फॉन्ट साइज वाढवा

सोलो मुशाफिरीत ठिकाणांची, वास्तूंची, निसर्गाची काढलेली छायाचित्रं कालांतरानं बघताना, पहिल्यांदा भेटलेल्या, मदतीला धावून आलेल्या, मित्र झालेल्या माणसांच्या छायाचित्रांपाशी मी अधिक रेंगाळतो. प्रवासात भिडणारा प्रत्येक क्षण कधीच यंत्रात कैद करता येत नाही, तशी काही महत्त्वाची माणससुद्धा आपल्याकडून नकळत हरवून जातात. कर्नाटकातील बदामीला गेलो असता अशाच दोन माणसातल्या देवदूतांची आठवण मला आज होते, ज्यांची माणुसकी माझ्या मनात सदैव तेवत आहे.

हंपीवरून मी निघालो आणि हॉस्पेटमध्ये बस पकडून बदामीला पोहचलो. बागलकोट जिल्ह्यातील बदामी हे तिथल्या गुहा, मंदिरं आणि किल्ल्यासाठी प्रसिद्ध असलेलं शहर आहे. बदामी बस स्टॅंडला लागूनच ‘बसवेश्वर लिंगायत’ खानावळीत मी अगदी रँडमली शिरलो. भूक प्रचंड लागली होती. बदामीला जाण्याचा योग आलाच तर जरूर या घरगुती खानावळीत भोजनाचा आस्वाद घ्या. सोलो मुसाफिर सहसा कमीत कमी खर्चात अधिकाधिक अनुभव कसा मिळवता येईल याच्या प्रयत्न असतात. योग्य ठिकाणी अधिक खर्च झाला किंवा अगदी एखाद्या वेळेस पैसे वाया गेले, तरी मी तो प्रवासाचाच एक भाग मानतो, पण थोडं थांबलं, शोधलं की गोष्टी जुळून येतात हे आता कळू लागलं आहे. त्यानुसार बनशंकरी देवीच्या मंदिराजवळ एका होम स्टेत माझी उत्तम सोय झाली.

उद्या मला ऐहोले आणि पत्तदकल ही बौद्ध, हिंदू आणि जैन मंदिरांची संकुलं पहायची असल्यामुळे, आजच्या दिवसभरात मला उद्याच्या प्रवासाची साधनं निश्चित करायची होती. स्थानिकांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार उद्या स्वतंत्र गाडीच ठरवावी लागणार अशी शंका मला येऊ लागली. परंतु शोध थांबला नव्हता. आणि माहिती मिळाली की याच परिसरात सकाळी सहाच्या सुमारास स्थानिक बस सेवा सुरू होते, जी अतिशय मर्यादित असल्यामुळे लोकांना तितकीशी माहीत नाही. आता शोध त्यादिशेनं सुरू झाला, स्थानकात काही फोन फिरवले आणि बसची निश्चित वेळ शोधून काढली. बदामी-बनशंकरी-पत्तदकल-ऐहोले असा हा पट्टा आहे. तेव्हा बनशंकरीवरून ऐहोले जावे आणि तशाच बसमधून पत्तदकल गाठावे असा आराखडा मी मनात आखला.

जर तुम्ही वास्तुकलेबद्दल फारच चोखंदळ असाल, तर ही दोन्ही मंदिर-संकुलं पाहायला एक-दोन दिवसही आपल्याला अपुरे पडतील. या मंदिर संकुलांत सात ते दहा या शतकांत निर्माण झालेल्या चालुक्य स्थापत्य कलेचा नयनरम्य सोहळा बघायला-अनुभवायला मिळतो. ज्या सर्जनशील हातांनी ओबडधोबड खडकांतून हा अद्भुत चमत्कार पेश केला, त्या हातांना आपण सालाम करतो आणि एक-एक मंदिर बघताना, हळूहळू मनात तो आकार घेऊन आपण पुढे सरकतो. भारतीय धर्मांचं हे देखणं संमेलन पाहताना मनात उदात्त भाव निर्माण होतात. त्या आठवणींसह शेवटी आपण संकुलाच्या बाहेर पडतो. तसाच पत्तदकल मंदिर संकुलातून मी बाहेर आलो आणि असं एकटं फिरताना अनेकदा पडणारा ‘आता काय करायचं..?’ हा प्रश्न माझ्या मनामध्ये उपस्थित झाला. सरळ बदामी जाण्याचा मी विचार केला खरा, पण कुठलंही साधन मला मिळत नव्हतं. शेवटी वाहन-विनंतीचा हीचहायकिंग प्रयोग सुरू झाला.

बरं एक मगाशी सांगायचं राहिलं, मी याठिकाणी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गेलो होतो, हा बहुदा कर्नाटकातल्या शाळांच्या सहलीचा सिझन असावा, कारण ठराविक युनिफॉर्म मधल्या मुलांचे घोळके शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ढगांसारखे इथून तिथे वावरत होते. तेव्हा हा आठवडा, किंबहुना डिसेंबर महिना गर्दीचा आहे, हे ध्यानात ठेवा. पण माझ्या हेच पथ्यावर पडलं! सरळ जाऊन मुलांची जमवाजमव करणाऱ्या, किंचित त्रासलेल्या एका शिक्षकाला मी गाठलं, त्यांचं नाव जयशंकर सर. हे नेमके निपाणीचे निघाले, मराठी समजत होतं, परंतु बोलताना अडचण होती, माझी काहीच हरकत नव्हती. मी स्वतः शिक्षक आहे सांगून प्रथम पार्श्वभूमी तयार करताना हळूच सरांना त्यांच्या सहलीचा मार्ग विचारला. तो मला अपेक्षित ठिकाणी पोचवणारा आहे, हे समजल्यावर ‘मी जॉईन होऊ का?’ अशी विनंती केली आणि भल्या माणसानं चक्क होकार दिला! बसमध्ये बसलेल्या मुलांना मोजताना सरांनी ‘अधिक एक’ अशी शेवटची मोजणी पूर्ण केली, प्रवास पुन्हा सुरू झाला.

कर्नाटकातल्या छोट्याशा गावात एका शाळेच्या सहलीत मी ‘पोरा सम पोर’ होऊन मिसळून गेलो. बदामीला जायचं होतंच, पण मी अनभिज्ञ असलेलं ‘महाकुट मंदिर’ याच सहलीमुळे बघता आलं. मुलं कुठलीही असोत, ती मुलांसाराखीच वागतात, तेव्हा पुढील प्रवासात शाळेतल्या या अनवट पोरांशी मस्ती केली, नंतर मंदिरातच त्यांच्या मांडीला मांडी लावून महाप्रसादाचा आस्वाद घेतला. शेवटी विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मोकाट सोडल्यानंतर, एका झाडाच्या सावलीखाली जयशंकर सरांशी शिक्षकांच्या आदिम समस्यांवर गप्पा मारल्या. मग वेळ होताच पुन्हा मुलांची जमवाजमव करून, त्या बसनं मला बदामीच्या गुहांजवळ सोडून दिलं आणि धूळ उडवत ती पुढे निघून गेली.

बदमीच्या गुहा अनुभवून, मग समोर असणाऱ्या किल्ल्याच्या माथ्यावर एकटा बसून, दिवस मावळताना शांत होत जाणाऱ्या बदामी शहराकडे मी बघत राहिलो. हा एकंदर प्रवासातला शेवटचा टप्पा होता. हंपीपासून जगलेले क्षण तिथे आठवत होते. आणि अचानक जाणवलं, की आपण त्या गोजिऱ्या मुलांचा, जयशंकर सरांचा आठवण म्हणून एखादा फोटो काढायला हवा होता, पण ते राहूनच गेलं..

दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता माझी बेळगावसाठी बदामीवरून बस होती. जिथे मी रहात होतो तिथून सहा वाजल्याशिवाय मला कुठलंही वाहतुकीचं साधन मिळणार नाही, हे आता कळून चुकल्यामुळे किंचित मनात धाकधूक होती. म्हणूनच पहाटे चार पासून मी बनशंकरी मंदिराच्या आसपास ‘एखादं वाहन मिळतंय का!’ या आशेनं घिरट्या घालू लागलो. चिटपाखरू नसणं म्हणजे काय, हे मला आता कळत होतं. सव्वाचार झाले, साडेचार झाले, एक-एक मिनिट पुढच्या मिनिटाला गिळत पुढे सरकत असताना, माणूसपणाची एकही खूण तिथे उमटत नव्हती. चालत गेलो असतो तर रस्ता अर्ध्या तासाचा होता, परंतु पाठीवरच्या सामानाचं धूड, पहाटेची अनोळखी वेळ, यामुळे मी ते टाळत होतो. परंतु आता गत्यंतर नाही हे ओळखून मी निघणार, इतक्यात एका खोपटात दिवा चमकला आणि एक चहावाला त्यातून उगवला.

भाषाभिमानी दक्षिणेत संवादाचा प्रचंड प्रश्न उद्भवतो. आधी त्या चहा विक्रेत्याला गाठून जमेल त्या प्रकारे ‘काही सोय होऊ शकते का?’ हे विचारण्याचा मी प्रयत्न केला. त्याला माझी धावपळ हावभाव बघून समजली आणि  तो ‘नाही’ असं खुणेनं सांगत होता. तेव्हा हतबल होताना, नेमकी कडेला आडवी करून ठेवलेली त्याची लुना मला दिसली आणि माझ्या अशाब्दीक भाषेतून ‘मला सोडतोस..?’ असं अगतिक होत मी त्याला विचारलं, तर डिसेंबरची थंडी असल्यामुळे कुडकुडण्याचा अभिनय करून ‘मी येणार नाही..’ असं त्याच भाषेतून तो उत्तरला. शेवटी ‘मी बाईक चालवतो, तू मागे बस..’ अशी हिंदीतून विनंती केली आणि अचानक तो राजी झाला, तेव्हा कळलं पठ्याला हिंदी येत होतं.

पहाटे पावणे पाच वाजता अनोळखी चहावाल्याला मागे बसवून, त्याच्याच बाईकवर मी बदमीच्या मोकळ्या रस्त्यांवरून बेभान सुटलो आणि स्थानकावर पोहचताच माझी बेळगावची बस निघताना मला दिसली. त्याचे जीवापासून आभार मानण्यासाठीसुद्धा माझ्याकडे वेळ नव्हता. मी कसाबसा उतरलो, खिशात हात घातला, हाताला लागली ती नोट काढून त्याला भेट देताना कृतज्ञतेची चक्क मिठी मारली आणि सुटणाऱ्या बसच्या दिशेनं धावत सुटलो. काठोकाठ बस मिळाली.

मुशाफिरी करताना एक गोष्ट कायम जाणवत राहते, की अशा क्षणांची छायाचित्रं  काही काढता येत नाहीत! हे क्षण फक्त तुमच्या मनात निरंतर दरवळत राहतात. काही क्षण तर इतके परमोच्च कृतज्ञतेचे असतात, की तेव्हा ते संपूर्ण जगण्याशिवाय दुसरं काही सुचतही नाही. जयशंकर सर असतील किंवा हा चहा विक्रेता, अशी अनेक माणसं आणि त्यांची माणुसकी, या प्रवासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मी अनुभवतो आहे.

त्यांचे चेहरे, त्यांच्या आठवणी माझ्या मनात त्याच सर्जनशील हातांनी घडवलेल्या मंदिरासारख्या आजही शाश्वत आहेत.

– आदित्य दवणे

RohanSahityaMaifaljpg-1-1


या सदरातील लेख…

‘गोकर्ण’: एक अस्पर्शित जादूनगरी! (एकला ‘सोलो’रे)

अचानक एका मैत्रिणीनं येऊन विचारलं, ‘You coming to Paradise beach?’ या बीचचं नावच मी पहिल्यांदाच ऐकलं…

लेख वाचा…


One Comment

    • Saurabh Burungale

    • 2 years ago

    अप्रतिम लेख सर! वाचताना असं वाटत होतं की ते दृश्य आपल्या डोळ्यांसमोरच घडत आहेत. लेखाचा शेवट तर लाजवाब! सोलो मुशाफिरीतील एक गोष्ट फार आवडली ती म्हणजे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फिरणं, आनंद घेणं! फक्त पैशांची बचत व्हावी म्हणून नाही तर अशा प्रकारच्या फिरण्याने जयशंकर सर व चहा विक्रेतां सारखी माणसं भेटतात व असे मुलांसोबत बस मधून प्रवास करण्याचे वेगळे अनुभव मिळतात! लिंगायत मधील भोजन करण्याची फार उत्सुकता आहे व ही शिल्पं पाहण्याची देखील उत्सुकता आहे. ग्रेटच! पुढील लेखासाठी उत्सुक!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *