फॉन्ट साइज वाढवा

राधिका नवरेची आणि माझी भेट झाली ती एका संस्थेच्या पेजवरच्या तिच्या कामासंदर्भातल्या लेखामुळे! तिचं काम हस्तकला क्षेत्रातलं आणि वेगळंच होतं. त्याबाबत अधिक शोधाशोध केल्यावर कामाची तोंडओळख तर होत गेली, मात्र तिच्याशी बोलल्यावर समाजमाध्यमांत तिच्याविषयी जेव्हढी माहिती आहे, त्यापेक्षा तिचं काम खूप विस्तृत आणि पद्धतशीर आहे, हे लक्षात आलं.

“तुला कळलं कुठून माझ्याबद्दल? मी समाजमाध्यमांत अजिबात सक्रीय नाही. मी तिथे प्रमोशन करत नाही. माझा व्यवसाय मी organically वाढवला आहे. मला व्यवसायवृद्धीमध्ये मानवी स्पर्श ही एकमेव गोष्ट महत्वाची वाटते.” तिच्याशी बोलताना राधिकाचा हा पहिला संवाद होता. तेव्हाच वाटलं होतं की हा संवाद interesting च होणार. कारण माणूस हाच जेव्हा कशाच्याही केंद्रस्थानी असतो, त्यावेळी त्या कामात, उपक्रमात फार वैविध्य असतं, गुंतागुंत असते, अडथळे असतात, त्यावरचे प्रभावी उपाय असतात आणि अखेर मनसोक्त समाधानही असतं. राधिका उत्साहाचा धबधबा आहे. ती मनापासून आणि उत्स्फूर्तपणे बोलते, पण तिच्या बोलण्यातला मुद्देसूदपणा कधीच सुटत नाही, ती तिचे अनुभव सांगताना त्या प्रसंगांचं चित्र समोरच्यासमोर भरभरून बोलत उभं करते आणि तरीही त्यात एक हवीहवीशी अलिप्तता सांभाळते. एखादा भारावून टाकणारा अनुभव सांगून झाला की ‘किती छान आहे ना गं हे?’ असं अप्रुपाने विचारते आणि पुढच्याच क्षणी एखाद्या अनुभवाने दिलेल्या अप्रिय पण व्यवहार्य धड्याविषयीदेखील कृतज्ञतेने बोलते. राधिका नवरे ही रंग, गंध आणि पोतांच्या दुनियेत रमलेली मुलगी आहे. तिला आयुष्यातला सुखावणारा तलम स्पर्शही गवसला आहे आणि जाड्या-भरड पोताचं महत्वही तिने अचूक जाणलं आहे.

अजरखपूरमध्ये, कच्छ, गुजरात

‘ट्रेजर्ड हॉलिडेज’ या संस्थेच्या माध्यमातून राधिका टेक्सटाईल आणि क्राफ्ट टुरिझम चा अनुभव लोकांना देते. अस्सल भारतीय वस्त्रप्रकार आणि त्यांचे विणकर, तसेच हस्तकलेच्या वस्तूंचे कारागीर यांच्या कामाची ओळख राधिका थेट त्यांच्या घरात नेऊन करून देते. कारागीर आणि विणकरांशी गप्पा होतात, त्यांच्याच घरात त्यांनी रांधून वाढलेलं जेवण होतं. कधीकधी त्यांचं काम करून बघूया, हे कुतूहल निर्माण होतं. राधिकाच्या भाषेत हा केवळ मजेसाठी केलेला प्रवास नसतो…यात अनेक गोष्टी जाणणं, समजणं, त्यांचा अनुभव घेणं असतं. हे ‘जबाबदार पर्यटन’ आहे.

राधिका मुळची पुण्याची! आज पर्यटन क्षेत्रात वेगळी वाट निवडणाऱ्या राधिकाचा जन्म पर्यटनदिनाचाच असावा, हा एक योगायोग! एखादं काम तळमळीने करण्यासाठी काही गोष्टी तुमच्या ‘जीन्स’ मध्ये असाव्या लागतात, ही गोष्ट जितकी खरी आहे, तेव्हढंच काही गोष्टींनी ‘जीन्स’ पोसले जावे लागतात… हेही खरं आहे. राधिकाच्या वडलांना कामाच्या निमित्ताने भारतभर प्रवास करावा लागत असे. ती सांगते, “बाबा कुठल्याही राज्याहून परत आले, की त्यांच्या बॅगांत त्यांनी खजिना आणलेला असे. अप्रतिम विण असलेली हातमागावरची कापडं, उत्तम पोत असणाऱ्या साड्या, रेशमी, कॉटन, खादी असे प्रकार, तलम बनारसी, सुंदर रंगसंगती असणारं, हवेशीर कॉटन या गोष्टी फार लहानपणापासून बाबांमुळे बघायला मिळाल्या आणि त्यांचे रंग, स्पर्श, त्या hand dyed कापडांच्या रंगांचा एक खास गंध हे नेहमी आठवणीत राह्यले. माझ्या घरात आम्ही सगळेच जण कायम फक्त हातमागावर बनलेली कापडंच वापरत आलो आहोत.”

बगरू मध्ये मास्टर ब्लॉकप्रिंटरबरोबर

राधिका तीन भावंडातलं मधलं अपत्य! समाजशास्त्र विषयात पदवी घेऊन तिने पुणे विद्यापीठातून (आताचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) B.Lib, अर्थात ग्रंथपालनशास्त्रातली पदवी संपादन केली. आणि त्यात ती पहिली आली. तेव्हाच्या प्रथेप्रमाणे तिला ब्रिटीश कौन्सिल लायब्ररी (BCL) मध्ये इंटर्न म्हणून काम करण्याची संधी लगेच मिळाली. ग्रंथपालन क्षेत्रातलं आंतराष्ट्रीय स्तरावरचं प्रशिक्षण तिला मिळालं. पुढे BCL तर्फे पूर्ण स्पॉन्सरशिप मिळून MBA ही तिने पूर्ण केलं. यातही तिने सुवर्णपदक पटकावलं. लायब्ररीतली नोकरी सांभाळून तिने ही पदवी मिळवली, तिला अभ्यासासाठी अनेक रिसोर्सेस, अनेक पुस्तकं उपलब्ध होती. त्याचा पुरेपूर फायदा तिने करून घेतला. महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या वरिष्ठ आणि मार्गदर्शक अनिल बक्षी यांचं तिच्या कामावर, अभ्यासावर लक्षही होतं आणि गरज लागेल तिथे त्या तिला मार्गदर्शनही करत होत्या. योग्य वेळी योग्य माणसं भेटणं, त्यांचा सल्ला आणि आलेली संधी स्वीकारणं हे महत्वाचं असतं, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र त्या संधीतून पुढचा मार्ग कसा आखावा, याचं महत्व राधिकाच्या प्रवासाकडे बघून समजतं. तब्बल १५ वर्षं राधिका BCL मध्ये मार्केटिंग आणि रिलेशनशिप मॅनेजमेंटचं काम सांभाळत होती, आणि त्यानंतर ५ वर्षं ग्रेट सॉफ्टवेअर लॅबोरेटरी या कंपनीत मनुष्यबळ विकास आणि ब्रँडिंगचं काम बघत होती. या कंपनीमध्ये एक फार चांगली पद्धत होती. नवीन आलेल्या कर्मचाऱ्याला ओपन करियर प्लॅनिंगमध्ये म्हणून एक वरिष्ठ व्यक्तीशी सतत संवाद साधता येत असे. त्याच्याशी आपल्या मनातल्या भावी योजना, आपली स्वप्नं, पॅशन या गोष्टी बोलाव्यात आणि त्याने तुम्हाला याबाबत अधिक मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा असे. आपल्याला कायम या आयटी क्षेत्रात काम करायचं नाही, आणि वेगळं काही करायचं आहे, हे राधिकाने आपल्या मेंटॉरला, डॉ. श्रीधर शुक्ल यांना सुरुवातीलाच सांगून टाकलं होतं. विशेष असा, की तिची स्वप्नं हटके आहेत, हे समजून घेत कंपनीने तिला नेहमी प्रोत्साहन दिलं. तिने मागितलेल्या रजा असोत किंवा सल्ला असो, तिच्या मेंटॉरने तिच्या स्वप्नांचं नेहमी संगोपनच केलं.

कच्छ मधले रंग

एकदा तर तिच्या बंगाली मैत्रिणीसोबत ती कोलकात्यात शांतीनिकेतनमध्ये जाऊन राहिली. आपल्या आठ दिवसांच्या मुक्कामात राधिकाने बंगाली लिपी शिकली. तिथल्या झाडांखाली बसून बंगाली पुस्तकं वाचली, कविता म्हंटल्या. दर आठवड्यात तिथे कलाजत्रा भरत असे. श्रीनिकेतन आणि शांतीनिकेतनमधले कलाकार तिथे येत. हस्तकला आणि पर्फॉर्मिंग आर्ट्स यांची ती मैफलच असे. बाउलगान तिने तिथे मनसोक्त ऐकलं. तिथल्या कलाकारांच्या हस्तकलेचं कौशल्य पाहिलं. आणि भारावल्या मनाने ती परतली. हे वर्ष होतं – २००८! पुढच्याच वर्षी म्हणजे २००९ साली तिला संधी मिळाली अमेरिकेला जाण्याची! भारताची सांस्कृतिक दूत म्हणून ती आठ आठवडे अमेरिकेला गेली….. आणि तिला काय करायचं आहे तो क्षण सापडला तो गावाकडच्या अमेरिकेत! अमिश गावात तिला तिचे अमेरिकेतले होस्ट घेऊन गेले. ही होती ‘क्राफ्ट टेल’ अर्थात हस्तकला सहल!

शांतताप्रिय अशी ओळख असलेले हे अमिश लोक साधेपणाने राहतात. वीज, इंधन वापरत नाहीत. पाणचक्की, पवनचक्की यांचा उपयोग करतात. घोडे वापरतात, शेती करतात. हस्तकलेत रमतात. त्याच वस्तूंची विक्री करतात. तिथे तिने त्यांच्या हस्तकला पहिल्या. भेटवस्तूंची विक्री करणारं सुंदर दालन पाहिलं. तिथे प्रवाश्यांसाठी सर्व सोयी होत्या. मुख्य म्हणजे अत्यंत स्वच्छ स्वच्छतागृहं होती. हा सगळाच अनुभव राधिकासाठी नवा होता. इथे स्मॉकिंग ही भरतकामाची एक विशिष्ट पद्धत, लाकूडकाम, पेंटिंग, केक्स किंवा इतर गोड पदार्थ बनवण्याची पद्धत तिने जवळून पाहिली. कुणाची इच्छा असेल, तर हे कारागीर त्यांच्या जोडीने कामही करू देत होते. मग ब्लूबेरी पायसाठी राधिकाने ब्लूबेरीज घोटूनही पाहिल्या. हस्तकलेच्या गावाच्या या सहलीबद्दल तिने आई-वडलांना भली मोठी मेल पाठवली. लहानपणीचे वडलांच्या बॅगेतले ते अनेक रंग-गंध आणि पोतांचे हाती बनवलेले असंख्य प्रकार तिच्या मनात जागे झाले होते. भारतात खूप फिरायला हवं, आपल्या कला जाणून घ्यायला हव्यात, विणकरांना, कारागिरांना असा मान मिळवून द्यायला हवा, आपली हस्तकौशल्यं लोकांना दाखवायला हवीत….असं तिने लिहिलं होतं. त्यावर तिच्या वडलांचं एका ओळीत उत्तर आलं – ‘Who has stopped you to travel in your own country?’

हंपी…पाषाणातली कारागिरी

हाच क्षण होता तो! भारतात परत आल्यावर तिने प्रवास सुरु केला. कधी एकटीने, कधी मैत्रिणींबरोबर ती भारत फिरू लागली, विषेशतः ग्रामीण भारत आणि हस्तकलांच्या कारागिरांचा तिने शोध सुरु केला. अभ्यास आणि वाचन सुरु केलं. नोंदी लिहून ठेवायला सुरुवात केली. स्थानिक संस्कृतीची नस स्थानिक लोकांच्याच घरांत, त्यांच्याशी बोलताना, त्यांच्या घरात राहताना, त्यांच्या पारंपरिक कला बघत, शिकत, त्यांच्याबरोबर काम करत आणि मुख्य म्हणजे सार्वजनिक वाहतूक सेवा वापरत तिला सापडायला लागली. अशा प्रकारचं पर्यटन कुणीच आयोजित करत नसल्याने तिचं तिला सर्व नियोजन करावं लागत होतं.

जयपूरमध्ये राहून ती रोज ३० किमी वरच्या बगरू गावात रोज ये-जा करत असे. विजयेंद्रजी नावाचे मास्टर ब्लॉकप्रिंटर होते, त्यांच्या घरी ती ब्लॉक मेकिंग-प्रिंटींग, डायिंग, पेंटिंग सगळं शिकत होती. काही दिवसांनी त्या कुटुंबाला खात्री पटली. ही मुलगी उगीच येत नाही, हे लक्षात आल्यावर विजयेंद्रजी स्वतः तिला जयपूर मधून हिरो होंडा वरून घरी घेऊन आले. दिवसभर त्यांच्या सोबत काम करून झालं, की संध्याकाळी तिथल्या मुलांबरोबर ती अरविंद गुप्ता यांची खेळणी बनवणं, कविता शिकवणं, त्यांची लोकगीतं म्हणणं या गोष्टी करत असे. त्या विणकरांच्या वस्तीत राधिकादीदी आता परिचयाची होऊ लागली होती.

बिष्णोई समाजाच्या मुखीयाने बांधलेली रंगीत पगडी

या लोकांच्यापर्यंत इतर लोक आले नाहीत, त्यांची कला जाणून घेतली नाही, तर हे कारागीर हळूहळू संपत जातील. या कला, ही हस्तकौशल्यं फक्त म्युझियम्स मध्ये राहतील, किंवा युट्यूबवर राहतील, हे तिच्या लक्षात आलेलं मोठं सत्य होतं. म्हणून ज्यांनी इच्छा व्यक्त केली, त्यांना ती या विणकरांच्या कापडनिर्मिती प्रक्रिया बघायला घेऊन जाऊ लागली. पुढचा विचार होता, या कारागिरांना आर्थिक फायदा करून देणं. इथेच तिला टेक्सटाईल आणि क्राफ्ट टुरिझमची कल्पना सुचली. ‘दे-आसरा फौंडेशन’ मधले तिचे मेंटॉर श्रीपाद जोशी यांना ही कल्पना तिने सांगितली. डोरीन डिसा आणि नंदिता खैरे यांचेही मोलाचे मार्गदर्शन तिला लाभले. त्यांनी तिला अनेक प्रॅक्टिकल प्रश्न विचारले. जवळपास सहा महिने ती बिझनेस प्लॅन लिहित होती. अखेरीस २०१६ साली सुरु झालेल्या ‘ट्रेजर्ड हॉलिडेज्’ च्या जन्माची कथा इतकी मोठी आहे. भारतातल्या अनेक प्रदेशांतली कलाकुसर, हस्तकला, विणकाम, मातीकाम,करणाऱ्या कलाकारांची ओळख सर्वत्र पोचवणे हे तिच्या संस्थेचं उद्दिष्ट आहे. बांधणी, ब्लॉक प्रिंटिंग, बाटिक, कलमकारी अशा अनेक प्रकारांची ती ओळख करून देते.

टूर्स न्यायच्या ठरवल्यानंतर तिने अनेक गोष्टी मनाशी पक्क्या केल्या. काही तिला स्वतःला अमलात आणायच्या होत्या, काही तिने जोडलेल्या कारागीर आणि वीणकरांकडून करून घ्यायच्या होत्या.

काश्मीर..मऊसूत शालीची ऊब

तिने स्वतःशी ठरवलं, की तिच्या कंपनीचा उद्देश विणकरांची, कारागिरांची कला सर्वदूर पोचवणे हाच असेल, त्यासाठी ग्राहकांना ती त्यांच्यापर्यंत घेऊन जाईल, तिच्या टूरमध्ये फक्त १० प्रवासी असतील. यात ती कोणतंही कमिशन घेणार नाही, टूरमधल्या लोकांना किंमतीबाबत घासाघीस करण्याची परवानगी नसेल. अर्थात ती सांगते, विणकरांचं काम पाहिल्यानंतर कुणीही त्यांच्याशी घासाघीस करत नाहीत. एखादा विणकर पन्नाशीतच म्हातारा का दिसू लागतो, त्याची पाठ, डोळे, बोटं कशी काम करू शकत नाहीत, हे माझे ग्राहक-पर्यटक स्वतः बघतात. त्यामुळे माझ्या टूर मधली खरेदी ही दोन्हीकडून समाधान आणि आनंद देणारीच असते.

विणकर आम्हाला स्वतः प्रेमाने जेवण बनवून खाऊ घालतात. ते जेवतात तेच जेवण आम्ही जेवतो. मिनरल वॉटरच्या बाटल्या कधीही वापरत नाही. आम्ही स्थानिक लोक पितात तेच पाणी पितो.

शक्यतो कॅमेरे बंद ठेवा. मुख्य विणकराच्या सूचना ऐका, त्यांची बोलीभाषा ऐका, समजून घेण्याचा प्रयत्न करा, सेल्फी आणि फोटोंत रमू नका, हे ती कटाक्षाने सांगते आणि ते करूनही घेते.

जसं ग्राहकांसाठी तिचे काही नियम आहेत, तसेच विणकरांकडूनही काही गोष्टी ती करून घेते. सगळ्यांत महत्वाचं म्हणजे भरपूर साहित्य उपलब्ध ठेवणं, एका प्रकरच्या अनेक साड्या तयार हव्यात. कारण ‘हीच’ साडी हवी, असं एका वेळी अनेक ग्राहकांना वाटू शकतं. मोठा ग्रुप आल्यानंतर एक किंवा दोनच लोक साड्या किंवा कापडं दाखवायला पुरेशी नसतात. माल दाखवणं, तो पुन्हा घड्या घालून ठेवणं, पॅकिंग करणं, बिलं तयार करणं – अशी वेगवेगळी कामं सांभाळण्यासाठी लोक हवेत. घरात पक्की बांधलेली आणि अतिशय स्वच्छ बाथरूम्स हवीत, हा तिचा आग्रह असतो आणि ती त्याचं महत्व त्यांना पटवून देते. (या एका आग्रहाने आज अनेक दुर्गम गावांत या कारागीर आणि विणकरांच्या घरांत बाथरूम्स बांधली गेली आहेत. त्या घरातल्या बायका आणि तरुण मुली त्यांचा आनंद राधिकाजवळ बोलून दाखवतात.)

डहाणूतल्या तारपा नृत्याच्या वेळी

काही गोष्टी अशा साखर पेरून करून घ्याव्या लागतात. ती सांगते ऑनलाईन पेमेंटचे अनेक पर्याय उपलब्ध झाल्यावर मी त्या त्या घरातल्या बाईला विचारु लागले, ‘पैसे तुमच्या अकाऊन्टमध्ये ट्रान्स्फर करू का?’ बहुतांश ठिकाणी बायकांची स्वतःची खातीच नसायची. मग पैसे ट्रान्स्फर करणं कसं सोयीचं आहे हे त्यांना ती सांगत असे. पुढच्या वेळी त्यांच्याकडे गेलं की घरातली बाईच येऊन सांगत असे की, ‘दीदी, मेरा खाता बन गया..आप उसीमें ट्रान्स्फर करो!’ आता खातं उघडल्याचे फोन ओरिसा, राजस्थानातूनही येतात. अॅटीट्युड बदलण्याचा उघड प्रयत्न न करता सक्षमीकरण असंही करता येतं. असे अनेक अनुभव राधिकाकडे आहेत.

राधिका Hands of India नावाच्या एका हँडलूम कॉटनच्या एका ब्रँडसाठी इल्कल, खण आणि मश्रू साड्यांच्या बाबतीत काही रिसर्च करत होती. प्युअर कॉटनच्या इल्कल साड्या ब्रँडला हव्या होत्या. जवळपास २५० विणकरांशी ती बोलली. पण मनासारखं काम मिळत नव्हतं. अखेर एक मुलगी मिळाली. तिचा मुख्य व्यवसाय खरंतर सोलापुरी कडक भाकऱ्या बनवण्याचा होता. पण तिने या ब्रँडसाठी काम सुरु केलं. सुरवातीला तिच्या कामात सफाई नव्हती. हळूहळू ती येऊ लागली. बंगलोर मध्ये Hands of Indiaच्या शोरूमचं उद्घाटन या मुलीच्या हस्ते करण्यात आलं. आयुष्यात पहिल्यांदा ती गाव सोडून बंगलोरला गेली, हॉटेलमध्ये राहिली. त्या उद्घाटनाला Hands of India च्या दोन्ही भागीदार आणि ही मुलगी तिने स्वतः विणलेल्या साड्या नेसून आल्या होत्या. या मुलीसाठी हा फार मोठा अनुभव होता.
राधिका आता तिच्या हंपीच्या घरी ग्राहकांना घेऊन जाते. आता तिचं स्वतःचं घर झालं आहे. नवरा एका हॉटेलात वेटर होता, आता तोही तिच्या व्यवसायात काम करतो. ती हिंदी शिकली. ‘ही माझी सेलिब्रेटी विव्हर आहे’, असं राधिका अभिमानाने सांगते.

एक साडी बनवण्याच्या कामात सात ते आठ कुटुंब सहभागी असतात. रेशमाचे गुंडे बनवणे, विणकाम, रंगकाम, धुणे, पदराला गोंडे लावणे अशी अनेक कामं असतात. त्यामुळे फक्त हातमाग नाही तर हाती चालणारी इतरही अनेक कामं, धोबीघाट आम्ही बघतो. माझ्या टूरमधल्या लोकांसाठी अनेक अनुभव नवे असतात. हौशीने लोक हँडलूमचे कपडे घालून येतात. विणकर ते ओळखून – ‘अरे, हे अमुक कापड ना, अमुक ठिकाणी हे तयार होतं, तुम्ही कुठून घेतलं, तिथला अमुक विणकर माझा मित्र आहे…’ असं आवर्जून सांगतात. ग्राहक आणि विणकर यांच्यातलं हे ‘आईसब्रेकिंग’ पाहणं, हाही माझ्यासाठी फार आनंदाचा भाग असतो. अगदी ५०० रुपयांपासून ५ लाख रुपयांपर्यंत रेंज दाखवणं हा विणकरांसाठी अभिमानाचा भाग असतो. आपण तयार केलेलं कापड किंवा साडी हौसेने नेसलेली बघणं हा आनंद फक्त त्यांच्या डोळ्यांत दिसतो. महाराष्ट्र, गुजराते, कर्नाटक, तामीळनाडू, हिमाचल, राजस्थान, ओरिसामधलं हातमागावरचं काम राधिका दाखवते. आता तिने नुकतीच काश्मीरसहलही सुरु केली आहे. तिथलं भरतकाम, विणकाम, गालिच्यांचं काम ती दाखवते.

ओरिसात….

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हँडलूम फक्त सण-समारंभ आणि लग्नापुरतं मर्यादित राहू नये. हातमागावरील टॉवेल्स-पंचे ते पडदे-बेडशीटस् पर्यंत अनेक गोष्टी आपण वापरत रहायला हव्यात. तरच हातमाग टिकून राहणार आहेत, हेही ती सतत सांगत असते.

काश्मीरमध्ये नुकत्याच नेलेल्या टूरमध्ये गालिच्याचं काम बघणं हा तिच्या मते जणू काही आध्यात्मिक अनुभवच होता. मास्टर विव्हर सतत त्याच्या चार सहाय्यकांना – कोणत्या रंगाची गाठ बांधा, कोणता रंग वर घ्या वगैरे सूचना देत असतो. राधिका सांगते, ‘त्याचं काश्मीरी भाषेत हे सूचना देणं ऐकताना श्लोक पठण ऐकल्याचा भास होत होता.

राधिका स्वतः तिच्या पर्यटनाला ‘लर्निंग हॉलिडे’ म्हणते. विणकर आणि कारागिरांचे कष्ट आणि त्यांची कला दोन्हीला महत्व मिळणं, आदर मिळणं आणि आर्थिक सहाय्य मिळणं या गोष्टी तिच्यासाठी फार महत्वाच्या आहेत. तिचा सतत अभ्यास सुरु असतो. लोक जोडण्याचं महत्व तिने ओळखलं आहे. अनेक विणकर तिच्याशी आणि तिच्या कुटुंबाशीही जोडले गेले आहेत. हे नातं आता त्यांच्या विणकामाच्या पलीकडचं आहे. त्यांच्या मुलांची उच्च शिक्षणं असोत, एखादा व्यावसायिक सल्ला असो, कुटुंबातले आनंद-दुःखाचे प्रसंग असोत, राधिका – जिच्याशी सर्व काही हक्काने बोलता येईल अशी त्यांच्या घरातलीच सदस्य बनली आहे. ‘ट्रेजर्ड हॉलिडेज्’ सोबतच्या या सर्जनशील प्रवासाला म्हणूनच उबदार मानवी स्पर्श लाभला आहे.

कोव्हिड काळात विणकरांची परिस्थिती अवघड झाली होती. त्यावेळी आपल्या कुटुंबीयांशी बोलून राधिकाने ‘ट्रेजर्ड विव्हज्’ नावाने विणकरांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी विशेष प्रयत्न केले. १२ राज्यांतून तिने हातमाग आणि हस्तकलेची उत्पादनं मागवली आणि त्यांची यशस्वी विक्री केली आणि विणकरांच्या ३२ कुटुंबांना तिने काम मिळवून दिलं.

नीता कुलकर्णी



Shipla Parandekar

या सदरातील लेख…

खाद्यसंस्कृतीची संशोधिका : शिल्पा परांडेकर

महाराष्ट्रातल्या ५०० गावांचा प्रवास एकटीने करून शिल्पाने विस्मृतीत गेलेले, जाऊ पाहणारे शेकडो पदार्थ आणि त्यांच्या कृती समजून घेऊन त्यांची नोंद केली आहे.

लेख वाचा…


मल्हार इंदुरकर – नदीमित्र

मल्हार हा मूळ चिपळूणचा! तिथलाच रहिवासी. त्याच्या घरामागे वशिष्ठी नदी वाहाते. त्यामुळे पाण्याची ओढ त्याला जन्मजात आहे….

लेख वाचा…


सिराना – द परफेक्ट ब्लेंड!

संधीने दार ठोठवलं तर ते पटकन उघडायलाही अनेकदा धाडस करावं लागतं. योगिनीने ते केलं….

लेख वाचा…



शेतीव्यवसायला नवी दिशा देणारी ‘पल्लवी’

महाराष्ट्राची ही माहेरवाशीण तिथे आसामात शेती आणि शेतीपूरक अनेक व्यवसाय करते.

लेख वाचा…


वास्तुचित्र : वारसा आणि स्थापत्याचे अचूक कॉम्पोझिशन

शिक्षण आणि व्यवसायाने आर्किटेक्ट असणाऱ्या आणि अॅनिमेशनच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनुपला नुसतं ‘फोटोग्राफर’ म्हणणं योग्य ठरणार नाही.

लेख वाचा…


Comments(4)

    • मृणाल लिमये

    • 2 years ago

    नीता, खूप सुरेख. ही तुझी लेखमाला एक से बढकर एक अशी होत आहे. ??

    • Nilambari Gokhale

    • 2 years ago

    Reading this experience made me enthusiastic to book for the tour. For a long time i was looking for meaningful tourism and would love to explore. How can I contact Radhika?

    • Kanchan Kulkarni

    • 2 years ago

    Absolutely awesome ?

    • seemantini Noolkar

    • 2 years ago

    नीता खूप सुंदर लिहिलं आहेस. बर्‍याच दिवसांनी काहीतरी वाचल्याचं समाधान मिळालं .मी नुकतीच
    जम्मू मधे पश्मिना विणकराशी भरपूर गप्पा मारुन आले. . . भारतात केवढा खजिना आहे . . राधिका बेहरे यांचं काम खरच हटके आहे . . Thanks for sharing

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *