READING TIME – 8 MINS

कल्पना करा, की तुम्ही संगणकावर काही काम करत असतांना एक नवीन ई-मेल आल्याचं तुम्हाला नोटिफिकेशन दिसतं. सकृतदर्शनी तो ई-मेल तुमच्या बँकेकडून आलेला दिसतो, ज्यात तुमच्या खात्यातून एक लाख रुपये ट्रान्सफर झाले आहेत आणि त्या transaction चे डिटेल्स बघण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा असा मेसेज असतो. 

इतकी मोठी रक्कम आपण कुठे कधी ट्रान्सफर केली हे आपल्याला आठवत नसतं. कुठल्याही शंकेला वाव नसावी इतका तो ई-मेल ऑथेंटिक दिसत असतो. रक्कम मोठी असल्याने काळजीपोटी तुम्ही दिलेल्या link वर क्लीक करता. लिंकवर क्लीक केल्यावर, तुमच्या नकळत कुठलसं अॅप्लिकेशन तुमच्या कंप्युटरवर आपोआप इन्स्टॉल होतं. ती लिंक अर्थातच फेक असते. 

आता तुमच्या कंप्युटरमधल्या फाइल्स, डेटा corrupt व्हायला सुरुवात होते. याचं कारण म्हणजे तुम्ही स्वतःच “ट्रोजन हॉर्स” नावाच्या Malware (एक प्रकारचा virus च) ला तुमच्या कंप्युटरमध्ये शिरकाव करून दिलेला असतो. ही झाली ट्रोजन हॉर्स या malware ची संक्षिप्त माहिती. 

आता तुम्ही विचाराल, की सिनेमाच्या लेखात या ट्रोजन virus ची माहिती आली कुठून? कदाचित रावसाहेबांसारखे तुम्ही देखील म्हणाल, “हे गल्ली चुकलं का हो पी. एल?”.

तर याचा संबंध एका खूप जुन्या गोष्टीशी आहे. प्राचीन काळी ट्रॉय हे टर्कीमधलं भक्कम तटबंदीने सुरक्षित असलेलं एक शहर होतं. ट्रॉयवर कब्जा मिळवण्यासाठी ग्रीक आणि ट्रोजन (ट्रॉयचे रहिवासी) यांच्यात बरीच वर्षे चाललेल्या युद्धात ग्रीकांना ट्रॉयमध्ये प्रवेश मिळत नव्हता. तेव्हा ग्रीकांनी एक शक्कल लढवत ट्रॉयमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी एक लाकडाचा मोठा घोडा तयार केला.

 ग्रीकांनी जेव्हा ट्रॉय सोडून जाण्याचे नाटक केलं, तेव्हा त्यांनी त्यांच्या काही सैनिकांना ह्या लाकडी घोड्यात लपवून ठेवलं होतं. विजयाने हुरळून जात ट्रोजन सैन्याने तो घोडा ट्रॉयच्या आत नेला. 

त्याच रात्री घोड्यात लपलेले सैनिक बाहेर पडले व त्यांनी ट्रॉयच्या वेशीचे दरवाजे ग्रीक सैनिकांसाठी उघडले. अभेद्य अशा ट्रॉयचा पाडाव झाला. म्हणूनच शत्रूच्या डोळ्यांसमोर छुपा हल्ला करणाऱ्या घातक सॉफ्टवेअरला सायबर क्षेत्रातील भाषेत “ट्रोजन हॉर्स” म्हणतात.

troy1

ट्रोजन युद्धाची ही सगळी कथा ‘इलियड या होमरच्या महाकाव्यावर आधारित ‘ट्रॉय’ या हॉलिवूडच्या सिनेमांत आपल्याला बघायला मिळते. हा चित्रपट एकूणच युद्ध आणि त्या विध्वंसातून निर्माण होणारी मानवी शोकांतिका आहे. काव्यावर सिनेमाची कथा रचणं हे तसं धाडसाचं काम. कारण कादंबरी किंवा कथेत लेखकाने पात्रे जिवंत केलेली असतात. 

कथेत मांडलेली पात्रं जितक्या सहजतेने पडद्यावर सजीव होतात, तितकं सहज काव्यातली पात्रे पडद्यावर जिवंत करणं महाकठीण काम, पण दिग्दर्शक वुल्फगॅंग पीटर्सनने हे धनुष्य छान पेललं आहे. घोड्याचा प्रवेश करून ट्रॉयचा पाडाव इतकीच या सिनेमाची कथा नाहीये. त्याला मानवी भावभावनांचे वेगवेगळे पैलू जोडत डेविड बेन्यॉफने “ट्रॉय”ची गोळीबंद पटकथा लिहिली आहे.

सिनेमाच्या सुरुवातीला ट्रॉय आणि स्पार्टामध्ये शांततेचा करार करण्यासाठी आलेला ट्रॉयचा राजपुत्र पॅरीस हा स्पार्टाच्या राजाच्या, मेलॅनसच्या बायकोकडे, हेलनकडे आकर्षित होऊन तिला ट्रॉयमध्ये पळवून आणतो. अपमानित झालेला मेलॅनस आपल्या भावाकडे, अगमेनॉनकडे मदतीची याचना करतो. अगमेनॉनला खूप आधीपासून ट्रॉयवर आपली हुकूमत हवी असते. या घटनेमुळे त्याला ट्रॉयवर युद्ध करायला त्याला आपसूक एक निमित्त मिळतं.

दुसरीकडे, ट्रॉयचा दुसरा राजपुत्र, पॅरिसचा थोरला भाऊ हेक्टरला युद्धाची स्पष्ट चाहूल जाणवू लागते. आपण हेलनला परत करायला हवं असं हेक्टर आपल्या बापाला सांगतो, पण पुत्रप्रेमाने आंधळा झालेला ट्रॉयचा राजा, “पॅरिसने हेलनला पळवून आणली नाही तर ती स्वखुशीने आली आहे त्यामुळे तिला परत करण्याचा प्रश्नच नाही”, अशी मखलाशी करतो. 

हेक्टरला आता ट्रॉयच्या रक्षणासाठी लढण्यावाचून पर्याय उरत नाही. अगमेनॉनकडे मोठं सैन्य असूनही अभेद्य तटबंदीमुळे ट्रॉयचंच पारडं जड असतं. तेव्हा अगमेनॉन अकिलीसला साकडं घालतो.

अकिलीस हा ग्रीक योद्धा प्रचंड शूर आहे. सुरुवातीला अकिलीसला या युद्धात काडीचाही रस नसतो. पण अकिलीसची आई, थेटिस त्याला सांगते, की “या भयानक युद्धानंतर तू जिवंत परतणार नाहीस, पण इतिहासात मात्र अजरामर होशील. The glory will be yours!” अकिलिसची आई त्याला युद्धापासून परावृत्त करत नाही. किंबहुना ती त्याला प्रोत्साहित करते. 

सलीम -जावेदच्या ‘त्रिशूल’ सिनेमांत सुद्धा असाच एक प्रसंग आहे, जेव्हा आई-वडिलांची मर्जी सांभाळेल अशा सुशील मुलीला संजीवकुमारची आई धुडकावून लावते.” माझा स्वार्थ मी तुझ्या प्रगतीच्या आड येऊ देणार नाही” असं सांगत आपल्या मुलाचा हात ती त्याच्या मालकाच्या मुलीच्या हातात देते. असो, हे जरा विषयान्तर झालं. तर मूळ मुद्दा अकिलीस.

अकिलीस आपल्या कोवळ्या चुलत भावाला, पेट्रोक्लसला घेऊन लढाईला तयार होतो. अकिलीस आणि पेट्रोक्लस दिसायला बऱ्यापैकी सारखे असतात. एका चकमकीत पेट्रोक्लसलाच अकिलीस समजून त्याचा हेक्टरकडून अंत होतो. आपल्या लहानग्या चुलतभावाच्या मृत्यूनंतर अकिलीस सूडाने वेडापिसा होतो.

दुसऱ्या दिवशी एकटा रथ चालवत अकिलीस ट्रॉयच्या अजस्त्र पसरलेल्या भिंतीसमोर उभा राहून “हेक्टर.. हेक्टर” अशा सतत हाका मारून त्याला द्वंद्व युद्धाचे आव्हान देतो. ट्रॉयच्या त्या अजस्त्र भिंतीतून अकिलीसच्या त्या हाका प्रतिध्वनी सारख्या उमटत असतात. संपूर्ण ट्रॉयवर आता निराशेचे मळभ दाटून आलेले आहेत.

दोन दिग्गज योद्धे एकमेकांसमोर उभे ठाकतात. लढाई सुरु होण्यापूर्वी हेक्टर जो कोणी या लढाईत मरण पावेल, त्याच्यावर संपूर्ण इतमानाने अंतिम संस्कार व्हावेत असा ठराव ठेवतो, पण अकिलीस ‘There are no pacts between lions and men.’ असं म्हणत हेक्टरची इच्छा धुडकावून लावतो. अकिलीससोबतच्या त्या भीषण युद्धात हेक्टरचा अंत होतो.

troy2

Repay no one evil for evil असं एक वचन आहे. कधीतरी अचानक एक दुःखद घटना घडते. त्या दुःखाची सल इतकी बोचरी असते, की ज्या व्यक्तीने आपल्याला या स्थितीत लोटलं त्याच्याविरुद्ध प्रतिशोधाची भावना तीव्र होते. सूडाचा अग्नी वणव्यासारखा पसरत माणसाची सद्सद्विवेकबुद्धी भस्मसात करतो. 

हेक्टरला मारल्यावर सुडाने आंधळा झालेला अकिलीस सर्वांदेखत मृत हेक्टरचे दोन्ही पाय आपल्या रथाला बांधत त्याला फरफटत आपल्या शिबीराकडे घेऊन जातो. 

Honour the gods, love your woman and defend your country या त्रिसूत्रीवर जगलेल्या उमद्या हेक्टरच्या मृतदेहाची विटंबना आपल्या डोळ्यांदेखत ट्रॉयचा राजा, प्रिअम त्या उंच तटबंदीवरुन हताशपणे बघत असतो.

त्याच दिवशी रात्री अकिलीसच्या शिबिरात एक वयस्कर व्यक्ती प्रवेश करते. ट्रॉयच्या राजाला, प्रिअमला आपल्या शिबिरात अवेळी आलेलं बघून अकिलीस चमकतो. तू इकडे आलासच कसा विचारल्यावर, ‘I know my country better than the Greeks’ असं म्हणत प्रिअम त्या परिस्थितीत सुद्धा ग्रीकांना माझ्या या भूमीवर विजय मिळवणं इतकं सोपं नाहीये असं सूचित करतो. 

स्वतःच्या जाणत्या, उमद्या मुलाच्या मृत्यूने उन्मळून गेलेला प्रिअम अकिलीसकडे अंतिम संस्कार करायला आपल्या मुलाचं, हेक्टरचे शव मागतो.

Achilles (प्रिअमच्या मागणीला नकार देत) : He killed my cousin.

Priam : He thought it was you. How many cousins have you killed? How many sons and fathers and brothers and husbands? How many, brave Achilles? I knew your father, he died before his time. But he was lucky not to live long enough to see his son fall    

आपला कधीही मृत्यू होऊ शकतो हे जाणून देखील, शत्रूला इतमानाने जो अंतिम संस्कार करू देत नाही तो कसला योद्धा असं सडेतोड बोलून प्रिअम  अकिलीसच्या वागण्याची निर्भत्सना करू लागतो. 

प्रिअमचं ते निर्भीड बोलणं अकिलीसच्या मनाला खोलवर दंश करू लागतं. माणसं मारायची आणि युद्ध जिंकायची चटक लागलेल्या अकिलीसला सूडामुळे आपलं किती अधःपतन झालंय हे प्रथमच जाणवतं. तो स्वतःच्या तंबू बाहेर जाऊन हेक्टरच्या प्रेतापाशी येऊन ढसाढसा रडतो. युद्ध जिंकलेला अकिलीस रडतांना अतिशय केविलवाणा दिसू लागतो. हेक्टरच्या प्रेताला आपण लवकरच परत भेटूया असं म्हणत ते प्रेत प्रिअमला सुपूर्त करतो. योग्य त्या इतमामात हेक्टरचे अंतिम संस्कार पार पाडले जातात.              

तसं बघितलं, तर या सिनेमाला कोणी नायक नाहीये. पडद्यावर आपण जे बघतो ते सगळे निरनिरळ्या गुण-अवगुणांची प्रतिनिधित्व करणारी पात्रं आहेत. ‘ट्रॉय’ मधला ट्रोजन हॉर्स हा सुद्धा एकूणच मानवी भावभावनांचे एक प्रकारचे रूपक आहे. माणूस जन्माला येतो, मोठा होतो. संपत्ती, पैसा, अधिकार मिळवत मोठा होत जातो. ट्रॉयच्या त्या अजस्त्र भिंतीप्रमाणे त्याचा लौकिक वाढत जातो. 

troy3

आयुष्यभर तत्व पाळत जगत आलेल्या त्या माणसाला अचानक एक मोहाचा, लालसेचा क्षण खुणावतो. त्याच्या तत्वाच्या भक्कम तटबंदीपाशी तो मोहाचा क्षण, तो घोडा त्याला उभा दिसतो. अविचाराने तो त्या एका मोहाच्या क्षणाला भुलतो, त्याला प्रवेश करू देतो आणि मग सुरु होतो त्याचा ऱ्हास. वर्षानुवर्षे जतन करून ठेवलेली ती तत्वांची कमान कोसळते. स्वतःच्या हातानेच आयुष्यभराचं संचित तो उध्वस्त करून टाकतो, अगदी ट्रॉय सारखंच!

कुठे बघता येईल : Amazon Prime Video
संदर्भ :
https://en.wikipedia.org/wiki/Troy_(film)
http://www.pahawemanache.com/review/tory-wolfgang-peterson

– उन्मेष खानवाले.

या लेखमालिकेत एकूण ८ लेख आहेत.
लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –


1.वाह! क्या ‘सीन’ है -ट्रॉय
2.वाह! क्या ‘सीन’ है – ‘स्वदेस’
3.वाह! क्या ‘सीन’ है – उस्ताद हॉटेल
4.वाह! क्या ‘सीन’ है – छोटी सी बात
5.वाह! क्या ‘सीन’ है – मी वसंतराव
6.वाह! क्या ‘सीन’ है – ‘तुंबाड’
7.वाह! क्या ‘सीन’ है – लक्ष्य
8.वाह! क्या ‘सीन’ है – कंपनी


Comments(2)

  • Anand Manjalkar

  • 8 months ago

  Great writing. Glory will be yours 😊

  • keerti.nagaracts

  • 8 months ago

  Such a unique piece of content!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *