फॉन्ट साइज वाढवा
“२०१९ हे वर्ष संयुक्त अरब अमिरातीच्या इतिहासातील एक महत्त्वाचं वर्ष ठरेल, कारण या वर्षाला हा देश ‘इयर ऑफ टॉलरन्स’ म्हणून स्वीकारेल आणि त्या निमित्ताने या देशातल्या प्रत्येकाला सहनशीलता आणि क्षमा या दोहोंच्या महत्त्वाची माहिती समजेल,” ही घोषणा युएईतल्या प्रत्येक मुख्य वर्तमानपत्रात पहिल्या पानावर झळकली आणि आमच्या ऑफिसच्या प्रत्येकाला फावल्या वेळेत चर्वण करण्यासाठी एक नवा विषय मिळाला. माझ्या बाजूला बसणारा फ्रान्सिस अशा सगळ्या गोष्टींमध्ये रमणारा. मूळचा फिलिपिन्स देशाचा, पण २००३ सालापासून युएईमध्ये सहकुटुंब बस्तान बसवलेला हा महाभाग अनेक विषयांची सखोल माहिती आपल्या मेंदूच्या ‘हार्ड डिस्क’मध्ये बाळगून होता. आमच्या गप्पागोष्टींमध्ये एरव्ही उत्साहाने सामील होणारा फ्रान्सिस या बातमीवर मात्र विशेष व्यक्त होत नव्हता.
“काय झालं? आज पहिल्यांदा तुझ्या आवडीच्या विषयावर तू काहीही न बोलता नुसता बसून आहेस…. सगळं ठीक?” मी त्याला बोलता करायचा प्रयत्न केला. त्याने नुसतं तोंडदेखलं हसून वेळ मरून नेली खरी, पण संध्याकाळी ऑफिसच्या संपल्यावर गाडीकडे जाताना त्याने मला हटकलं.
“पहिल्या पानावरची ठळक बातमी तुम्हाला दिसली, पण त्याचं बातमीच्या खाली छोट्या आकारात असलेली दुसरी बातमी तुम्ही वाचली का ?”
“कोणती रे?”
“‘इयर ऑफ टॉलरन्स’च्या निमित्ताने अबू धाबीच्या सर बानी यास बेटावर जुन्या काळच्या चर्च आणि मोनेस्टरीचे अवशेष लोकांसाठी खुले केले गेले आहेत…. ही बातमी…”
माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. फिलिपिन्स देशाच्या इतर नागरिकांप्रमाणे फ्रान्सिससुद्धा कट्टर ख्रिस्ती होता. एका अरबी देशात जुन्या काळच्या चर्चचे अवशेष सापडतात आणि ही माहिती त्या देशाकडून लोकांना सांगितलेही जाते आणि ती जागाही लोकांसाठी खुली करून दिली जाते याचं त्याला विशेष अप्रूप वाटत होतं. त्याच्या मेंदूमध्ये ‘याची देही याची डोळा’ ते चर्च बघायची इच्छा आकाराला येतं होती, हे मी ताडलं आणि पुढच्याच आठवड्यात कामानिमित्त अबू धाबीला जायचं असल्यामुळे त्या निमित्ताने वाट वाकडी करून सर बानी यास बघून यायचं असा आम्ही दोघांनी बेत आखला.
पूर्वेकडच्या ‘माघरीब’ देशांमध्ये ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम हे तीन धर्म जन्माला आले असले, तरी आखाती देशांमध्ये आणि वाळवंटी भागामध्ये इस्लाम जितका विस्तारला, तितकी मजल इतर दोन धर्मांनी साध्य केली नाही. ज्यू फार पूर्वीच परागंदा झालेले, आणि १४५३ साली तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल जिंकून घेतल्यावर युरोपीय देशांची आखाताच्या दिशेने होतं असलेली घोडदौड थांबलेली…. त्यामुळे जवळजवळ पाच-सहा शतकं या भागात इस्लामचाच झेंडा फडकत होता. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर यूएईसारख्या इस्लामिक अरब देशामध्ये पुरातत्व विभागाला उत्खननात एक चर्च सापडतं आणि ते ही माहिती खुली करून लोकांना त्या जागी जाण्याची मुभाही देतात हे माझ्यासारख्या भटक्याला निश्चितच सुखावणारं होतं.
ठरल्याप्रमाणे अबू धाबीची मीटिंग पार पडून अखेर त्या दिवशी फ्रान्सिस आणि मी आमचा मोर्चा बानी यासच्या दिशेने वळवला. अबू धाबी या अमिरातीला निसर्गाने काही अप्रतिम जागा बहाल केलेल्या आहेत. इथे खाडीमध्ये तिवरांच्या जंगलाचा भला मोठा पसारा हे स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचं आवडतं ठिकाण आहे. शिवाय या अमिरातीच्या भूमीलगत खाडीमध्ये अनेक निसर्गसंपन्न बेटं आहेत. मुख्य भूमीपासून नऊ-दहा किलोमीटर अंतरावर वसलेलं सर बानी यास हे त्यापैकीच एक. या भागातल्या पुरातन कबिल्यांपैकी आद्य असा बानी यास कबिला. या कबिल्यातल्या अनेकांनी या भागावर दीर्घकाळ आपला अंमल बसवलेला असल्यामुळे त्यांच्या नावानेच या बेताची ओळख तयार झाली.
जेबेल धन्ना या जागेतून आम्ही बोटीने या बेटाच्या दिशेला निघालो, तेव्हा समोरच्या खाडीमध्ये अक्षरशः गुलाबी रंगछटांचा सडा पडलेला होता. तिवरांच्या आडोशाने वाढणाऱ्या शैवालांवर ताव मारत असलेले ते शेकडो फ्लेमिंगो पक्षी खाडीच्या पाण्यावर गालिचा अंथरल्यासारखे पसरले होते. आमच्या बोटीवरच्या अनेकांनी त्यांची छायाचित्रं टिपून घेतली. ते विलोभनीय दृश्य डोळ्यांमध्ये साठवून घेतल्यावर अखेर फ्रान्सिस मूळ विषयाकडे वळला.
रोहन शिफारस
मदुराई ते उझबेकिस्तान
10 ठिकाणांचे हटके अनुभवकथन
दक्षिण भारतातली मंदिरं, सात दिवसात आटोपलेली युरोप टूर, कबीर संगीत गाणाऱ्या कलाकारांसोबतची यात्रा, थरच्या वाळवंटातील उंटावरची थरारक राइड, हजारो भाविकांसोबत अनुभवलेली वारी, उझबेकिस्तानमधील सेक्स टुरिझमचा बाजार अशा हटके ठिकाणांचा समावेश आहे. साहस, वासना, कुतूहल आणि अगदी ईश्वरभक्तीपर्यंतचा अनुभव कधी उपरोधिक, तर कधी खट्याळ शैलीत वाचायला मिळतो. लेखकाच्या निरिक्षणक्षमतेमुळे हे सगळे अनुभव आपल्यापर्यंत जिवंतपणे पोहोचतात. ‘कन्डक्टेड टुर्स’ची वेगळी अनुभूती देणारं, थोडं अंतर्मुख करणारं प्रवासवर्णन… .
₹240.00Add to Cart
“बानी यास बेट मला बघायचंच होतं…. तू आला नसतास तरी मी नक्की गेलो असतो तिथे…”
“अरे मला सुद्धा भटकंती आवडते… मी का नाही येणार ?”
“कारण ही साधी भटकंती नाहीये…. आखातातल्या अरब देशात चर्च सापडणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे माहीत आहे का तुला?”
“का? सौदी सोडून इतर आखाती देशांमध्ये चर्च बांधल्यायत ना इथल्या ख्रिस्ती लोकांसाठी….?”
“ते आत्ता…. पण जुन्या काळात या भागात चर्च अथवा सिनेगॉग तयारच झाले नाहीत, कारण इथे ख्रिस्ती अथवा यहुदी लोक कधी राहूच शकले नाहीत असा आजवरचा समज होता ना…. बघ, मिळालं ना चर्च? अरे, गेली हजारो वर्षं तुझ्या देशापासून थेट आफ्रिकेपर्यंत जर व्यापार चालत असेल तर या भागात प्रार्थनास्थळं उभारली गेलीच असणार…”
फ्रान्सिस कट्टर रोमन कॅथॉलिक असल्यामुळे चर्च या विषयावर भरभरून बोलत होता.
आमची पावलं बानी यास बेटावर पडली, तेव्हा भर दुपारची वेळ असल्यामुळे ऊन चांगलंच जाणवत होतं. या बेटाची अबू धाबीच्या अल नाहयान राजघराण्याने खास काळजी घेतली, ती इथल्या प्राण्या-पक्ष्यांच्या विविधतेमुळे. यूएईचे पहिले राष्ट्राध्यक्ष शेख झाएद बिन सुलतान अल नाहयान यांनी या बेटाला १९८७ साली अभयारण्याचा दर्जा दिला. तेव्हापासून आजपर्यंत या बेटावर पशुपक्ष्यांचा मुक्त संचार बघण्यासाठी आणि निसर्गाच्या सान्निध्यात काही क्षण घालवण्यासाठी अनेक पर्यटक थंडीच्या दिवसात येत असतात. आम्हीही उन्हापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने झाडांच्या सावलीचा आश्रय घेतला आणि आडोशाने चालायला लागलो.
“तुला माहीत आहे का हे चर्च कोणत्या पंथाचं आहे?” फ्रान्सिसने मला प्रश्न केला.
“तूच सांग…. तू या विषयातला जाणकार आहेस… मी काय उत्तर देणार तुला?” मी सरळ श्रोत्याची भूमिका स्वीकारली.
“मी मागच्या चार-पाच दिवसात शोधून काढल्याप्रमाणे हे चर्च नेस्टोरियन चर्च आहे. नेस्टोरियन पंथ ख्रिस्ती धर्माच्या पौर्वात्य शाखांपैकी एक महत्वाचा पंथ आहे. इ.स. ४१० साली इराण – तेव्हाच पर्शिया – आजच्यासारखा नव्हता…. तिथे त्या काळी अतिशय बलाढ्य असं सस्सानिड साम्राज्य होतं. नेस्टोरियन पंथ त्या सस्सानिड साम्राज्यातून उगम पावला आणि पुढे विस्तारला. सीरिया, इराक – जो तेव्हा मेसोपोटेमिया म्हणून ओळखला जाई – आणि जॉर्डनचा काही भाग इतक्या विस्तृत भागात नेस्टोरियन ख्रिस्ती लोक पसरलेले होते…. तुमच्या केरळमध्येही नेस्टोरियन पंथ बराच विस्तारला…”
“त्यांच्या आणि बाकीच्या रोमन कॅथॉलिक पंथांच्या चालीरीती वेगवेगळ्या होत्या की सारख्याच ?”
“अरे, चालरीती असं काही नसतं रे…. तुम्ही कुठे राहता, तुमच्या आजूबाजूची परिस्थिती कशी आहे यावर चालीरीती ठरतात. बाकी छोट्या छोट्या गोष्टी सोडल्या, तर वेगवेगळ्या पंथांमध्ये विशेष काही फरक नसतो…”
फ्रान्सिस हे बोलला खरं, पण त्याच्या तशा बोलण्यात उत्तर देण्यापेक्षा प्रश्नाला बगल द्यायचा उद्देश जास्त ठळकपणे जाणवत होता. माझ्या माहितीतल्या बऱ्याच कट्टर कॅथॉलिक लोकांमध्ये हा प्रकार मी आधीही अनुभवलेला होता… ‘आमच्या धर्मात पोटभेद आहेत नुसते, मतभेद आणि मनभेद नाहीत’ हे आडवळणाने सांगण्याची ही सगळी कसरत…..
आम्ही त्या चर्चच्या अवशेषांसमोर येऊन उभे राहिलो, तेव्हा मात्र मला काही काळ स्तब्ध व्हायला झालं. त्या वस्तूचा केवळ पाया आणि त्या पायातून वर आलेल्या थोड्या भिंती इतकंच अस्तित्व आज उरलं होतं. तिथे आम्हाला अबू धाबीच्याच पुरातत्व विभागाचा डॉक्टर मोहम्मद नावाचा इतिहास-संशोधकही भेटला. त्याने त्या चर्चच्या कुंडलीचा सखोल अभ्यास केलेला असल्यामुळे आम्ही त्याला बोलतं करायचा प्रयत्न केला. त्याने उत्साहाने आम्हाला आजूबाजूच्या परिसराचा फेरफटका मारण्यासाठी त्याच्याबरोबर यायला सांगितलं आणि चालता चालता या परिसराचा इतिहास उलगडायला सुरुवात केली.
“या बेटावर आम्हाला इस्लामच्या अगदी सुरुवातीच्या काळातल्या आणि त्याआधीच्या ख्रिस्ती धर्माच्या काळातल्या मनुष्यवस्तीचे पुरावे सापडलेले आहेत. यूएईमधली ही एकमेव पुरातन ख्रिस्ती वास्तू. १९९२ साली डॉक्टर जोसेफ एल्डर्स यांच्या नेतृत्वाखाली इथे पुरातत्व विभागाच्या संशोधनाचं काम सुरु असताना हे चर्चचे अवशेष त्यांना सापडले. अजूनही ते या प्रकल्पाचे प्रमुख आहेत. त्यांनी शोधून काढलं, की हे चर्च ख्रिस्तजन्मानंतर ७५० वर्षं नेस्टोरियन पंथाचे स्थानिक लोक प्रार्थनेला वापरत होते.चर्चच्या वास्तूच्या उत्तर भागात स्वयंपाकघर आणि शयनकक्ष आणि पूर्वेकडच्या भागात दफनभूमी सापडलीय. डॉक्टर एल्डर्स यांनी हळू हळू जमतील तितके भग्नावशेष वाळूतून मोकळे केले. हे चर्च ख्रिस्तजन्मानंतर सातव्या शतकात बांधलं गेलं असावं, असा त्यांचा कयास आहे. इथे त्या काळच्या लोकांची हत्यारं , भांडी असं बरंच काही मिळालेलं आहे.”
अबू धाबीच्या पुरातत्व विभागाने या अवशेषांवर भलं मोठं छप्पर उभारलेलं आहे. अजूनही या भागात संशोधन सुरू आहे. २०१९ साली खुद्द पोप फ्रान्सिस व्हॅटिकनहून यूएईमध्ये आले आणि त्यांनीही या बेटाला भेट दिली. अबू धाबी येथे राहणारे बिशप पॉल हिंदर अनेकदा इथल्या कामाचा आढावा घ्यायला येत असतात. एकूणच काय, तर सर बानी यास बेट संशोधक, शास्त्रज्ञ आणि धार्मिक अधिकारी यांच्यासाठी विशेष स्थान झालेलं आहे.
एके काळी मोतीशिंपांसाठी प्रसिद्ध असलेलं हे बेट ब्रिटिशांनी १८२० सालच्या उत्तरार्धात ‘शोधून’ काढलं. इथले मोती अतिशय सुरेख असल्यामुळे इथे मोत्यांच्या व्यापाऱ्यांची वस्ती होतीच, पण शंभर-एक वर्षात मोत्यांच्या व्यापारात चांगलीच खोट आल्यामुळे इथले लोक हळूहळू आजूबाजूच्या भागात निघून गेले आणि स्थिरावले. १९५०-६० च्या दशकात तर या बेटावर ब्रिटिश नौदलाने आपल्या सैनिकांच्या गोळीबाराच्या सरावासाठी सरावकेन्द्र उभारली होती. अशा या जागेवर आज अबू धाबीच्या आशीर्वादाने अप्रतिम पर्यटनकेंद्र सुरू झालेलं आहे.
फ्रान्सिसने मला पुढच्या काही तासांमध्ये ख्रिस्ती धर्माची माहितीपूर्ण सफर घडवली. ख्रिस्ती धर्म जेरुसलेमच्या कुशीत कसा जन्माला आला इथपासून पुढे त्यात वेगवेगळे पंथ कशा प्रकारे उदयाला आले आणि वाढले हे मला त्याच्याकडून भरभरून ऐकता आलं. त्याच्या या कथनाचा श्रोता जरी मी असलो, तरी साक्षीदार ते सर बानी यास बेट होतं. उन्हं कळायला लागल्यावर आम्ही परतीच्या वाटेकडे निघालो, तेव्हा माझ्या हातात अनुभवाचं भलं थोरलं गाठोडं होतं, जे मला आयुष्यभर पुरणार होतं.
त्या बेटावर आम्हाला भेटलेल्या एमी कोकाईन या शास्त्रज्ञाने एका वाक्यात या सगळ्याचं समर्पक कथन केलं आहे. “Some people call this place the Arabian ark , and we really owe it all to the foresight of Sheikh Zayed.” या द्रष्ट्या माणसाच्या दृष्टीमुळे निर्माण झालेली ही सृष्टी आरक्त झालेल्या क्षितीजाच्या पार्श्वभूमीवर दूर जात असताना अचानक आम्हाला एका अरेबियन ओरिक्सचं दर्शन झालं. त्याचं हक्काचं वसतीस्थान बघायला आलेल्या आमच्यासारख्या पाहुण्यांना मूक निरोप देण्यासाठी कदाचित तो आलेला असावा…. दुसरं काय?
-आशिष काळकर