फॉन्ट साइज वाढवा

प्रवासातून घरी परतताना माझ्या आत रुंजी घालत असतात या काळात जगलेल्या आठवणी आणि प्रामुख्यानं या आठवणींत असतात या प्रवासात भेटलेली देश-विदेशातील माणसं! मी स्वभावानं तसा अंतर्मुखी (introvert), स्वतःहून कुणात न मिसळणारा, पण या प्रवासानंच मला कोषातून बाहेर आणलं, त्यामुळे लोकांतात आणि एकांतात दोन्हीत रमण्याची कला मला आताशा अवगत होऊ लागली आहे. या सोलो भटकंतीत मला अनेक चेहऱ्याची, अनेक स्वभावाची, अनेक रंगा-ढंगाची माणसं भेटली. ती माणसं त्यांच्या-त्यांच्या प्रदेशातून त्यांचा स्वतःचा असा एक गंध घेऊन आली होती. माझ्याकरिता हे सारंच नवं होतं, मी ते टिपत गेलो. त्याच माणसांविषयी आजच्या लेखात प्रेम-कृतज्ञता म्हणून काही लिहावंसं वाटलं, त्यामुळे यातला हरएक शब्द आणि शब्द त्यांना मनःपूर्वक अर्पण!

मला या प्रवासातली माझी पहिली मैत्रीण आठवते ती दिल्ली शहरातली सुरभी! माझी अगदी पहिली सोलो ट्रीप होती – कसोलला. कसोलमधला माझा पहिला दिवस, मी बॅकपॅक होस्टेलमध्ये ठेवून खाली कॅफेमध्ये आलो आणि ‘ कसोलला पोचलो… आता काय?’ हा प्रश्न घेऊन बसून राहिलो. भेट द्यायची ठिकाणं लक्षात होती, नियोजन अगदी काटेखोर होतं, पण सोलोमध्ये ते तसं पाळलं गेलं तर त्या प्रवासाची मजा जाते हे मला त्या दिवशी कळलं. रात्रीच्या प्रवासामुळे, वाटेत काही न खाल्यामुळे भूक लागली होती, म्हणून कॅफेमध्ये कॉफी आणि सँडविच ऑर्डर केलं आणि करायला काहीच हातात नसतं तेव्हा जे सगळे करतात तेच ‘मोबाईल’ यंत्र माझ्या हाती आलं आणि इतक्यात मला समोरून एक आवाज आला, ‘Hey hi… are you on solo trip? I’m Surabhi, from Delhi’ माझ्यातल्या introvert नं चमकून वर पाहिलं आणि त्याला तिथं एक सुंदर मुलगी आपल्याशी बोलू पाहतेय इतकंच उमगलं. पहिली सोलो ट्रीप, त्यातला हा पहिला दिवस, त्यातही त्या उजळ सकाळी एक देखणी मुलगी तुमच्याशी मैत्री करू पाहतेय हा सुंदर योग होता. पण मी माझ्या तेव्हाच्या स्वभावानुसार तटस्थ सावधगिरी बाळगून ठराविक माहिती दिली आणि सुरभी थेट उठून माझ्या टेबलावर आली, गप्पा मारू लागली. हळूहळू मीसुद्धा स्वतःला मोकळं केलं आणि बोलू लागलो. तीसुद्धा सोलो ट्रीपवर होती आणि तिलासुद्धा कंपनी हवी होती, मग आम्ही गप्पा मारताना आणखीन एक चंदीगढचा मुलगा आम्हाला जॉइन झाला, आम्ही जवळच्या ‘चलाल’ गावात जाऊन आलो, संध्याकाळी पुण्याचा एक मुलगा आमचा दोस्त झाला, आम्ही एका पिझा कॅफेमध्ये धमाल केली आणि पुढल्या दिवशी मी माझ्या वाटेवर मार्गस्थ झालो. पण सुरभी मला माझ्या प्रवासात भेटलेली पहिली मुसाफिर म्हणून मला लक्षात राहिली!

पुढे याच प्रवासात मी पुलगा गावात राहत असताना बंगलोरचे आर्यन आणि ग्रुप माझे मित्र झाले, त्यात रांचीहून आलेले अभिनव-डॉली हे दांपत्य फार मजेशीर होते, त्यांच्यासोबत मी ‘बूनिबूनी पास’ नावाचा एक ट्रेक पूर्ण केला. आणि खाली उतरून त्याच जंगलात ‘फ्रेंच बाबा बेकरी’ नावाचं फटकुळावर ‘हाटेल’ मांडलेल्या मेट नावाचा फ्रेंच माणसाकडे मी राहायला आलो. याच्याकडे TPमध्ये राहण्याची व्यवस्था स्वस्तात होती, पण मला माझं सामान ठेवल्यानंतर कळलं की हा मेट बंधू त्याच्याच बेकरीत निजणार असून, या तंबूत घनघोर जंगलातल्या रात्री मी एकटाच झोपणार आहे. सुरुवातीला भीतीचा पल्ला पार केल्यानंतर मला दिवसभराच्या दमण्यामुळे सहज झोप लागली आणि सकाळी मी रात्री होतो तसा आणि तितका पूर्ण जागा झालो. मी बाहेर आलो तेव्हा मेटकडे जोसेफ नावाचा त्याचा एक मित्र त्याला भेटायला आला होता, त्याच्याशी गप्पा मारताना कळलं त्याचं वय सत्तावीस वर्षं असून भारत हा त्याचा अठरावा देश आहे, जिथे तो सोलो भटकंतीला आलाय. मी मनातल्या मनात तोंडात बोटं घातली. जोसेफ गेल्यानंतर मी मेटशी गप्पा मारू लागलो. त्याला मी थेट विचारलं, ‘एवढं कसं रे बिनधास्त तुम्ही जगता?’ तेव्हा त्यानं क्षणभर माझ्याकडे पाहिलं, तो त्याच्या वाढलेल्या खुरट्या तपकिरी दाढीतून हसला आणि माझ्या मनगटावरल्या महागड्या घड्याळाकडे बघत म्हणाला, ‘तुझ्याकडे हे घड्याळ आहे बघ… माझ्याकडे ते नाहीये… तुझ्याकडे हा मोबाइल आहे… माझ्याकडे आहे पण इतका भारीतला नाहीये… तू जितके कपडे आठ दिवसंकरिता आणले असतील तितकेच मी गेली दोन वर्षं वापरतोय… आदित्य माझ्या गरजा खूप कमी आहेत अरे…!’ मेटचं माझ्या पहिल्याच सोलो भटकंतीत मिळालेलं हे वाक्य माझ्यातल्या मुसाफिराचे डोळे उघडणारं ठरलं. 

मला पुढे माझा गोकर्ण प्रवास आठवतो. जिथे मला आनंद भेटला, पुन्हा बंगलोरहून आलेला, पण प्रचंड बावरलेला आणि त्याच संध्याकाळी या प्रवासतील सुंदर आठवण देऊन गेलेली सुकृतीही मला स्मरते. आनंद बाइकवरून गोकर्णला आला होता, पण त्याला इथे येऊन काय करायचं असतं हे माहीत नव्हतं, जे मला माहीत होतं आणि माझ्याकडे बाइक नव्हती. आम्हा दोघांच्या गरजा एकमेकांमुळे पूर्ण झाल्या. त्या संध्याकाळी केरळच्या तिरुअनंतपुरमहून आलेल्या चार मुलींचा ग्रुप भेटला, मित्र झाल्या आणि यातलीच एक सुकृती! आम्हाला रात्री गोकर्णच्या पॅरडाईज बीचवर जायचे होतं, दिल्ली, जर्मनीचे काही साथी सोबत होते. या मुलींनी दोन स्कूटी भाड्यावर घेतल्या होत्या, पण रात्रीची वेळ असल्यामुळे प्रत्येक मुलाने गाडी चालवावी आणि मुलीनं सुरक्षित मागे बसावं असं ठरलं आणि याच नियोजनात सुकृती माझ्या सोबत आली. तिच्यासोबत मल्याळम, इंग्रजी, हिंदी, मराठी या चारही भाषांच्या मिश्रणातून झालेला संवाद माझ्या आजही कानात गुंजतो आहे. पॅरडाईज बीचवर आम्ही sea planktons पाहिले, परतताना आम्ही एकमेकांना ऐकवलेलं आपापल्या भाषेमधील गाणं मी कधीही विसरू शकत नाही. या स्कूटी कालावधीत जे घडलं ते खूप सुंदर होतं, कायम लक्षात राहणारं होतं. दुसऱ्या दिवशी या सगळ्या मुली परत निघाल्या, त्यात सुकृतीही निघून गेली. मग मी आणि आनंद त्याच्या बाईकवर याना केव्ज, विभूती फॉल्सला जाऊन आलो. परतताना चाळीस-पंचेचाळीस किमीच्या प्रवासात मी हायवेवर आनंदची बाइक हाताळली, त्यानं ती हाताळू दिली हे मी कसं विसरू! 

अनेक माणसं आणि व्यक्तिमत्त्व या प्रवासात भेटली ती एका लेखात आणणं शक्य नाही. एकटा प्रवास करणं म्हणजेच एकटा प्रवास न करणं असतं हे तेव्हाच आकळू शकेल जेव्हा असा प्रवास आपण करायला सुरुवात करू. तुम्ही जेव्हा एकट्यानं प्रवास कराल, तेव्हा तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल की, सगळं जग आपल्यासोबत वाहतं आहे. या वाहण्यात मध्येच एखादा खडक लागेल तेव्हा त्यावर विसावून ही माणसं पहा; अगदी तुमच्याच सारखी ती आहेत असं तुम्हाला आढळून येईल. त्यातल्याच एका समधर्म्याला तुम्ही साद द्या, त्याच्याशी मैत्री करा आणि पुढल्या प्रवासाला निघताना त्याला स्मरणात ठेवून प्रवाहात पुढे व्हा… 

इतकं सगळं खरं सोपं आहे!

  • आदित्य दवणे


This image has an empty alt attribute; its file name is primeadvt-1024x546.jpg
या सदरातील लेख…

‘गोकर्ण’: एक अस्पर्शित जादूनगरी! (एकला ‘सोलो’रे)

अचानक एका मैत्रिणीनं येऊन विचारलं, ‘You coming to Paradise beach?’ या बीचचं नावच मी पहिल्यांदाच ऐकलं…

लेख वाचा…


माणुसकीचे त्यांचे चेहरे!

– कर्नाटकातल्या छोट्याशा गावात एका शाळेच्या सहलीत मी ‘पोरा सम पोर’ होऊन मिसळून गेलो. बदामीला जायचं होतंच, पण मी अनभिज्ञ असलेलं ‘महाकुट मंदिर’ याच सहलीमुळे बघता आलं.

लेख वाचा…


जान है तो जहान है! (कलगा-पुलगा-तुलगा)

– मी त्या नदीवरील पुलावरती मांडी घालून दुखावलेला हात दुसऱ्या हातात घेऊन बसून राहिलो. हा हात मध्ये नसता, तर त्याच्यामागे पोट होतं! 

लेख वाचा…


अनेगुंडी : एक अद्वितीय सफर!

-त्या खडकांवरील अनघड चित्रांवरून हात फिरवताना मला अबोल-सर्जनशील पूर्वजांना स्पर्श केल्याचा भास झाला, पण त्यापूर्वीचा प्रवास म्हणजे एक दिव्य होतं! 

लेख वाचा…


बद्रीनाथ : एक नियोजित बुलावा

-थंडी कडाडून वाढली आणि मंदिराशेजारील गरम पाण्याच्या कुंडांनी आम्हाला हाक दिली. दोघांचे डोळे एकमेकांकडे बघताना लकाकले. 

लेख वाचा…


आचवलांचा फॉर्म्युला आणि वेरूळ-कैलास!

-मंदिराच्या चारही बाजूंनी असणाऱ्या गुहांत भरताचे राज्यारोहण, कृष्णजन्म आणि असे अनेक पौराणिक प्रसंग रेखाटलेले आहेत. जे आपण बघताना, समजून घेताना इतके गुंगून जातो की आपलेच नकळत शिल्प होते, भान हरवते! 

लेख वाचा…



एका बोअरिंग प्रवासाची इंटरेस्टिंग कथा!

-श्री अरविंदांच्या समाधी दर्शनासाठी गेलो आणि गेल्या दोन दिवसांच्या कंटाळ्याचा क्षण एका क्षणात नाहीसा झाला. 

लेख वाचा…



गोकर्ण-उडपी एक ‘गीत-प्रवास’!

-कुडले बीचवर मी लग्नाआधी साजरा केल्या जाणाऱ्या हळदी समारंभाची माहिती गुगलवर शोधत बसलो. 

लेख वाचा…



महाबलीपुरम – पुरातनातील राजधानी!

-महाबलीपुरम हे तामिळनाडूला नाही तर संपूर्ण भारताला पडलेलं सुंदर स्वप्न आहे. 

लेख वाचा…



आळंदी : एका वारकऱ्याने दाविली हो वाट!

-एकदा पुण्यात प्रवेश केला की मग मी आनंदातच असतो, मला छान वाटतं! 

लेख वाचा…



One Comment

    • SP

    • 2 years ago

    एकट प्रवास करण म्हंजेच एकट प्रवास न करणे असत ! I really enjoy reading your unfiltered memories written so beautifully .. Thanks for sharing them with us !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *