फॉन्ट साइज वाढवा
मल्हारची पहिली भेट झाली ती अगदीच अनपेक्षितपणे! पश्चिम घाटासबंधी काही व्हिडीओज बघत असताना अचानक एका व्हिडिओचं नोटीफिकेशन आलं. ते पाण्यातलं जंगल होतं, कुतूहलाने तो व्हिडीओ सुरु केला. अंधारं; पाण्यात उभं असलेलं आणि जाडजुड वृक्षवेली आणि U आकाराची जमिनीच्या वर असणारी असंख्य मुळं असलेलं ते जंगल आणि त्यात पावसाच्या सरींमध्ये टॉर्चच्या प्रकाशात उभा असलेला एक तरुण; ही पहिलीच फ्रेम कमाल होती. “जगाची उत्पत्ती एका उबदार डबक्यात झाली, असं चार्ल्स डार्विनने म्हंटलं आहे. कसं दिसत असेल ते डबकं? हे कुतूहल लहानपणापासून माझ्या मनात आहे…” असं सांगणारा मल्हार इंदुलकर दोडामार्गजवळच्या हेवाळे गावापाशी असणाऱ्या त्या प्रसिद्ध ‘मायरीस्टीका swamp’ची ओळख करून देत होता. याला ‘दलदलीतलं जंगल’ असं ढोबळपणे म्हणता येईल. ती फिल्म बघितली आणि जंगलाइतकंच कुतूहल मल्हारच्या कामाविषयी वाटू लागलं. शोधाशोध केल्यावर त्याच्या सगळ्याच कामाची माहिती होत गेली; पण ते काम फारच वेगळं होतं. कोकण आणि तिलारी व तेरेखोलच्या खोऱ्यात त्याचं काम होतं. कामानिमित्ताने सतत जंगलात, नदीकाठी फिरणाऱ्या मल्हारशी संपर्क होणं; सोपी गोष्ट नसते.
मल्हार हा मूळ चिपळूणचा! तिथलाच रहिवासी. त्याच्या घरामागे वशिष्ठी नदी वाहाते. त्यामुळे पाण्याची ओढ त्याला जन्मजात आहे. पाण्यात पोहणं असो किंवा छोट्या होडीतून खारफुटीच्या जंगलात रपेट मारणं असो, त्याला पाणी समजतं. त्याचे प्रवाह त्याला माहिती असतात. नदीच्या पोटातली दुनिया किती अद्भुत आहे, हे त्याला माहीत आहे. त्यात मासे, वनस्पती, दगड-धोंडे, खडक आहेत, पाणसाप, पाणमांजरं आणि मगरीसुद्धा आहेत. पावसाळ्यात नदीचं फुगत जाणारं पात्रही तो बघतो आणि उन्हाळ्यात रोडावत जाणाऱ्या त्यांच पात्राची व्यथाही त्याला कळते. यामागची कारणंही त्याला चांगलीच माहीत आहेत. मासेमारीचं वेळापत्रक त्याला पाठ असतं. माश्यांच्या पैदाशीचा हंगामही त्याला ठाऊक असतो. एकूण नदी ही परिसंस्था त्याला व्यवस्थित ठाऊक आहे. नदीच्या निमित्ताने एकमेकांवर अवलंबून असणारी जैविक साखळी त्याला माहीत आहे. पण तरीही नदी हेच आपलं कार्यक्षेत्र असेल, हे शाळकरी मुलगा असताना त्याला तरी कुठे माहिती होतं? मल्हारचं मुख्य काम ‘पाणमांजर या प्राण्यांचं संरक्षण आणि त्यांचा अभ्यास’ हे आहे. मात्र या कामाला एक चौकट नाही. कारण पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करताना एकूणच साकल्याने आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन ठेवूनच काम कराव लागतं, हे तो जाणून आहे. या क्षेत्रात मुळात ठोस चौकटी नसतात. ही साखळी असते. एका घटकावर पुढचा घटक अवलंबून असतो. त्यामुळे विचार सलग आणि चौफेर करावाच लागतो. म्हणूनच आज मल्हार नदी संवर्धन, मासेमारीसाठी मार्गदर्शन, दलदलीतल्या जंगलाचं संरक्षण, सेंद्रीय शेती आणि इको-टुरीझम असं बहुपेडी काम करतोय. तो सांगतो, “पर्यावरण जपताना अगदी सूक्ष्म गोष्ट असली तरी ती सुरक्षित राहील, हे बघावं लागतं. अत्यंत लहान गोष्टीचा परिणाम फार मोठा असू शकतो, हे स्वतःला, सहकाऱ्याना आणि स्थानिकांनाही सतत बजावायला लागतं.”
पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात डोळसपणे काम करणाऱ्या आईबाबांचा हा लेक पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणक्षेत्रात कामासाठी उतरला तो मात्र फारच वेगळ्या कारणाने! त्याचं शांत आणि सहज आयुष्य एका धोपट मार्गाने चालत राहिलंही असतं. दहावी आणि नंतर बारावी केल्यावर पुढे रूढ वाटेवरचे अनेक पर्याय असतानाही त्याने ऐकली; ती नदीने लहानपणीच त्याला दिलेली साद! पुढे तो थेट उदयपूरला ‘शिक्षांतर’ संस्थेच्या ‘स्वराज’ या अभिनव शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी झाला.
‘स्वराज’ची किमया
या शैक्षणिक कार्यक्रमात चाकोरीबद्ध विषय किंवा अभ्यासक्रम नाही. त्यांचं ब्रीद‘Rethinking on Education and Development’ हे आहे. पहिल्या वर्षात अनेक पर्यावरणपूरक विषयांची ओळख करून दिल्यानंतर एक विषय विद्यार्थी निवडतात. त्यालाही सेंद्रीय शेती फायदेशीर कशी ठरेल, ग्रीन कार्सची निर्मिती, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणपूरक घरांची निर्मिती अशा अनेक विषयांची ओळख करून दिली गेली. या कार्यक्रमात अनेक फिल्म्स पाहिल्या, डम्पिंग ग्राउंडसना भेटी दिल्या, तिथल्या संगमरवर उद्योगाला भेट दिली. या सगळ्यांमुळे केवळ पर्यावरणावरच नाही तर एकूण माणसाच्या आरोग्यावर काय भीषण परिणाम होत आहेत, हे त्याने प्रत्यक्ष पाहिलं. त्यातच एक दिवस त्याने फिल्म पाहिली– Story of Scrap! या फिल्ममध्ये अनेक घातक उद्योगांचा समाजांवर काय परिणाम होतो, भरमसाठ जंगलतोड कशी होते, लोकांना स्थलांतर करणं कसं भाग पडत, आदिवासींना आपली पारंपरिक कौशल्य सोडून कारखान्यात नोकरी करण्यावाचून कसा पर्याय राहत नाही, अशा अनेक गोष्टींचा मागोवा घेतला होता. विशेषतः काँगोमधील टिटॅनमच्या खाणीत कोणत्याही सुरक्षेविना काम करणारी लहान मुलं (तीदेखील पळवून आणलेली), त्यात होणारे त्यांचे मृत्यू याचाही वेध घेण्यात आला होता. ही फिल्म मल्हारसाठी निर्णयापर्यंत घेऊन जाणारी ठरली. ‘प्रत्येक माणूस बारीकसारीक कृतीतून किती प्रमाणात कार्बन डाय ऑक्साइड तयार करतो, हे लक्षात आल्यावर माझीच घुसमट झाली’, असं तो सांगतो. रासायनिक द्रव्ये नदीत सोडल्याने नदी आणि खाडीत काय हानी झाली होती, हे त्याने लहानपणापासून पाहिलं होतं. त्यामुळे आता पर्यावरणातच काम करायचं हे त्याने पक्कं केलं. वन्यजीव संरक्षण क्षेत्रात काम करायचं हे त्याने निश्चित केलं आणि बंगळूरूच्या ‘नित्यता’ या संस्थेमध्ये इंटर्न म्हणून त्याचं काम सुरू झालं.
‘नित्यता रिव्हर वॉटर कॉन्झर्व्हन्सी’ ही संस्था पाणमांजरांवर काम करते. त्यांची सुरक्षा आणि संवर्धन यातून नदीचं आरोग्य सांभाळण्याचा, पाणमांजरांबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न संस्थेच्या उपक्रमांत केला जातो. कर्नाटकात कावेरीच्या पात्रातील पाणमांजरांवर काही वर्षं मल्हारने काम केलं. या कामाने वशिष्ठी नदी, तिलारी, तेरेखोल इथल्या नद्या व खाड्यांतल्या पाणमांजरांसंदर्भात काम करण्याची दिशा त्याला सापडली. “या संस्थेत अनेक तज्ञ लोकांकडून, वन्यजीव संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे; कोकणात पाणमांजरांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी शिस्तबद्धरित्या काम कसं करता येईल आणि त्यात स्थानिक लोकांचा सहभाग कसा घेता येईल, याचा आराखडा माझ्या मनात तयार होत गेला”, असं तो सांगतो.
पाणमांजर का हवं?
पाणमांजरांचा अभ्यास करताना मल्हारला या बुजऱ्या पण खेळकर स्वभावाच्या प्राण्याबद्दल अनेक गोष्टी कळत गेल्या. हा मांसाहारी सस्तन प्राणी नदीच्या आरोग्यासाठी जितका उपयुक्त आहे, तेव्हढाच तो मासेमारांना मदत करणाराही आहे. म्हणून त्याचं अस्तित्व जपायला हवं. मल्हार याबाबत नेमकी माहिती देतो. हा प्राणी माश्यांची शिकार करतो. मात्र, ती आजारी मासे खातात, त्यामुळे माशांत रोग पसरत नाही. म्हणूनच नदीच्या आरोग्यासाठी ती महत्त्वाची असतात. स्थानिक माशांपेक्षा विदेशी जाती ते खातात, त्यामुळे चांगला भाव मिळणाऱ्या स्थानिक जाती मासेमारीसाठी टिकून राहतात. हा प्राणी नदीकाठी खडकांच्या कपारीत बिळांत राहतो. मासे, खेकडे, बेडूक, पाणसाप, सरडे आणि क्वचित प्रसंगी नदीजवळचे पक्षी हे त्यांचे खाद्य असते. कळपात राहणारा प्राणी असल्याने मगरी वगैरे त्यांच्या वाट्याला सहसा जात नाहीत. कोणत्याही नैसर्गिक जीवसाखळीत परिसरातल्या कमजोर घटकांना संपवून त्याची गुणवत्ता राखण्यात भक्षक प्राण्याची मोठी भूमिका असते.
या प्राण्याची १५-२० वर्षांपूर्वी प्रचंड प्रमाणावर शिकार झाली. त्याच्या कातडीची तस्करी हे त्याचं मुख्य कारण. आणि ते मासे खातं म्हणून मासेमारीसाठी वाईट – हा गैरसमज हे दुसरं कारण! काही ठिकाणी तर यांची संख्या फारच घटली. अखेरीस, सरकारने त्यांच्या शिकारीवर बंदी आणली आणि वन्यजीव कायद्यांतर्गत संरक्षणही दिलं.
कोकणातील काम
मल्हारने चिपळूण आणि सिंधुदुर्गातील तिलारी व तेरेखोल नदीपरिसरात पाणमांजरांसाठी ‘नित्यता’ आणि ‘सँक्च्युरी एशिया’ या संस्थांतर्फे कामं केलं आहे. या प्रोजेक्टअंतर्गत त्याने पाणमांजराचे अस्तित्व नदीच्या कोणत्या पट्ट्यात जास्त आहे हे निश्चित करण्यासाठी नदी किनारी फिरून पायाचे ठसे व विष्ठा रेकॉर्ड केली. कोणत्या ठिकाणी पाणमांजराला काय धोके आहेत याचा अभ्यास केला व त्यानुसार जनजागृती कार्यक्रम राबवले. ‘Pride campaign’ या संकल्पनेतून वेगवेगळ्या प्रकारे लोकांशी संवाद साधला. त्यांना सहभागी करून घेतलं. ग्रामसभांमध्ये हा विषय समजून सांगितला. शालेय विद्यार्थ्यांसोबत विविध कार्यक्रम आयोजित केले. ‘पाणमांजर महोत्सव’ आयोजित केला. पथनाट्य, पाणमांजर उत्सव, शाळेतील मुलांची पदयात्रा, इतकंच काय तर अगदी चर्चमधल्या ‘मास’च्या वेळी फादरना विनंती करून याविषयी जागृती करणं, नदी किनाऱ्यावरील स्वछता मोहीम, असे कार्यक्रम आयोजित केले. विणीच्या हंगामात मत्स्योत्पादन चांगले होण्यासाठी नदी पट्टा हे संरक्षित क्षेत्र घोषित व्हावे म्हणून प्रयत्न केले व या पट्ट्यात मासेमारीवरती लोकसहभागातून निर्बंध आणले. तसेच ज्या शेतांमध्ये पैदाशीसाठी मासे येतात अशा शेतांच्या परिसरात शेत मालकांसोबत चर्चा करून मासेमारीवरती ठराविक क्षेत्रामध्ये निर्बंध आणले. कारण पाणमांजरं मासेमारीसाठी जशी गरजेची आहेत, तसंच त्यांना खाद्यही व्यवस्थित मिळेल, याचीही काळजी घेणं गरजेचं आहेच. पाणमांजरांच्या कुटुंबांवर किंवा त्यांच्या कळपावर सतत लक्ष ठेवावं लागतं. मल्हार सांगतो, “हे एकट्या-दुकट्याचं काम नाही, त्यासाठी लोकसहभागच लागतो. तो प्रयत्नानेच मिळवावा लागतो.”
रोहन शिफारस
संथा वाहते…?
‘जीवनदायी’ नद्यांचे आजचे वास्तव
ज्यांनी मानवी संस्कृतीला आधार दिला , त्या नद्यांना आपण एकीकडे आई म्हणत म्हणत पूर्णपणे विद्रूप करून टाकले ; इतके की आता त्यांना खरा चेहराच उरला नाही . नद्या अशाप्रकारे बिघडल्याने आपल्यासाठी आपत्ती बनून राहिल्या आहेत . त्यांचे स्वास्थ्य बिघडल्याने पिण्याच्या पाणी , शेती , सभोवतालचे पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवरही खोलवर परिणाम झाले आहेत . उत्तर महाराष्ट्रातील पांजरेपासून मराठवाड्यातील मांजरेपर्यंत आणि कोकणातील पाताळगंगेपासून चंद्रपूरच्या इरई नदीपर्यंत राज्यभर हेच चित्र पाहायला मिळत आहे . त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहेत . त्यामुळेच नद्या सुधारायच्या असतील तर काळजीपूर्वक आणि तातडीने पावले उचलावी लागतील !
₹125.00Add to cart
अचानक सापडलेलं पाण्यातलं जंगल
पर्यावरण क्षेत्रात ‘फोकस्ड’ काम करत असलात तरी, त्याला चौकट नसते. मल्हारलाही हा अनुभव लवकरच आला. पाणमांजरांवर काम करत असताना एक नवीन आव्हान समोर आलं. बेडकांच्या बुरशीवर काम करणाऱ्या गायत्री श्रीधरन या मैत्रिणीसोबत काम करत असताना सिंधुदुर्गातल्या दोडामार्गजवळच्या हेवाळे गावात लक्षावधी वर्षांपूर्वीचं दलदलीतलं जंगल(swamp) त्याने पाहिलं. ही swamps अगदी दुर्मीळ आहेत. सुंदरबन हे प्रसिद्ध उदाहरण! कान्हाळाची राई या ठिकाणी असणाऱ्या या जंगलातल्या आदिम काळातल्या झाडांची मुळे ही इंग्लिश U अक्षरासारखी उलटी आणि जमिनीच्यावर आहेत. जायफळ जातीच्या या झाडांची संख्या तिथे जास्ती असल्याने ते Myristica swamp आहे. या जंगलाचं संरक्षण होणं फार गरजेचं आहे. त्यातले वन्यजीवन, झाडं, वेली फार वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मीळ असल्याने त्यांना जपणं, तिथे फार वावर न होऊ देणं गरजेचं असत. प्रदूषण तिथे पोचणार नाही याची काळजी घ्यावी लागते. कारण एक सुदृढ आणि निरोगी जैवसाखळी तिथे असते. ही जंगलं आजूबाजूच्या गावांतल्या जमिनीतली पाण्याची पातळी उत्तम ठेवतात. त्यामुळे विहिरी कोरड्या पडणे वगैरे प्रश्न येत नाहीत.
मल्हारने अनेक तज्ज्ञ आणि अभ्यासकांच्या साहाय्याने स्थानिकांना सहभागी करून घेत या जंगलाच्या सुरक्षेसाठी प्रयत्न केले. या जंगलांची माहिती देत, त्याचं महत्त्व स्थानिकांना पटवून दिलं. लक्षावधी वर्षांपूर्वीची ही झाडं, वेली आणि तिथले प्राणीजीवन, कीटक जपायला हवेत, हे स्थानिकांनाच नाही तर शासनालाही पटवून देण्यात ते सर्वजण यशस्वी ठरले. आणि आता ते जंगल ‘जैविक वारसा स्थळ’ म्हणून घोषित झालं आहे. “इथल्या लहानात लहान घटकाचीही जीवापाड काळजी घ्यायला हवी” असं मल्हार आग्रहाने सांगतो.
वैज्ञानिक आणि वैचारिक आधुनिकता हवी
मल्हारचं काम समजून घेताना प्रगती, आधुनिकीकरण यांचीही चर्चा झाली. आधुनिकता किंवा प्रगती ही वैज्ञानिक आणि वैचारिक हवी, फक्त तंत्रज्ञानाच्या रस्त्यावरून जाणारी नको, असं त्याचं मत आहे. त्याच्या सर्व उपक्रमांत लोकसहभाग मिळवणं हेच मोठं आव्हान असतं त्यामागचं कारणही हेच आहे. पण लोकांशी सतत या गोष्टी बोलत राहणं, त्यांच्याशी चर्चा करत राहणं हेच त्याच्या मते समजूतदार पर्याय आहेत. “लोकांचा कामावर आधी विश्वास बसतो, मग व्यक्तीवर! त्यामुळे आपलं कामच अधिकाधिक बोलकं करत राहणं हे मी सांभाळतो” असं तो सांगतो. आता ‘सेंद्रीय शेती’ आणि ‘अरण्यवाट’ हा जंगलात पर्यावरणपूरक टुरीझम यांसाठी त्याचे प्रयोग सुरु आहेत. त्याच्या मते, कामाचं स्वरूप आणि दिशा पक्की असेल, तर थोडा जास्ती वेळ द्यावा लागला तरी चालतो. काम नुसतं यशस्वी करून पुरत नाही, ते सस्टेनेबल करण्यावर त्याचा भर असावा. माणूस सक्षम झालाच पाहिजे, पण त्याच्या जोडीने पर्यावरण आणि इतर जीवसंस्थाही अधिकाधिक निरोगी करायला हव्यात. ‘नेट्वर्किंग महत्त्वाचं असणाऱ्या आजच्या काळात माणूस आणि पर्यावरण यांचं एकमेकांवर अवलंबून असण्याचं महत्त्व सतत पटवत राहायला हवं’ हे मल्हारचं मत सर्वाधिक बोलकं आहे.
– नीता कुलकर्णी
हा लेख लिहित असतानाच चिपळूण आणि परिसरात भयानक पूर आला. त्यामागची कारणं वाचत असताना,कोसळणाऱ्या दरडी पाहत असताना मल्हारची अनेक मतं सतत आठवत होती. आत्ता तो आणि त्याचे सहकारी पेढे गावात मदतकार्यात गुंतले आहेत….
या सदरातील पहिला लेख…
खाद्यसंस्कृतीची संशोधिका : शिल्पा परांडेकर
महाराष्ट्रातल्या ५०० गावांचा प्रवास एकटीने करून शिल्पाने विस्मृतीत गेलेले, जाऊ पाहणारे शेकडो पदार्थ आणि त्यांच्या कृती समजून घेऊन त्यांची नोंद केली आहे.
मल्हार हा मूळ चिपळूणचा! तिथलाच रहिवासी. त्याच्या घरामागे वशिष्ठी नदी वाहाते. त्यामुळे पाण्याची ओढ त्याला जन्मजात आहे….
Mrunal Limaye
म स्त च. ??खूप बेफाट होणारे ही सिरीज, नीता.
Dipali M
मल्हारच्या कार्याबद्दल कुतुहुल वाटत आहे. खूप महत्त्वाच्या प्रश्नांकडे त्याने लक्ष वेधले आहे. सुसंगत अश्या लिखाणाने त्याचे कार्य माझ्यापर्यंत पोहचू शकले, त्याबद्दल धन्यवाद ?✨ पुढेही अश्या दुर्मिळ विषयांबद्दल वाचायला आवडेल.
हेमंतकुमार चोप्रा
फार छान माहिती
सर्पमित्रांप्रमाणे नदीमित्र ही असतात हे समजले
रोहन प्रकाशन नेहमीच वैविध्यपूर्ण साहित्य प्रकाशित करत असते
सुनील चव्हाण
छान लेख. माहितीपूर्ण लेख असून, पर्यावरणाच्या दृष्टीने मल्हारचे प्रयत्न कौतुकास्पद आहे.
नीता, सुंदर पध्दतीने हा विषय हाताळलास आहे. अभिनंदन तुझे.
Asmita H.Chopra
Fantastic
ज्ञानेश्वर जाधवर
खूप महत्वाची माहिती दिली आहे आणि अनुभवातून आलेली असल्यामुळे वाचनीय व उपयुक्त लेख आहे.
Atul Palkar
Nice, interesting & informative article.
आनंद पाळंदे
नद्या वंद्य आहेत पण त्यावर लिखाण कमी आहे. उचित वेळी वाचले. चिपळूण महापूर नदी दोषी नाही याची जाणीव होण्यासाठी अशा लेखनाची गरज आहे.
Shubhada Deshmukh
सुंदर मांडणी. अभिनंदन आणि शुभेच्छा मल्हार
Arjun Pawar
नदी मित्र खूप छान माहिती भेटली मॅडम
Atul Palkar
Nice, interesting & informative article ?
Prashant Dattatraya Patwardhan
चिपळूण जवळच्या या तरूण मित्राचे काम चिपळुणात राहून आम्हाला माहीत नव्हते. नदी मित्र हा शब्द मी पहिल्यांदाच वाचला. नीता कुलकर्णी यांनी नेमक्या शब्दात मल्हार चे काम शब्दबद्ध केले आहे. मल्हार इंदुलकर याच्या कामाला मनापासून शुभेच्छा नीता अशाच मुलखावेगळ्या लोकांच्यावर तुझ्या लेखनातून प्रकाश टाकत राहा. तुझे अभिनंदन