अयोध्या ते वाराणसी
भाजपच्या प्रवासाची आँखों देखी हकीगत
भाजपच्या प्रवासाची आँखों देखी हकीगत
१९४७ पासूनच्या घटना-घडामोडींतून उलगडलेला स्वतंत्र भारत
संपादन :
भारताचा प्रदीर्घ स्वातंत्र्यलढा यशस्वी होऊन १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. अनेकविध समस्यांचं ओझं घेऊन आणि मोठी स्वप्नं उराशी बाळगून आपल्या नव स्वतंत्र देशाने वाटचाल सुरू केली. पुढील ६५ वर्षांच्या प्रवासात अशा अनेक महत्त्वपूर्ण घटना-घडामोडी घडून गेल्या ज्यामुळे देशाची वाटचाल नियत झाली वा ज्यातून विविध क्षेत्रांतील वळणं दिसून आली. अशा घटनांचा मागोवा या ग्रंथात घेतला आहे.
स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात मूलभूत स्वरूपाच्या कोणत्या गोष्टी घडून आल्या? पुढील काळात राजकारण-समाजकारण कसं बदलत गेलं? अर्थ-उद्योग ते विज्ञान आदी क्षेत्रात कसे बदल संभवत गेले? कितपत विकास साध्य झाला आणि कशा बाबतीत अधोगती संभवली? आपल्या वाटचालीच्या दृष्टीने कोणत्या आंतरराष्ट्रीय घटना अनुकूल वा प्रतिकूल ठरल्या? चित्रकला, नाट्यक्षेत्र ते चित्रपटमाध्यम यातून बदलत्या परिस्थितीचं प्रतिबिंब किती परिणामकारकतेने प्रतीत झालं? क्रीडाविश्वात काय बदल घडले? अशा प्रश्नांची उत्तर देणाऱ्या व जनजीवन घडवणाऱ्या विविध क्षेत्रांतील घटना आणि त्याचप्रमाणे जनजीवन विस्कळीत करणाऱ्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती-दुर्घटना आदींचाही वेध या ग्रंथातून घेतला आहे.
गतकाळातील घटनांचा जास्तीतजास्त तटस्थतेने मागोवा घेण्याचा आम्ही यत्न केला आहे. त्यामागे केवळ स्मृतींना उजाळा द्यावा इतका मर्यादित उद्देश नाही. ज्यांनी हा काळ पाहिला आहे, त्यांना या गतघटनांचं नव्याने आकलन व्हावं ही अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे उगवत्या पिढीला गतकाळाचं नेमकं भान यावं व समकालीन घटनांचा अन्वयार्थ लागावा, हे अभिप्रेत आहे. एकंदरीत, आपल्या भोवतालाचं समग्र भान देऊ पाहणारा असा हा महद्ग्रंथ असा घडला भारत !
शिष्टाईचे अंतरंग- परराष्ट्र व्यवहार आणि मुत्सद्देगिरीच्या विश्वाचा वेध
देशा-देशांतील संबंध जोपासण्यासाठी, वाद मिटवून सामंजस्य निर्माण करण्यासाठी, व्यापार-वृध्दीसाठी, जटिल प्रश्नांची उकल करण्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘डिप्लोमसी’ला अर्थात शिष्टाईला अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्याला अनुसरून अनेक भारतीय राजदूत, अधिकारी, नेते आणि मंत्री आपलं कसब पणाला लावत असतात. मात्र, याबाबतचे तपशील गोपनीयतेच्या आवरणामुळे सामान्यजनांपर्यंत पोहोचत नाहीत.
ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांचं राजधानी दिल्लीत गेली पंचेचाळीस वर्षं वास्तव्य आहे. अनेक अधिकृत परदेशी दौर्यामध्ये पत्रकार म्हणून केलेलं प्रतिनिधित्व व या वर्तुळातील वावर यांतून आलेले अनुभव, केलेली निरीक्षणं आणि अभ्यास या सर्वांतून त्यांनी साकार केलेल्या या पुस्तकाद्वारे ही कसर भरून निघत आहे.
नाईक यांनी या पुस्तकात दिल्लीतील ‘चाणक्यपुरी’, ‘शांतिपथ’ येथील विविध देशांच्या वकिलाती, दूतावास यांबद्दल ‘क्लोज-अप’ साधणारी माहिती दिली असून पं. नेहरूंनी घातलेल्या परराष्ट्र धोरणाचा पाया, यशवंतराव चव्हाण यांचं योगदान, गुजराल सिध्दान्त यांसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांचा वेध घेतला आहे. तसंच त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणातील मुत्सद्देगिरीच्या नाना तऱ्हांची सविस्तर माहिती दिली असून या क्षेत्रात मराठी व्यक्तींनी केलेल्या भरीव कामगिरीचाही आढावा घेतला आहे.
राजदूत, सचिव, राजकीय नेते व मंत्री आदी परराष्ट्र धोरणाशी संबंधित व्यक्तींच्या मुलाखती, भारत-अमेरिका, भारत-रशिया व इतर राष्ट्रांबरोबरच्या संबंधांवर अनुभवी नेते व राजदूत यांनी केलेलं भाष्य या पुस्तकात समाविष्ट केलं आहे. तसंच या क्षेत्रातले काही गंभीर, तर काही हलके-फुलके मजेशीर प्रसंगही सांगितले आहेत.
थोडक्यात सांगायचं तर, स्वातंत्र्योत्तर काळातील मुत्सद्देगिरीच्या विश्वाचा विविधांगी मागोवा घेणारं मराठीतील किंबहुना हे पहिलंच पुस्तक – साउथ ब्लॉक, दिल्ली – वाचकांना एका वेगळया विश्वाचं अंतरंग उलगडून दाखवेल, हे निश्चित!
कथा – महाकाव्य – शोकात्मिका
ग्रीस आणि भारत या देशांना अतिशय प्राचीन संस्कृतीचा उज्ज्वल वारसा लाभला आहे. मौखिक आणि चिरंतन महाकाव्यांची निर्मिती करणारे हे दोनच देश आहेत. दोन्ही देशांतील महाकाव्यांत आणि पुराणकथांमध्ये विलक्षण साम्यही दिसून येतं. या महाकाव्यांचा विषय संहारक युद्ध हा असून त्यातून प्रकट झालेलं तत्त्वज्ञान, डोकावणारा इतिहास, मानवी प्रवृत्ती, धर्माच्या संकल्पना या सर्व घटकांमुळे ही महाकाव्यं विविध पातळ्यांवर समृद्ध ठरतात. या पुस्तकात सुरुवातीला लेखिकेने ग्रीक वाङमयाची पार्श्वभूमी दिली आहे. पुढे ग्रीक पुराणकथांची वैशिष्ट्यं सांगून अभिजात साहित्यमूल्य असलेल्या रोचक ग्रीक पुराणकथा लेखिकेने पुस्तकासाठी वेचल्या आहेत. त्यात झ्यूस, हेरा, अथिना यांसारख्या देवतांच्या कथा आणि ऑर्फीयस व पॅन्डोरा सारख्या इतर कथांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ओडिसी व इलियड ही महाकवी होमरने साकारलेली महाकाव्यं, एस्किलस-सॉफोक्लिस-युरिपिडीस लिखित शोकांतिका यांचाही आढावा घेऊन लेखिकेने एक व्यापक वाङ्मयीन पट या पुस्तकाला प्राप्त करून दिला आहे. प्राचीन ग्रीक माणसाच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, आकांक्षा, तत्त्वज्ञान, स्वप्न, कल्पना प्रतिबिंबित करणारं असं हे
अभिजात वाङमय मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन अंतर्मुख करतं. सर्जक कलावंताला आविष्काराची प्रेरणा देणाऱ्या, मानसशास्त्रज्ञाला मनाच्या कानाकोपऱ्याकडे बघायला प्रवृत्त करणाऱ्या आणि साहित्याच्या व इतिहासाच्या विद्यार्थ्याला माहितीचा नवा खजिना उघडून देणारं रंजक असं…ग्रीकपुराण !
प्रो . तेन यांनी आपला ‘ वाङ्मयसिद्धान्त ‘ फ्रेंचमध्ये १८६४ मध्ये मांडला . त्याचे १८६१ मध्ये इंग्रजीत भाषांतर झाले . गेली एकशेपन्नासाधिक वर्षे जगभरचे अभ्यासक या सिद्धान्ताची सातत्याने चर्चाचिकित्सा करीत आलेले आढळतात . विशेषत : ‘ वंश ‘ ( Race ) , ‘ वातावरण ‘ ( Milieu ) व ‘ वेला ‘ ( Moment ) ही तेनची तत्त्वत्रयी अभ्यासकांना निरनिराळ्या प्रकारांनी विचार करायला लावणारी आहे . या त्रयीखेरीज तेन यांनी इतरही महत्त्वपूर्ण विचार मांडलेले आहेत . महत्त्वाचे म्हणजे त्यांनी ‘ राष्ट्र व राष्ट्रीयते’चाही सुदीर्घ विचार केलेला आहे . आज भारतात आणि विशेषत : महाराष्ट्रात वाङ्मयाच्या सामाजिक अभ्यासाने जोर धरलेला आहे . दलित , ग्रामीण , भटके , आदिवासी , गिरिजन साहित्यकृतींनी वाङ्मयाच्या सामजिक समीक्षेची गरज अधोरेखित केलेली आहे . याशिवाय सध्या आपण ‘ भारतीय वाङ्मया’च्या संकल्पनेचाही गंभीरपणाने विचार करीत आहोत . त्यामुळे तेनच्या सिद्धान्ताचे नव्याने अवलोकन होणे गरजेचे झालेले आहे . प्रस्तुत पुस्तकाद्वारे तेनच्या सिद्धान्ताचे यथामूल व सुविहित भाषांतर प्रथमच मराठीत येत आहे . मराठीबरोबर हिंदी व इंग्रजीच्या अभ्यासकांनादेखील हे भाषांतर उपयोगाचे ठरेल .