेला, नाकासमोर चालणारा एक मध्यमवर्गीय स्वप्नाळू तरुण आपलं प्रेम मिळवण्यासाठी बऱ्याच खटपटी करत असतो. बरं, या माणसाच्या पर्सनॅलिटीची जादू अशी असते, की याने कामासाठी बोलावल्यावर, याच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी रेडिओवर कॉमेंट्री ऐकतात, पण याचं काही ऐकत नाही आणि ऑफिसचा पीयून सुद्धा याला बघून कधी उभा राहत नाही. अरुणचं प्रेम असतं प्रभा नारायण  (विद्या सिन्हा) नावाच्या तरुणीवर. प्रभा सगळं माहीत असूनही, अरुणचं आपल्यासाठीचं झुरणं मस्त एन्जॉय करत असते, पण मनोमनी कुठेतरी तिला पण तो आवडलेला असतो.

choti si baat4

सिनेमांत खरा ट्विस्ट येतो, जेव्हा नागेश शास्त्री (असरानी) हा स्ट्रीट स्मार्ट तरुण कबाब में हड्डी बनून या प्रेमकथेत घुसतो. नागेशची स्टाईल, रुबाब आणि प्रभाची त्याच्याशी असलेली घट्ट मैत्री बघून अरुण अस्वस्थ होतो. नागेश टेबलटेनिस आणि चेस चॅम्पियन असतो. हॉटेलमधले वेटर, कुकसुद्धा या नागेशसरांना ओळखत असतात. भरीस भर म्हणजे नागेशकडे स्कुटर सुद्धा असते, त्यामुळे अरुणचा विद्यासोबत होणाऱ्या बसप्रवासाचा आनंद सुद्धा नागेश हिरावून घेतो. थोडक्यात, नागेशची एकूणच देहबोली, त्याचा आत्मविश्वासपूर्ण वावर अरुणचं खच्चीकरण करत असतो.      

choti si baat3

अपयशाच्या भीतीने शामळू अरुणला “माझं तुझ्यावर प्रेम आहे” हे एवढंच प्रभाला सांगणं कर्मकठीण होऊन बसतं. नाना उपाय करून थकलेला अरुण शेवटी लोकल, बसमध्ये चिटकवलेल्या प्रेम प्रकरणात यश, वशीकरण वगैरे जाहिरातीसारखं आपलं सामान गुंडाळून दाखल होतो ते खंडाळ्यातल्या कर्नल ज्युलियस नागेंद्रनाथ विल्फ्रेड सिंग (अशोक कुमार) असं लांबलचक नाव असलेल्या व्यक्तीकडे. कर्नल सिंग हे एक भारदस्त व्यक्तिमत्व आहेत. नेते, अभिनेते अशी सगळी प्रसिद्ध माणसं त्यांच्याकडे आपल्या समस्या सोडवायला येत असतात.

अरुणला भेटल्यावर त्याची समस्या कर्नलला कळते आणि मग तिथून अरुणच्या ट्रेनिंगला सुरुवात होते. कर्नल प्रेमातील एकूणएक बारकावे अरुणला शिकवू लागतात. एकेक टप्पा पार करत अरुणच्या ट्रेनिंगचा शेवटचा टप्पा येतो ज्याचं नाव असतं – ‘ड्रॉइंगरुम सें बेडरूम तक तीन आसान तरीकों में’!  

कर्नलचे मित्र डेव्हिड अब्राहम यांनी हा एक धाडसी प्रकार शोधलेला असतो. या प्रकारांत प्रियकर आपल्या प्रेयसीला घरी बोलावतो मग तिच्यासमोर सिगारेट पिण्यासाठी म्हणून आगपेटीची काडी पेटवतो. त्याचवेळी अचानक ती जळती काडी प्रियकराच्या हातातून चुकून प्रेयसीच्या साडीवर पाडल्याचे (खरं म्हणजे मुद्दामच) निमित्त करून ती साडी जळायला सुरुवात झाली, की लगेचच प्रियकर ती आग विझवणार. नंतर प्रेयसीला आपल्या बेडरूममध्ये नेऊन तिथे तिला दुसरी साडी बदलायला सांगणार. या सगळ्या प्रसंगानुरूप होणाऱ्या जवळकीतून प्रेयसीचे खरोखरीचे प्रेम किती आहे हे जाणून घेण्याची आणि तिच्याकडून प्रेमाचा कबुलीजबाब वदवून घेण्याची ही अनोखी, पण जराशी बोल्ड पद्धत असते.

choti si baat2

अरुण ट्रेनिंग संपवून मुंबईला परत येतो. नागेश आणि इतर लोकांना आपल्या बदललेल्या व्यक्तिमत्वाचा चांगलाच झटका देत अरुण आपल्या जुन्या अपमानाचे उट्टे काढतो. कर्नल मुंबईला येऊन स्वतः जातीने अरुणची प्रगती बघत असतात. अरुण नसल्याने उदास झालेली प्रभा पुन्हा त्याला बघून आनंदित होते. अरुणची प्रगती बघून आता नागेशची चरफड सुरु होते. अशाच एक-दोन प्रसंगात नागेशला कर्नल सिंग दिसतात. नागेश कर्नलचा पाठलाग करतो. यात गंमत अशी असते, की नागेशसुद्धा कर्नलचा सल्ला घेत असतो, पण प्रत्यक्ष भेटून नव्हे तर पत्राद्वारे. कर्नलच्या चाली, युक्त्या नागेशलादेखील माहित असतात. अगदी ‘ड्रॉइंगरुम सें बेडरूम तक तीन आसान तरीकों में’ हा प्रकार सुद्धा नागेशला ठाऊक असतो.

एक दिवस नागेश प्रभाला भेटून अरुणच्या या प्लॅनबाबत तिला सावध करतो. शारीरिक जवळीक साधून अरुण असलं काही करणार आहे हे ऐकून प्रभाला धक्का बसतो. अरुण प्रभाला भेटायला त्याच्या घरी बोलावतो. अरुणची परीक्षा बघायला प्रभा एकटीने अरुणला भेटायचा धोका पत्करायला तयार होते. अरुणच्या घराचं एकूणच नेपथ्य जसं टेबलावर ठेवलेली सिगारेट आणि आगपेटी, बेडरूममध्ये आधीच ठेवलेली साडी हे सगळं बघून प्रभाची मनातली भीती हळूहळू खरी ठरू लागते. 

त्याचवेळी अरुण मात्र प्रभाचा उदास, मलूल चेहरा बघून, काहीही न बोलता बेडरूममधून एकटाच बाहेर निघून जातो. कुठलीही शारीरिक लगट नसलेली अरुणची ती सभ्य वागणूक बघून प्रभा अत्यंत खुश होते. तिच्या मनातील संशयाचे धुके नाहीसे होतं. सिनेमाच्या शेवटी “ये छोटी सी बात कहने के लिए ये सब क्यूँ किया” असं म्हणत प्रभा अरुणच्या मिठीत सामावते.

choti si baat2

या संपूर्ण सिनेमाचा गाभा म्हणजे हा प्रसंग आहे. एकमेकांवर प्रेम असेल तर सांगून व्यक्त व्हा. Love is a whole thing, we are only pieces. हे रुमीचं एक खूप सुंदर वाक्य आहे. खरं प्रेम हे मुळातच परिपूर्ण असतं, आपण सगळे त्यांत फक्त तुकड्या-तुकड्यात व्यक्त होत असतो. प्रेमात जर दोघांच्या भावना सारख्याच आहेत, तर कुठलीही चाल, युक्ती वापरण्याची मुळीच गरज नसते. ते प्रेमच सगळे अडथळे पार करून एकमेकांना जवळ आणते या आशावादावर हा संपूर्ण सिनेमा आधारित आहे.      

७० च्या दशकातील बऱ्यापैकी शांत असलेल्या दक्षिण मुंबईतील लोकेशन्स, सलील चौधरीच संगीत (ये दिन क्या आये हे मुकेशचं गाणं अप्रतिम!) आणि मुख्य म्हणजे सगळ्यांचा अभिनय हे सगळं “छोटी सी बात” मध्ये अगदी योग्य प्रमाणात जुळून आलं होतं. सिनेमाच्या पहिल्या भागात अमोलची सतत झालेली फजिती आणि मग कर्नलच्या शिकवणीनंतर त्याने घेतलेला बदला हे झकास जमूनआलं.

“छोटी सी बात” नंतर अमोल पालेकरांच्या सिनेमाचा नंतर आवर्जून उल्लेख होऊ लागला याचं महत्वाचं कारण म्हणजे सलीम-जावेदच्या “विजय” ला त्यांनी  दिलेली टक्कर. सबकुछ अमिताभ असणाऱ्या काळात अमोलचा प्रेक्षकवर्ग टिकून राहिला कारण ते larger than life असलेल्या भूमिकेत कधीच नव्हते. कुठल्याही गर्दीत दिसणारा तो एक सामान्य माणूस होता. उगाच व्हिलनच्या खिशात चावी ठेवून “चाबी अब मै तेरे जेब से निकाल कर ही ये ताला खोलुंगा पीटर” असं म्हणत हिरोगिरी करणाऱ्याच्या भानगडीत ते कधी पडले नाही आणि मुळात त्यांना ते शोभलं देखील नसतं.

चॉकलेटी चेहरा, सॉलिड व्यक्तिमत्व, धारदार आवाज अशा हिंदी सिनेमातील हिरोसाठी लागणाऱ्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी अमोल पालेकरांकडे नव्हत्या, पण रोज बस, लोकल मध्ये धक्के खात येणाऱ्या, नोकरी सांभाळत आपली छोटी छोटी स्वप्न पूर्णकरण्यासाठी धडपडणाऱ्या लोकांना 86 नंबरच्या बसमध्ये हळूवार फुलणारी, अगदी सहज घडणारी “छोटी सी बात” ही आपलीच गोष्ट वाटते आणि हेच या सिनेमाचे खरे यश आहे.

कुठे बघता येईल : Youtube
संदर्भ :
https://en.wikipedia.org/wiki/Chhoti_Si_Baat
https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/amol-palekar-was-called-arrogant-recast-in-his-first-film-8565589/

– उन्मेष खानवाले. 

या लेखमालिकेत एकूण ८ लेख आहेत.
लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –


1.वाह! क्या ‘सीन’ है -ट्रॉय
2.वाह! क्या ‘सीन’ है – ‘स्वदेस’
3.वाह! क्या ‘सीन’ है – उस्ताद हॉटेल
4.वाह! क्या ‘सीन’ है – छोटी सी बात
5.वाह! क्या ‘सीन’ है – मी वसंतराव
6.वाह! क्या ‘सीन’ है – ‘तुंबाड’
7.वाह! क्या ‘सीन’ है – लक्ष्य
8.वाह! क्या ‘सीन’ है – कंपनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *