कॉलेज संपल्यावर चला काही तरी टाइमपास करू अशी चर्चा चालली होती. पण करायचं काय हा एक प्रश्न होता. कोणी तरी म्हणालं, अरे फर्ग्युसनला चला. एका हिंदी नाटकाचा शो आहे. सोलो प्रयोग आहे.

आधी मी तयार नव्हतो. पण सगळेच जात होते, मग मीही गेलो. कारण प्रयोग फुकट होता, ऐच्छिक देणगीही नव्हती. पण प्रयोग एवढा छान होता, की असं वाटलं मी स्वत:हून पैसे देऊनही प्रयोग बघितला असता. मग मी त्यानंतर ते केलंही. त्या प्रयोगाचं नाव भंवर आणि कलाकार शिवराज वायचळ.

शिवराज नाटकांत कामं कशी करायला लागला, त्यानं आणखी काय काय काम केलं आहे, हे आता मला ऐकायचं होतं. त्यानं जी गोष्ट सांगितली ती फार मजेशीर आहे.

पुण्यात प्रकाश पारखी सरांची नाट्यसंस्कार कला अकादमी नावाची बालनाट्य बसवणारी संस्था आहे. मीही त्यात एक नाट्यछटा केली होती एका शिबिरात. पण पुढं त्यांच्यासोबत काम केलं नाही. शिवराजच्या कामाची सुरुवातही तिथूनच झाली आहे.

तो आठवीत असताना त्याच्या काही मित्रांबरोबर तिथं काम करायचा. तेव्हाची एक आठवण शिवराजनं सांगितली. परिसा रामायण नावाच्या नाटकात तो लव-कुश या जोडीतला लव झाला होता.

भरत नाट्य मंदिरात झालेल्या प्रयोगात त्यानं केलेलं हे नाटकातलं पहिलं काम. त्यानंतर आणि त्याच्या आधीही त्यानं नाटकांत कामं केली होतीच. नाही असं नाही; पण या क्षेत्रात करिअर म्हणून काही करण्याचा विचार त्यानं केलेला नव्हता.

त्यानंतर शिवराज त्याच्या मित्रांना म्हणजे, सूरज, विराजस, मिहिर आणि ओंकार या मित्रांना पुन्हा भेटला. त्या वेळी सूरज एक बालनाट्य बसवत होता. त्यानं त्यात काम करण्यासाठी शिवराजला विचारलं होतं आणि त्याला शिवराज हो म्हणाला होता.

त्याबद्दल सांगताना शिवराज म्हणतो, तो खरं तर सहज संध्याकाळचा एक टाइमपास सुरू होईल म्हणून मी हो म्हणालो होतो. पण तो टाइमपास राहिला नाही. मी ते नाटक फार सिरियसली घेतलं.’ खरं तर त्याच्या मित्रांमुळंच तो या क्षेत्रात आला असं शिवराज म्हणतो.

त्याची आधी आवड वेगळीच होती. त्याचं अकरावी आणि बारावीला सायन्स होतं. पण त्यानं फाइन आर्ट्समध्ये बॅचलर्स केलं. तिथं तो पेंटिंग करायचा. त्याला खरं तर त्यातच, म्हणजे व्हिज्युअल डिझाइन, व्हीएफएक्समध्ये वगैरे जायचं होतं. पण तो म्हणाला की नाटक इतकं सीरियसली सुरू होतं, की या गोष्टी जरा मागेच राहिल्या.

सिनेमा, नाटक वगैरे जोरात सुरू झालं. पण अजूनही त्यानं चित्रकला सोडलेली नाही. जसा वेळ मिळेल, तशी तो चित्रं काढत राहतो. तो म्हणला, की त्याला नाटकात कामं करताना, नाटक बसवताना आत्तापर्यंत शिक्षणाच्या दृष्टीनं शिकलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचा खूप फायदा होतो.

एवढं काम करूनही शिवराजचं म्हणणं आहे, की या क्षेत्रात नाव कमावलं आहे असं म्हणण्यापेक्षा लोक त्याला ओळखतात एवढंच. त्याला सध्या वेगवेगळ्या लोकांबरोबर वेगवेगळ्या प्रकारची कामं करायला मिळत आहेत, याचाच आनंद आहे.

shivraj waychal

जास्तीत जास्त आणि त्यातही वेगळं काम करत राहणं त्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. शिवराज म्हणाला, की तो सध्या थोडी निवडक कामं करतोय. पण तीही निवडताना प्रत्येक काम आधीच्या कामापेक्षा थोडं वेगळं असेल, याचा विचार करतो. त्यानिमित्तानं नवीन लोक भेटतात, नवीन गोष्टी शिकायला मिळतात, असं त्याचं मत आहे.

पण तो एवढं सगळं सांगत असताना माझ्या डोक्यात पैशांचा विचार येत होता. त्यामुळं शिवराजला मी तसं स्पष्टपणे विचारलं. त्यानं फार विचार केला नाही. फक्त माझ्या डोळ्यांत डोळे घालून त्यानं उत्तर दिलं.

तो म्हणाला, ‘बरेच जण म्हणतात की या क्षेत्रात ठराविक पगार नाही. ते अगदी खरं आहे. मला आठवतं मला कोणी तरी म्हणाल्याचं की, कला हा काही श्रीमंत होण्याचा मार्ग नाही. कला केवळ तुम्ही तुमच्यासाठी करता. मलाही तेच वाटतं, की कला आपण आपल्यासाठी करत राहतो. त्यातून आपण मोठे होत राहतो, त्यातून आपल्याला आनंद मिळत राहतो. पैसे त्यातून मिळतात. असंख्य असे आहेत, की ते करोडपती झाले आणि असंख्य असेही आहेत की जे काहीच होऊ शकले नाहीत. त्यांना अगदी गरिबीतच आयुष्य काढावं लागलं. ठराविक पगारापेक्षा कला जोपासणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. पैशांसाठी कामं करावीच लागतात. त्याला पर्याय नाहीच. तो समांतर प्रवास आहे. काही कामं तुम्ही पैशांसाठी करता, काही तुमच्यासाठी करता. तो समतोल सांभळण्याचा प्रयत्न मी करतो, असं मला वाटतं.’ बास! त्यानं एवढं स्पष्टीकरण दिल्यावर मी गप्प बसलो. काय बोलणार ना आपण यापुढं???

आता वेगवेगळे विचार येत होते. आमची गाडी आता घसरली सध्याच्या काळावर. म्हणजे मी त्याला म्हणालो, की अरे पूर्वी जशी नाटकं होती, तशी परिस्थिती आता दिसत नाही. थोडं वेगळंच वाटतं काही तरी नाटकांना गेल्यावर. तुला काय वाटतं?

तो हसला आणि त्यानंतर त्यानं जे उत्तर दिलं ते जरासं मला टोमणा असल्यासारखं मला वाटलं. पण ते फक्त पहिली दोन-तीन वाक्यं. नंतर मलाही त्याचं बोलणं पटलं.

तो म्हणाला, ‘पुलंनी लिहिल्याप्रमाणं, आमच्या वेळी असं नव्हतं असं म्हणणारी माणसं प्रत्येक काळात आहेत. डिजिटलचा जमाना, ओटीटीचा जमाना आहे असं म्हटलं जातं सध्या. पण लोक वाचत नाहीत किंवा नाटक बघत नाहीत असं मला वाटत नाही. असं म्हणणारे लोक आहेतच. ते आताही आहेत, पुढेही असतील. जे पुस्तकं वाचतात, नाटकं बघतात, त्यांना त्यातून काही तरी मिळतं ना…. माहिती असेल, आनंद असेल, आनंद असेल काही तरी असतं ना. त्याशिवाय का नवनवीन पुस्तकं आणि नाटकं येत आहेत… अर्थात कोणालाही कोणत्याही गोष्टीसाठी फोर्स करता येत नाही. पण ज्यांना जे आवडतंय, त्यांनी ते करावं आणि खूश राहावं.’

shivraj waychal

तो बोलला खरा; पण मी आपला त्याच्यावर विचार बसलो होतो. त्यानंही मला डिस्टर्ब केलं नाही. जरा वेळानं माझी तंद्री सुटली, तेव्हा तो माझ्याकडंच बघत होता. त्याला कदाचित सवय असावी लोकांच्या अशा वागण्याची!

मी भानावर आल्यावर आता मला उत्सुकता होती त्याला आलेले अनुभव ऐकण्याची. देशभरातच काय पण जगभरात जो माणूस दौऱ्यांसाठी फिरला असेल, त्याच्याकडं तर अनुभवांचा खजिना असेल. म्हणून मी त्याला त्याचे अनुभव विचारले. त्यावर तो म्हणाला अनुभव खूप आहेत रे. पण कायम लक्षात राहील असा एक आहे. तो सांगतो, असं म्हणून त्यानं बोलायला सुरुवात केली…

‘आम्ही भंवर करायला बल्गेरियाला गेलो होतो. आशिया खंडातून तिथल्या एका फेस्टिव्हलसाठी हे एकमेव नाटक सिलेक्ट झालं होतं. भंवरची भाषा हिंदी आहे. आम्ही ते त्याच भाषेत सादर केलं. त्यानंतर आम्ही तिथल्या लोकल भाषांतली सादरीकरणं बघितली. मग आमच्याशी बोलायला तिथला एक स्थानिक आला. आमच्याशी बोलायला लागला. त्याला फार काही कळलं नव्हतं आमचं नाटक. पण त्याला ते रिलेट झालं, कारण तोही एके ठिकाणी नाइट वॉचमन होता. त्यालाही भंवरमधल्या माणसासारखी बोलायची सवय होती. तो मला भेटला तेव्हा खूप वेळ रडत होता. माझा हात हातात घेऊन तो खूप वेळ बोलला. त्याचं इंग्लिशही चांगलं नव्हतं. तो मला तोडक्यामोडक्या इंग्लिशमध्ये सांगत होता, की तो कसा एक वॉचमन होता. त्याला भाषा जरी समजली नव्हती, तरी नाटकातून काय म्हणायचं आहे, ते पूर्णपणे समजलं होतं. ही खरं तर खूपच भारी प्रतिक्रिया मिळाली होती मला. हा फार विलक्षण अनुभव होता.’

कलेचं हेच तर विशेष आहे. तिथं तुमच्या भावना पोहोचवणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. ते जो कोणी करू शकतो, तो यशस्वी झालाच म्हणून समजायचं. आणि शिवराज यात पुरेपूर यशस्वी होताना दिसतोय.

  • गौरांग कुलकर्णी

या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
रंगमंचावरील तारे


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *