READING TIME – 8 MINS

एक दिवस दिग्दर्शक रामगोपाल वर्मा (रामू) निर्माता झामु सुगंधसोबत त्याच्या ऑफिसमध्ये चर्चा करत होता. तितक्यात फोनची रिंग वाजली. फोनवरची बातमी ऐकून झामु हादरून गेला. प्रसिद्ध कॅसेटकिंग गुलशन कुमार यांची सकाळी साडेदहाच्या सुमारास हत्या करण्यात आली होती. हत्येमागे मुंबई अंडरवर्ल्डचा हात होता. हे ऐकून रामूच्या मनांत मात्र वेगळेच विचार येऊ लागले. रामूला गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्याचा छंद होता. 

खून साडेदहाला झाला, तर मग हत्येच्या दिवशी गुन्हेगार किती वाजता उठले असतील? निघतांना त्यांनी नाश्ता केला असेल का? घराबाहेर पडतांना कामाला बाहेर जातोय असं काही सांगितलं असेल का? असे अनेक चित्रविचित्र प्रश्नांनी त्याच्या मनांत गर्दी केली. तोपर्यंत अंडरवर्ल्डमधल्या गुन्हेगारांच्या खाजगी आयुष्याबद्दल कोणाला काहीही माहिती नव्हती.

रामू मग काही गुन्हेगारांना भेटला त्यातून मिळालेल्या माहितीतून त्याला “सत्या” ची कल्पना सुचली. १९९८ सालच्या सत्याने चित्रपटसृष्टीत खळबळ उडवली. त्याकाळात शक्यतो पांढऱ्या सुटाबुटात, गॉगल लावून फिरणारे गँगस्टर बघण्याची सवय असलेल्या हिंदी सिनेमा प्रेक्षकांना ओळख लपवून आपल्यातच वावरण्याऱ्या भिकू म्हात्रे, कल्लू मामा यांच्यासारखे गँगस्टर पूर्णपणे अनपेक्षित होते.

सत्याच्या वेळी मिळालेल्या सगळ्या माहितीचा सिनेमांत वापर करून घेणं रामूला शक्य झाले नाही. एव्हाना कुप्रसिद्ध दाऊद इब्राहिमच्या गॅंगमध्ये उभी फूट पडून, छोटा राजनने वेगळी टोळी सुरु केली होती. त्यांच्यातले टोळीयुद्ध मुंबईच्या रस्त्यांना रक्ताने भिजवत होते. आपल्याकडील माहितीचा वापर करून रामूने लेखक जयदीप साहनीसोबत काम करत आपल्या पुढील सिनेमाची, कंपनीची (२००२) कथा तयार केली.

बदलत्या काळात गुन्हेगारी टोळीचे “कंपनी” असे कॉर्पोरेट सुटसुटीत नाव आहे. अस्लम अली या मुंबईतल्या भाई माणसाने एकहाती “कंपनी” वाढवली आहे, पण आता वयोमानानुसार प्रकृती साथ देत नसल्याने अस्लम भाईंची कंपनी आपसूक त्याचे चेले सांभाळत आहेत आणि मुख्य गोची इथेच झाली आहे. जेव्हा कुठलाही धंदा, पक्ष, business एकटा माणूस सांभाळत असतो, तेव्हा सारे त्याचा सल्ला निमूटपणे ऐकतात, पण पुढे पुढे त्याच्या वारसदारांतील वर्चस्वाची लढाई तीव्र होऊ लागते.

वरवर एकच वाटणाऱ्या अस्लम अली गॅंग मध्ये आता दोन गँग्स आहेत. एका गँगचा म्होरक्या आहे मलिक (अजय देवगण)  तर दुसऱ्या गॅंगचा म्होरक्या आहे सईद (राजेंद्र सेठी). मलिक आपली गॅंग वाढवण्यासाठी चंदू नागरेला (विवेक ओबेरॉय) सामील करतो.

एक दिवस सामानाची डिलिव्हरी करतांना चंदू सईदचा सल्ला धुडकावून लावतो. चवताळलेला सईद आपला भाऊ अनीससोबत अस्लम भाईच्या बंगल्यावर येऊन कालच्या नवख्या पोराने आपली कशी बेइज्जती केली याचा पाढा वाचतो. अस्लम भाई, मलिक आणि चंदूला आपल्या बंगल्यावर येण्याचे फर्मान सोडतात.

सईद आता भविष्यातला आपल्या मार्गातला अडसर बनल्याचे मलिकला कळलं आहे. मिटिंग मध्ये मलिक सईदची माफी मागतो आणि तिथून निघून जातो. इकडे सईद आणि त्याचा भाऊ अनीसच्या डोक्यात मात्र कंपनीतील मलिकचं वाढतं प्रस्थ लागलं आहे.

company2

मलिक-चंदू पाठोपाठ थोड्याच वेळात सईद आणि त्याचा भाऊ अनिससुद्धा अस्लमभाईच्या बंगल्यातून बाहेर पडतात.    गाडीत बसताना दोघे भाऊ मलिकला संपवण्याचा प्लॅन आखतात, पण आपल्या विषयी दोन्ही भावांच्या मनात काय भावना आहेत हे मलिक ओळखून आहे.

बाहेर मुसळधार पाऊस सुरु होतो. सईदच्याच कारमध्ये आधीच येऊन बसलेला मलिक शांतपणे आपली सिगारेट पेटवतो. त्या अंधारात त्याच्या सिगारेटचे टोक अंगठीतल्या खडयासारखे चमकू लागते. आपल्या कारमध्ये अनपेक्षितपणे मलिकला बघत सईदला धक्का बसतो. मलिकच्या हातातली बंदूक बघून आपली लाईफलाईन आता संपलीय हे सईदला उमगतं, पण शेवटचा उपाय म्हणून तो मलिककडे आपल्या जीवाची भीक मागतोय.  

सिनेमांत दोन व्यक्तीमधील होणारा परिणामकारक संवाद अतिशय महत्वाचा घटक आहे. ‘Dialogue should be treated like a poor man’s telegram.’ हे प्रसिद्ध ब्रिटीश फिल्ममेकर बिली विल्डर यांचे खूप गाजलेले quote आहे. सिनेमातील प्रत्येक व्यक्तिरेखेचा बोलण्याचा ढंग, बसण्याची पद्धत आणि चालण्याची पद्धत वेगवेगळी असते. तसंच बोलताना एखादा एका विशिष्ट शब्दांवर जोर देतो, तर दुसरा वेगळ्याच शब्दावर जोर देतो. प्रत्येक व्यक्तीची वाक्यरचना वेगळी असते.

वानगीदेखल कंपनीमधल्या या प्रसंगासाठी मलिक आणि सईदचे बंद कारमध्ये होत असलेलं हे संभाषण बघा.

सईद (मलिकच्या हातातील बंदूक बघत घाबरून)  : “मलिक, अंदर जो हुआ वो भूल जा”

मलिक : “बात अंदर की नही आगे की है”

सईद: “हम दोनो ने इतने साल साथ में काम किया है, उसके वास्ते छोड दे”

मलिक: “अगर तुम्हारे हाथ में बंदूक होती तो क्या तुम मुझे छोड देते?”

सईद: “मलिक, मुझे पता है तू मुझे छोडने की गल्ती नही कर सकता. पर मेरे भाई को जाने दे. ये धंदा छोड देगा”    

मलिक धंदा आणि भावनांमध्ये गल्लत करणारा व्यक्ती नाहीये हे सईद ओळखतो. शेवटी आपल्या भावाला सोड अशी विनंती करून तो स्वतः मलिककडून मृत्यू पत्करतो. पण त्याचवेळी मृत भावाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत असलेल्या अनीसलासुद्धा मलिक निष्ठुरपणे गोळी घालतो, कारण अनिस त्याच्या भावाच्या मृत्यूचा पुढे बदला घेणारच याची मलिकला पूर्ण खात्री असते. त्यामुळे आपल्या गॅंगमधील माणसांची सुरक्षितता त्याला अनिसपेक्षा जास्त महत्वाची आहे. त्यानंतर अतिशय थंडपणे मलिक सईदला आणि अनीसला मारून टाकल्याचं मलिक अस्लम भाईला सांगतो. अस्वस्थ अस्लम भाई, बिछान्यातून उठण्याचा प्रयत्न करत असतांना, मलिक त्यांना थांबवत म्हणतो.

“आप लेटे रहीये अस्लम भाई. अभी आप तबीयत संभाले और मैं धंदा संभालता हूं!”  

मलिक हा अत्यंत कमी बोलणारा पण दूरदर्शी असलेला व्यक्ती आहे. उगाचच भाषणबाजी करणे त्याच्या स्वभावात नाही. त्याचवेळी तो आपल्या विचारांवर अतिशय ठाम आहे. त्याने एकदा काही गोष्ट ठरवल्यावर तो त्यापासून मागे हटत नाही. व्यक्तिरेखेच्या या सगळ्या बाबींचा खूप बारकाईने अभ्यास करून संवाद लिहिण्यात आले आहे.

रामूने हा प्रसंग कसा चित्रित केला याबद्दलची आठवण सांगतांना अजय देवगण म्हणाला, की रामूने मला फक्त एवढंच सांगितलं, की गोळी चालवतांना तुला खूप कष्ट घेण्याची गरज नाहीये. डॉक्टर आपल्या पेशन्टला जितक्या सहजतेने इंजेक्शन देतो अगदी तसाच तुला गोळी घातल्याचा अभिनय करायचा आहे. या प्रसंगात, कारमध्ये मलिक सईदला त्याचा डावा हात वर करायला सांगून ज्या थंड पद्धतीने त्याच्या बगलेतून गोळी मारतो ते बघतांना खरंच शहारे येतात.

company3

कुठल्याही सिनेमाला ideal casting ची गरज असते. अजय देवगण याची मलिक, विवेक ओबेरॉयची चंदू तर मोहनलालची कमिशनर श्रीनिवासन म्हणून केलेली निवड अतिशय चपखल आहे. सिनेमांतील व्यक्तिरेखा नक्की कोणाची असते? लेखकाची कि दिग्दर्शकाची कि पडद्यावर सादर करणाऱ्या अभिनेत्याची या प्रश्नाचे ठराविक असे उत्तर नाही.

आजपर्यंतच्या हिंदी सिनेमाच्या इतिहासात कित्येक प्रसिद्ध व्यक्तिरेखांचा अभ्यास केला, त्यावरील आधारित माहिती वाचली तर हेच लक्षात येते. “दो बिघा जमीन” मधल्या “शंभू महातो” च्या मुख्य भूमिकेत बिमलदांनी जेव्हा बलराज साहनीची निवड केली, तेव्हा सुटाबुटात फिरणाऱ्या बलराजना या भूमिकेला न्याय द्यायला मुळीच जमणार नाही म्हणून कथाकार सलील चौधरी आणि पटकथाकार हृषीकेश मुखर्जींनी बिमलदाकडे तीव्र नापसंती व्यक्त केली. बिमलदांनी एक महिन्याचा कालावधी मागून घेतला. या एक महिन्याच्या काळात बलराज कलकत्याच्या रस्त्यावर हातरिक्षा चालवू लागले. हातरिक्षा चालकांच्या सवयी त्यांनी अशा आत्मसात केल्या, की त्यांना बघून सगळं युनिट चाट पडलं. इथे व्यक्तिरेखा दिग्दर्शकाची होती.

“दीवार” लिहितांना सलीम-जावेदना तोंडात बिडी घालून फिरणारा बंडखोर “विजय” स्पष्टपणे डोळ्यासमोर दिसत होता. ते दिसणं इतकं स्पष्ट होतं, की “विजयचे” अर्थात अमिताभचे सीन्स पडद्यावर दाखवतांना कॅमेराची position नक्की कुठे असावी, त्याचे angles याबाबतची बारीकसारीक तांत्रिक माहितीसुद्धा त्यांच्या स्क्रिप्ट्स मध्ये असायची. इथे व्यक्तिरेखा लेखकाची होती.      

Try to love the character in you and not you in the character हा व्यक्तिरेखा पडद्यावर सादर करण्याचा मूलभूत नियम आहे असं म्हटलं जातं. रंगाने उजळ, भाषेवरून, एकूणच राहणीमान उच्चभ्रू वर्गातील वाटणाऱ्या विवेक ओबेरॉयला आपली पहिलीच भूमिका “चंदू” मिळणं तसं कठिणच होतं. या चिकण्या मुलाला चंदूची भूमिका देण्यास रामू आणि इतर युनिट साशंक होतं. विवेकने १५ दिवसांची मुदत रामूकडून मागून घेतली. 

या काळात तो चक्क झोपड्पट्टीत राहिला, त्याने पब्लिक वॉशरूम्स वापरले. दाढी वाढवली. पंधरा दिवसांनी रामूला त्याच्या ऑफिसला भेटायला येतांना तिथल्याच कुंडीतल्या रोपांची माती स्वतःच्या चेहऱ्यावर लावून, तोंडात बिडी ठेवून विवेक रामूच्या केबिनमध्ये गेला आणि खुर्चीवर रेलून स्वतःचे दोन्ही पाय रामूच्या चेहऱ्यासमोर ठेवले. विवेकच्या या अवताराकडे रामू बघतच राहिला. “ए अब ये थोबडा क्या देख रहा है?”, असं विवेकने म्हटल्यावर रामूची निवड पक्की झाली. इथे व्यक्तिरेखा अभिनेत्याची होती.

“सत्या”, “कंपनी” असे अंडरवर्ल्डवर आधारित सिनेमे बनवल्यावर रामूचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, तो दाऊदशी फोनवर बोलला आहे अशा अनेक वावड्या उठल्या. “कंपनी” मध्ये आपलं पात्र विनोदी पद्धतीने दाखवल्याने छोटा शकील रामूवर चिडला होता आणि तो शकीलच्या हिट लिस्टवर होता असंही बोललं गेलं. खरं-खोटं रामूला माहीत, पण इतक्या वर्षांनी अंडरवर्ल्ड संबंधित कुठल्याही सिनेमाचा मापदंड निर्विवादपणे “सत्या” आणि “कंपनी” आहे हे मात्र निश्चित!  

संदर्भ :
https://en.wikipedia.org/wiki/Company_(2002_film)
https://www.hindustantimes.com/bollywood/15-years-of-company-ajay-devgn-reveals-that-rgv-initially-refused-him-the-role-of-malik/story-KqDhaIaEi3j8r4wJp7PugP.html
https://www.hindustantimes.com/bollywood/15-years-of-company-vivek-oberoi-stayed-in-slums-to-prep-for-his-role-in-the-film/story-yd4mfa3BhZ0lrapbnLg4uK.html
शिणेमाच्या ष्टोरी मागील गोष्ट – अभिजित देसाई. राजा प्रकाशन.   

– उन्मेष खानवाले. 

या लेखमालिकेत एकूण ८ लेख आहेत.
लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –


1.वाह! क्या ‘सीन’ है -ट्रॉय
2.वाह! क्या ‘सीन’ है – ‘स्वदेस’
3.वाह! क्या ‘सीन’ है – उस्ताद हॉटेल
4.वाह! क्या ‘सीन’ है – छोटी सी बात
5.वाह! क्या ‘सीन’ है – मी वसंतराव
6.वाह! क्या ‘सीन’ है – ‘तुंबाड’
7.वाह! क्या ‘सीन’ है – लक्ष्य
8.वाह! क्या ‘सीन’ है – कंपनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *