फॉन्ट साइज वाढवा

“कधी विचार केलायस का, की अबू धाबीसारख्या अमिरातीमध्ये एक असं बेट सुद्धा अस्तित्वात आहे, जिथे आजही या भागातल्या प्राचीन काळच्या जीवनपद्धतीच्या खाणाखुणा दिसू शकतील ?” ओमरने प्रश्न केला. ओमर दुबईतल्या माझ्या अपार्टमेंटमध्ये काही दिवसांपूर्वी राहायला आला होता. त्या तीन खोल्यांच्या अपार्टमेंटमध्ये एकूण सहा जण राहत होते. त्यातला माझ्या खोलीतला माझा जुना ‘रूममेट’ ‘चतुर्भुज’ झाल्यामुळे स्वतःच्या ‘स्टुडिओ’ अपार्टमेंटमध्ये राहायला गेल्यावर दोन-तीन आठवड्यांत त्याच्या जागी एक नवा इसम राहायला आला. निळ्या डोळ्यांचा, दररोज अतिशय पद्धतशीरपणे दाढी-मिशी कोरणारा आणि अरबी असूनही ‘शुद्ध शाकाहारी’ असणारा हा इसम म्हणजेच ओमर. मूळचा लेबनीज , पण कालांतराने तीर्थरूपांनी कुवेती नागरिकत्व घेतल्यामुळे कुवेतच्या पासपोर्ट बाळगणारा हा बोलघेवडा ओमर स्वभावाने अतिशय अघळपघळ होता. सामान्यतः दुबईमध्ये लोकांचा वेळ घालवण्याचा विरंगुळा खरेदी, खाणंपिणं आणि मौजमजा या परीघातच सीमित असतो, पण ओमर मात्र माझ्या पिंडाचा निघाला. आम्ही दोघांनी मिळून पुढे सातही अमिरातींमध्ये मनसोक्त भटकंती केली आणि अनेक अपरिचित जागा धुंडाळल्या…. आजची भटकंतीही अशाच एका अनोख्या जागेची ओळख करून घेण्याच्या उद्देशाने आखली गेली होती.

तेलरूपी ‘काळं सोनं’ मिळायच्या आधी आखाती भागातल्या अरबांच्या मिळकतीचा मुख्य स्रोत होता – मोतीशिंपल्यांचा व्यापार. या आखातातले जुन्या काळचे अरब पट्टीचे दर्यावर्दीही होते आणि वाळवंटातले वाटाडेही. हे अरबी लोक खोल पाण्यातून मोतीशिंप शोधण्यातही मुरलेले होते.

२००६ साली अबू धाबीला पोचणं म्हणजे जिकिरीचं काम होतं. दुबईच्या ‘जबेल अली’ बंदराचा भाग मागे गेला की, वाळूच्या अथांग पसाऱ्यात गाडी शिरायची. मग दीड-दोन तासानंतर थेट अबू धाबीच्या नागरी वस्तीच्या वेशीपर्यंत आल्यावर जीवात जीव यायचा. आम्ही ज्या ठिकाणी निघालो होतो, ती जागा अबू धाबीच्या किनाऱ्यापासून चाळीसएक किलोमीटर लांब समुद्रात होती. तिथे जाण्यासाठी ‘फेरी’ करावी लागायची… जी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी काही काळापुरतीच उपलब्ध असे.

ओमरने गाडी अबू धाबीच्या किनाऱ्यावरच्या ‘जेबेल धन्ना’ या जागी एकदाची थांबवली. रीतसर फेरीची तिकिटं काढली आणि सकाळी साडेआठ वाजता आम्ही त्या फेरीच्या डेकवर पाय ठेवला. निळाशार समुद्र, पांढरीशुभ्र वाळू, थंडीचे दिवस असल्यामुळे वाहत असलेला बोचरा गार वारा आणि या सगळ्यावर ‘उतारा’ म्हणून घेतलेली गरमागरम कॉफी अशा पद्धतीने आमच्या या भटकंतीचा ‘श्रीगणेशा’ आणि ‘बिस्मिल्ला’ झाला. भटकंतीचं ठिकाण होतं – ‘डेलमा बेट’.

जुनं अरबी जग

डेलमा बेटावर अजूनही मिळणारे टपोरे मोती

तेलरूपी ‘काळं सोनं’ मिळायच्या आधी आखाती भागातल्या अरबांच्या मिळकतीचा मुख्य स्रोत होता – मोतीशिंपल्यांचा व्यापार. या आखातातले जुन्या काळचे अरब पट्टीचे दर्यावर्दीही होते आणि वाळवंटातले वाटाडेही. हे अरबी लोक खोल पाण्यातून मोतीशिंप शोधण्यातही मुरलेले होते. खोल आखाती पाण्यात लाकडी बोटी न्यायच्या, तिथे नाकाला लाकडी चाप लावायचा, कमरेला पखाल बांधायची, पायाला दोरखंड बांधायचा आणि थेट खाडीच्या निळ्याशार पाण्यात सूर मारायचा ही त्यांची शिंपले हुडकण्याची पद्धत. स्थानिक लोक सांगतात की, जुन्या काळचे अरब गोताखोर सरावाने तब्बल पाच मिनिटांपर्यंत श्वास रोखू शकायचे. खाडीच्या तळाशी मिळतील तितके शिंपले ते पखालीत भरायचे आणि वर यायचे. पर्शियन आखातातल्या शिंपल्यांमधून निघणारे मोती अतिशय सुरेख… हे गुलाबी, पांढरे, फिक्कट सोनेरी अशा अनेक रंगांचे टप्पोरे मोती बाजारात अरबी व्यापाऱ्यांना चांगली किंमत देऊन जायचे. ‘डेलमा बेट’ हे फार पूर्वीपासून मोतीशिंपांच्या व्यापारातल्या महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक म्हणून अरबी जगतात प्रसिद्ध होतं. आम्ही सव्वा तासांच्या प्रवासानंतर जेव्हा त्या बेटावरच्या वाळूत पाऊल ठेवलं, तेव्हा अचानक आपण घड्याळाचे काटे मागे फिरवून भूतकाळात गेल्याचा भास झाला…. शहरीकरणापासून अलिप्त राहिलेलं हे बेट अजूनही जुनंच वाटत होतं.

आखाती देशात ‘धाऊ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक लाकडी होड्या. या मासेमारी आणि समुद्रतळाशी सूर मारून मोतीशिंप शोधण्याच्या कामासाठी वापरल्या जात असत.

“मी आज तिसऱ्यांदा आलोय इथे” ओमर मला सांगत होता. “मला ही जागा प्रचंड आवडते. हे आहे खरं अरबी जग… त्या काचेच्या उंच इमारती, मोठमोठे शॉपिंग मॉल्स ही काही आमची ओळख नाही… असं समज, तू आता जुन्या काळच्या अरबी गावात आला आहेस …”
त्याचं म्हणणं अगदीच स्वप्नाळू नव्हतं. डेलमा बेट खरोखरच तसं होतं… खरंतर अजूनही आहे. १९०६ सालच्या शारजाह येथे राहणाऱ्या एका ब्रिटिश नागरिकाने या बेटाबद्दल लिहून ठेवलेलं आहे. हे बेट १८८०-९० च्या काळात मोतीशिंपांच्या व्यापाराच्या मार्गावरचं एक गजबजलेलं ठिकाण होतं. बेटाच्या किनाऱ्यावर तेव्हाच्या पद्धतीची लाकूड आणि मातीची दुकानं होती. अजूनही त्या जुन्या काळच्या खुणा येथे बघायला मिळतात.
“ओमर, तुला या बेटाच्या इतिहासाची माहिती आहे का रे ?” मी चालता चालता कुतूहलाने प्रश्न केला.

“आहे ना… याआधी आलेलो तेव्हा बरीच माहिती गोळा केलीय मी. अबू धाबीच्या स्थानिक पुरातत्व विभागाने काही पाश्चिमात्य पुरातत्वशास्त्रज्ञांना या बेटावर उत्खनन करण्यासाठी आमंत्रण दिलं आणि त्यातून त्यांना चकित करणारी माहिती मिळाली… उत्खननात मिळालेल्या वस्तूंचं ‘कार्बन डेटिंग’ केल्यानंतर समजलं, की इथे ७००० वर्षांपूर्वी प्रथमतः मनुष्यवस्ती झाली असावी…. म्हणजे थेट निओलिथिक क्रांतीच्या काळापर्यंत या बेटाचा संबंध जोडला जातो… आहेस कुठे? शिवाय इथे मिळालेल्या जीवाश्मांच्या अवशेषांवरून हेही स्पष्ट होतं की, तेव्हाच्या आदिमानवांचाही खजूर आणि मासे हाच मुख्य खुराक होता…”

खाडीच्या शांत पाण्यात खोलवर बुडी मारून खाडीच्या तळाशी असलेले मोती-शिंपले होडीमध्ये घेऊन येणारे गोताखोर.

‘अल-मराईखी’ पुराणवस्तुसंग्रहालय

मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. वाळवंटी देशांना इतिहास तो काय आणि कितीसा, या आपल्याकडच्या प्रचलित समजुतीला धक्का देणारी ही माहिती मला सुखावून गेली. ओमरने त्याच्याकडच्या माहितीचा पेटारा उघडला. एव्हाना आम्ही एका जुन्या घरासारख्या दिसणाऱ्या विस्तीर्ण एकमजली इमारतीसमोर आलेलो होतो. ही इमारत म्हणजे ‘अल- मराईखी’ पुराणवस्तुसंग्रहालय. इथे ओमर चांगलाच खुलला.
“मोहम्मद बिन जस्सीम अल-मराईखी नावाच्या एका धनाढ्य मोत्यांच्या व्यापाऱ्याचं हे घर. ख्रिस्तजन्माच्या नंतर १८७०व्या वर्षीचा त्याचा जन्म. तो चांगला साठ-पासष्ट वर्षं जगला… त्याची मुलं आणि नातवंडंही या भागात आब राखून होती. अब्दुल रहमान बिन अली अल-मुबारक या जुन्या अरबी कवीने त्याच्यावर एक दीर्घकाव्य केलेलं आहे, ज्यावरून हा अल-मराईखी चांगलाच प्रसिद्ध होता हे कळतं….”

पुराणवस्तुसंग्रहालयाच्या रूपात जीर्णोद्धार होण्यापूर्वीच्या काळचं ‘अल -मराईखी’ कुटुंबाचं घर

वास्तविक भारतासारख्या विविधता आणि समृद्धी एकत्र नांदत असेलल्या आणि प्रदीर्घ इतिहास लाभलेल्या देशाच्या माझ्यासारख्या नागरिकाला या सगळ्या इतिहासाचं विशेष अप्रूप वाटत नव्हतं… पण इथल्या अरबी लोकांसाठी हा इतिहास त्यांच्या पूर्वजांची अमूल्य ठेव होता. त्यांच्या कवींच्या जेमतेम एका पानावर मावेल इतक्याशा कवितेला ‘शाकुंतल’ची सर नसेलही, पण त्यांना त्याचाही जबरदस्त अभिमान होता.
या घराचं आज अबू धाबीच्या पुरातत्व विभागाच्या आशीर्वादाने संग्रहालय झालेलं आहे. विजेचा शोध जेव्हा लागला नव्हता, तेव्हा या वाळवंटी आखातात उन्हाळा असह्य असायचा…. पण त्यावर इथल्या लोकांनी एक तोडगा शोधला होता. त्यांच्या घराच्या मध्यभागी एक छप्पर नसलेला मोकळा चौक असायचा. भिंतींना खिडक्या असायच्या, ज्या उघडल्या की वायुविजन व्हायला मदत व्हायची. याशिवाय खास अरबी शैलीत तयार केलेलं ‘बरजील’ प्रत्येक घराला असायचे. हे बरजील म्हणजेच घराच्या उंचीपेक्षा आठ-दहा फूट उंच बांधलेले ‘विंड कॅचर्स’. त्यांच्यामुळे वारा अडला जाऊन खालच्या दिशेला वळायचा. या बरजीलच्या खाली घराच्या जमिनीखाली पाण्याचा हौद अथवा पन्हाळ तयार केला जायचा. अशा रचनेमुळे आत आलेल्या वाऱ्याचं तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा सहा-सात डिग्रीने कमी होतं असे. आपल्याकडे राजस्थानच्या भागात वारा वाहण्याच्या दिशेकडे कारंज्यांची अथवा पाण्याच्या तलावांची रचना केलेली असते, तशीच काहीशी ही खास अरबस्तानची वातानुकूलनाची ही पद्धत.
आखातात गोड्या पाण्याच्या विहिरी
“या बेटाला मिळालेली निसर्गाची एक मोठी देणगी माहित्ये ?” ओमरच्या प्रश्नामुळे मी पुन्हा एकदा वर्तमानात आलो.
“भर आखातातल्या या बेटावर गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत…. आणि त्याही मुबलक. अगदी वर्षभर त्यातलं पाणी आटत नाही. १९५०पर्यंत अबू धाबीला पाणी हे डेलमा बेट पुरवायचं…” आपण कितीही फुशारक्या मारल्या, तरी निसर्गच मानवापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे याचं हे उदाहरण. ओमरबरोबर मी तिथल्या एका विहिरीजवळ गेलो आणि त्या विहिरीत डोकावून बघितलं. खरोखर त्या विहिरीत नितळ आणि स्वच्छ असं गोडं पाणी होतं. त्या आणि आजूबाजूच्या विहिरींनी कित्येक वर्षं या भागातल्या अरबांच्या कोरड पडलेल्या घशांना शांत केलं असेल कुणास ठाऊक….

“या बेटाचा अजून एक इतिहास आहे ” ओमरने नवी माहिती सांगायला सुरुवात केली. “ख्रिस्तजन्मानंतरच्या सातव्या शतकाच्या काळात या भागाची ओळख होती पाच मुख्य बेटं…. आजच्या बाहरेन देशाच्या आजूबाजूची ही बेटं अर्थातच व्यापारी मार्गावरची, त्यापैकी ताल्मोन नावाच्या बेटावर गोडं पाणी आणि शेतीला योग्य अशी माती असल्यामुळे तिथे ‘अल मोराईकात’ नावाच्या कबिल्याने आपलं बस्तान मांडलं. खजुराच्या झाडांच्या झावळ्यांचं छत आणि त्याखाली वाळू-मातीच्या विटांनी बांधलेल्या चिकट वाळूच्या लगद्याचा मुलामा दिलेल्या भिंती अशा थाटाची त्यांची घरं (अरबी भाषेत त्यांना ‘उर्शन’ असं म्हणतात.) लवकरच या बेटावर जागोजागी आकाराला आली आणि या कबिल्याने अल्पावधीत मोतीशिंपांच्या व्यापारात आपलं नाव कमावलं. हे ताल्मोन बेट म्हणजेच आजचं डेलमा…”
माझ्या डोळ्यांसमोर खरोखर तशा पद्धतीचं ‘अल-मराईखी उर्शन’ उभं होतं. आजूबाजूला मला तशा अनेक घरांचं अस्तित्व जाणवत होतं.

आजचं ‘अल-मराईखी’ पुराणवस्तुसंग्रहालय

मिनार नसलेल्या मशिदी

“ही बघ, ही जुनी मशीद. अजून दोन मशिदी आहेत इथे.” ओमरने मला एक जुनी इमारत दाखवली. जुनी असली, तरी अबू धाबीच्या पुरातत्व विभागाने त्याची चांगली डागडुजी केली होती. इमारत साधीच असली, तरी माझ्या डोळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट जाणवली.
“ओमर, मशीद आहे ना ही नक्की?”
“का?”
“या मशिदीचे मिनार कुठे गेले? पडले की काय?”
ओमरने माझ्याकडे चमकून बघितलं…. पण मी आर्किटेक्ट आहे हे अचानक त्याच्या ध्यानात आलं आणि त्याने हसून माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं.
“तू म्हणतोस ते बरोबर आहे …. इस्लामिक पद्धतीच्या वास्तुरचनेत मशीद म्हंटलं की मिनार आलेच… पण इथल्या तिन्ही पुरातन मशिदींना मिनार नाहीत. इथे एकूण तीन मशिदी – अल मुरायखी मशीद, अल मुहनादी मशीद आणि अल दवासरी मशीद. तिन्हींच्या रचनेत विसंगती आहे…. आपण आत्ता बघतो आहोत ती अल मुरायखी मशीद तशी नवी – १९३१ ते १९४६ दरम्यानची. समुद्रातले दगड आणि शंख-शिंपले रचून त्यावर चिकणमातीचे थर देऊन तयार केलेली. त्यामुळे मशीदीपेक्षाही तिला ‘नमाज पढायची विस्तीर्ण खोली’ म्हणणं जास्त योग्य ठरेल… अल दवासरी मशिदी तशीच खोलीवजा…. पण अल मुहनादी मशीद तशी नाही. ती मशीदच आहे, पण तिला मिनार नाही… इतकंच काय, पण मिहराब आणि मिनबारही नाही….”
मिहराब म्हणजे मशिदीच्या मक्केच्या बाजूच्या भिंतीत तयार केलेली खाच, जिच्याकडे तोंड करून नमाज पढला जातो आणि मिनबार म्हणजे मशिदीच्या जमिनीपासून उंच तयार केलेला चौथरा, ज्यावर उभा राहून इमाम जमलेल्या लोकांना प्रवचन देतो. इस्लामी वास्तुरचनेप्रमाणे मशिदीचे हे अविभाज्य भाग… पण या बेटावरच्या मशिदी वास्तुरचनेच्या या नियमांना अपवाद आहेत.

“अरे, इथल्या उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरून तुमच्या भारत देशाशीही इथले लोक व्यापार करत होते हे सिद्ध झालंय…. आणि दुसरीकडे थेट मेसोपोटेमियाशी यांची घसट होती…. इथल्या जुन्या इमारतींची रचना उम्मायाद कालखंडातल्या पद्धतीची आहे ” ओमरने मला नवा धक्का दिला. “आत्ता काही महिन्यांपूर्वी ब्रिटिश संशोधकांनी इथे जे नवं उत्खनन केलं, त्यात त्यांना ख्रिस्तपूर्व ६००० वर्ष काळातल्या गुलामगिरीच्या प्रथेशी जोडणाऱ्या खुणा मिळाल्या आहेत… कदाचित इथले धनाढ्य व्यापारी गुलाम बाळगतही असतील तेव्हा….” गुलामगिरी पूर्वीच्या अरब देशांमध्ये प्रचलित होती, हे मला माहीत होतं. इस्लामने गुलामगिरीच्या प्रथेला विरोध केला नव्हता, त्यामुळे आत्ताआत्तापर्यंत ही प्रथा या भागात अस्तित्वात होती.

मदाबे अर्थात खजुराशी लापशी

डेलमा बेट आणि सभोवताली पसरलेलं खाडीचं निळंशार पाणी

इथल्या ‘मदाबे’ म्हणजेच खजुराची लापशी तयार करण्याच्या कारखान्यात मी जी लापशी प्यायली, तिची चव पुढे तास-दोन तास जिभेवर रेंगाळत होती. रखरखीत वाळवंटात उगवणाऱ्या या झाडाने अरबांना शतकानुशतकं अन्न पुरवलेलं आहे. खजुराचं झाड या भागाचा कल्पवृक्ष का आहे, हे त्या पेलाभर लापशीमुळे मिळालेल्या समाधानातून मला व्यवस्थित समजलं. आम्ही आमच्याबरोबर ‘सॅक’मध्ये भरपूर खाण्यापिण्याचं जिन्नस आणले होते, पण त्या लापशीमुळे मिळालेला आनंद स्वर्गीय होता. संयुक्त अरब अमिराती हा देश ज्यांच्या पुढाकारामुळे जन्माला आला, त्या अबू धाबीच्या शेख झाएद यांचा खजुरावर विशेष जीव. त्यांनी ‘डेट इन्स्टिट्यूट’ जन्माला घालून खजुराचं नवं वाण विकसित केलं. या वाणाची झाडं कमी उंचीची असल्यामुळे त्यावर लगडलेले खजूर तोडणं सोपं जायचं आणि वृद्ध माणसांना कोणाच्याही मदतीशिवाय ताजे खजूर थेट झाडावरून काढता यायचे…. भारतासारख्या शेतीप्रधान देशातून येऊनही मला या कहाण्या ऐकताना विलक्षण आनंद होत होता.
दिवसभराच्या त्या पायपिटीनंतर त्या बेटावरच्या जवळ जवळ सगळ्या जागा डोळ्यांखालून घातल्या आणि परतीच्या फेरीची वेळ झाल्यावर आमची पावलं जेट्टीच्या दिशेला वळली. ओमरसाठी ही तिसरी खेप असली, तरी त्याचंही समाधान झालेलं नव्हतंचं… या बेटावर आल्यापासून आमचा एका अर्थाने आधुनिक जगाशी संबंध तुटल्यासारखं झालं होत आणि आम्हाला ते आवडतही होतं… पण आता पुन्हा त्या जगात परतण्यावाचून पर्याय नव्हता. फेरीच्या डेकवर पाय ठेवल्यावर आम्ही दोघेही मावळत्या सूर्याच्या पार्श्वभूमीवर त्या बेटाकडे एकटक बघत होतो. हातात ‘मिनरल वॉटर’ची बाटली असूनही बेटावरच्या गोड्या पाण्याच्या विहिरीतल्या पाण्याची चव आम्हाला आठवत होती. अखेर फेरी अबू धाबीच्या दिशेला निघाली आणि आम्ही भूतकाळातून वर्तमानात परतलो.
बेट हळू हळू दूर होत असताना मला कधी काळी कोण्या एका पुस्तकात वाचलेलं इंग्रजीत भाषांतरित केलेलं अरबी सुभाषित आठवलं….
“Who lives sees, but who travels sees more!”

– आशिष काळकर

(दुबईस्थित वास्तुविशारद असून अरबस्तानच्या सांस्कृतिक-साहित्यिक व राजकीय वारश्याबद्दल विशेष आस्था.)


/article-dalma-islan/article-dalma-island-by-ashish-kalkar/d-by-ashish-kalkar/
या सदराबद्दल…

अरबस्तानच्या अनवट वाटा

‘अरबस्तानच्या अनवट वाटा’ या लेखमालेतून मी या सात अमिरातींमधल्या काही खास जागा आपल्या सगळ्यांसमोर घेऊन येणार आहे. या जागा अपरिचित असल्या, तरी विलक्षण आहेत. या जागांची आपली एक खास कहाणी आहे.

लेख वाचा…


रोहन शिफारस

एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंती

पृथ्वीच्या दक्षिण टोकावरील शेवटचं गाव ‘प्युर्टो विल्यम्स’, खलाशांचं कबरस्तान ‘केप हॉर्न’, ९८% बर्फानेच वेढलेलं ‘अंटार्क्टिका’, अवघ्या तीन हजार लोकवस्तीचं ‘फॉकलंड आयलंड’, तर उत्तर टोकावरील ‘आर्टिक सर्कल’, ‘नॉर्दन लाईट्स’चं मनोहारी दर्शन, हिमनगांची जागतिक राजधानी ‘ग्रीनलँड’ आणि लँड ऑफ फायर अँड आईस ‘आइसलँड’… पृथ्वीवरच्या अशा दोन टोकांवरील वेगळ्या दुनियेची सफर प्रधान या पुस्तकातून घडवून आणतात. थरारक सफरींचा अविस्मरणीय अनुभव देणारं कथन…एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंती !

End of the World cover

250.00Add to cart

Comments(9)

    • गोडबोले शरद

    • 3 years ago

    उत्सुकता वाढत आहे. पुढचे सगळे भाग वाचणार आहे.

    1. धन्यवाद! जरुर वाचा… हे सदर पाक्षिक असून शुक्रवारी नवे लेख पसिद्ध होतील.
      मैफल exclusive मधील इतर लेखही वाचा व लेखांची लिंक शेअर करा..

      -टीम रोहन

    • मृण्मयी

    • 3 years ago

    खूप छान लेख. आणि माहितीपूर्ण देखील. नव्या ( की जुन्या?) जगाची सफ़र घडवलीत.

    1. धन्यवाद! जरुर वाचा… हे सदर पाक्षिक असून शुक्रवारी नवे लेख पसिद्ध होतील.
      मैफल exclusive मधील इतर लेखही वाचा व लेखांची लिंक शेअर करा..

      -टीम रोहन

    • Shrikant Pataskar

    • 3 years ago

    Thanks for introducing unknown facets of the Arab World

    1. Thanks Shrikant Pataskar! Do follow this series… new articles will be published twice a month on Fridays…
      We at Rohan Prakashan have started digital publishing with a view to make available variety of quality literature to our readers across the globe.
      Do read other articles as well. Your feedback is important to us.

      Do share the articles as well.

      Thanks!
      Team Rohan

    • प्रज्ञा केसकर

    • 3 years ago

    खूप छान लेख. एका नवीन ठिकाणची माहिती कळली. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत!

    1. धन्यवाद! येत्या शुक्रवारी पुढचा लेख प्रसिद्ध होईल.

      -टीम रोहन

    • Sachin Mandlik

    • 3 years ago

    या सदरात पुढे पुष्कळ लेख येवो ही विनंती. शक्य असल्यास लेखकाला अमिरातीच्या बाहेरच्या त्यांनी पाहिलेल्या अशाच जागांवरही लिहायला सांगावं, नक्कीच मजा येईल वाचायला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *