READING TIME – 6 MINS

पुलंची ‘उरलेला घास’ नावाची एक कथा आहे. आपल्या उमेदीच्या काळात मान-सन्मान अनुभवलेले एक श्रेष्ठ गायक आता लोकांच्या विस्मरणात जाऊन एकाकी जीवन जगत असतात. त्यांच्या वैयक्तिक जीवनांत आलेल्या वादळाने आपल्या बायको, मुलीसोबत त्यांची ताटातूट झालेली असते. एक दिवस योगायोगाने आपल्या गावी, रेडिओवर आपल्या मुलीने सादर केलेला  “मालकंस” ते ऐकतात. गायन ऐकून ते खूप अस्वस्थ होतात. तडक रेडिओ स्टेशन गाठतात. तिथे त्यांच्या जुन्या ओळखीने ते आपल्या आवाजात गाणं रेकॉर्ड करतात. त्यानंतर संपूर्ण गावांत फक्त ज्यांच्या घरी रेडिओ आहे, त्या इनामदारांच्या वाड्यात ते रोज पडवीत बसून आपल्या कन्येच्या गाण्याची वाट बघत बसतात. मालकंसची एक जागा आपली मुलगी नीट गात नाही ही त्यांच्या मनातील खंत आहे.

आपलं रेकॉर्ड केलेलं गाणं तिने ऐकावं आणि मग तिला हा एक ‘उरलेला घास’ भरवून तो परिपूर्ण “मालकंस” तिच्याकडून नंतर रेडिओवरच ऐकायचा हे त्यांच्या जगण्याचं ध्येय बनतं. कित्येक दिवस जातात. मग एक दिवस मुलीच्या आवाजात तो मालकंस त्यांना रेडिओवर ऐकायला मिळतो आणि त्या रात्री ते तिथंच कोसळतात. एका सच्च्या कलाकाराला कलेवरच्या निष्ठेपायी बायको-मुलीच्या विरहापेक्षा कानावर तो अपूर्ण ‘मालकंस’ जास्त आघात करत राहतो ही शोकांतिका खूप तरलपणे पुलंनी मांडली होती.

श्रेष्ठ कलेची निर्मिती ही शोकांतिकेतूनच होते असं म्हणतात. आपल्याकडे अंगभूत कला असावी, त्या कलेसाठी लागणारी आवश्यक गुणवत्ता असावी हे खरंच,  पण हे सगळं असून लौकिकदृष्ट्या यशस्वी होता येईलच असं नव्हे. त्या कलेला लोकाश्रय, समाजमान्यतेचा “उरलेला घास” मिळणं तितकंच गरजेचं आहे.

कलावंताला कलेचे दैवी वरदान असतं, पण त्याला सांभाळून घेऊन दाद देणारा रसिक जर त्या कलाकाराला मिळाला नाही, तर तोच त्यांचा लौकिक अर्थानं अंत ठरतो.

“मी वसंतराव” सिनेमांत  “आपल्याला गायची इच्छा असणं, पण समोरच्याला ते ऐकण्याची इच्छा नसणं यासारखं दुसरं दारिद्र्य नाही” असं जेव्हा दीनानाथ मंगेशकर लहानग्या वसंतरावांना सांगतात, तेव्हा कलाकारांची ही शोकांतिका ठशठशीतपणे समोर येते. “मी वसंतराव” हा बायोपिक म्हणजे श्रेष्ठ गायक वसंतराव देशपांडेवर आधारित याच शोकांतिकेचा प्रवास आहे.  

साधारणपणे सिनेमांत कथानक सांगण्याच्या Linear (एक-रेषीय) आणि Non-Linear (समांतर) अशा दोन पद्धती आहेत. Linear म्हणजे कथा सुरु झाली, की एकाच पात्राच्या दृष्टिकोनातून ती उलगडत जाते. Non-Linear पद्धतीत एकाहून अनेक उपकथा उलगडत जातात आणि मग त्या एका ठिकाणी एकत्र येऊन शेवटाकडे जातात. 

सिनेमाच्या सुरुवातीला वयोवृद्ध वसंतरावाची  “कट्यार” मधल्या खानसाहेबांशी (स्वतः वसंतरावंच) काल्पनिक भेट होते आणि मग तिथून Linear पद्धतीने वसंतरावांच्या आयुष्याचा पट प्रेक्षकांना उलगडू लागतो.

बायोपिक करतांना लेखक-दिग्दर्शकाला कथेच्या नायक/नायिकेला Larger than life दाखवण्याचा मोह आवरत नाही. लेखक/दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि पटकथा लेखक उपेंद्र सिधये यांनी मात्र हा मोह टाळत, संयतपणे वसंतरावांचा प्रवास पडद्यावर मांडला आहे. 

संगीत दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता या दोन्ही भूमिकांना राहुल देशपांडे यांनी समसमान न्याय दिलेला आहे. या सिनेमात वसंतरावांच्या आयुष्यातील महत्त्वाचे दोन टप्पे पाहायला मिळतात. पहिल्या भागात वसंतरावांचे (राहुल देशपांडे) बालपण, बापाचे छत्र नसतांना त्यांच्या आईने (अनिता दाते) स्वतःच्या हिमतीवर केलेला सांभाळ, निरनिराळ्या गुरूंकडून मिळालेले संगीत शिक्षण, त्यांची आणि पु.ल. देशपांडे (पुष्कराज चिरपुटकर) यांची मैत्री, वसंतरावांचे कौटुंबिक जीवन असं सगळं आहे. तर नंतरच्या भागात ‘नोकरी की पूर्णवेळ गायन’ अशा धर्मसंकटात अडकलेल्या वसंतरावांची घुसमट दिसून येते. या निर्णायक वेळी वसंतरावांना त्यांचे कुटुंब आणि मित्र पु.ल. देशपांडे यांचा मिळालेला मानसिक आधार, पूर्णवेळ गायकी सुरु करूनदेखील कुठल्याही चाकोरीत न अडकता, स्वतःची शैली निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या वसंतरावांचा संघर्ष आहे.

me_vasantrao_1

तुमचं घराणं कोणतं? असा प्रश्न विचारल्यावर “माझ्यापासून सुरु होणारं माझं घराणं, देशपांडे घराणं!”, असं ताड्कन बोलणाऱ्या, फटकळ वसंतरावांचा स्वभाव आपल्या आईशी, म्हणजे ताई यांच्याशी मिळताजुळता आहे. अर्थात या आपल्या स्वभावाचे व्यावहारिक हाल त्यांनी आयुष्यभर सोसले. पारंपरिक संगीताची चाकोरी मोडून स्वतःची अशी नवीन संगीतशैली निर्माण करायला वसंतराव धडपडत असतात, पण अभिजात संगीताचे स्वघोषित संस्कृतीरक्षक त्यांच्यावर ‘गलिच्छ, अभद्र’ ऐकवतात म्हणून बहिष्काराचे अस्त्र उगारतात. 

“जन्मापासून मला संघर्ष करावा लागला आहे. माझं आयुष्यचं कधीच चाकोरीबद्द नव्हतं तर माझं संगीत चाकोरीबद्ध कसं असणार?” असं म्हणत वसंतराव आपला संघर्ष सुरूच ठेवतात.

me_vasantrao_2

वसंतरावांचा संघर्ष सोपा नसतो. स्वत्व टिकवण्याची धडपड करतांना “तुम्ही गायकी भ्रष्ट केली” असा आजूबाजूचा कोलाहल त्यांना घेरून टाकत असतो. अंधारल्या आयुष्यात प्रकाशाची एक तिरीप यावी या आशेवर असतांना दिवसेंदिवस त्यांच्या मनाच्या तळाशी साचलेला निराशेचा काळा डोह मात्र अधिकाधिक गडद होत जातो. 

एक वेळ अशी येते, की सततची अवहेलनना, आर्थिक ओढग्रस्त, बायकोचे (कौमुदी वलोकर) दागिने गहाण ठेवून कुटुंबाची केली जाणारी गुजराण यामुळे वसंतराव पिचून जातात. त्यांचा आत्मविश्वास डळमळू लागतो. “कशासाठी गायचं मी?”, असं म्हणत आपली निराशा, कडवटपणा एका रात्री ते आपल्या मित्रांपाशी, पुलंकडे उघड करतात. वसंतरावांना ऐकून घेतल्यावर पुलं त्यांना आपल्या गाडीत बसायला सांगतात. कुठे, कोणाकडे चाललोय याबद्दल वसंतरावांना ते काहीच सांगत नाहीत.  

ज्या ठिकाणी सभ्य लोकं येण्याचं सहसा टाळतात, अशा एका वस्तीत पुलं वसंतरावांना त्या रात्री घेऊन येतात. तिथे एका झोपडीवजा घरापाशी आल्यावर, दरवाजाची कडी वाजवून, पुलं “अक्का” अशी साद घालतात. झोपडीचं दार उघडतं, साधारण एक पन्नाशीच्या आतबाहेर असणारी एक प्रौढ स्त्री दरवाजा उघडते. पुलं आणि वसंतराव त्या घरात शिरतात. कंदिलाचा मिणमिणता उजेड सगळ्या झोपडीत भरून राहिलेला असतो. अक्का एकेकाळच्या उत्कृष्ट लावणी गाणाऱ्या कलाकार आहेत. सध्याची त्यांची आर्थिक परिस्थिती खूपशी बरी नाहीये हे लगेचच कळून येतं. पुलं अक्कांना लावणी गाण्याची विनंती करतात. कसलेही आढेवेढे न घेता अक्का (पडद्यावर लावणी कलाकार शकुंतलाबाई नगरकर) लावणी गाण्यास सुरुवात करतात.

पुनव रातीचा लखलखता मी केला गं मी शिणगार

सोनकेतकी कांतीला ह्या जडला केशरी ज्वार

लावणीचे साधारण दोन प्रकार आहेत – तमाशातील लावणी आणि बैठकीतील लावणी. तमाशातील लावणीचा भर नृत्यावर, तर बैठीकीतील लावणीचा भर हा मुख्यत्वे करून शब्द आणि चेहऱ्यावरील हावभावांवर असतो. गीतकार वैभव जोशींनी लिहिलेली ही बैठकीतील लावणी हा या सिनेमांत चुकवू नये असा अनुभव आहे. 

गाणं कसं असावं? शब्दांचे उच्चार कसे असावेत? गाण्याच्या हरकती कशा असाव्यात? या सगळ्या बारीकसारीक गोष्टींचा विचार या प्रकारात केलेला असतो. पुनव रातीचा लखलखता गात असतांना “लखलखता” हे शब्द गायल्यावर आक्कांची झोपडी प्रकाशमान झालेली दाखवणे असो किंवा “डावा डोळा लवतोय बाई” म्हणतांना शकुंतलाबाईनी आपल्या डोळ्यांची केलेली मोहक चपळ हालचाल असू दे किंवा  “उरी दाटतो ग श्वास” म्हणतांना आपल्या गळ्यापाशी दोन्ही हात नेत त्यांनी केलेला जिवंत अभिनय असू दे हे सगळं अप्रतिम प्रकाशयोजनेचा, अभिनयाचा आणि संगीताचा एकत्रित सुवर्ण आविष्कार आहे.

me_vasantrao_4

अक्कांची ती अदाकारी बघून वसंतराव थक्क होतात. आपल्या शेवटच्या कामाचे मिळालेले मानधन अत्यंत आदराने अक्कांना सुपूर्त करत ते अक्कांना नमस्कार करतात. वसंतराव देखील पट्टीचे गाणारे आहेत असं कळल्यावर अक्काकडून वसंतरावांना गाणं गाण्याची फर्माईश होते. “लावणी गाऊ का?”, असं वसंतरावानी विचारल्यावर शास्त्रीय गाणारे लावणी कशी गाणार असा विचार अक्कांना स्पर्शून जातो. “लावणी असो, शास्त्रीय की गझल या सगळ्यांचा आत्मा शेवटी संगीतच आहे. ‘ऐसे कैसे रे सोवळे,शिवता होतसे ओवळे’. संगीतात सोवळं ओवळं काहीच नसतं. अहो, गाणं हे गाणं असतं अक्का”, असं म्हणत वसंतराव लावणी गाण्यास सुरुवात करतात.

तन मन धन पडलं गहाण

माझं राहिलं ना राहिलं पंचप्राण

हातातली शाल डोक्यावर पदरासारखी धरत वसंतराव अस्सल लावणी कलाकारासारखी ती लावणी फुलवत नेतात. वसंतरावांना लावणी सादर करतांना पडद्यावर दाखवणं हे एक धाडसाचं काम होतं. पुरुषांनी लावणी सादर करतांना त्यावर “बाईलपणाचा” शिक्का बसण्याचा धोका असतो, पण शर्वरी जमेनीस यांचं नृत्यमार्गदर्शन आणि समोर शकुंतला बाईंनी दिलेली साथ या सगळ्या प्रसंगाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. 

वसंतरावांची अदाकारी बघून पुलं, अक्कासकट प्रेक्षकदेखील चकीत होतात. लावणी झाल्यावर अक्का उठतात आणि वसंतरावांनी त्यांना दिलेल्या बिदागीत स्वतःकडचे काही पैसे एकत्र करून ती रक्कम पुन्हा वसंतरावांना काहीशा जबरदस्तीनेच सुपूर्त  करतात. अक्कांची ती दाद बघून वसंतराव हेलावतात.

“मी जीवतोड कला सादर करतो, पण बघणारे रसिक कुठेत?”, असं खिन्नतेने विचारणारे निराश, दुःखी वसंतराव या प्रसंगानंतर अंतर्बाह्य बदलून जातात. कलावंत आणि रसिक यांचं नातं कसं असतं असं विचारल्यावर राम शेवाळकर म्हणाले होते, “कलावंत हा बोलका रसिक असावा लागतो आणि रसिक हा मुका कलावंत असावा लागतो”. स्वतः दारिद्र्यात राहत असून, ठिगळ लावलेले पातळ नेसूनदेखील चेहऱ्यावर चिंतेचा गंध नसलेल्या अक्का, “लावणी गाणार का” म्हटल्यावर कुठीलीही अपेक्षा न ठेवता निष्ठेने आपली कला सादर करतात आणि त्याचवेळी वसंतरावांनी आपली कला सादर केल्यावर सच्च्या रसिकाप्रमाणे आपल्याला मिळालेली बिदागी हातची न राखता लुटवून देखील टाकतात. 

“दारी येईना चुकून, तरी सांगतो शकून असा पावणा मी पाहिलाच नाही.” ही लावणीतील ओळ या पूर्ण प्रसंगासाठी लाकडात ठोकलेल्या खिळ्याप्रमाणे घट्ट रुतून बसते.

एकमेकांशी संवाद साधण्यासाठी भाषेचा वापर होतो. भाषेतील शब्दांचा अर्थ समजून घेत समोरच्याशी संवादाचा पूल बांधला जातो. संगीत देखील संवादाचे असेच एक माध्यम आहे. संगीत मात्र सुरांची भाषा बोलतं.  All art aspires to the condition of music असं म्हणतात. कलेच्या कुठल्याही प्रकारात संगीत सर्वश्रेष्ठ आहे असा त्याचा अर्थ. 

संगीत लय-ताल-सूर या त्रिसूत्रीतून एक भावानुभव देतात. तो अनुभव शब्दांत मांडता येत नाही आणि शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला की, तो संवाद तुटतो. गातांना गळ्यातून असा सूर लागावा, की त्यातून सगळ्या जगाचा विसर पडावा. कुठलीही भेसळ नसलेलं असं ते संगीत ऐकताना “आपणच ते संगीत” अशी अद्वैताची भावना निर्माण व्हावी. माझे मीपण न उरावे अशी हीअवस्था. सिनेमाच्या शेवटाला येणारे “कैवल्यगान” याच अनुभूतीचे,अवस्थेचे शब्दरूप वर्णन आहे.

लय ताल सूर सारे, शून्यात एक झाले  

आता समेवरी हे कैवल्यगान आले

कुठे बघता येईल : Jio Cinema
संदर्भ :
https://en.wikipedia.org/wiki/Me_Vasantrao
https://myandheri.news/2022/04/first-day-first-show-me-vasantrao-fascination-vasantraos-singing-thoughts-and-musical-legacy/
https://www.deccanherald.com/entertainment/entertainment-news/me-vasantrao-reflects-the-supreme-reward-of-music-1103127.html

– उन्मेष खानवाले.

या लेखमालिकेत एकूण ८ लेख आहेत.
लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –


1.वाह! क्या ‘सीन’ है -ट्रॉय
2.वाह! क्या ‘सीन’ है – ‘स्वदेस’
3.वाह! क्या ‘सीन’ है – उस्ताद हॉटेल
4.वाह! क्या ‘सीन’ है – छोटी सी बात
5.वाह! क्या ‘सीन’ है – मी वसंतराव
6.वाह! क्या ‘सीन’ है – ‘तुंबाड’
7.वाह! क्या ‘सीन’ है – लक्ष्य
8.वाह! क्या ‘सीन’ है – कंपनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *