शाळेत पहिलीपासून ‘फाइन आर्ट्स’ हा विषय शिकवला जातो, हे मला विराजसमुळे समजलं. कॉलेजला ही एक वेगळी डिग्री असते, हेच मला आतापर्यंत माहिती होतं. पण शाळेत काय काय शिकवतात, असं मी विराजसला विचारलं.

त्यांना शाळेत पहिलीपासूनच फाइन आर्ट्स या विषयात नाटक, नृत्य, शिल्पकला, तबला असे वेगवेगळे विषय होते. त्यातला एक निवडायचा होता, मग विराजसनं नाटक हा विषय निवडला. त्यांची त्या त्या विषयांवर परीक्षाही होत होती. त्यामुळं आपल्याला मित्रांबरोबर नाटक करायला आवडतं हे विराजसला तो पाच-सहा वर्षांचा असतानाच लक्षात आलं होतं आणि त्याच्या घरातही त्याच्या लहानपणी ही आवड जोपासली गेली.

तो जॉइंट फॅमिलीत वाढला. लहान असताना जेवणं झाल्यावर विराजस आणि त्याची चुलत बहीण एखादी सिच्युएशन ठरवायचे आणि नाटक नाटक खेळायचे. पण शाळेमुळं ही फक्त एक आवड म्हणून मर्यादित न राहता त्याचं त्यात शिक्षण झालं.

विराजसला शाळेत दिग्पाल लांजेकर, राहुल वाल्हेकर म्हणजे आरजे राहुल शिकवायला होते. त्यामुळं विराजस त्यांना दादा म्हणतो. शाळा संपल्यावर तो आणि त्याचे मित्र दिग्पाल दादाच्या नाटकाच्या ग्रुपला जॉइन झाले; पण शाळेत विषय म्हणून शिकल्याचा त्याला तिथं फायदा झाला. तिथं त्याचा ग्रुप सगळा नाटकाचाच होता.

“पहिलीपासूनच स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो, बक्षिसं मिळायची, कौतुक व्हायचं. त्यामुळं छान वाटायचं. पहिलीपासूनचे काही एक दोन मित्र आताही ग्रुपमध्ये आहेत” असं विराजस सांगतो.

दिग्पाल दादाच्या ग्रुपमध्ये सगळ्यात लहान होतो. त्यामुळं तिथं खूप नाटकांमध्ये कामं केली. काही लहानही कामं होती. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मदनलाल धिंग्रा यांच्या मैत्रीवर आधारित चॅलेंज, योगेश सोमणांनी लिहिलेलं गणपती बाप्पा मोरया यात लहान भूमिका केल्या.

प्रकाश पारखी यांच्या नाट्यसंस्कार कला अकादमीच्या वी वाँट चार्ली नावाच्या नाटकात चार्ली चॅप्लिनची भूमिका केली. लहानपणापासूनच चार्ली माझा आयडॉल आहे आणि त्याचा असा एकही सिनेमा नाही, जो मी बघितलेला नाही”, असं विराजस म्हणतो.

विराजसनं त्याच्या अगदी सुरुवातीच्या शॉर्ट फिल्मपासून त्याचं काम बघितलेलं आहे. त्यामुळं वी वाँट चार्ली नाटकाचा त्याला फायदा झाला. या नाटकातच त्याची काही मित्रांबरोबर भेट झाली आणि पुढं त्यानं त्यांच्याबरोबरच थिएट्रॉन हा ग्रुप सुरू केला.

“पण मग वेगळा ग्रुप सुरू केल्यावर जे आधी संपर्कात होते त्यांचं काय? असं मी वाचारल्यावर विराजस हसला आणि पुढं म्हणाला, अरे आम्ही वेगळा ग्रुप सुरू केला, तरी आम्हाला पारखी सर, दिग्पाल दादा यांचा खूप पाठिंबा होता” असं तो म्हणाला.

मग मी त्याला त्यांच्या ग्रुपच्या नाटकांबद्दल सांग म्हणालो. मग त्यानं सुरुवात केली. तो म्हणाला, ‘पहिलं नाटक आम्ही २०११मध्ये आणलं. त्याचं नाव ॲनाथिमा. आज १२ वर्षं झाली, तरी त्याचे पुण्या-मुंबईत प्रयोग सुरू आहेत. ग्रुप सुरू केला, तेव्हा आम्हाला सगळ्यांनाच अभिनय करायचा होता, पण कोणी तरी लिहावं लागेल, कोणी तरी दिग्दर्शन करावं लागेल हे समजलं. मग मी म्हटलं मी लिहून बघतो. त्यानंतर मग मी ते नाटक लिहिलं आणि त्याचं दिग्दर्शन केलं. इंग्रजी हॉरर कॉमेडी हा प्रकार पुण्यात चालणार नाही, असं बरेच जण म्हणत होते; पण लोकांनी ते नाटक खूप उचलून धरलं.’

virajas kulkarni

विराजसनं हे नाटक लिहिलं, त्याचं दिग्दर्शनही केलं. पण मग ही कन्सेप्ट सुचली कशी, हे मी त्याला विचारलं. आणि आधी काहीच जर लिहिलेलं नव्हतं, तर मग स्क्रिप्ट तरी कशी तयार झाली, त्यातले बारकावे कुठून घेतले, असं मी आपलं एकावर एक प्रश्न विचारत होतो. माझं झाल्यावर त्यानं एक श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली.

‘मी नववी-दहावीत असताना पॉकेट मनी कमवायला वाढदिवसांना वगैरे जाऊन जादूचे प्रयोग करायचो. जादूचे प्रयोग करतानाच्या बऱ्याच ट्रिक्स मी या नाटकाचं स्क्रिप्ट लिहिताना वापरल्या. त्यामुळं या नाटकाला रिपीट ऑडियन्स तयार झाला.

नाटकात वस्तू गायब व्हायच्या, इकडं तिकडं हलायच्या हे जादूच्या प्रयोगांसारखंच होतं. त्यामुळं लोक हसायचे, किंचाळायचे. आमच्या ग्रुपला या नाटकानं ओळख मिळवून दिली असं मला वाटतं. त्या नाटकामुळं भविष्यात काय करायचं हे समजलं. आपल्याला जे बघायला मिळालं नाही, ते आपण लोकांना दाखवू असं वाटलं. त्यामुळं माझा पहिला सिनेमा व्हिक्टोरिया हॉररच झाला. त्याची मुळं ॲनाथिमा या नाटकात आहेत.

आता आपल्या सगळ्यांनाच विराजसला असलेल्या नाट्य-सिनेक्षेत्राबाबतची पार्श्वभूमी माहीत असेलच. त्याचे आजोबा, म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते जयराम कुलकर्णी आणि आई मृणाल कुलकर्णी. त्यामुळं त्याच्या रक्तात कुठं तरी ही कला असणार असं मला वाटलं होतंच. पण मी तरीही त्याला मुद्दाम विचारलं…

म्हटलं की, सगळ्या लहान मुलांना लोक विचारतात, तुला बाबांसारखं व्हायचं आहे, की आईसारखं? तुला असं कोणा विचारलं होतं का, असेल तर तू काय म्हणायचास? त्याला बहुदा मी हे विचारीन असं अपेक्षित असावं. तो म्हणाला, मी लहान असताना पाहुणे जेव्हा हे विचारायचे, तेव्हा मला असं वाटायचं की एवढेच दोन ऑप्शन आहेत का?

मी लहान असताना बाबांची पुस्तकं बघितली होती. ते क्रिमिनल लॉयर आहेत. त्यांची ती पुस्तकं बघून खूप अभ्यास करावं लागेल हे वाटलं होतं लहान असताना. आणि दुसरीकडं, शाळेत असल्यापासून नाटकांची आवड होती. त्यामुळं आपण याच क्षेत्रात काही तरी करू असं वाटत होतं. पण मला घरातून सांगण्यात आलं होतं, की आधी शिक्षण पूर्ण करायचं मग बाकीचं. कारण माझ्या घरातले सगळे डबल ग्रॅज्युएट आहेत. शाळा-कॉलेज सुरू असताना या गोष्टी प्रोफेशनली करायच्या नाहीत हे ठरलं होतं. पण साधारण कल या बाजूला आहे हे लक्षात आलं होतं. आई आणि आजोबा दोघेही याच क्षेत्रातले असल्यानं या क्षेत्राबाबतचे गैरसमज नव्हते.

तो एवढं सांगून पुढं बोलणारच होता, तेवढ्यात मी मध्येच विचारलं, तुला पार्श्वभूमी तर होती, तू नाटकांत सध्या काम करतोसही. मग इथपर्यंतचा थोडा प्रवास सांग की. त्यावर तो हसला आणि म्हणाला, “माझ्या आईची फारशी इच्छा नव्हती की मी अभिनय करावा. नाटकांत काम करायचो, बक्षिसं मिळायची याचं कौतुक तिला होतंच. पण माझे स्ट्राँग पॉइंट लिखाण, नाटकांचं दिग्दर्शन हे असल्याचं तिला माहीत होतं. त्यामुळं तिकडं लक्ष केंद्रित कर असं तिचं म्हणणं होतं. मग मी बऱ्याचशा गोष्टी शिकून घ्यायचा प्रयत्न केला.

मी सांगितलं तसं चार्ली चॅप्लिन माझा आयडॉल आहे. तो त्याच्या सगळ्या फिल्म्स लिहायचा, डिरेक्ट करायचा, त्याला संगीत द्यायचा, कामही करायचा. बऱ्याच वेळा त्यानं कॅमेराही हँडल केला आहे. त्यामुळं आपल्याला ज्या क्षेत्रात जायचं आहे, त्यातलं सगळं आलं पाहिजे, हे तेव्हापासूनच कुठे तरी डोक्यात होतं.”

अच्छा म्हणून तू सध्या सगळं करू शकतोस होय…. मी आपला परत मध्येच तोडलं त्याला. पण मग याचं काही तू शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आहेस, की कसं? विराजस माझ्याकडे बघत होता. सांगतो जरा धीर धर म्हणाला.

“व्हीएफएक्स आणि ॲनिमेशनमध्ये मला इंटरेस्ट होता. त्याची इंटरमिजिएट परीक्षा पास झालो. ॲडव्हर्टायझिंगमध्ये इंटरेस्ट होता, त्यामुळं त्यांच्या ऑफिसला जाऊन बसायचो. पण आपल्याला जे आवडतं, त्यातली डिग्री घेऊ असा विचार करून मास मीडिया केलं. त्यातही शिकल्यावर असं लक्षात आलं, की लिखाणासंबंधित गोष्टी मला जास्त आवडतात. त्यामुळं मग सुभाष घई यांच्या व्हिसलिंग वुड्समध्ये मी स्क्रीनप्लेमध्ये मेजर केलं”

अरे मग तू सिरीयल कशी काय केलीस? असं मी पुन्हा विचारलं. त्यावर तो पुन्हा हसला. सगळ्यांना एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे. तुम्ही विराजसशी चांगलं बोलत असाल ना, तर तो चिडत नाही. शांतपणे ऐकून घेतो तुमचं. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं स्मितहास्य कायम होतं.

“कधीही ॲक्टिंगमध्ये उतरायचं नाही असं ठरवलं होतं. ॲक्टिंग फक्त थिएटरपुरती मर्यादित ठेवायची हे ठरवलं होतं. कारण मला तिथं ॲक्टिंग करायला प्रचंड आवडतं. तिथं ॲक्टिंग करताना सगळ्यात जास्त आनंद मिळतो. त्यामुळं माझं करिअर कॅमेराच्या मागं असावं असा मला वाटत होतं. पण तसं असताना अचानक टीव्हीवरच्या मालिकेची मला ऑडिशन आली. एक ते दीड वर्षांच्या या कामात खूप काही शिकता आलं. याचा एक मोठा फायदा असा झाला, की आम्ही नाटक करतोय ते बघायला लोकांनी यावं, ही धडपड होती, ती थोडी कमी झाली. सिरीयल खूप लोकांनी बघितलेली असते, पण लोक जेव्हा भेटून सांगतात, की अमुक एक नाटक बघितलं आणि ते खूप आवडलं, तेव्हा सगळ्यात जास्त आनंद होतो.”

आता या क्षेत्रात नाव कमावल्यावर कसं वाटतंय असं मी विचारलं; पण त्यानं मला एकदम थांबवलं. तो म्हणाला मी अजून नाव वगैरे कमावलेलं नाही. अजून खूप काम करायचं आहे मला. काही लोक जरा ओळखतात एवढंच मी म्हणेन. पण त्याचा अर्थ नाव कमावलं आहे असा नाही, असं तो म्हणाला.

“बरं. मग या क्षेत्राबद्दलच थोडं सांग” असं मी आपलं घाबरतच म्हणालो. त्यावरही त्यानं लगेच उत्तर दिलं. “हे क्षेत्र थोडं विचित्र आहे असं मी म्हणेन. कारण जर एखादं काम तुम्ही खूपच उत्तम केलंत, तर कदाचित तुम्हाला दुसऱ्या रोलमध्ये फिट बघितलं जात नाही. किंवा आणखी गोष्ट म्हणजे, दोन प्रोजेक्टच्या मध्ये पुन्हा झिरोपासून काम सुरू केल्याची भावना असते. माझ्या मित्रांबरोबरही मी हे डिस्कस केलं आहे, की पहिला प्रोजेक्ट संपल्यानंतर दुसरा प्रोजेक्ट सुरू होऊन त्याचे पैसे मिळेपर्यंत बेरोजगार असल्याची भावना येते.

आम्ही नाटकांचे वर्कशॉप्स जेव्हा घेतो, तेव्हा अनेक लोक विचारतात, की या क्षेत्रात येण्यासाठी काय करावं लागेल? आम्ही तेव्हा सांगतो, की काम मिळेपर्यंत तुम्हाला एक फायनॅन्शिअल सपोर्ट सिस्टिम उभी करणं गरजेचं आहे. पण या एकाच गोष्टीवर पोट अवलंबून असेल, तर पॅनिक व्हायला होतं. किंवा अनेक वेळा पैशांसाठी असं एखादं काम स्वीकारायला लागतं, की जे तुमच्या करिअरच्या लाँग टर्मसाठी चांगलं दिसणार नाही. बाकी ठिकाणी ती मुभा असू शकते असं मी म्हणेन. कारण तिथं थोडे पैसे मिळवण्यासाठी, दुसरा जॉब मिळेपर्यंत हा केला; पण इथे तसं नाही करता येत.

एखाद्या वेगळ्या गोष्टीशी नाव जोडलं गेलं, तर त्याचा करिअरवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं फिक्स्ड इन्कम असणं मला गरजेचं वाटतं. ते पाठबळ असेल, तर तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या नाहीत, त्याला नाही म्हणता येतं असं मला वाटतं. बिलं सगळ्यांनाच भरायची असतात, हप्ते सगळ्यांनाच भरायचे असतात. त्यामुळं अशी एक सपोर्ट सिस्टीम तयार करून या क्षेत्रात जावं असं मला वाटतं.”

virajas kulkarni 1

आता विराजसचं आधीचं वाक्य लक्षात ठेवून मी सावधपणे विचारलं, की आतापर्यंत जितकं काम केलं आहेस, त्याचा अनुभव काय काय आहे? काही विशेष घडलेले किस्से आहेत का? मी कशा पद्धतीनं विचारतोय हे त्याच्या लक्षात आलं होतं. पण तो त्याविषयी बोलला असता, तर विषयांतर झालं असतं, म्हणून त्यानं थेट उत्तर दिलं माझ्या प्रश्नाचं.

“सध्या व्यावसायिक नाटकात काम करतोय. त्यामुळं प्रयोगानंतर खूप लोक येऊन भेटतात. पण त्यातही अरे हे खूप भारी होतं किंवा ते खूप छान झालं एवढंच न बोलता ते जेव्हा मनापासून व्यक्त होतात तेव्हा खूप छान वाटतं. आता नाटक किंवा सिनेमा बघण्यासाठी घरातून बाहेर जाऊन थिएटरला आलात तर आम्ही दिसतो. पण सिरीयलमुळे घरात बसूनच रोज रात्री आपली भेट होऊ शकते. त्यामुळं नाटक बघायला आल्यावर हा कलाकार आपल्या ओळखीचा नाही असं कधी होत नाही. काही वेळेला याचा अनुभव वयस्कर प्रेक्षक किंवा लहान मुलांमुळं आला आहे.

त्यांच्या मनात ती बाउंड्री राहत नसल्यानं ते अगदी आपुलकीनं, घरगुती असल्यासारखं बोलतात. एक किस्सा आहे. माझी सिरीयल सुरू होती, ज्यात माझा रोल बऱ्यापैकी सोज्वळ तरुणाचा होता. पण एकदा त्याच दरम्यान पुण्यात मिकी नावाच्या नाटकाचा प्रयोग होता, ज्यात मी ६७ वर्षांच्या म्हाताऱ्या माणसाची भूमिका करतो. चिडकं कॅरेक्टर होतं ते. ते नाटक बघायला एक कुटुंब आलं होतं. त्यातली मुलगी नाटकानंतर अस्वस्थ झाली होती. तिला असं झालं होतं, की अरे रोज हे आपल्याला टीव्हीवर दिसतात, ते आज अजिबात तसं वागत नाहीत. मागे ते फोटो काढायला आल्यावर ती रडायला लागली होती.

एका मुलाचा मला सोशल मीडियावर मेसेज आला होता. त्याला त्याच्या घरातले लोक सांगत होते, की तो सीरियलमध्ये बघ कसा वागतो. तसा तूही वागत जा. मग मी त्याला पळवाट सांगितली. मी त्याला म्हणालो, की घरच्यांना सांग त्याला तसं वागायचे पैसे मिळतात. ते तुम्ही मला द्यायला लागा, मी चांगला वागतो. अर्थात हे गंमतीनं सांगितलं मी त्याला. अशा खूप गमती होतात.”

विराजसच्या मते, बाकी कुठल्याही माध्यमापेक्षा नाटकाचा प्रेक्षकवर्ग खूप चांगला समजतो. तो म्हणतो, की हा वर्ग ओळखता येतो. खूप भारी होतं, अशा प्रकारच्या एखाद्या वाक्यापेक्षा नाटक बघणारे प्रेक्षक चांगलं विश्लेषण करून सांगू शकतात.

त्यांना एखादी गोष्ट आवडली असेल, तर ती का आवडली हे त्यांना सांगता येतं. त्याचं उदाहरण देताना तो म्हणतो, की त्यानं अनेक अमराठी लोकही मराठी नाटकांना येऊन बसलेले बघितले आहेत. तो म्हणतो की या प्रेक्षकवर्गाला ना वयाचं बंधन आहे, ना भाषेचं. म्हणूनच त्याला असं वाटतं की हे प्रेक्षक खूप महत्त्वाचे आहेत.

  • गौरांग कुलकर्णी

या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
रंगमंचावरील तारे


 

gaynache_rangi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *