फॉन्ट साइज वाढवा

पुण्यात वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग कायम सुरू असतात. जपानी केशरचनेपासून ते आफ्रिकन वेषभूषेपर्यंत, काश्मिरी खाद्यपदार्थांपासून ते केेरळच्या आरोग्यप्रसाधनापर्यंत आणि गच्चीतल्या बागेपासून ते घोड्यांच्या पागेपर्यंत सगळ्या गोष्टींचे ‘क्लास’ इथं घेतले जातात. मात्र, सध्या ‘कलेचा आस्वाद कसा घ्यावा?’ हा वर्ग घेण्याची नितांत आवश्यकता आहे.

ग्रंथालयांत पुस्तकांची काळजी कशी घ्यावी, याबाबत हजारेक सूचना लिहिलेल्या असतात. तरीही पुस्तकांचे कोपरे दुमडणं, पुस्तकांची पानं फाडणं, मजकुरावर खुणा करणं, लेखकाला वाह्यात सूचना करणं असले प्रकार सुरूच असतात. तीच प्रथा सिनेमा आणि नाटकं बघतानाही बहुसंख्य प्रेक्षकांनी जारी ठेवली आहे. पॉपकॉर्नसह इतर अनेक आवाज करणारे पदार्थ खाणं, समोरच्या खुर्चीवर पाय ठेवणं, ते नाही जमलं तर समोरच्या खुर्चीला खटक खटक पाय मारणं, सोबत आलेल्या माणसासोबत अखंड गप्पा मारणं, मोबाइल काढून सतत मेसेज चेक करणं किंवा आलेला प्रत्येक फोन घेऊन मोठ्या आवाजात बोलणं… एक ना दोन! हे सर्व प्रकार करताना आपण काही चुकीचं करतो आहोत, याची कसलीही जाणीव या निरागस जीवांना नसते.

हल्ली हा अनुभव वारंवार यायला लागला आहे. नाट्यगृहांत, चित्रपटगृहांत, शास्त्रीय संगीताच्या मैफलीत किंवा अगदी चित्रप्रदर्शनांतही! आपल्याला एकाग्रपणे कुठल्याही कलाकृतीचा आस्वाद घेताच येणार नाही, याबद्दल प्रेक्षकांची आता खात्री पटत चालली आहे. महत्त्वाचं कारण अर्थातच आपल्या हातात आलेला मोबाइल नावाचा उपद्रव. वेळी-अवेळी वाजणाऱ्या मोबाइलच्या रिंगमुळे या सर्व ठिकाणी आपल्याला त्रास होऊ लागला आहे. प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी मोबाइल ‘सायलेंट मोड’वर टाकण्याची सूचना दिली जाते. मात्र, ती काही जणांना समजत तरी नाही किंवा ते दुर्लक्ष तरी करतात. असे लोक थोडेच असतात हे खरंय; पण त्यांच्यामुळं होणारा उपद्रव मात्र सगळ्यांना सहन करावा लागतो. नाटक किंवा कुठलीही कलाकृती सादर होत असताना, प्रेक्षक म्हणून आपण काही मूलभूत नियम पाळले पाहिजेत, याबाबत काही दुमत नसावं. आम्ही तिकीट काढून नाटक बघतो, त्यामुळे आम्ही वाट्टेल तसे वागू, या सबबीला तर अर्थच नाही. आपण अनेक सेवांसाठी पैसे मोजतो. ते पैसे त्या सेवांसाठी असतात; त्या बदल्यात आपण केवळ ती विशिष्ट सेवा विकत घेतलेली असते. सेवा देणारे लोक आपले नोकर होत नाहीत, ही गोष्ट अशा सबबी सांगणाऱ्यांनी ध्यानात ठेवायला हवी. ‘विमानाचं तिकीट काढलंय, पैसे मोजलेत म्हणून आता जरा पाच मिनिटं खिडकी उघडू द्या,’ असं म्हणून चालेल काय? किंवा हॉटेलमध्ये पैसे मोजले, म्हणून आपण तिथल्या प्लेट उचलून घरी आणत नाही. नाटकाचं तिकीट काढलंय, याचा अर्थ ती कलाकृती बघण्यासाठी मोजलेले ते दाम आहेत. त्या बदल्यात एक चोख कलाकृती सादर करण्याचं काम कलाकारांचं आहे. त्यामुळं कलाकारानं त्याच्या इतर वैयक्तिक अडचणी काहीही असल्या, तरी रंगमंचावर पाऊल ठेवल्यापासून ते पडदा पडेपर्यंत आपल्या भूमिकेत शिरून काम केलंच पाहिजे, ही अपेक्षा जेवढी रास्त, तेवढीच प्रेक्षकांनी त्या कलाकृतीचा सामुदायिक आस्वाद घेता येण्यासाठी केलेल्या नियमांचं पालन करण्याची अपेक्षाही योग्यच!

जेव्हा या अपेक्षांना काही कारणांनी तडे जायला सुरुवात होते, तेव्हा खरी अडचण येते. जेव्हा या अपेक्षा उभयपक्षी मान्य असतात आणि दोघांकडूनही त्या व्यवस्थित पाळल्या जातात, तोवर सगळं छानच चाललेलं असतं. मात्र, हल्ली मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळं या अपेक्षा पूर्ण होणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. मोबाइल वापरणाऱ्या अनेक लोकांना तो वापरण्याच्या सभ्य पद्धती अजिबात माहिती नसतात. मुळात एखादी व्यक्ती नियम पाळते म्हटलं, की सगळेच नियम पाळते आणि नियम तोडणारे सगळीकडेच नियम तोडतात. समोरच्या खुर्चीवर पाय टाकून बसणे किंवा मागून लाथा मारणे इथपासून ते मध्यंतरात चहा-वड्याच्या स्टॉलवर ढकलाढकली करणे, अगदी स्वच्छतागृहातही किळस येईल अशा पद्धतीने वागणे अशा गोष्टी करणारे लोकच मोबाइल वाजविणाऱ्यांमध्ये आघाडीवर दिसतात. याशिवाय पुण्यात तरी नाटकाला येणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असते. त्यांना मोबाइल नीट ‘सायलेंट मोड’वर टाकता येत नाही. फोन वाजला, की तो घेतलाच पाहिजे अशा मानसिकतेची ही पिढी आहे. नाटक सुरू असताना अचानक फोन वाजला, की त्यांची होणारी धांदल बघायची. वास्तविक, मोबाइल ‘स्विच ऑफ’ करणे किंवा ‘सायलेंट मोड’वर टाकणे हे फारच सोपं काम आहे. ही पिढी आपल्या नातवांकडूनही ते सहज शिकू शकते. या लोकांकडून मुद्दाम हे घडत नाही, हे जेवढं खरं, तेवढंच हे घडू नये यासाठी ते प्रयत्नही करत नाहीत, हेही तितकंच खरं!

फिल्म फेस्टिव्हलमध्ये जागतिक दर्जाचे चित्रपट बघणं हा एक आनंददायक अनुभव असतो. तिथं येणारा प्रेक्षक पुष्कळसा सुज्ञ असतो. मात्र, एरवी नेहमीच्या मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा बघायला गेलं, की आपल्यासमोर आज काय वाढून ठेवलंय, या भीतीनं पोटात गोळाच येतो. एखादा टाइमपास, करमणुकीचा सिनेमा असेल तर एक वेळ हा दंगा खपूनही जातो. मात्र, एखादा गंभीर, इन्टेन्स सिनेमा बघताना आजूबाजूला होणारे हे भयावह आवाज प्रचंड रसभंग करतात. तरुण पिढीच्या मुलांना काही बोलायची सोय नाही. ते फटकन उलट उत्तरं देतात. ‘थिएटर खरीद लिया क्या?’ असा केवळ अॅटिट्यूड नसतो, तर तसा प्रश्न ते थेट आपल्याला करतातही!

रसभंगाचे हे काहीसे फिजिकल प्रकार झाले. काही मानसिक त्रास देणारेही प्रकार आहेत. उदा. एखादा चर्चेतला सिनेमा आपण पाहत असतो. त्यात काही उत्कट दृश्यं असतात. रूढार्थानं ती सहजतेनं पाहायला मिळणारी दृश्यं नसतात. ती पाहत असताना अचानक कुठून तरी हशा ऐकू येतो… किंवा अगदीच अनाठायी अशी टिप्पणी ऐकू येते… आपण त्या दृश्यात गुंगून गेलो असताना या हशामुळं वा त्या बोलण्यामुळं आपला रसभंग होतो; मूडच जातो. कलाकाराला अपेक्षित असलेल्या ठिकाणी दाद न मिळणं किंवा नको त्या ठिकाणी चुकीची दाद वा प्रतिक्रिया येणं असं हल्ली वारंवार घडताना दिसतं. कशामुळं होतं हे? कुठलाही कलाकार त्याची कलाकृती तयार करतो ती लोकांनी पाहावी, समजून घ्यावी, त्याचा आनंद लुटावा यासाठी! त्याचं त्या कलाकृतीच्या माध्यमातून काही तरी एक सांगणं असतं. पण ते पुष्कळदा लोकांपर्यंत पोचतच नाही की काय, अशी शंका येते. हल्ली समाजमाध्यमांनी भावनांचं सपाटीकरण केलंय म्हणून असं होतंय, की एकूणच तरल भावनांच्या जोपासनेचा अभाव दिसतोय? काही तरी चुकतं आहे हे नक्की…

कला सादर करणारा कलाकार आणि तिचा आस्वाद घेणारा प्रेक्षक एकाच प्रतलात असायला हवेत. अर्थात ही आदर्श परिस्थिती झाली. दर वेळी असं होत नाही. त्यामुळं कलाकार एका विशिष्ट संवेदनशीलतेतून काही सांगू पाहत असेल आणि प्रेक्षक त्या विशिष्ट संवेदनशीलतेतून ती कलाकृती पाहत नसेल, तर गोंधळ होतो. प्रेक्षकाची अपेक्षा काही वेगळीच असते आणि त्याला कदाचित समोर काही वेगळंच दिसत असतं. त्यातून प्रतिक्रियेची प्रक्रिया विस्कटायला सुरुवात होते. विशेषतः सामूहिक आस्वादनाच्या जागांवर हे वारंवार घडताना दिसतं. चित्रपटगृहात सिनेमा पाहताना आपण एकटे पाहत नाही. आपल्यासोबत अनेक लोक तो पाहत असतात. त्यातल्या बहुतांश जणांच्या संवेदनेची तार सिनेमाशी जुळलेली दिसते आणि नेमक्या अशाच वेळी दोन-तीन बेसूर तारा छेडल्या जातात. तो कणसूर त्रासदायक असतो.

याचा जरा विचार केल्यावर असं लक्षात येतं, की प्रेक्षक किंवा आस्वादक म्हणून आपल्या भावभावना फारच ढोबळ, भडक व बटबटीत झाल्या आहेत. आनंद, दुःख, प्रेम, विरह, माया, द्वेष, संताप, सूड आदी ढोबळ आणि ठळक भावनाच तेवढ्या कलाकृतीतून ग्रहण केल्या जातात. त्यातही हिंसा, सूड, संताप आदी भावनांच्या प्रदर्शनाला मिळणारी दाद किंवा प्रतिसाद पाहण्याजोगा असतो. या ठळक भावनांच्या अधे-मधे काही तरल भावना लपलेल्या असतात. त्या शब्दांनी सांगता येत नाहीत; अनुभवाव्याच लागतात. या भावनांना साद देण्यासारखी परिस्थिती काही कलाकृती निश्चितच निर्माण करतात. आपल्यामध्ये मात्र त्या तरल भावनांचा कदाचित नीट परिपोष न झाल्याने आपण त्या कलाकृतीला जसा हवा तसा प्रतिसाद देऊ शकत नाही. करुणा किंवा सह-अनुभूती (सहानुभूती नव्हे!) या भावनांची त्रुटी विशेषत्वाने जाणवते. आपल्याकडच्या चित्रपटांत एकूणच थेट लैंगिक दृश्यं दाखवण्याचं प्रमाण कमी आहे. हल्ली मात्र ‘प्रौढांसाठी’ असे प्रमाणपत्र दिलेल्या बऱ्याच सिनेमांत अशी थेट लैंगिक दृश्यं दाखविली जातात. (या दृश्यांची कथानकातील गरज वा उपयुक्तता हा निराळ्या चर्चेचा विषय आहे.) अशा दृश्यांची आखणीदेखील त्या दृश्यात सहभागी असलेल्या स्त्री पात्रांच्या त्या वेळी असलेल्या भावना दर्शविण्यासाठी केल्याचं दिसून येतं. मात्र, हे समजून न घेणारा मोठा प्रेक्षकवर्ग अशा दृश्यांकडं निराळ्या नजरेनं पाहतो. त्या नजरेत दिग्दर्शकाला अपेक्षित असलेली पात्राविषयीची ‘सह-अनुभूती’ कुठे दिसत नाही.

आपल्याकडे एकूणच दृश्यसंस्कारांच्या बाबतीत आनंदीआनंद असल्यानं ही परिस्थिती निर्माण होते. एखादं चित्र कसं पाहावं, हे आम्हाला कुणी शिकवत नाही. आम्हाला वाचता येतं; पण लेखकाला त्या दोन वाक्यांच्या मध्ये काय म्हणायचंय हे समजत नाही. आम्हाला सिनेमा किंवा नाटकातील दृश्यांमागची प्रकाशयोजना, नेपथ्यरचना किंवा त्या दृश्याची भूमिती समजत नाही. एखाद्या कलाकृतीमधील अमूर्तता कळणं ही आपण रसिक म्हणून किंवा आस्वादक म्हणून जरा वरची इयत्ता गाठल्याचं लक्षण आहे. आपण त्या दृष्टीनं किती प्रयत्न करतो ही स्वतःला विचारून पाहण्याची गोष्ट आहे. कुठलीही सूक्ष्म, अमूर्त किंवा तरल भावना जाणण्याचा प्रयत्नच न करणं किंवा त्या गोष्टी हसून, चेष्टेवारी नेऊन सोडून देणं हे सध्या सर्रास होताना दिसतंय. अनेकांना तर लेखनातील उपहासही समजत नाही, असं आढळून येतं. त्यामुळं आस्वादकाकडून विशिष्ट गुणवत्तेची अपेक्षा करणाऱ्या कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी आपण समाज म्हणून कितपत सक्षम आहोत, असा प्रश्न अनेकदा पडतो.

आपल्या आजूबाजूचं जग फार वेगानं बदलतं आहे. नवी पिढी फार वेगानं सगळे बदल स्वीकारते आहे. अशा जगात वावरताना आणि त्या जगानुसार स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करताना आपण अनेकदा आपल्या हळुवार भावभावनांची नीट जोपासना करायला विसरतो. आयुष्यातले छोटे छोटे आनंददायक क्षण टिपायला, त्यातला आनंद लुटायला विसरून जातो. त्यातून भावनांचं प्रकटीकरण हळूहळू बंद होऊन जातं. टिपकागदासारखं मन गंजून जातं आणि जुन्या दरवाजाच्या बिजागरीसारखं सदैव कुरकुरू लागतं. अशी बधीर मनं घेऊन आपण समाज म्हणून वावरू पाहतो आहोत. त्यामुळं आपली सौंदर्यदृष्टी लोप पावली अन् जगण्यातली विसंगती खटकेनाशी झाली आहे. मग हा मुद्दा फक्त आस्वादनाच्या फरकापुरता मर्यादित राहत नाही, तर एकूणच आपल्या आयुष्याचा परीघ मर्यादित करण्याचा होऊन जातो.

दाद देऊन शुद्ध व्हावं, असं म्हटलं जातं. दाद देण्याचं महत्त्व असं मोठं आहे. कलेचा नीट आस्वाद घेता आला, की खुल्या मनानं आणि नेमक्या जागी दाद देता येते. ती त्या कलाकाराला आनंद देऊन जातेच; पण माणूस म्हणून आपल्यालाही समृद्ध करीत असते. असा आस्वाद सर्वांना घेता येवो आणि सगळे कणसूर लोप पावून जगण्याचा तंबोरा नीट सुरांत लागो, एवढीच साधी अपेक्षा!

– श्रीपाद ब्रह्मे

या सदरातील लेख…

बोल्ड अँड हँडसम

वाचकांच्या मनात ‘पुढे काय होणार?’ हा तीनाक्षरी प्रश्न जन्माला येण्यातच हेरकथांचं, रहस्यकथांचं सार्थक असतं.

लेख वाचा…


लेख झाला का?

साधारणत: मृगाचा पहिला पाऊस पडून गेला, की दिवाळी अंक काढणारी संपादक मंडळी एकदम ‘चार्ज’ होतात.

लेख वाचा…


येणे स्वरयज्ञे तोषावें…

स्वरांच्या या परब्रह्माला साक्षात बघण्याचे, भेटण्याचे अगदी मोजके प्रसंग माझ्या आयुष्यात आले. माझ्या पत्रकारितेच्या पेशामुळंच हे शक्य झालं.

लेख वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *