READING TIME – 8 MINS

ही घटना आहे २००२ सालातील. बँगलोरच्या ताज हॉटेलमध्ये एक नावाजलेला शेफ नारायणन कृष्णन एक दिवस आपल्या गाडीतून प्रवास करत होता. एका सिग्नलपाशी गाडी थांबल्यावर त्याने सहज बाहेर नजर टाकली आणि अचानक बाहेरचं दृश्य बघून तो मुळापासून हादरून गेला. सिग्नलच्या पलीकडे एक बेघर, वयस्कर माणूस आपली भूक सहन न झाल्याने स्वतःचीच विष्ठा खात होता.

ते भयंकर दृश्य बघून नारायणन कृष्णनला भडभडून आलं. त्याने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल्या गावी, मदुराई येथे ‘अक्षय ट्रस्ट’ या संस्थेची स्थापना केली. ‘क्षुधेलिया अन्न! दयावे पात्र न विचारून’ या तुकोबांच्या उक्तीनुसार कित्येक बेघर, विकलांग लोकांच्या जेवणाची सोय ‘अक्षय ट्रस्ट’ च्या माध्यमातून नारायणन कृष्णन सध्या करत आहेत.

नारायणन कृष्णनच्या कामाची खूप प्रशंसा झाली. इतर लोकांप्रमाणेच लेखिका अंजली मेनन ही सुद्धा त्याच्या या कार्याने खूप प्रभावित झाली. त्यावेळी अंजली गर्भवती होती आणि आपल्या आईसोबत कोझिकोडला माहेरपणाची ऊब अनुभवत होती. तिचा दिग्दर्शक मित्र अन्वर रशीद तिच्याकडे सतत नवीन स्क्रिप्ट दे अशी भुणभुण लावत होता. 

कुठलाही सर्जनशील लेखक आजूबाजूला घडणाऱ्या घटना, अनुभव हे टीपकागदासारखं टिपून घेत त्यातून आपल्या कथेसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची सोय करत असतो. आपल्या कोझिकोडलमधील वास्तव्यादरम्यान अंजलीनेसुद्धा तिथला निसर्ग, समुद्र, तिथल्या खाण्यापिण्याच्या सवयी, कला यासोबतच तिथला मुस्लीम समाज, त्यांची संस्कृती असे अनुभवलेले अनेक भिन्न-भिन्न मुद्दे एकमेकांत सफाईदारपणे विणत त्याची स्क्रिप्ट अन्वर रशीदला वाचायला दिली. 

रशीदला स्क्रिप्ट आवडली. लिस्टीन स्टिफनच्या रूपाने सिनेमाला निर्माता मिळाला. अंजली-रशीद-स्टीफन या अमर-अकबर-ऍंथोनीच्या त्रिकुटाने २०१२ साली एक मल्याळी सिनेमा बनवला – उस्ताद हॉटेल!

 ‘उस्ताद हॉटेल’ ची मुख्य कथा ही फैजी (दलकीर सुलेमान) आणि त्याचे आजोबा करीमइक्का (थिलकन) यांच्या विषयी आहे. सिनेमांत सांगितल्याप्रमाणे ‘फैजी’ ची कथा फैजीच्या जन्माच्या आधीपासून सुरु होते. ‘मुलगाच हवा’ या बुरसटलेल्या विचारसरणीचा अब्दूर रझाक एकपाठोएक अशी चार बाळंतपणं आपल्या बायकोवर, फरीदावर लादतो. चार मुलींनंतर पाचव्या खेपेला मुलगा होतो, पण सततच्या बाळंतपणाने फरीदाचा दुर्दैवी अंत होतो. 

अब्दूर आपल्या चार मुली आणि मुलाला घेऊन दुबई गाठतो. अब्दूर आपल्या व्यवसायात जम बसवत श्रीमंत होतो. एक पंचतारांकित हॉटेल सुरु करून फैजीने ते चालवावे अशी त्याची इच्छा असते. फैजीला मात्र आचारी (शेफ) होण्यातच रस असतो. आपलं शेफ होण्याचे स्वप्न हे बापाच्या स्वप्नाला नख लावेल हे ओळखून फैजी आपल्या बापाला मला हॉटेल मॅनेजमेन्टचा कोर्स करायचाय असं खोटंच सांगून शेफ बनण्याचा कोर्स करायला स्वित्झर्लंडला जातो.        

फैजी भारतात परतल्यावर अब्दुरला खरी परिस्थिती कळते. अब्दुर फैजीवर प्रचंड भडकतो. शेफ होणं म्हणजे भिकेचे डोहाळे असं म्हणत तो फैजीचा पासपोर्ट, त्याचे क्रेडिट कार्ड्स जप्त करून घेतो. बापाच्या वागण्याने दुखावलेला फैजी कोझिकोडला, आपल्या आजोबांकडे करीम इक्का (मल्याळी मध्ये ‘इक्का’ म्हणजे मोठा भाऊ) कडे पोहचतो. उभ्या आयुष्यात अब्दुरचं आपल्या या बापाशी, करीमइक्काशी कधीच पटलेलं नसतं. करीमइक्का कोझीकोडच्या किनाऱ्यावर ‘उस्ताद हॉटेल’ नावाचे एक छोटेसे हॉटेल चालवत असतात.  

सत्तरीच्या घरात असलेले करीमइक्का दुनियादारी अनुभवलेले, आपल्या कर्मचाऱ्यांना अडीअडचणीला मदत करणारे सहृदयी गृहस्थ आहेत. आपला नातू म्हणून फैजीला ते कोणतीच विशेष वागणूक देत नाही. टेबलवर सांडलेले खरकटे साफ करणे ते सामानाची डिलिव्हरी करणे असली सगळी कामे ते फैजीकडून करून घेतात. 

जसजसा वेळ जाऊ लागतो, तसतसं सुरुवातीला कुरकुर करणाऱ्या फैजीला हळूहळू आपल्या आजोबांच्या प्रेमळ स्वभावाचे एकेक पदर उलगडत जातात. फैजीचा शेफ बनण्याकडे असणारा कल बघता एका पंचतारांकित हॉटेल मध्ये शेफ म्हणून काम करू देण्याच्या फैजीच्या विनंतीला करीमइक्का होकार देतात. काळ हळूहळू पुढे सरकत असतो.

ustad hotel

त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करत असतांना काही मोठे धनाढ्य प्रस्थ उस्ताद हॉटेलची मोक्याची जागा हडप करण्यासाठी कट-कारस्थाने करत असल्याचं फैजीला कळतं. खोटे-नाटे आरोप करून उस्ताद हॉटेल बंद केले जाते. फैजी, त्याची प्रेयसी शहाना आणि इतर कर्मचारी खंबीरपणे लढा देऊन उस्ताद हॉटेल पुन्हा सुरु करतात. 

हॉटेल नव्याने सुरु होतं, त्याच दिवशी फैजीला फ्रांसमध्ये शेफचा जॉब मिळाल्याचं कळतं. ज्यासाठी आसुसतेने वाट बघितली ते स्वप्न आता फैजीला खुणावत असते. मात्र त्याच रात्री करीमइक्काला Mild heart attack येतो. रुग्णशय्येवर असलेले करीमइक्का फैजीला बोलवून त्याला मदुराईच्या नारायणन कृष्णनना भेटायला सांगून त्याच्याकडे निरोपाची एक चिट्ठी सुपूर्त करतात.

सिनेमांत लेखिका अंजली मेननने नारायण कृष्णन (जयप्रकाश) या नावाचेच पात्र बनवून खरोखरीच्या नारायण कृष्णनच्या कामाला मानवंदना दिली आहे. मदुराईला नारायणन कृष्णनला फैजी भेटतो. “मी माझ्या नातवाला स्वयंपाक कसा करायचा हे शिकवलं आहे. तू त्याला आपण अन्न कोणासाठी रांधायचं हे समजावून सांग.”, करीमइक्काचा हा निरोप वाचून नारायणन कृष्णन फैजीला आपल्यासोबत घेऊन त्याच्या कामाची माहिती देतो. फैजीला कृष्णनचं काम बघून स्तिमित व्हायला होतं.  

दुसऱ्या दिवशी कृष्णन फैजीला आपल्यासोबत दिव्यांग मुलांच्या शाळेत घेऊन जातो. तिथे गेल्यावर कृष्णन त्या दिवशीचे जेवण फैजीला बनवायला सांगतो. फर्माईश असते ती अर्थातच उस्ताद हॉटेलच्या प्रसिद्ध चिकन बिर्याणीची. त्या दिवशी फैजी आपलं सगळं कौशल्य वापरुन उत्कृष्ट बिर्याणी बनवतो. बिर्याणी खाऊन सगळी मुलं तृप्त होतात. या दृश्यात दाखवलेली सगळी मुलं खरोखरची विकलांग आहेत. ती मुलं जेवत असतांना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपतांना कॅमेराचा खूप सुरेख वापर करण्यात आला आहे. बिर्याणी तयार करण्याची क्रिया,शाळेच्या खिडकीतून कुतूहलाने ते सगळं बघत असलेली मुलं आणि पाठीमागे त्याला साजेसे असं बॅकग्राऊंड संगीत हे सगळं खूपच सुरेख पद्धतीने जुळून आलं आहे.          

जेवणानंतर जे घडतं ते मात्र खूप विलक्षण असतं. सगळी दिव्यांग मुलं फैजीभोवती जमा होतात आणि एकेक करून सगळे आपल्या बोटांनी फैजीच्या हातावर विशिष्ट सांकेतिक भाषेत काहीतरी रेखाटतात. ती त्यांची sign language असते. स्पर्शाची भाषा स्पर्शाला कळते. जन्मजात विकलांग, अनाथ, कधी हॉटेलचं तोंडही न बघितलेली ती मुलं कोणी आपल्यासाठी इतकी मेहनत घेऊन इतकं सुंदर जेवण बनवतं याची जाणीव ठेवून फैजीला धन्यवाद द्यायला ती एकत्र आलेली असतात. जगाच्या लेखी दुर्लक्षित, उपेक्षित अशा त्या लहान मुलांची ती प्रतिक्रिया फैजीला अनपेक्षित असते.

खरा साधेपणा खूप मोठा असतो आणि तो प्रत्येकाला साधेलच असं नाही. घराच्या कौलातून अचानक उन्हाचा एक साधा कवडसा आत येतो आणि मग त्या प्रकाशझोतात असंख्य धूलिकण चमकू लागतात. वास्तविक ते धूलिकण तिथेच असतात पण कवडसा पडण्याचं निमित्त होतं. “जो जर्रा जहाँ है वही आफताब है”. नारायण कृष्णन सारखे व्यक्ती कुठल्यातरी साध्याशा कवडशाचं निमित्त होऊन लोकांच्या जीवनांत प्रवेश करतात आणि आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीचं जीवन देखील उजळून टाकतात.

थोड्या दिवसांनी घरी परत गेल्यावर फैजीला कळतं, की त्याचे आजोबा हॉस्पिटलमधून discharge मिळाल्यावर तीर्थयात्रेला निघून गेलेत. ते नक्की कुठे गेलेत हे कोणालाच त्यांनी सांगितलं नसतं. नंतर फैजी फ्रान्सला न जाता उस्ताद हॉटेल सांभाळू लागतो. 

सिनेमाचा शेवट सुखांत आहे. चरितार्थासाठी छोटंसं हॉटेल चालवून गरजूंनामदत करावी बस्स! एवढंच करीमइक्काचा इच्छेचा परीघ होता. समाजात यशस्वी म्हणून जगण्यासाठी पैसा, बंगला, गाडी असे काही ठरवलेले मापदंड आहेत. ते मिळवण्यासाठी बरयाचदा आपल्या तत्वांना मुरड घालावी लागते. तुमचा आनंद, समाधान मोजायला मात्र कुठलेही मापदंड नाही. याच संदर्भात काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर वाचलेली ओशोंची एक कथा प्रचंड आवडली.  

एके दिवशी ओशो एका महत्त्वाकांक्षी राजकीय नेत्याबरोबर त्याच्या गाडीने जबलपूरहून अलाहाबादला निघाले होते. काम महत्त्वाचं आणि तातडीचं होतं. अलाहाबादला वेळेत पोहोचणं गरजेचं होतं. वाटेत ओशोंच्या लक्षात आलं, की रस्ता बदलला आहे. बाहेर मैलाच्या दगडावर पाहून त्यांनी खात्री करून घेतली. त्यांनी त्या नेत्याला विचारलं, आपला रस्ता बदलला आहे का? तो नेता म्हणाला, हो. मघाशी अलाहाबादच्या रस्त्यावर एकाने मला ओव्हरटेक करून गाडी पुढे काढली आणि तो या रस्त्यावर वळला आहे. आता त्याला ओव्हरटेक केल्याशिवाय मला चैन पडायची नाही. त्यांनी ती गाडी गाठून तिला ओव्हरटेक करेपर्यंत दोन तास उलटून गेले होते. त्यानंतरच ते पुन्हा अलाहाबादच्या रस्त्याकडे वळले.

ओशो म्हणतात, आपल्या प्रवासात हेच होतं. आपण सुखाने प्रवास करत असतो, अचानक कोणीतरी कार घेतो, कोणी लक्झरी कार घेतो, कोणी मोठा बंगला बांधतो मग त्या सगळ्यांना ओव्हरटेक केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही, भले प्रवासाची दिशाच बदलली तरी चालेल.

एखादी गोष्ट शिकणं आणि ती प्रत्यक्षात अनुभवणं या सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत. मदुराई भेटीनंतर पूर्वीचा फैजी आणि नंतरचा फैजी यांच्यात लक्षणीय बदल झालेला असतो. गरिबांना अन्न दे, मदत कर वगैरे उपदेश करीमइक्का फैजीला देऊ शकले असते, पण फ्रान्सला जायला उतावीळ झालेल्या फैजीवर त्याचा तितकासा प्रभाव पडणार नाही हे हुशार करीमइक्का ओळखून होते. ‘

ज्याप्रमाणे दुसऱ्याने अन्न खाल्ल्याने आपलं पोट भरत नाही, तसंच कोणीतरी सांगितलेल्या उसन्या-उधारीच्या तत्वांवर आपण आपला मार्ग निवडू शकत नाही. ‘Anyone can fill a stomach, but only a good cook can fill the heart as well’. आपल्या आजोबांनी सांगितलेल्या या वाक्याचा अर्थ खऱ्याअर्थाने त्यादिवशी मदुराईमध्ये फैजी अनुभवतो. 

ustad1

सिनेमा बघितल्यावर करीमइक्का सारखी लोभस माणसं आपल्या आयुष्यात देखील असायला हवी असं वाटतं. All wines should be tasted; some should only be sipped, but with others drink the whole bottle. करीमइक्काचं पात्र या मुरलेल्या wine प्रमाणे आहे. वयानुसार अधिकाधिक वेळ सोबतीला हवंहवंसं वाटणारं!

कुठे बघता येईल : Youtube (हिंदी डब)
संदर्भ :
https://en.wikipedia.org/wiki/Ustad_Hotel
https://web.archive.org/web/20121106001609/http://www.keralathanima.com/movies/usthad-hotel-and-narayanan-krishnan.html

– उन्मेष खानवाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *