फॉन्ट साइज वाढवा
प्रवास हा तुमचा स्थायीभाव असेल, तर तो दुसऱ्या राज्यात, देशात, खंडात जाऊन करून आलो काय किंवा अगदी आपल्याच शहराच्या अनोळखी भागाला जाऊन भेट देऊन आलो काय, तो तुम्हाला तितकाच आनंद देऊन जातो. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपण प्रवासाला प्रत्यक्षात निघाल्यावरच आपला प्रवास सुरू होतो, तर ते तसं नाहीये! माझ्यामते ज्या क्षणी तुम्हाला ‘आता आहोत त्या ठिकाणाहून आपण उठावं, कुठेतरी फिरून यावं, नवं काही बघून यावं, दिनचर्येला छेद देणारं काही करावं’ असं आतून वाटतं, त्याक्षणी खरा प्रवास सुरू होतो. हा प्रवास कदाचित इतरांना जाणवत नाही, कारण त्यांच्या दृष्टीनं तुम्ही-आम्ही प्रवासाचा विचार करणारे हे निश्चल असतो, आपल्या असण्या-दिसण्यात काही फरक नसतो, पण त्याच वेळी केवळ आपल्यालाच आपली अंतर्यात्रा ठाऊक असते. आपण मनानं त्या ठिकाणाहून निघालेलो असतो, आपण शोध घ्यायला सुरुवात करतो, आपल्या शरीरातील पेशी आतून उत्साही होतात आणि अशातच एक दिवस घराचा उंबरा ओलांडून तो लौकिक प्रवास सुरू होतो. पण यापूर्वीच्या अलौकिक प्रवासाची अनुभूतीही तितकीच सुखदायक असते, हेही तितकंच खरं!

मला आठवतं, काही वर्षांपूर्वी मला अनेकदा येतो तसा रूटीनचा कंटाळा आला आणि असा कंटाळा आला की नेहमीप्रमाणे मी अस्वस्थ होतो आणि त्याच अस्वस्थतेतून मग प्रवास घडतो. तेव्हा मग ‘कुठेतरी जाऊया, पण कुठे जाऊया?’ म्हणत विचारचक्र सुरू झाली. रूटीनचा कितीही कंटाळा आला असला, तरी लगेचच त्यात रुजू होणसुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे जवळच कुठेतरी जाऊन यायचं नियोजन मी केलं आणि ठिकाण ठरवलं- ‘पुणे’!

जगभरात पुण्याविषयी आणि पुणेकरांविषयी अगदी पुणेकरांकडूनही अनेक प्रकारचे तिखट, आंबट, तुरट किस्से सांगितले जातात, मीसुद्धा ते गमतीनं ऐकतो, पण का कुणास ठाऊक मला पुण्याचं पहिल्यापासून एक निराळच आकर्षण आहे! ‘तुला कुठे स्थायिक व्हायला आवडेल?’ असा कुणी प्रश्न विचारलाच आणि मुळात संधी दिली, तर मी पुणे हा पर्याय निवडायचा संभव अधिक आहे. कुणीही या गावाला काहीही म्हणो, पण मला कायमच या गावाविषयी एक आंतरिक ओढ वाटत आलीये. माझा जन्म या गावचा म्हणूनही असेल कदाचित! म्हणजे ठाण्याहून निघाल्यावर, रेल्वे असेल तर कर्जत मागे पडतं, रस्त्यानं जाणार असाल तर तुम्हाला पनवेल संपताना द्रुतगतीमार्ग लागतो आणि पुढे-पुढे दोन्ही मार्गांवरून लोणावळा ओलांडता क्षणी माझं हृदय गुणगुणतं, म्हणजे तुमच्या आवडत्या व्यक्तीला भेटायला तुम्ही जाताना, ती घटिका जवळ येत जाते अगदी तसं काहीतरी होऊ लागतं. आणि एकदा पुण्यात प्रवेश केला की मग मी आनंदातच असतो, मला छान वाटतं!

या वेळी मधला वार असल्यामुळे सोबत कुणी येईल याची शक्यता नगण्य होती, म्हणून एकटाच घरातून पहाटे निघालो, ठाण्याला इंद्रायणीच्या जनरलचं तिकीट काढलं, गाडीत बसलो आणि माझा पुण्याच्या दिशेनं प्रवास सुरू झाला. गाडीत जागा मिळाली, तीसुद्धा खिडकी, त्यामुळे अपेक्षेप्रमाणे प्रवास सुखकर झाला. सकाळी ९-९:३० दरम्यान शिवाजी नगर आलं आणि माझा पायी प्रवास सुरू झाला. माझ्या मोबाईलमध्ये ‘pune’ असं लिहिलं की किमान शे-दीडशे तरी संपर्क आहेत पण आत्ता मला त्यातल्या कुणालाच फोन करून त्यांचा सुरळीत सुरू झालेला दिवस माझ्या येण्यानं विस्कळीत करायचा नव्हता. आणि माझ्याकडे पुढल्या दिवसाचं नियोजनही नव्हतं. पण काहीतरी होईल, मी कुठेतरी पोहोचेन असा विश्वास होता. मी आकाशवाणीवरून डावीकडे फुटपाथवरची वाट पकडली आणि चालायला सुरुवात केली. मनात पुणे आणि परिसरातील ठिकाणं येत होती. एकीकडे गुगलवरून माहिती मिळतेय का? याचाही शोध सुरू होता. मी चालत होतो.
आणि चालताना मला समोरून खांद्यावर वीणा घेतलेला वारकरी वेषातला एक इसम दिसला. ठाणे-मुंबईत हल्ली याच वेषात लोक तुमच्या जवळ येऊन पैशाची मागणी करतात, भीक मागण्याचा तो एक वेगळा प्रकार इथे सुरू झाला आहे. ‘पुण्यातही याचकांची ही नवी कल्पना रुजू झालीच!’ असं मनात म्हणत मी जरा त्या व्यक्तीपासून दूर जाण्याच्या विचारात असतानाच तो माझ्या जवळून, माझ्याशी काही न बोलता, उलट मुखात ‘राम कृष्ण हरी’ जपत पुढे निघून गेला आणि त्या क्षणी माझ्या डोक्यात वीज चमकली – ‘अरे मी आळंदीला जाऊ शकतो…!’ मी क्षणभर थांबलो, वळून मागे पाहिलं, तो वारकरी आपल्या हरिनामाच्या धुंदीत तसाच चालला होता. मी ज्याला याचक समजलो, तोच मला दान देऊन निःसंगपणे आपल्या वाटेनं निघून गेला. माझ्या डोक्यात आळंदीचा विचार आला आणि आश्चर्य म्हणजे कुठल्याही शंकाखोर विचारानं त्याला छेद दिला नाही. आणि मी थेट स्वारगेटला जाणारी बस शोधू लागलो.

स्वारगेटला उतरलो आणि जणू मला आळंदीवरून बोलावणंच असल्यासारखी माझ्या समोर थोड्याच वेळात आळंदीला जाणारी बस येऊन उभी राहिली. तासाभरात आळंदी आलं. आळंदी आणि आणि माझं बालपणापासून एक नातं आहे. मी जन्माला आलो त्यानंतर माझ्या वडिलांनी, त्यांच्या विद्यार्थी-प्राध्यापक मित्रांसोबत इथे येऊन माझ्या तान्ह्या वयात मला माऊलींच्या समाधीचा स्पर्श घडवला आहे. तेव्हापासून अनेकदा बाबांसोबत मी इथे आलोय. आमच्या कुटुंबाचं हे एक महत्वाचं श्रद्धास्थान आहे. आळंदीत जिथे बस थांबते तिथपासून मंदिरापर्यंतची वाट मला पाठ असल्यामुळे मी सरळ चालत निघालो आणि मंदिर परिसरात येऊन पोचलो. पहाटे निघताना पुण्याला जायचं इतकंच ठरवून निघालेला मी, दुपारी बाराच्या दरम्यान आळंदीत माऊलींच्या सुवर्ण पायरीशी उभा होतो. गर्दी फारशी नव्हती. आपण गेला असाल आळंदीला तर पूर्वी एका मोठ्या हॉलमध्ये लोखंडाच्या खांबांनी आखलेली नागमोडी वळणांची वाट तिथे होती. बालपणी याच खांबांना वेडंवाकडं लटकत, मस्ती करत, आई-बाबांचा ओरडा खात समाधीपर्यंतचा प्रवास व्हायचा. आता तिथून प्रवेश नसून, काही मजले उंच असलेल्या इमारतीतून नियोजनबद्ध तुम्हाला आत सोडलं जातं, पण नियमित जाणारा वारकरी आजही एकदा तिथे वाट चुकत असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण इतका तो हॉल, ती खांबांची नागमोडी वाट त्याच्या स्मरणात आहे.

अगदी शांततेत दर्शन झालं. बाहेर आलो आणि इतर मंदिरांना भेटी दिल्या. आजनवृक्षाच्या छायेत ज्ञानेश्वरी वाचणारे वारकरी स्त्री-पुरुष नेहमी पाहताना, मलासुद्धा इथे असंच अनेक तास ध्यानात किंवा ‘भावार्थदीपिका’ वाचण्यात व्यतित करावेत असं वाटत आलंय, कदाचित भविष्यात हे स्वप्न पूर्ण होईलही. वृक्षाला, वारकऱ्यांना नमस्कार करून मी बाहेर आलो, तर सुवर्ण पिंपळाच्या आवारात मला एक भारी गोड आजी दिसली. वयानं ही असावी ऐंशी वर्षाच्या पुढचीच, पण ती बायांना थांबवून त्यांच्यासोबत फुगड्या घालत होती. ती इतकी आनंदात होती की मला मीरेची आठवण झाली. ती जरा दमली तेव्हा मी तिची जाऊन विचारपूस केली, तिनं माझ्या चेहऱ्यावरनं प्रेमानं हात फिरवला आणि मी सेल्फीसाठी विचारताच ती आनंदानं तयार झाली. मंदिर परिसरात रमलो. पण आता विठोबा-माऊलीनंतर पोटोबा-माऊलीनं हाक द्यायला सुरुवात केली, भूक लागली.

आळंदीत जेवणापेक्षा मी पुण्यात जाऊन जेवेन असा विचार केला आणि ‘बादशाही’ हे खानावळीचं नाव मनात येवून गेलं. ठरवलं इथेच जाऊन आजचं सात्त्विक भोजन करायचं. आणि पोचलो आळंदीहून बसनं स्वारगेट, तिथून चालत बादशाहीच्या रांगेत. भरपेट भोजनाचा आस्वाद घेतला आणि तरीही माझ्याजवळ अर्धा दिवस उरला होता. अर्थातच मला रात्री कुणाकडेतरी राहण्यासाठी जावं लागणार होतं, तो धक्का कुणाला बसणार याचा मलाही अजून अंदाज नव्हता, पण त्याचा विचात मागे सारत मी ‘आता आपण आयुष्यात काय करू शकतो?’ याची उजळणी मनात सुरू केली आणि थोड्याच अंतरावर अल्का टॉकीज असल्याचं आठवलं. तेव्हा नक्की झालं तिथे असेल तो सिनेमा आपण पाहायचा. मी अनेकदा सिनेमांना एकटा गेलोय, अनेकांना याचंही आश्चर्य वाटतं, पण माझ्यासारख्यांसाठी ती सामान्य गोष्ट आहे. ‘शाहू’ हा प्रभास आणि श्रद्धा कपूरचा चित्रपट लागला होता, त्याचं तिकीट काढून बसलो, तीन तास कसे गेले माझं मला कळलं नाही. डोकं वापरण्याचा काही प्रश्न नव्हता, बाकी जे समोर आलं ते बघत गेलो, त्याचा आनंदच होता.

संध्याकाळी मात्र आता राहण्यासाठी छप्पर हवं होतं आणि माझा हक्काचा मामा आठवला. त्याच्याकडे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी मी ठाण्याला परतलो. ही एक दिवसीय सोलो सफर तुमच्यासोबत शेअर करण्याचं एकच उद्देश की प्रचंड गुंतागुंतीच्या दिनचर्येत आपल्याला जरा श्वास घेऊन नव्या दमानं काम करायचं असेल, तर असे स्वतःचे, स्वतःपुरता असणारे छोटे ब्रेक्स खूप आवश्यक असतात. तुम्हाला असे Getaways नवी उर्जा देतात उद्याच्या त्या क्युबिकल्स मधल्या प्रश्नांना सामोरं जाण्याची. अशा वेळी नियोजनाची गरजही पडत नाही, अशाच एखाद्या प्रवासात कदाचित कुणी वारकरी प्रवासातल्या अलौकिकाचे दान नकळत तुम्हाला देऊन जातो, तो किंवा तत्सम कुणीही तुम्हाला वाट दाखवू शकतो.
– आदित्य दवणे

या सदरातील लेख…
‘गोकर्ण’: एक अस्पर्शित जादूनगरी! (एकला ‘सोलो’रे)
अचानक एका मैत्रिणीनं येऊन विचारलं, ‘You coming to Paradise beach?’ या बीचचं नावच मी पहिल्यांदाच ऐकलं…
लेख वाचा…

– कर्नाटकातल्या छोट्याशा गावात एका शाळेच्या सहलीत मी ‘पोरा सम पोर’ होऊन मिसळून गेलो. बदामीला जायचं होतंच, पण मी अनभिज्ञ असलेलं ‘महाकुट मंदिर’ याच सहलीमुळे बघता आलं.

जान है तो जहान है! (कलगा-पुलगा-तुलगा)
– मी त्या नदीवरील पुलावरती मांडी घालून दुखावलेला हात दुसऱ्या हातात घेऊन बसून राहिलो. हा हात मध्ये नसता, तर त्याच्यामागे पोट होतं!

-त्या खडकांवरील अनघड चित्रांवरून हात फिरवताना मला अबोल-सर्जनशील पूर्वजांना स्पर्श केल्याचा भास झाला, पण त्यापूर्वीचा प्रवास म्हणजे एक दिव्य होतं!

-थंडी कडाडून वाढली आणि मंदिराशेजारील गरम पाण्याच्या कुंडांनी आम्हाला हाक दिली. दोघांचे डोळे एकमेकांकडे बघताना लकाकले.

आचवलांचा फॉर्म्युला आणि वेरूळ-कैलास!
-मंदिराच्या चारही बाजूंनी असणाऱ्या गुहांत भरताचे राज्यारोहण, कृष्णजन्म आणि असे अनेक पौराणिक प्रसंग रेखाटलेले आहेत. जे आपण बघताना, समजून घेताना इतके गुंगून जातो की आपलेच नकळत शिल्प होते, भान हरवते!

एका बोअरिंग प्रवासाची इंटरेस्टिंग कथा!
-श्री अरविंदांच्या समाधी दर्शनासाठी गेलो आणि गेल्या दोन दिवसांच्या कंटाळ्याचा क्षण एका क्षणात नाहीसा झाला.

महाबलीपुरम – पुरातनातील राजधानी!
-महाबलीपुरम हे तामिळनाडूला नाही तर संपूर्ण भारताला पडलेलं सुंदर स्वप्न आहे.
वा आदित्य, मुशाफिरी असावी तर अशी, भेटलेल्या प्रत्येकाला मनातले घर देणारी …