READING TIME – 8 MINS

माणसांप्रमाणे सिनेमांवर देखील कळत-नकळत संस्कार होत असतात. अचानक काहीतरी निमित्त होऊन कुठलंसं एक कथाबीज लेखकाच्या मनांत अंकुरतं. लेखक आपल्या विचारांचं, कल्पनाशक्तीचं खतपाणी घालून ते कथाबीज जीवापाड सांभाळतो. सुरुवातीला अतिशय नाजूक अवस्थेतलं ते बीज हळूहळू छान बाळसं धरू लागतं.

लेखकाच्या मनांतून बाहेर पडण्यासाठी ते उसळ्या मारू लागलं, की मग ते पूर्ण वाढ झालेलं कथानक तो जगासमोर ठेवतो. दिग्दर्शक, कॅमेरामन, कलाकार, तंत्रज्ञ त्यावर शेवटचा हात फिरवत त्याला आपल्यापरीने समृद्ध करतात. शेवटी या प्रवासांत सिनेमाच्या मोहमयी दुनियेचे भले-बुरे अनुभव झेलत, काही कथानकं तरतात, तर काही तळाशी जातात.

१९९३ साली नागझिराच्या जंगलात, एका रात्री राही अनिल बर्वेला त्याच्या मित्राने नारायण धारपांची एक भयकथा ऐकवली. कथेचं नाव होतं “आजी’. मुळात धारपांनी लिहिलेली ही कथा स्टीफन किंग यांच्या “ग्रॅमा (Gramma)” या कथेचे मराठी रूपांतर. त्या जंगलातील रात्रीची किर्रर्र शांतता, सोबत शेकोटीचा उजेड आणि त्यातून निर्माण होणारं एकूणच गूढ वातावरण यामुळे राहीला त्या कथेने अक्षरशः झपाटून टाकलं. ते झपाटलेपण इतकं वाढलं, की १९९७ साली राहीने शिवाजी पार्कच्या एका कॅफेमध्ये त्याच कथेवर आधारित एका सिनेमाची स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली. 

राहीने आधी सिनेमाचं नाव ठेवलं होतं, “पहाड पांगिरा”, पण “इतक्या मोठ्या नावाचा सिनेमा मी बघणार नाही, तीन अक्षरी नाव ठेव”, असं त्याच्या मैत्रिणीने त्याला तंबी दिल्यावर, शेजारी असलेल्या “तुंबाडचे खोत” वरून सिनेमाचं तात्पुरतं बारसं झालं “तुंबाड” या नावाने. सुरुवातीच्या काळात “मुद्रा” या नावाने प्रकाशित होणारा हा सिनेमा का कुणास ठाऊक पण तुंबाड या नावानेच तयार झाला.

“तुंबाड” निर्मितीची कथा अनेक सुरस आणि चमत्कारी घटनांनी भरलेली आहे. “तुंबाड हा नरकातून गेलाय”, असं राही म्हणतो. प्रत्येक वेळी तुंबाडची निर्मिती सुरु व्हायची आणि मोठ्या प्रॉडक्शन हाऊसकडून नकार मिळवल्यानंतर बंद पडायची. मात्र या प्रत्येक वेळेस तुंबाड राहीच्या मनांत मुरत मुरत, आत झिरपून वाढत होता. 

या कठीण काळात आपल्या स्वप्नांवर राख साचू न देता राहीने आपले प्रयत्न सुरु ठेवले. शेवटी तीन वेळेस सुरु होऊन बंद पडलेला तुंबाड चौथ्यांदा मात्र स्वतःच्या पायावर उभा राहिला, चक्क धावू लागला.

१९१८ ते १९४७ या काळातील एका कुटुंबातील तीन पिढ्यांची ‘तुंबाड’ची कथा ही भय, लालसा, वासना, लोभ यांनी बांधलेली आहे. ‘The world has enough for everyone’s need, but not for everyone’s greed’ ह्या महात्मा गांधींच्या ओळींने सिनेमाची सुरुवात होते. 

प्राचीन काळी धन-धान्य देणारी पूर्तीची देवी सगळं जग निर्माण करते, पण तिचं प्रेम असतं आपल्या पहिल्या मुलावर, हस्तरवर! हा हस्तर अतिशय लोभी आहे. देवीकडून सोनं आधीच हस्तगत करणारा हस्तर जेव्हा तिच्या धान्यावर कब्जा मिळवायला जातो, तेव्हा इतर देव चिडतात. त्यांच्या झालेल्या युद्धातून देवी हस्तरला वाचवते, पण एका अटीवर – हस्तरची कोणी पूजा करणार नाही आणि तो सतत देवीच्या गर्भात निद्रावस्थेत राहील.

tumbaad-1

माणसाचं मन मुळातच लोभी आहे. निषिद्ध असूनही तुंबाड गावांतले गावकरी पैशाच्या लोभाने हस्तरची पूजा करू लागतात, त्यामुळे ते गांव शापित होतं. तो शाप सतत पडणाऱ्या पावसातून गावांत कायमच बरसत असतो. याच गावांत एका सरकार नावाच्या व्यक्तीचा वाडा आहे आणि तिथूनच देवीच्या गर्भगृहात जाण्याचा रस्ता आहे, जिथं सोनं लपवलेलं आहे अशी वदंता असते. 

सरकारकडे एक गरीब आई (ज्योती मालशे) तिच्या दोन मुलांसह राहत असते. ती एका आज्जीचा सुद्धा सांभाळ करत असते. ही आजी शापित आहे. तिच्या भयावह विचित्र रुपामुळे तिला साखळदंडात कैद करून ठेवलं आहे. त्या दोन मुलांपैकी विनायकाला आज्जीला वाड्यातल्या खजिन्याची माहिती आहे याची खात्री असते. 

एक दिवस त्याचा लहान भाऊ अपघात होऊन दगावतो, तर दुसरीकडे वाड्याचा मालक, सरकार प्राण सोडतो. विनायकाची आई पुण्याला जायचं ठरवते, पण ती विनायकाकडून वचन घेते, की तो तुंबाडला परत येणार नाही. तरीही पंधरा वर्षांनी विनायक (सोहम शाह) खजिना शोधण्यासाठी वाड्याकडे परत येतो.

मधल्या काळांत विनायकाचे लग्न होऊन त्याला पांडुरंग (मोहम्मद समद) नावाचा एक मुलगा झालेला असतो. विनायक परत तुंबाडमध्ये आल्यावर अजूनही जिवंत असलेल्या शापित आजीकडून खजिन्याचे रहस्य जाणून घेतो. 

धान्यासाठी भुकेल्या हस्तरला कणिकेची बाहुली देऊन त्याच्याकडून सोन्याची नाणी मिळवायला विनायक सुरुवात करतो. त्यानंतर सुरु होतो तो हव्यास, लालसा यांचा विकृत प्रवास. हस्तरकडून सोनं कसं मिळवायचं हे माहित झालेला विनायक श्रीमंत होतो. 

विनायकाच्या जीवनांत त्या श्रीमंतीसोबत हव्यास, कामवासना हे सुद्धा आपसूक शिरतात. स्वतःच्या राहत्या घरांत आपल्या बायको आणि मुलासोबत राहत असतांना मित्राच्या तरण्याताठ्या सुनेला त्याने ‘ठेवून’ घेतलेलं असतं.

काळ पुढे सरकतो. विनायकची वाटचाल आता वार्धक्याकडे होऊ लागली आहे. अशावेळी सोनं मिळवण्यासाठी आपण मिळवलेलं ज्ञान आपल्या मुलाला देण्याचं विनायक ठरवतो. एखादा कारागीर जसं आपलं कसब, क्लुप्त्या आपल्या मुलाला शिकवतो, तसंच विनायक आपल्या मुलाला, पांडुरंगला हस्तरच्या तावडीतून सोनं कसं आणावं याचं ज्ञान देऊ लागतो. जणू काही वाड्यातून सोने चोरून आणणं हा त्यांचा पिढीजात व्यवसाय आहे, परंतु प्रेक्षकांना खटकणारं  विनायकचं हे वागणं पांडुरंगाला मात्र अजिबात खटकत नाही, कारण तो विनायकचाच मुलगा आहे.

tumbaad-2

 

Your children are not your children. They come through you but not from you असं खलील जिब्रान म्हणतो. श्रीमंत झाल्यावर  बापाला मिळणार मान, त्याची ऐशोआरामी वागणूक बघून पांडुरंगने आपसूक बापाचा मार्ग निवडायचा ठरवलेलं असतं. किंबहुना पांडुरंग हव्यास, लालसा याबाबत बापाच्या एक पाऊल पुढेच आहे.

बापाचं सोनं, त्याची संपत्ती,एवढंच काय, बापाने ‘ठेवलेलया बाईवर पण पांडुरंगाला मालकी हक्क हवाय आणि तो सुद्धा विनालंब. यामुळे वाड्याच्या पहिल्या भेटीत विनायकने मनाई करून सुद्धा पांडुरंग कणकेची बाहुली लपवून हस्तरला खायला देतो. दोघे बाप-बेटे त्यादिवशी हस्तरकडून थोडक्यात बचावतात. सुरुवातीला विनायक पांडुरंगवर प्रचंड चिडतो, पण पांडुरंगने हस्तरकडून मुद्रा हस्तगत करून घेतली हे त्याला जेव्हा कळतं, तेव्हा त्याचा राग निवळतो.

माणूस हे एक मोठे विचित्र रसायन आहे. सुरुवातीला आपल्या स्वार्थासाठी तो इतरांशी भांडतो. आपण आणि आपलं कुटुंब इतकाच विचार त्याच्या मनांत असतो, पण काहीवेळा काही घटना अशा घडतात, की सुरुवातीला कुटुंबासाठी विचार करणारा माणूस नंतर फक्त स्वतःपुरता विचार करू लागतो. 

तुंबाडहून घरी परतल्यावर पांडुरंगची आई जेव्हा त्याला कुतूहलाने विचारते, की “क्या हुआ तुंबाड में?” त्यावर पांडुरंग म्हणतो, “ये बाबा और मेरे बीच की बात है, तू सिर्फ घर संभाल।” हे उत्तर देताना तो आईला सोन्याची मुद्रा दाखवण्याऐवजी सोनेरी कागद गुंडाळलेलं चॉकलेट देतो. स्त्रीला तुच्छ लेखण्याचा पिढानपिढ्या झिरपत आलेला दर्प आता पांडुरंगच्या वागण्यातून बाहेर यायला सुरुवात होते.  

लहानगा पांडुरंग आपल्याजवळील सोन्याची मुद्रा घरांत ठेवलेल्या बाईला देत “बाबा ने तो सिर्फ तुम्हें रखा है, मैं तो तुमसे शादी करूँगा” असं बिनदिक्कतपणे सांगतो तेव्हा बाईने  “उमर क्या है तुम्हारी?” ह्या विचारलेल्या प्रश्नावर पांडुरंग सोन्याची मुद्रा हातात देत तिला म्हणतो, ‘अब से मैं रहूंगा और कुछ साल बाद तो सिर्फ मैं ही रहूंगा’. 

पडद्यावर सुरुवातीला हा सीन बघतांना आपल्याला कदाचित विनोदी वाटेल, पण पांडुरंगाचे उत्तर ऐकून नीतिमत्तेच्या चौकटीत आखून घेतलेल्या आपल्या पांढरपेशा मनाला धक्के बसू लागतात. कुठल्याही कथेत मुख्य भाग हा त्यातील पात्रांचा असतो. ती पात्रं कशी का असेना पण लेखकाची कथा पुढे नेत असतात. सुरुवातीला विनायकची वाटणारी कथा जसजशी पुढे सरकू लागते, तसतसं पांडुरंगाचं पात्र त्यात हळूहळू गडद रंग भरू लागतं.

आपल्या मुलाने आपण ठेवलेल्या बाईला मुद्रा दिली आहे हे समजल्यावर विनायक आपल्या मुलावर संतापतो, त्याला मारू पाहतो, पण हव्यास, लोभ याबाबतीत पांडुरंग हा कधीच आपल्या पुढे निघून गेलाय हे विनायकला कळल्यावर तो आपल्या मुलाशी मित्रत्वाने वागू लागतो. 

बायकांच्या बाबत  “कुछ साल धोती में रहना” असं बजावल्यावर मुलगा उलट विचारतो, “और तब तक?” तेव्हा विनायक आणि तो मुलगा एकमेकांकडे बघून विकृत पद्धतीने हसतात. त्यानंतर लगेच पांडुरंग आणि विनायक दोन्ही मिळून बायकांवर पैसे उधळताना दिसतात. समुद्राच्या लाटांमागून लाटा एकामागोमाग येऊन धडकल्याप्रमाणे हे प्रसंग प्रेक्षकांच्या मेंदूला झिणझिण्या आणतात. लोभाचं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होत जाणारे हे संक्रमण बघून आपण शहारत जातो.

tumbaad-3

तुंबाडसारख्या फॅन्टसी सिनेमांत तांत्रिक बाजू भक्कम असावी लागते. सिनेमॅटोग्राफर पंकजने ही बाजू भक्कम सांभाळली आहे. सिनेमातील प्रत्येक फ्रेम खूप विचारपूर्वक साकारली आहे. कॅमेरा उगाच फिरवून अंगावर येणारे स्पेशल इफेक्ट्स यात नाहीयेत. तुंबाड गाव, सरकारचा वाडा, स्वातंत्र्यपूर्वकाळातील पुणे हे सगळं पंकजच्या कॅमेराने खुबीने टिपलंय. Sound, Art तसंच Costume design ची कामे देखील अगदी ठशठशीतपणे आपलं अस्तित्व दाखवतात.

सोहम आणि समद यांच्याप्रमाणेच राही सुद्धा या सिनेमाचा नायक आहे. काम करणारी जवळची माणसे सोडून गेली, पैसे संपले या अनेक समस्या येऊन सुद्धा राही खंबीर होता. “सततच्या अपयशाने मी react करणं देखील सोडलं. सिनेमातल्या विनायककडे सुरुवातीला तटस्थ नजरेने बघता बघता तो माझा हळूहळू माझा भाग झाला. सिनेमाच्या हव्यासापोटी मी सुद्धा विनायकप्रमाणे सतत तुंबाडकडे येत राहिलो. कदाचित माझ्यात सुद्धा तो अंश आहे.”, असं राही म्हणतो. सिनेमाचा पुढचा sequel कधी येणार असं विचारल्यावर “कधीही नाही, सिनेमाच्या शेवटाला पांडुरंगाने बंद केलेले वाड्याचे दरवाजे पुन्हा उघडण्याची माझी इच्छा नाही इतका मी exhaust झालोय”, असं देखील तो म्हणतो.            

मला तरी व्यक्तिशः राहीचं हे म्हणणं पटत नाहीये. मला खात्री आहे एक दिवस राही हा दरवाजा नक्की कधीतरी उघडणार, कारण शेवटी त्याने म्हटल्याप्रमाणे विनायकाचा अंश त्याच्यात उतरला आहे. त्यामुळे तुंबाडचा हव्यास, ती लालसा इतक्या सहजासहजी राहीचा पिच्छा सोडणार नाही हे मात्र नक्की!

कुठे बघता येईल : Amazon Prime Video
संदर्भ :
दिग्दर्शक राही बर्वे यांची मुलाखत : https://www.youtube.com/watch?v=ckp7h2vGSM0&t=872s
तुंबाडच्या निर्मितीची कथा. दिग्दर्शक राही बर्वे यांच्या फेसबुक वॉलवरून साभार.    
https://en.wikipedia.org/wiki/Tumbbad

– उन्मेष खानवाले.  

या लेखमालिकेत एकूण ८ लेख आहेत.
लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –


1.वाह! क्या ‘सीन’ है -ट्रॉय
2.वाह! क्या ‘सीन’ है – ‘स्वदेस’
3.वाह! क्या ‘सीन’ है – उस्ताद हॉटेल
4.वाह! क्या ‘सीन’ है – छोटी सी बात
5.वाह! क्या ‘सीन’ है – मी वसंतराव
6.वाह! क्या ‘सीन’ है – ‘तुंबाड’
7.वाह! क्या ‘सीन’ है – लक्ष्य
8.वाह! क्या ‘सीन’ है – कंपनी

Comments(3)

    • Anand Manjalkar

    • 11 months ago

    Nice one. Liked how greed was described. Can’t wait to see Vinayak to open doors again someday. Greed has no end.

    • keerti.nagaracts

    • 11 months ago

    Amazing ! What a great piece of article!

    • manasi mutalikdesai

    • 11 months ago

    Apratim… Lekhat suddha manus gung hoto

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *