शिल्पाची आणि माझी भेट झाली ती एका हेरीटेज टूर मध्ये! “तू काय करतेस?” या माझ्या प्रश्नावर ती म्हणाली होती, “मी खूप भटकते, लोकांशी बोलते, पारंपरिक खाद्य पदार्थांची माहिती गोळा करते. कॉलम्स लिहिते, फिटनेस फूडचं माझं स्टार्टअप आहे.” एअरपोर्टवर बसून तिने खरंच एक कॉलम लिहून पाठवला. हिचं काम समजून घ्यायलाच हवं, असं तेव्हाच वाटलं. नंतर कंबोडियातली देवळं बघताना, सीएम रीप शहरात पायी भटकताना शिल्पाची ओळख होत गेली. शिल्पाची पॅशन आहे – विविध ठिकाणची खाद्यसंस्कृती समजून घेणं, तिचा अभ्यास करणं आणि तिची व्यवस्थित नोंद करून ठेवणं. त्या परक्या देशातला भांडीबाजार तिने पालथा घातला, तिथून वैशिष्ट्यपूर्ण भांडी, खवणी, किसणी अशा गोष्टी विकत घेताना तिचे डोळे लकाकत होते. एका ठिकाणी, सहलीला आलेलं स्थानिक कुटुंब जेवायला बसलं, तेव्हा शिल्पाने त्या घरातल्या कर्त्या स्त्रीशी ओळख करून घेतली, त्यांचे पदार्थ समजून घेतले, त्यांचे फोटो, व्हिडीओ घेतले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कमालीची सार्थकता दिसत होती.
शहरात जन्मलेल्या, आधुनिक विचारसरणीच्या घरात वाढलेल्या, मुंबई-पुण्यात एकटी राहून प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शिल्पाच्या या कामामागची प्रेरणा काय असेल, हा प्रश्न मला पडला होता. कारण प्रवासाची आवड अनेकांना असते, खाण्याची, पदार्थांचा इतिहास समजून घेण्याचीही आवड असते. पण आपल्या आवडीचा अत्यंत सुसूत्रपणे आणि शिस्तबद्धरीत्या पाठपुरावा करणं, आपल्या आवडीला-छंदाला काही एक हेतू देणं, त्यातून दीर्घकाल टिकणारं, अनेकांना उपयुक्त ठरेल असं काम करून ठेवणं हे किती लोकांना जमतं? शिल्पाचं वेगळेपण यातच आहे.
ती ‘खाद्यसंस्कृतीची संशोधक’ आहे. लक्षात घ्या, खाद्यसंस्कृतीची! केवळ पाककृतींची नाही.
महाराष्ट्रातल्या ३० जिल्हे, २८७ तालुके आणि ५०० गावांचा प्रवास एकटीने करून तिने विस्मृतीत गेलेले, जाऊ पाहणारे शेकडो पदार्थ आणि त्यांच्या कृती समजून घेऊन त्यांची नोंद केली आहे. खान्देश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या प्रदेशांत फिरून तिने ही माहिती गोळा केली आहे. तिचं हे काम अजूनही चालू आहेच, पण आता ते अनेक अंगाने विस्तारतंय. आणि तसंही तिचं हे काम फक्त पाककृतींची नोंद करणं, इतकं मर्यादित नव्हतंच. तिच्या या कामामागच्या विचारांची त्रिज्या मोठीच होती.
स्वावलंबनाचे धडे
मूळ गाव कोल्हापूर, अनेक अनुभव घेण्याचं धाडस अंगी रुजवणारं कुटुंब, निगुतीने चौरस आहार रांधणाऱ्या आजी-आई, आजूबाजूच्या इतर अनेक सुगरणी, इतिहास, मानववंशशास्त्र, संस्कृती यांबद्दलचं विलक्षण कुतूहल, प्रश्न विचारून गोष्टी समजून घेण्याची वृत्ती या गोष्टी तिला आपोआप मिळाल्या होत्या. पण ही तर फक्त सुरुवात होती. या आधारावर तिच्या आवडीची दिशा ठरतीय हे तिलाही तेव्हा लक्षात आलं नव्हतं. शिक्षण आणि त्यानंतर नोकरी हे रूढ समीकरण तिनेही सोडवलं. स्वतःच्या पायावर उभं राहणं ही गोष्ट तिच्यासाठी स्वाभाविक होती. तिने शहाण्या मुलीसारखं अर्थशास्त्रात पदवी व नंतर पदव्युत्तर शिक्षण मार्केटिंगमध्ये पूर्ण केलं. पत्रकारितेचा अभ्यासक्रमही केला. कॉलेजमध्ये असतानाच तिला ‘सकाळ’ माध्यम समूहासोबत काम करण्याची संधी मिळाली. तिथे आधी संपादकीय विभागात व नंतर सेल्स आणि मार्केटिंग विभागात बारा वर्षं काम केलं! याच दिवसांनी तिला मोठी देणगी दिली ती स्वावलंबनाची! स्वतः कमावणं ही एक वेगळी गोष्ट असते, पण त्याच्या जोडीला मोठ्या शहरात एकटीने राहणं या गोष्टीचे अनेक पैलू असतात. घर शोधण्यापासून बिलं भरण्यापर्यंत अनेक! शिल्पाला या स्वावलंबनाच्या धड्यांनी खूप गोष्टी शिकवल्या, त्या तिला तिच्या ‘हरवलेल्या चवींच्या शोधप्रवासात’ उपयोगी पडल्या.
खाणं आणि भटकंतीची बीजं तिच्यात रुजली होतीच. आजीचे पदार्थ, नात्यातल्या व विविध समाजातल्या परिचितांकडून त्यांची खाद्यसंस्कृती जाणून घेण्याचा छंदही होता. करिअरसाठी घरापासून लांब गेल्यावर मात्र या गोष्टी जाणून घेण्यात अधिक रुची निर्माण झाली. तेव्हा करिअर, काही जबाबदाऱ्या यांमुळे नोकरी करत असताना आवडणारा मार्ग निवडता नाही आला. पण तरी, ‘आता मला माझं काहीतरी करायचं आहे’ हा ध्यास शांत बसू देत नव्हता आणि एका क्षणी लक्षात आलं की आता आपल्याला जे खरंच करायचं आहे ते करायचा क्षण आलाय.
तो क्षणही खूप खास होता. काही जुन्या रेसिपी तिच्या वाचण्यात आल्या. तेव्हा तिला वाटलं की आपल्याही आजीकडे अशा पाककृतींचा खजिना असणार. आपण तो जपून ठेवायला हवा होता. काश!!! “असा काही ना काही ‘काश’ प्रत्येकाच्या मनात असतोच… तसा माझ्याही मनात तो होताच. माझ्या आजीचे मी पदार्थ लिहून ठेवले असते, मी अजून काही गोष्टी तिच्या मार्गदर्शनाखाली शिकले असते तर…” तिच्या मनात आलं, की आपल्या गावोगावी अशा कित्तीतरी आज्ज्या असतील… त्यांना भेटलो तर? त्यांच्या काही खास पाककृती गोळा केल्या तर? या निमित्ताने खाद्यसंस्कृती जाणून घेता येईल. माझी या कामामागची प्रेरणा हाच ‘काश’ होता. जे राहून गेलं होतं, ते करायचं होतं.
या प्रवासाची सुरुवात मात्र कुठून आणि कशी करावी, हे समजत नव्हतं. असे जुने पदार्थ ग्रामीण भागातून समजतील हे नक्की माहित होतं. परंतु गावांत जायचं कसं, शिवाय लोक अशी माहिती द्यायला तयार होतील का, असे अनेक प्रश्न होते.
हरवलेल्या चवींच्या शोधप्रवासात
अभ्यास-प्रवासाला सुरुवात करण्याआधी हा विषय समजून घ्यायचा होता. महाराष्ट्राची भौगोलिक रचना, समाजव्यवस्था, इतिहास, संस्कृती, खाद्यसंस्कृती, भाषा या सर्व गोष्टी जाणून घ्यायला तिने सुरुवात केली. याविषयी जे काम झालंय त्याचं वर्षभर वाचन केलं, संदर्भ गोळा केले. या क्षेत्रातील अभ्यासकांशी ती बोलली. विषयाचा आवाका मोठा आहे हे लक्षात येत होतं. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती फक्त पाककृतींपुरती मर्यादित नाहीच. तिला ऋतूमानाची, भौगोलिक वैविध्याची जोड आहे. तिच्यात केवळ रांधण्याचं कौशल्यच नाही, तर स्त्रीच्या आयुष्याचं सार सामावलेलं आहे. त्यात अर्थपूर्ण लोकगीतं, गाणी आहेत, दागिने आहेत, वैशिष्ट्यपूर्ण उपकरणी आणि भांडी आहेत. सण-उत्सव आहेत. शिल्पा सांगते, “विस्मरणात गेलेल्या पदार्थांचा शोध घेता-घेता लक्षात आलं की आपली खाद्यसंस्कृती म्हणजे केवळ पदार्थांचा वारसा नाही तर तिच्याशी प्रथा, परंपरा, रितीरिवाज, अध्यात्म, भक्ती, कला सुंदर पद्धतीने जोडल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रात अठरापगड जाती-जमाती, विविध समाज यांची प्रत्येकाची संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे आपली खाद्यसंस्कृती एक प्रभावी विचारधारा आहे आणि हा ठेवा विविध माध्यमातून सर्वदूर पोचवण्यासाठी माझे प्रयत्न सुरू झाले.”
बचत गट, सरपंचांचं कार्यालय, महिला मंडळं आणि अर्थातच वैयक्तिक ओळखी अशा वेगवेगळ्या माध्यमांतून तिने गावोगावच्या महिलांचे संपर्क गोळा केले. एकातून दुसरी ओळख हाही मोठा आधार होता. एकटीने भटकंती करायची इच्छा आता प्रत्यक्षात आणायची होती. तिने परिचित मार्गावरून कोकणातल्या एका गावी प्रवास करून बघितला. माहिती मिळू शकेल असा विश्वास वाटला. तो अनुभव गाठीशी घेऊन तिने स्वतःच्या कोल्हापूर जिल्ह्यापासून प्रवास सुरू केला. प्रवासाला निघण्यापूर्वी एक विशिष्ट जिल्ह्याचा तालुका व गावांचा विचार करून ती रूट आधीच ठरवत असे. लोकांच्या बरोबरच, स्थानिक संग्रहालयं, अभ्यासक यांना भेटत असे. फार इंटरेस्टिंग माहिती जमा होत गेली. काही ठिकाणी तिला बायकांनी पदार्थ करून दाखवले, काहींनी तोंडी सांगितले. काही पदार्थांचे व्हिडीओज ही तिने बनवून ठेवले आहेत. उकड्पेंडी, पानगे, रोटगे, खुला, दामटी लाडू असे २५ पेक्षा अधिक समाजांतले ५०० हून अधिक पदार्थ तिने गोळा केले.
या जोडीला स्थानिक पीकपद्धती, धान्यं, भांडी, खाण्याच्या पद्धती यांचीही नोंद तिने केली. तिची काही निरिक्षणं नोंद घ्यावी अशी आहेत. उदा. गोंडा या आदिवासी जमातीत कोणत्याही गोष्टीचा संग्रह करण्याची पद्धत नाही. लागेल ती गोष्ट हवी तेव्हढीच निसर्गातून ते खुडून आणतात. तर बिनागोंडा या आदिवासी भागात मोहाची फुलं अतिशय किचकट प्रक्रिया करून वाळवतात आणि स्वयंपाकात वापरतात. अनेक आदिवासी जमातींत ऋतूत येणारं पहिलं फळ अख्खं गाव एकत्र बसून खातं.
१२०० दिवसांचा सोलो ट्रॅव्हल
या १२०० दिवसांच्या सोलो ट्रॅव्ह्लमध्ये एक-दोन जिल्हे वगळता बाकी सर्व ठिकाणी तिने स्वतः ड्राइव्ह केलं आहे. शिल्पा सांगते, “मी कोकणपासून ते अगदी अतिदुर्गम गडचिरोली पर्यंत प्रवास केला आहे. भाषेची अडचण केवळ काही आदिवासी भागांत (गोंड-माडिया, कोरकू, ठाकर, कातकरी वगैरे) किंवा लमाणी तांड्यांवर आली. इतर ठिकाणी आजच्या पिढीतील मराठी बोलणारे लोक असल्यामुळे संवाद साधणं सोपं झालं आणि काही जुने शब्द, म्हणी, वाक्प्रचार मला कळले. दुसरं म्हणजे, मी कुठेही गेले तरी मला चांगलेच लोक भेटले. मला वाटतं, तुमचं काम लोकांना भावतं, तुम्ही किती तळमळीने ते करताय, ती तळमळ लोकांपर्यंत पोचते. स्वतःला त्रास घेऊन मदत करणारे किती तरी लोक मला भेटले. मग ती माहिती सांगणं असो किंवा माझ्या राहण्या-जेवणाची सोय करणं असो. शेकडो अनोळखी बायांनी पदार्थाची कृती सांगताना त्यांची मनं माझ्यापाशी मोकळी केली. बाई समजून घेणं हा अनुभव माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता. अतिवृष्टीच्या प्रदेशात दमट हवेत आपलं अन्नधान्य टिकवणारी बाई असो किंवा मैलो न् मैल चालून हंडे वाहून आणणारी, कोरड्या प्रदेशातही खाण्याचं वैविध्य जपणारी बाई असो, त्यांच्या सर्जनशीलतेला नमस्कारच करावासा वाटतो. महाराष्ट्रातील लोकसंस्कृती खूप छान आहे आणि ती प्रत्यक्ष अनुभवणे त्याहूनही सुंदर. अनेक प्रकारचे समाज, अनेक प्रकारचे लोक मला भेटले परंतु माणुसकीवरची श्रद्धा कमी होईल असा एकही अनुभव नाही. एका अनोळखी मुलीला थेट स्वयंपाकघरात शेजारी बसवून जेवायला वाढणारी घरंच मला मिळाली.”
१२ व्या शतकातील खाद्यसंस्कृती
आपल्या खाद्यपरंपरेचे महत्त्व आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन सांगणारे, आपल्या जुन्या ग्रंथातील ज्ञान सर्वांपर्यंत पोचवणारे पुस्तक…
या सगळ्या प्रवासानंतर स्वतःत खूप बदल झाला, असंही ती सांगते. माध्यमातल्या कॉर्पोरेट नोकरीपेक्षा हे काम तिला जास्त आवडतंय कारण ते सर्वार्थाने समृद्ध करणारं आणि समाधान देणारं आहे. एकट्याने, स्वतःच्या मेहनतीने स्वतःचं विश्व निर्माण केल्याचाही तिला खूप आनंद आहे. वेगळीच आत्मनिर्भरता आणि धाडस आलंय, ते जास्ती मोलाचं आहे.
Fit Treat स्टार्टअप
पाककृती, जुनी पारंपरिक गाणी, लोककथा, म्हणी, दागिने, लोकजीवनाचे अनुभव तिच्या संग्रही आहेत. या अनुभवांतून व संग्रहातून काही पुस्तकांची निर्मिती ती करणार आहे. या मालिकेतलं पहिलं पुस्तक तयार झालं असून प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
महाराष्ट्रानंतर तिच्या पुढच्या पुस्तक-मालिका इतर राज्यांचा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि मानववंशशास्त्राच्या अंगाने आढावा घेणाऱ्या असतील.
आपले जुने पदार्थ हे आरोग्यदायी आहेत. हे केवळ सांगून सर्वदूर पोचणार नाहीत तर ते विविध माध्यमांतून पोचवायला हवेत. याच विचारातून तिने ‘FIT TREAT’ हा स्टार्टअप सुरू केलाय. यामध्ये जुने, आरोग्यदायी पदार्थ फिटनेसप्रेमींना पुरवले जातात. शिल्पाकडे अनेक क्षेत्रांतले आणि वेगवेगळ्या कारणांसाठी विशिष्ट डाएटची गरज असणारे क्लायंट्स आहेत. वजन कमी करणं, वाढवणं, काही कारणांसाठी, आजारांसाठी आहार घेणारे, बॉडी बिल्डींग करणारे किंवा अगदी एकटे राहणारे लोकही तिच्या FIT TREAT चे ग्राहक आहेत. प्रत्येक ग्राहकाच्या डाएटच्या आवश्यकतेनुसार ती पदार्थ बनवते. कमी तेल, कमी गोड, कमी मसालेदार पदार्थही सुंदर दिसतात आणि चवीलाही बहारदार लागतात. अगदी कोल्हापुरी चिकन रस्सा किंवा खास मसाल्याच्या भाज्याही आरोग्यदायी पद्धतीने बनवता येतात आणि त्या चवदारही होतात. तिने जे पारंपरिक पदार्थ माहीत करून घेतले, त्यांचा वापर करून, थोडक्यात ‘पारंपरिक शहाणपणा’ वापरून ती पदार्थ बनवून देते.
महा_संस्कृती व्यासपीठ
महा_संस्कृती हे एक असंच अनोखं व्यासपीठही ती उभं करत आहे. महाराष्ट्राची अपरिचित संस्कृती, इतिहास आणि वारसा लोकांपर्यंत नेण्यासाठी वेबसीरीज, प्रकाशनं, कॉफीटेबल बुक, कार्यक्रम अशा विविध माध्यमातून हा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमात इतिहास, संस्कृती, कला यांचे अभ्यासक, संशोधक व उपासक तसेच विविध विषयांतील तज्ज्ञ मंडळींचा समावेश आहे. या उपक्रमाकरिता महाराष्ट्रातील अनेक नावाजलेले उद्योगसमूहदेखील पाठीशी उभे राहिले आहेत. या उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्रातील कोकण विभागापासून झाली आहे आणि या उपक्रमाचा दिमाखदार सोहळा सप्टेंबरमध्ये मुंबई येथे पार पडणार आहे. थोडक्यात, शिल्पाचं काम चौफेर सुरू आहे. आणि अनेक नवीन योजना मनात आहेत.
लहानपणी काही सोलो ट्रॅव्हलर्सची पुस्तकं वाचून आपणही एकटीने भटकंती करायची असं तिने ठरवलं होतं. आपल्या आवडीला आणि आपल्या छंदाला नीट वळण देत तिने एक वेगळं काम सुरू केलं आहे. शिल्पाचा हा प्रवास असाच ‘चवदार’ आणि समृद्ध होत राहो. अनेक सुंदर अनुभवांनी तिची पोतडी भरत राहो अशा शुभेच्छा!
– नीता कुलकर्णी
(संपादिका, अनुवादिका व अभिवाचक म्हणून कार्यरत)
या सदराबद्दल…
या सदरात अशाच काही इंटरेस्टिंग माणसांबद्दल, त्यांच्या पठडीमध्ये न बसणाऱ्या कामांबद्दल जाणून घेणार आहोत. यापैकी काहींविषयी माहिती असेल, पण त्यांच्या कामाविषयी माहिती नसेल, काही व्यक्ती तर अपरिचित असतील.
रोहन शिफारस
हां ये मुमकिन है
प्रसूती कक्षाच्या आत बसलेली कुत्री, शेजारीच पसरलेला बायो-मेडिकल कचऱ्याचा ढीग, दुर्गंधी पसरवणारं स्वच्छतागृह, बाळंत स्त्रियांना टाके घालणाऱ्या तिथल्याच झाडूवाल्या, स्टाफरुममध्ये एकमेकींच्या हातांना मेंदी लावणाऱ्या लेडी डॉक्टर्स… हे दृश्य होतं बिहारमधल्या मोतिहारी जिल्हा रुग्णालयातलं आणि दृश्य बघत होती यात बदल घडवू पाहणारी प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ डॉ. तरु जिंदल ! भ्रष्ट व्यवस्था, निष्क्रिय डॉक्टर्स, कुपोषणासारख्या समस्या अशा अनेक आघाड्यांवर लढत देऊन अविश्वसनीय बदल घडवून आणणाऱ्या एका तरुण डॉक्टरची प्रेरणादायी संघर्षकथा… हां, ये मुमकिन है
₹350.00Add to cart
Mandar Kulkarni
मस्त लिहिलंय. शिल्पाबद्दल खूप नवीन माहिती मिळाली.
Rohan Prakashan
धन्यवाद! वेबसाइटचा आपण जरुर वापर करावा आणि त्यावरील सुविधांचा आनंद घ्यावा…
-टीम रोहन
परेश जयश्री मनोहर
नीता, हे फार भारी प्रकरण आहे. शिल्पा परांडेकर जे काम करताहेत ते अफलातून आहे….त्यांना आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांबद्दल अजून समजून घ्यायला आवडेल. विशेषतः नॉनव्हेज पदार्थांचे संकलन त्यांनी केलेत का आणि त्यात काय अनुभव आलेत तेही समजून घ्यायला हवे….मस्त लिहिलं आहेस
Rohan Prakashan
धन्यवाद परेश! तुम्हाला लेख आवडला याचा आनंद वाटला. नीता कुलकर्णी यांना आपला संदेश आम्ही नक्की कळवू.
मंझिल से बेहतर है रास्ते ही लेख मालिका असून दर महिन्याला एक लेख प्रसिद्ध होईल.. जरुर वाचत रहा.
– टीम रोहन
नीतिन वैद्य.
हे भारीये.. पुस्तकांबद्द्ल उत्सुकता आहे.. नुसत्या वेगवेगळ्या पदार्थांची माहिती नाही तर हे विस्मृतीत जाऊ पहात असलेले संचित आहे . शाहू पाटोळे यांनी त्यांचा विसरावाच असं वाटणारा खाद्यसंस्कृतीचा इतिहास अन्न हे अपूर्णब्रम्ह मधून लिहिलाय , या प्रवासातही असं काही सापडो..
Rohan Prakashan
धन्यवाद सर!
-टीम रोहन
संदीप माटे
डॉ.परांडेकर यांच्या हटके खाद्यप्रवासाबद्दल वाचून आनंद वाटला.रोहन प्रकाशनने अशा हरहुन्नरी लोकांसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला,त्यांचेही अभिनंदन.
Rohan Prakashan
धन्यवाद!
वाचत रहा… आणि शेअर करा!
– टीम रोहन