फॉन्ट साइज वाढवा

मागच्या दोन दिवसांनी भरभरून दिलेल्या अनुभूतीनं भरलेला खजिना घेऊन मी बंक बेडवरून उठलो. गोकर्ण मंदिर, ओम बीच, पॅराडाइस बीचमध्ये पाहिलेले सी प्लँक्टन्स, याना गुहा, विभूती धबधबा आणि अधेमध्ये पेरलेल्या असंख्य आठवणी मनामध्ये रुंजी घालत होत्या. मला त्या साऱ्या जपत आजचा हा दिवस काल धावती भेट दिलेल्या कुडले बीचवर जाऊन निवांत जगायचा होता. तुम्हाला शांत जगायचं असेल तर कुडले बीच हे त्याकरिता अतिशय आदर्श ठिकाण आहे. इथे तुम्हाला शॅक्स (बीच लगत राहण्यासाठी खोल्या) मिळतात, मी ठीक मधोमध, जिथून समुद्र किनारा पूर्णपणे जगता येईल अशी शॅक निवडली आणि तिच्यात बॅकपॅक ठेवून मी बाहेर कॅफेमध्ये येऊन बसलो. समुद्रावर पडलेलं ऊन, त्यानं तापलेली वाळू, नारळाच्या झाडांनी अच्छादलं कॅफे आणि त्यातून वाहणाऱ्या वाऱ्याने निर्माण झालेली थंडाई… मी गरजेपेक्षा अधिक रिलॅक्स होतो. कॉफी, सँडविच ऑर्डर केलं, एकीकडे पुस्तकं हातात होतं, त्याचा कंटाळा आला की कानात आपसूक हेडफोन्स जात होते, त्याचा कंटाळा आला की सगळं बाजूला ठेवून फक्त समोर चमकणारा समुद्र, त्याच्या किनाऱ्यावर त्वचेचा मुळातला लाल-गोरा रंग भारतीय करण्याची इच्छा बाळगून मॅटवर पहुडलेले परदेशी पाहुणे, मधूनच उडणारा पक्षी, लागणारी डुलकी, यात मी स्वतःला हरवलं होतं; मी या पृथ्वीवर नव्हतोच! वेळ सुखाचा होता, समाधानाचा होता.

संध्याकाळ होत आली आणि मी कॅफे सोडला. मालकाशी मैत्री झाली, रात्री जेवायला काय मिळू शकेल याची माहिती मिळाली आणि केशर-गुलाबी आकाश होताना मी किनाऱ्यावर वाळू नेईल तसा भटकू लागलो. किनाऱ्यावरचा एका खडकावर रेलून बसलो, समोर दिसणारी चित्र न्याहाळत राहिलो. अनेक परदेशी ग्रुप्स अंतरा-अंतरावर बसून माहोल बनवत होते, जगणं जगत होते. कुणी ध्यानधारणा, कुणी व्यायाम, कुणी गाणी म्हणत होते, कुणी वाद्य सुरा-तालात वाजवत होते. कुठलंही बंधन न बाळगता तात्पुरता झालेल्या जोड्या कळत होत्या, त्यांना आपल्याकडे आहे ते सगळं एकमेकांना देऊन मग पुन्हा आपापल्या मर्गावरती लागायचं होतं. मी हे सारं टिपत होतो, एकीकडे सूर्यास्त होत आला होता आणि माझा फोन वाजला. माझी तंद्री भंग झाली, खिशातून फोन काढला, स्क्रीनवर अनपेक्षित नाव पाहिलं आणि मी उडालो. सुखा-समाधानाच्या दुनियेतून सत्यात आलो, मनातून आनंद झाला होता खरा, पण क्षणभर मनावर दडपण आलं कारण स्क्रीनवर नंबर होता – संगीतकार अशोक पत्की यांचा!

मी फोन उचलला,

‘काका नमस्कार कसे आहात…?’

सुरुवातीची बोलणी झाली आणि पत्की काकांनी जो उच्चार केला, ज्यानं माझा हा प्रवास एका वेगळ्या सांगीतिक वळणावर लागला त्याचीच कथा तुम्हाला सांगायची आहे.

मी कविता करतो, स्वतःसाठी! आतमधून स्फुरलेल्या तरंगांना कागदावर व्यक्त करण्यासाठी कवितेचं माध्यम निवडतो. ठरवून ‘आता लिहायचंच’ असं ठरवून मी बोटावर मोजण्या इतक्या कविता लिहिल्या असतील. या घटनेच्या काही महिन्यांपूर्वी ‘सारे संगीतकार’ हे गीत मी लिहिलं, ज्याला यशवंत देव यांच्यापासून आताच्या आघाडीच्या संगीतकारांचा स्वरसाज लाभला, ज्याला संगीत मित्र स्वरूप होनप यानं दिलं. त्यात पत्की काकांचाही सहभाग होता. मला अनेकदा मित्र प्रश्न विचारतात, ‘एकटं फिरताना तुला बऱ्याच कविता सुचत असतील नाही!’ पण त्यांना माझं उत्तर नकारात्मक मिळतं, कारण मला प्रवासात अगदीच काही सुचत नाही, कारण माझं पूर्ण लक्ष माझ्या नियोजनावर केंद्रित असतं, त्यातल्या अनुभवांमध्ये मी हरवून जातो आणि कविता आत लुप्त होते. आणि अशात मला पत्की काकांनी समोरून प्रश्न केला होता,

‘एका चित्रपटाला गाणं हवंय, हळदीचा प्रसंग आहे, तुला लिहायला आवडेल का?’

काकांनी माझं काम ‘सारे संगीतकार’ प्रोजेक्टमध्ये पाहिलं होतं आणि म्हणून बहुधा त्यांना मला हे काम द्यावसं वाटलं असावं. पण मी ट्रिपवर होतो, माझा तनामनाचा झोन संपूर्ण निराळा होता. पत्की काकांनी मला विचारून मला चित्रपटात पहिलं गाणं लिहिण्याची पहिली संधी समोर आणून ठेवली होती. समोरून येणारी ही संधी आणि ती संधी देणारं व्यक्तिमत्त्व अजिबातच छोटं नव्हतं. मला ताबडतोब निर्णय द्यायचा होता. मी कुडले बीचवर रात्रीकडे कलणाऱ्या सुंदर संध्याकाळी मोठ्या पेचात येऊन पडलो होतो. आणि माझ्या तोंडातून उत्तर निघून गेलं जे अर्थातच मेंदूनं दिलं नव्हतं, ‘काका मी नक्की प्रयत्न करेन, मी तुम्हाला उद्यापर्यंत लिहून देतो गाणं…’

आणि मी माझ्याच उत्तरामुळे थक्क झालो. माझा होकार मिळताच काकांनी पुढच्या अर्ध्या तासात मला व्हॉट्सॲपवर गाण्याची अप्रतिम चाल पाठवली आणि कुडले बीचवर मी लग्नाआधी साजरा केल्या जाणाऱ्या हळदी समारंभाची माहिती गुगलवर शोधत बसलो. आश्चर्य म्हणजे आयुष्यात त्या क्षणापर्यंत मी एकही हळदीचा कार्यक्रम पाहिला नव्हता, आमच्यात साजरी होणारी हळद आणि चित्रपटातल्या नायिकेची हळद यात साधर्म्य असण्याचा संभव ५०-५० टक्के होता. मी निर्णय देऊन बसलो होतो, आलेल्या संधीवर स्वार झालो होतो, आता परतीची वाट नव्हती.

माझ्याकरता आता आजूबाजूचा परिसर, परदेशी पाहुणे, उडणारे पक्षी आणि लागलेली भूक सगळं नाहीसं झालं आणि फक्त चित्रपटाची नायिका आणि तिची हळद इतकाच प्रश्न माझ्यासमोर महत्त्वाचा उरला. मेंदूमध्ये रक्ताचा प्रवाह वाढत आहे याचा अनुभव येऊ लागला आणि एकाक्षणी मी चक्क विचार थांबवला आणि स्वतःशीच हसलो. आजूबाजूला पाहिलं, भोवताल आपल्यातच रममाण होता, तो बघत राहिलो. आणि गोळा केलेल्या माहितीवरनं, मुळातल्या कवित्वातून मनात ओळी तरळल्या,

हळदीच्या रंगात रंगली आज गुलाबी लाज का

वाट कुणाची पाहे नवरी सांग कुणी येणार का

माझ्याही नकळत काहीतरी सुचून गेलं, जे अर्थपूर्ण होतं, सुवर्णमध्य साधणारं होतं. भोवताली संपूर्ण जांभळा अंधार भरून उरला आणि माझ्या आत काही उजळू लागलं. माझ्या शॅक मालकाला विनंती करून मला जे असेल ते खाऊ घालायला सांगितलं, त्यानं ऑम्लेट ब्रेड दिला आणि मी स्वतः ला शॅकमध्ये बंद करून घेतलं. पान-पेन सोबत असण्याची अर्थातच शक्यता नव्हती, त्यामुळे सवयीप्रमाणे मी मोबाईलवर झरझर सुचेल तसं लिहू लागलो, अनेकदा अनेक ओळी बॅकस्पेस सलग दाबून खोडल्या गेल्या. नवीन लिहिल्या गेल्या, त्याही खोडल्या गेल्या. आणि असं करत-करत दीड कडवं लिहून झालं. उद्याच्या दिवशी मला इथेच थांबून चालणार नव्हतं, मी मुर्डेश्वर पाहून उडपीला स्टेसाठी पुढे जाणार होतो. त्यासाठी मला लवकर उठणं अपेक्षित होतं. सुचलेल्या ओळी फायनल करून शेवटी ठरवून मी झोपलो, पण डोक्यात हळद रंगली होती.

दुसऱ्या दिवशी गोकर्णवरून मी मुर्डेश्वरला निघालो. गाण्याचं आव्हान नसतं तर सगळं शांतपणे झालं असतं, कारण पुढचं नियोजन माझं पक्कं होतं. ते न हलवता मला गाण्याची काळजी वाहत पुढचा प्रवास करायचा होता. वेळेवर मला गोकर्ण स्टँडवरून मुर्डेश्वरची बस मिळाली. खिडकी जवळ जागा मिळून, प्रवासातल्या आनंदात मी मोबाईल बाहेर काढून उरलेली हळद शब्दांत साजरी करण्यास सुरुवात केली.

दीड-दोन तासात ठिकाणं आलं आणि मोबाइल खिशात गेला. आता मुर्डेश्वर नावाची कविता अनुभवायची होती. समुद्र किनाऱ्यावर वसलेलं हे शंकराचं देखणं मंदिर आहे. जिथे वीस मजली प्रवेशद्वार असून ज्याच्या आत लिफ्टनं शेवटच्या मजल्यावर जाता येतं जिथून तीनही बाजूनं व्यापलेला समुद्रकिनारा आणि मुख्य म्हणजे १३७ फुटी शंकराची भव्य सुंदर मूर्ती आपल्याला पाहता येते. तुमचे हात त्या दिव्य दृश्याला नमस्कार करण्यासाठी आपसूक जोडले जातात. तुम्ही काही काळ तिथे रमता आणि मग अतिशय महत्त्वाचा भाग महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पळता, जसा मी भूक लागून आधी त्या दिशेनं जाऊ लागलो.

महाप्रसाद भरपेट आणि चविष्ट होता. तिथे भलीमोठी रांग असल्यामुळे तिथेही वेळ मिळाला तसा मोबाइल बाहेर येऊन त्यावर काम सुरू राहिलं. आता उडपीच्या दिशेनं मी प्रस्थान करणं अपेक्षित होतं. मला हायवेवर उडपीसाठी बस मिळाली, पण बसण्यासाठी जागा मिळाली नाही. शेवटी उतरण्यापूर्वी कधीतरी ती मिळाली, पण त्या काळात काही लिहून झालं नाही. मला मिळालेल्या माहितीनुसार इथल्या प्रसिद्ध कृष्ण मंदिराच्या आवारात काही मठांची भक्तनिवास व्यवस्था आहे तिथेच चौकशी करून मी राहण्यासाठी जागा शोधणार होतो. ज्या कुटुंबासोबत मी हा प्रवास आणि ही माहिती शेअर केली, नेमकं त्यांना काही नियमांमुळे जागा न मिळता, केवळ मला एकट्याला खोली मिळाली आणि तीसुद्धा केवळ ३०० रुपयांत. ठिकाण, राहण्याची सोय सर्वोत्तम होती. त्यामुळे सगळं आटपून मी आधी कृष्ण दर्शनाला गेलो.

मला निसर्गपूर्ण ठिकाणं अधिक आवडतात, तिथे मी रमतो, अध्यात्मिक ठिकाणी आलोच आहोत तर पाहून येऊ अशा उत्साहात मी बघून घेतो, पण या वेळी मुर्डेश्वर आणि आताचं उडपी याला मोठा अपवाद ठरलं. एका रांगेत पुढेपुढे सरकताना मी कृष्णाच्या सुमधुर मूर्तीसमोर येऊन समोर उभा राहिलो आणि स्तब्ध झालो. मी कृष्णाची इतकी सुंदर मूर्ती यापूर्वी कधीच पहिली नव्हती. मी इतका हरवून गेलो की तिथल्या पुजाऱ्याला आणि मागच्या बंधूला मला पुढे होण्याची जरा चिडून आठवण करून द्यावी लागली. मी इतका त्या मूर्तीच्या प्रेमात होतो की वेळेची तमा न बाळगता मी पुन्हा रांगेत उभा राहिलो आणि दर्शन घेऊन आलो. ही दोन्ही ठिकाणं फक्त बघायचं म्हणून मी पाहिली नव्हती, त्यांनी मला जिंकून घेतलं होतं!

पण अजूनही गाणं अपूर्ण होतं…! ती रात्र जागून मी हे आव्हान पूर्ण करण्याचा निश्चय केला आणि हळदीचं गाणं उडपीच्या कृष्णाच्या साक्षीनं पूर्ण झालं. पुढल्या दिवशी सकाळी त्यातले काही शब्द, ओळी बदलून ‘हरे कृष्णा’ मनात म्हणून मी पत्की काकांना गाणं व्हॉट्सॲपवर पाठवून दिलं आणि जवळच्या एका समुद्र किनाऱ्यावर भटकायला गेलो. काकांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा होती, मनात धाकधूक होती, पण सोबतच्या प्रवासाला आता पूर्ण वेळ देण्याचा मी आता निर्णय घेतला.

आनंदाची गोष्ट म्हणजे काकांनी संध्याकाळपर्यंत गाणं अप्रुव्ह केलं, माझं कौतुक केलं आणि माझ्या कष्टाचं चीज झालं. पुढल्या दिवशी मी उडपीवरून मुंबईला निघालो. मी खरंच या वेळी काय-काय माझ्यासोबत घेऊन येत होतो? खरं तर खूप काही… गोकर्णपासून सुरू होणाऱ्या प्रवासातल्या सुंदर आठवणी, निसर्गापासून मानवनिर्मित देवतांच्या मंदिराचे देखणे आकार आणि माझ्यातल्या कवी शेजारी उगवून आलेली चित्रपट गीतकाराची शक्यता!

पुढे हे गाणं वैशाली सामंत यांनी गायलं, पण काही कारणांमुळे तो चित्रपट बाहेरच आला नाही. पण अशोक पत्कींसारख्या एका दिग्गज सांगीतकाराकडून आपल्याला गीताची विचारणा व्हावी, एका वेगळ्या परिस्थितीत आणि मनःस्थितीत आपण ते आव्हान स्वीकारावं, दैव कृपेनं ते पूर्ण व्हावं आणि पुढे ते गीत तितक्याच ताकदीच्या गायिकेनं गावं हे सगळं मॅड होतं… अविस्मरणीय होतं… खूप काही शिकवणारं आणि आतला माणूस घडवणारं होतं…!

– आदित्य दवणे

या सदरातील लेख…

‘गोकर्ण’: एक अस्पर्शित जादूनगरी! (एकला ‘सोलो’रे)

अचानक एका मैत्रिणीनं येऊन विचारलं, ‘You coming to Paradise beach?’ या बीचचं नावच मी पहिल्यांदाच ऐकलं…

लेख वाचा…


माणुसकीचे त्यांचे चेहरे!

– कर्नाटकातल्या छोट्याशा गावात एका शाळेच्या सहलीत मी ‘पोरा सम पोर’ होऊन मिसळून गेलो. बदामीला जायचं होतंच, पण मी अनभिज्ञ असलेलं ‘महाकुट मंदिर’ याच सहलीमुळे बघता आलं.

लेख वाचा…


जान है तो जहान है! (कलगा-पुलगा-तुलगा)

– मी त्या नदीवरील पुलावरती मांडी घालून दुखावलेला हात दुसऱ्या हातात घेऊन बसून राहिलो. हा हात मध्ये नसता, तर त्याच्यामागे पोट होतं! 

लेख वाचा…


अनेगुंडी : एक अद्वितीय सफर!

-त्या खडकांवरील अनघड चित्रांवरून हात फिरवताना मला अबोल-सर्जनशील पूर्वजांना स्पर्श केल्याचा भास झाला, पण त्यापूर्वीचा प्रवास म्हणजे एक दिव्य होतं! 

लेख वाचा…


बद्रीनाथ : एक नियोजित बुलावा

-थंडी कडाडून वाढली आणि मंदिराशेजारील गरम पाण्याच्या कुंडांनी आम्हाला हाक दिली. दोघांचे डोळे एकमेकांकडे बघताना लकाकले. 

लेख वाचा…


आचवलांचा फॉर्म्युला आणि वेरूळ-कैलास!

-मंदिराच्या चारही बाजूंनी असणाऱ्या गुहांत भरताचे राज्यारोहण, कृष्णजन्म आणि असे अनेक पौराणिक प्रसंग रेखाटलेले आहेत. जे आपण बघताना, समजून घेताना इतके गुंगून जातो की आपलेच नकळत शिल्प होते, भान हरवते! 

लेख वाचा…एका बोअरिंग प्रवासाची इंटरेस्टिंग कथा!

-श्री अरविंदांच्या समाधी दर्शनासाठी गेलो आणि गेल्या दोन दिवसांच्या कंटाळ्याचा क्षण एका क्षणात नाहीसा झाला. 

लेख वाचा…Comments(2)

  • Vishakha Patil

  • 2 years ago

  खूप सुंदर व अप्रतिम लिहिलेलं आहे, ही कथा नक्कीच

  तरुण पिढी ला प्रेरणादायक ठरेल.

  Amazing piece of work and very well articulated.

  Keep writing Aditya !!

  • Vishakha Patil

  • 2 years ago

  खूप सुंदर व अप्रतिम लिहिलेलं आहे, ही कथा नक्कीच तरुण पिढी ला प्रेरणादायक ठरेल.

  Amazing piece of work and very well articulated.

  Keep writing Aditya !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *