आवडते लेखक विश्राम गुप्ते यांच्या कादंबरीच्या या त्रिधारेची मी बरीच वर्षं वाट बघत होते.

चेटूक कादंबरीची सुरुवात होते साधारण पन्नासच्या दशकातील काळात. राणी ही इंदोरसारख्या शहरातील एका सीकेपी कुटुंबातील तरुण मुलगी वसंत दिघेच्या प्रेमात पडते. वसंतही राणीसाठी वेडा होतो. राणीचं अवघं सतराचं वय. प्रेमाचा अर्थही न सुधरण्याचं वय. खरंतर नुसतंच आकर्षण. लग्न झाल्यावर स्त्रीपुरुष संबंधातील शारीर बाजू राणीला समजते तशी तिच्या मनात तिरस्कार निर्माण होतो. या संबंधाची कुरूपता तिला पचवताच येत नाही. वसंताला तिला काही केल्या समजून घेत फुलवणंही जमत नाही. काव्य, संगीत, साहित्य यात रमणारी राणी वास्तव जगातल्या रोकड्या व्यवहारी लग्नसंसारात मात्र रमत नाही. एकामागोमाग एक तीन अपत्यजन्म राणीवर लादले जातात. पहिलं अपत्य गमावण्याचं दुःखही सोसावं लागतं. या लग्नसंबंधाचा अतोनात तिटकारा मनात पक्का होत राणी ते बंधन तोडण्याच्या वाटेवर चालू लागते. हे लग्न तोडून प्रीतीचा शोध घेण्याचं चेटूक तिच्यावर होतं.

Chetuk

चेटूक संपते. ही आर्त प्रेमकहाणी आहे, पण रूळलेल्या वाटेवरची नाही. ‘And they don’t live happily ever after’ हे बहुतेक कहाण्यांचं मूक वास्तव असतं, चेटूक मात्र ते ओरडून सांगते.

०००

विश्राम गुप्ते त्रिधारेबद्दल जाणून घ्या…

Vishram Gupte Photo
लेखक विश्राम गुप्ते

‘ऊन’ ही कादंबरी चेटूकचा पुढचा भाग आहे आणि अत्यंत रोचक पद्धतीनं लिहला गेला आहे. चेटूकमधे बरेचसे अनुत्तरीत असलेले प्रश्न ऊनमधे उलगडतात. राणी आणि वसंताचा घटस्फोट होणं, प्रकाश आणि विकास या दोन्ही लहान मुलांचं येऊन नागपूरच्या दिघ्यांच्या घरात रुजणं, वसंताचं दुसरं लग्न, राणीचा जगण्यातला संघर्ष, तिची नोकरी आणि पुनर्विवाह, नागपूरकर दिघ्यांचा सगळाच परिवार, घरकारभार हे सगळंच या ऊनमधे फार उत्तम रितीने डिटेलवार पद्धतीनं आलंय, पण कुठेही अजिबात कंटाळवाणं झालेलं नाही. गुप्त्यांची लेखनाची आणि वर्णनाची हातोटी इतकी मनोरंजक आणि चपखल आहे की काही वेळेस वाचकाला आपण त्याच काळात आणि नागपूरच्या दिघ्यांच्या मातीच्या घरातच आहोत असं वाटायला लागतं.

एका भरल्या घरातली बाई जेव्हा नवरा-मुलांना टाकून निघून जाते तेव्हा त्यांचं काय होतं, ती सगळी तगमग विलक्षण सच्चेपणानं, लखलखीत भाजरं ‘ऊन’ होऊन या कादंबरीत तळपली आहे.

Oon Cover

तो काळ, त्या काळातला वर्गसंघर्ष, जातीय वास्तव, लहान मुलांचं जग, एकत्र कुटुंबातील मजा आणि कुचंबणा, सणवार, सीकेपी स्वयंपाकपद्धतीतले बारीकसारीक डिटेल्स याचं या कादंबरीत असणं मजा आणतं. ऊनमधेही मला राणी दिघेच्या प्रेमातून बाहेर येणं जमत नाही. तिच्या दोन्ही मुलांची, त्यातही अवघ्या दीड दोन वर्षाच्या विकासची मात्र अतिशय कीव येते.


Vishram Gupte tridhara

ही कादंबरीत्रयी विकत घेण्यासाठी :

चेटूक, ऊन, ढग – कादंबरीत्रयी

प्रेम… एक संकल्पना, कौटुंबिक नातेसंबंध, आणि व्यक्तिगत जाणिवांचा खोलवर शोध… हे आहे या त्रिधारेचे सूत्र. अभिजात कथनवैशिष्ट्यं असलेली विश्राम गुप्ते लिखित संग्राह्य कादंबरीत्रयी…

खरेदी करा



खरंतर राणीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून गुन्हेगार ठरवणं सोपंच आहे. ‘सेक्शुअली अनफिट’ नात्यात राहून ती ते लग्न ओढत राहिली असती तर मग आवडली असती का? टिपिकल भारतीय नजरेत मग ती देवी ठरली असती. पण ती देवी नाही, ती फार निखळ, विजेसारखी तेज तळपती खरी जिवंत स्त्री आहे, म्हणूनच राणीशी रिलेट करता येतं. तिचं कौतुक वाटतं. तिची डायरी या कादंबरीत लिहून लेखकानं तिचीही बाजूही सविस्तर मांडली आहे.

०००

‘ढग’ हे पुस्तक मात्र विकासच्याच आजूबाजूस फिरतं. या कादंबरीत विकास मोठा झाला आहे. उदासीचा हा ढग मात्र त्याची पाठ सोडत नाही. लहानपणापासून न मिळालेल्या आईच्या सुखानं विकासची आयुष्यभर सदोदित होरपळ केली आहे. त्यामुळे त्याचे व्यक्तिमत्त्व असं नकारात्मक घडले आहे. अनेक करियर्स बदलत विकास चाचपडत मोठा होतो. कोळशाच्या खाणीपासून सुरुवात करत तो इंग्रजीचा प्राध्यापक होईपर्यंत मजल मारतो. नागपूर ते गोवा मधेच अरब देशात अशी विकासची वणवण सुरू राहते. वकिली, झोपडपट्टीत समाजकार्य, कम्युनिस्ट पार्टीतले भ्रमनिरास, प्राध्यापकी अशी त्याची फिरतीही सुरू राहते. चांगली कमावती डाॅक्टर बायको, दोन मुलं असं सगळं ठीकठाक जगणं असूनही विकासच्या आयुष्यात आई नावाचा एक करडा ढग दाटून आलेला कायम आहे.

Dhag Cover

विकासचा हा आत्मशोध कधीकधी कंटाळवाणा वाटतो. राणी आता या कादंबरीत वयस्कर झाली आहे. वाचक आणि विकास शोधत राहतात तो अपराधीभाव तिच्यात अजूनही दिसत नाही.

०००

तिन्ही कादंबर्‍यांमधे ढग ही सर्वात अधिक वाचायला अवघड वाटणारी कादंबरी आहे. ढगवर संपादकीय संस्कार होऊन ती पृष्ठसंख्येत थोडीशी कमी करायला हवी होती. राणी हे पात्र एका पुरुष लेखकानं निर्माण करावं याचं मला अतोनात कौतुक वाटतं. सहजच एक उच्छृंखल, बेजबाबदार, स्वैर अशी बा(आ)ई रंगवता आलीच असती त्यांना. तिथंच विश्राम गुप्ते वेगळे ठरतात आणि पुन्हा एकदा आवडतात. या तीन पुस्तकात तीन कलरस्कीम जाणवतात. चेटूक लाल आणि काळ्या व्हायब्रंट रंगाचं आहे. धगधगत्या आकर्षणाचा आणि प्रेमाचा लाल आणि तिरस्काराचा शुद्ध काळा.  ऊन अनेकरंगी, रंगीबेरंगी सुंदर तुकड्यांच्या गोधडी सारखं उबदार आहे. यात उष्ण रंग आहेत तसे शीत रंगही आहेत. ढग मात्र निरस करड्या रंगाचं आहे.ना शुभ्र न काळा. निव्वळ उदासीचा करडा.
०००
चेटूकचं मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णींचं आणि ऊन आणि ढगची मुखपृष्ठं अन्वर हुसेन यांची आहेत. ती उत्कृष्ट आहेत हे सांगणे न लगे. रोहन प्रकाशनची ही निर्मिती आवर्जून वाचावी अशी आहे.

– जुई कुलकर्णी

(फेसबुक वॉलवरून)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *