फॉन्ट साइज वाढवा

उदगीरचे ‘हॉट हॉट’ संमेलन संपले तरी साहित्य जगतातील उत्साह आणि उत्सवाचे वातावरण अजूनही वाफाळते, गरमागरम आहे. शिवाय सध्या पुण्यापासून ते ठाण्यापर्यंत आणि चांद्यापासून ते बांद्यापर्यंत सगळा महाराष्ट्रच वेगवेगळ्या कारणांनी तप्त झाला असल्याने, साहित्य क्षेत्र तरी त्याला कसे अपवाद ठरणार! त्यामुळेच सध्या सगळीकडे पुस्तक प्रकाशनांचे पेंडिंग सोहळे पार पाडताना दिसत आहेत. पुस्तकांची नवनवी दालने सुरू होत आहेत, (काही महत्त्वाची नियतकालिके बंद पडली तरी) नवी मासिके सुरू होत आहेत, पुस्तकांची प्रदर्शने भरत आहेत… असे एकूण ‘उत्सव बहु थोर होत’ पद्धतीचे वातावरण सगळीकडे दिसते आहे.
वास्तविक मे महिना म्हणजे सुट्टीचा महिना. या काळात शाळांना सुट्टी पडली रे पडली, की प्रवासाला निघायचे असा पूर्वीचा खाक्या असायचा. गेली दोन वर्षे कोव्हिडकाळामुळे हे सगळे वेळापत्रक बिनसले. यंदा मात्र सगळी परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसते आहे. त्यामुळेच दोन वर्षांपासून थांबून राहिलेल्या अनेक पुस्तकांचे प्रकाशन दणक्यात होताना दिसत आहे. विशेष म्हणजे पूर्वी पुण्यात पुस्तक प्रकाशनांसाठी काही ठरावीक ठिकाणे असायची. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा माधवराव पटवर्धन हॉल, पत्रकार भवनाचे सभागृह, एस.एम. जोशी सभागृह ही ती ठरलेली ठिकाणे. ही ठिकाणे आजही लोकप्रिय आहेत, यात वाद नाही. शहराच्या मध्यवर्ती भागात आणि सर्वांना यायला-जायला सोयीची अशी ही ठिकाणे आहेत, हे त्या लोकप्रियतेमागचे कारण आहे. अर्थात आता अनेक जण वेगवेगळी, नवी, चांगली ठिकाणे शोधत आहेत. चित्रपटविषयक कार्यक्रमांना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (एनएफएआय) ऑडिटोरियम कायमच लाभत असते. या जोडीला आता गोखले इन्स्टिट्यूटचा ज्ञानवृक्ष आणि परिसर, भांडारकर इन्स्टिट्यूटचे नवे झालेले अँफी थिएटर, कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेत झालेले रमा-पुरुषोत्तम सभागृह व तिथले सुंदर अँफी थिएटर, पी.एन. गाडगीळ समूहातर्फे खडकवासल्याच्या पुढे कुडजे गावात लवकरच सुरू होत असलेले ‘झपूर्झा’ हे कलासंकुल, मयूर कॉलनीतील शाकुंतल सभागृह अशा कितीतरी नव्या जागांनी पुण्यातील सांस्कृतिक विश्वाला हाकारे घालायला सुरुवात केली आहे. यापैकी काही ठिकाणी तर नियमित सांस्कृतिक कार्यक्रम होतही आहेत. शहरात अशी नवनवी सांस्कृतिक घडामोडींची केंद्रे होत राहणे फार महत्त्वाचे आहे. शहरात असलेली गर्द झाडी, वनराई यांना ‘शहराची फुप्फुसे’ असे म्हटले जाते. या नव्या सांस्कृतिक केंद्रांना ‘शहराच्या मानसिक पोषणाची केंद्रे’ असे म्हटले पाहिजे.
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद यांसारख्या मोठ्या शहरांत अशी सांस्कृतिक केंद्रे असतात व तिथे कायम काही ना काही कार्यक्रम होत असतात. त्यामुळे त्या शहरांतील सांस्कृतिक जीवन बहरलेले दिसते.

याउलट अवस्था ग्रामीण महाराष्ट्राची आहे. बऱ्याच तालुक्यांच्या ठिकाणी चांगली ग्रंथालये आहेत. मात्र, नवी पुस्तके घ्यायची म्हटले, तर त्यांना शहराचीच वाट धरावी लागते. ऑनलाइन पुस्तकविक्रीच्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्यांच्याकडे आपल्याला हवी ती पुस्तके उपलब्ध असतातच, असे नाही. आता मुंबई व पुण्यातल्या मोठ्या प्रकाशकांनी (त्यात ‘रोहन प्रकाशन’ही अर्थातच आले!) आता स्वत:च्या वेबसाइटवरून थेट पुस्तके ऑलाइन उपलब्ध करून, ग्रामीण वाचकांची मोठीच सोय केली आहे, यात शंका नाही.
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुस्तकांच्या जगात जी हालचाल होते, ती यासाठी महत्त्वाची आहे. किती कोटींची उलाढाल झाली किंवा मागील संमेलनापेक्षा कमी झाली की जास्त, हे मुद्दे महत्त्वाचे असले तरी केवळ तेवढेच मुद्दे महत्त्वाचे नाहीत. ग्रामीण भागात संमेलन झाले, की त्या परिसरातल्या अनेक वाचकांची पुढील वर्ष-दोन वर्षांसाठीची तरी पुस्तकांची भूक मिटते. संमेलनात पुस्तकांच्या दालनांसमोर आजही गर्दी नक्कीच होते. पुढच्या पिढीतील अनेक संभाव्य वाचक तिथे येत असतात. साहित्यिकांना बघत असतात. पुस्तक दालनांमधून हिंडत असतात. त्यांच्यासाठी ही संमेलने म्हणजे एक पेरणी असते. या मुलांनी तिथे यावे, पुस्तके बघावीत, हाताळावीत यासाठी प्रकाशकांपासून ते आयोजकांपर्यंत सारेच उत्सुक असतात. पुढच्या पिढीचा हा प्रतिसाद फार महत्त्वाचा असतो. अनेकदा तर असे वाटते, की अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने यापुढची सर्व संमेलने तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्हा केंद्र असलेल्या, पण तुलनेने लहान शहर असलेल्या ठिकाणीच भरवावीत. मोठ्या शहरांमध्ये साहित्य संमेलनांना मिळणारा प्रतिसाद व या निमशहरी भागांत मिळणारा प्रतिसाद यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. तेव्हा या गोष्टीचा खरोखर विचार व्हायला हवा.
आत्ताच्या काळात पुस्तकांचे महत्त्व खरेतर नव्याने सांगायला नको. सध्या समाजमाध्यमांचा वाढता प्रभाव आपण बघतो आहोत. या माध्यमांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे आपल्या मनावर कब्जा करायला सुरुवात केलीच आहे. आपण नकळत दुसऱ्याच्या इशाऱ्यावर नाचणारे रोबो तर होत नाही ना, अशी भीती अनेकदा मनात येते. अशा वेळी पुस्तकांचा फार आधार वाटतो. पुस्तके न बोलता, आपल्याला बरेच काही शिकवत असतात. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे, आपली विवेकबुद्धी शाबूत ठेवायला मदत करतात. आपली जी काही बरी-वाईट मते असतील, ती तर्काच्या कसोटीवर घासून-पुसून, तावून-सुलाखून घेण्याची संधी देतात. यासाठी पुस्तके हवीत, पुस्तक प्रकाशनेही हवीत आणि त्यासाठीचे उत्सवही हवेत… आपल्याला माणूस म्हणून जरा अधिक उन्नत व्हायचे असेल, तर या उत्सवाला पर्याय नाही!
– श्रीपाद ब्रह्मे


या सदरातील लेख…

बोल्ड अँड हँडसम

वाचकांच्या मनात ‘पुढे काय होणार?’ हा तीनाक्षरी प्रश्न जन्माला येण्यातच हेरकथांचं, रहस्यकथांचं सार्थक असतं.

लेख वाचा…


लेख झाला का?

साधारणत: मृगाचा पहिला पाऊस पडून गेला, की दिवाळी अंक काढणारी संपादक मंडळी एकदम ‘चार्ज’ होतात.

लेख वाचा…


येणे स्वरयज्ञे तोषावें…

स्वरांच्या या परब्रह्माला साक्षात बघण्याचे, भेटण्याचे अगदी मोजके प्रसंग माझ्या आयुष्यात आले. माझ्या पत्रकारितेच्या पेशामुळंच हे शक्य झालं.

लेख वाचा…


कलेचा आस्वाद कसा घ्यावा?

कुठलीही सूक्ष्म, अमूर्त किंवा तरल भावना जाणण्याचा प्रयत्नच न करणं किंवा त्या गोष्टी हसून, चेष्टेवारी नेऊन सोडून देणं हे सध्या सर्रास होताना दिसतंय.

लेख वाचा…


कलंदराचे कैवल्यगान…

रसिक म्हणून आपल्या मनातला हा घनघोर अंधार ‘मी वसंतराव’ एखादी ज्योत होऊन उजळवतो.

लेख वाचा…


वऱ्हाड निघालंय उदगीरला…

रसिक म्हणून आपल्या मनातला हा घनघोर अंधार ‘मी वसंतराव’ एखादी ज्योत होऊन उजळवतो.

लेख वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *