फॉन्ट साइज वाढवा

मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या, की पूर्वी इतर सर्व उद्योगांसोबत हवी तेवढी पुस्तकं मनसोक्त वाचण्याचा एक कार्यक्रम असे. लायब्ररीतून सकाळी आणलेलं पुस्तक संध्याकाळी बदलून आणायला जायचो. ग्रंथपालकाका हसून विचारायचे, की अरे, खरंच वाचून झालंय का? पण पुस्तक एवढं आवडीचं असायचं, की ते खरोखर दिवसभरात वाचून व्हायचं. कधी दुसरं पुस्तक आणतो, असं होऊन जायचं. अगदी लहानपणापासून थरारक गुप्तहेरकथा वाचायला आवडायचं. सुधाकर प्रभू हे आवडते लेखक होते. त्यांनी लहान मुलांसाठी अनेक पुस्तकं लिहिली. मात्र, ‘डिटेक्टिव्ह डीटी’च्या कथा सर्वाधिक आवडायच्या. हा आपल्याच वयाचा लहान मुलगा काय काय उद्योग करतो, हे बघून चकित व्हायला व्हायचं. भा.रा. भागवतांचा ‘फास्टर फेणे’ विसरणं अशक्यच. हा थेट रूढार्थाने गुप्तहेर नसला, तरी त्याच्या थरारक करामती खिळवून ठेवायच्या, यात वाद नाही. तेव्हा ‘दूरदर्शन’वर आलेली ‘फास्टर फेणे’ची मालिकाही आवडीनं बघितली होती. सुमीत राघवननं साकारलेल्या ‘फेणे’नं मनातल्या फेणेच्या प्रतिमेला धक्का दिला नाही. उलट मनातलं पात्र समोर सगुण साकार झाल्याचा आनंद दिला. त्याच काळात ‘दूरदर्शन’वर ‘अॅगाथा ख्रिस्तीज पायरो’ ही इंग्लिश मालिका सुरू झाली. त्या वेळी अॅगाथा ख्रिस्तीचं नाव पहिल्यांदा ऐकलं. परदेशी गुप्तहेर कथांची तो पहिली ओळख होती. त्यानंतर ओघानंच सर ऑर्थर कॉनन डायल यांच्या शेरलॉक होम्सची (व अर्थात डॉ. वॉटसनची) आठवण येणं आणि इयान फ्लेमिंग यांनी निर्मिलेल्या जेम्स बाँडची भेट होणं अपरिहार्य होतं. (अर्थात बाँडचे सिनेमे लहानपणी कुणी बघू दिले नसतेच, तो भाग वेगळा!) सिनेमातला बाँड हा अर्थातच ‘लार्जर दॅन लाइफ’ असल्यानं जबरदस्त प्रभावशाली वाटायचा. गुप्तहेरांचं जग नेमकं कसं असतं, याची झलक मिळाली ती बाँडपटांमुळंच. (त्या काळात प्रसिद्ध साहित्यिक रमेश मंत्री यांनी ‘जेम्स बाँड’वरून साकारलेलं जनू बांडे हे पात्र आणि त्याबाबतचं त्यांचं विनोदी लिखाणही एका नियतकालिकात अधूनमधून वाचल्याचं आठवतं…) हिचकॉकचे सिनेमे हेरपट नव्हते, तरी हेरपटांतला गूढ व थरारकतेचा अँगल त्यात असायचा. कधी कधी वाटायचं, हिचकॉकच्या सिनेमांतली रहस्यं शोधायला बाँडने यावं. (आता नव्या पिढीत कुणी तरी हा प्रयोग करायला हरकत नाही.) रत्नाकर मतकरी हे मराठी साहित्यातलं मोठं नाव. त्यांच्या गूढकथा वाचूनही अगदी असंच वाटायचं.


मधे बराच काळ लोटल्यानंतर मुलांसाठी म्हणून रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेला ‘फेलुदा’चा संच घेतला. प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित राय यांनी साकार केलेलं हे बंगाली गुप्तहेराचं पात्र. मला तोवर या पुस्तकांचा व या पात्राचा पत्ताच नव्हता. मात्र, ज्येष्ठ पत्रकार, संपादक व अनुवादक अशोक जैन यांनी अतिशय ओघवत्या भाषेत मराठीत अनुवादित केलेले ‘फेलुदा’चे काही भाग वाचले आणि एक नवाच खजिना गवसल्याचा आनंद झाला. अर्थात ही पुस्तकं कुमारवयीन मुलांसाठी होती. मोठ्यांसाठी असं पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या हेरकथा असाव्यात, ही इच्छा ‘रोहन’च्याच ‘अगस्ती’नं पूर्ण केली. अगदी अलीकडं वाचायला मिळालेला हा तीन पुस्तकांचा संच. प्रसिद्ध पत्रकार, लेखक, स्तंभलेखक श्रीकांत बोजेवार यांनी ‘अगस्ती’ हा नवा मराठी गुप्तहेर हिरो जन्माला घातलाय.

यातल्या ‘हरवलेलं दीड वर्ष’, ‘अंगठी १८२०’ आणि ‘न्यूड पेंटिंग@ १९’ तिन्ही गोष्टी खास जमल्या आहेत. प्रत्येक पुस्तक साधारण शंभर पानांचं आहे. हल्ली वाढलेल्या स्क्रीन टाइममुळं वाचनाचा वेळ आणि वेग दोन्ही घटले आहेत. असा वाचकवर्ग मोठा आहे. त्याला हे शंभर पानी पुस्तक सहज वाचून पूर्ण होईल, असा विश्वास देणारं आहे. मुळात पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर आपण त्या कथेत एवढे खिळून जातो, की मध्येच पुस्तक हातातून खाली ठेवणं अवघड जाईल. या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत म्हटलंय – ‘मराठी साहित्यात हेरकथांची सुरुवात १८९०-९२ साली ह. ना. आपटे यांच्या ‘चाणाक्षपणाचा कळस’ या दीर्घकथेपासून झाली, असं मराठी विश्वकोश सांगतो. वाचकांच्या मनात ‘पुढे काय होणार?’ हा तीनाक्षरी प्रश्न जन्माला येण्यातच हेरकथांचं, रहस्यकथांचं सार्थक असतं. मराठीत त्याची सुरुवात करून देणाऱ्या, ‘चाणाक्षपणाचा कळस’ या १३० वर्षं जुन्या कथेस आजच्या काळातील ही हेरकथा…’


लेखकाने म्हटल्याप्रमाणे, मराठी साहित्याला हेरकथांची १३० वर्षांची परंपरा आहे. त्या मानाने हा साहित्यप्रकार आपल्याकडे काही अपवाद वगळता, फार फुलला नाही, असंच म्हणावं लागेल. जे काही प्रयत्न झाले, ते पाश्चात्त्य कथाबीजांचं अनुकरण करणारे असेच होते. बोजेवार यांचा अगस्ती मात्र आजच्या काळातला आहे. तो अर्थातच टेक्नोसॅव्ही आहे, सुंदर बायकांचा उपभोग घ्यायला त्याला आवडते, त्याला चांगलंचुंगलं खाण्याचीही आवड आहे आणि तो दिसायलाही देखणा आहे. थोडक्यात, एक उत्तम हेर असण्याच्या बहुसंख्य वाचकांच्या मनातील सर्व अपेक्षा हा ‘अगस्ती’ पूर्ण करतो. त्याचा बेस मुंबईत असला, तरी कामानिमित्त तो जगभरात अनेक ठिकाणी संचार करतो. ‘रोडमास्टर’ ही त्याची आवडती बाइक आहे. त्याच्या काही विशिष्ट आवडीनिवडी, सवयी, लकबी आहेत. वाचकांना तिन्ही पुस्तकं वाचताना हे जाणवतं राहतं आणि तो कथानकात गुंतून राहतो.


कुठलंही नवं पात्र वाचकांच्या मनात प्रस्थापित करणं हे तसं जिकिरीचं व चिकाटीचं काम आहे. बोजेवार यांनी ‘अगस्ती’च्या रूपानं असा यशस्वी प्रयत्न केला आहे, असं म्हणायला हरकत नाही
आता ‘अगस्ती’चे पुढील भाग लवकर येवोत आणि त्या निमित्ताने वाचकांना नव्या, उत्तम हेरकथा वाचायला मिळोत, हीच अपेक्षा!

– श्रीपाद ब्रह्मे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *