फॉन्ट साइज वाढवा

डॉ. योगिनी बुधकर आणि डॉ. अश्विनी टिळे (देवरे) या दोघींची आणि त्यांच्या कामाची ओळख झाली ती नाशिकची प्राध्यापक मैत्रीण मृदुलामुळे! या दोघींच्या ‘मीडरी’ला भेट देऊन आल्यावर मृदुलाने आवर्जून फार अभिमानाने त्यांचं कौतुक केलं, तेव्हा मनात पहिला प्रश्न आला की, फार्मसी आणि झूऑलोजी या विषयात पदवी घेतलेल्या या दोन्ही मुलींनी ‘मीडरी’ का उभी केली असेल? मग त्यांच्याविषयी शोधाशोध केली, मृदुलाशी बोलले आणि मग या दोघींशीही बोलले… शिक्षण, नातेवाईक, अनुभव, संशोधन, पॅशन, आव्हानं, अडचणी, यश यांचा या दोघींनी नाशिकजवळच्या सिन्नर येथील ‘सिराना मीडस’ या मिडरीच्या रूपाने जमवला आहे. मधापासून मद्यनिर्मिती, असं थोडक्यात त्यांच्या व्यवसायाचं वर्णन करता येईल. मधमाशीपालन क्षेत्रात ठरलेल्या उद्योगांपेक्षा हा निराळाच उद्योग त्यांनी उभा केला आहे.

त्यांची वेबसाईट पाहिली तर पहिलं वाक्य आहे, ‘We make what we love….’ हे वाचलं आणि या दोघींबरोबरच्या गप्पा किती वळणं घेत रंगणार आहेत, हे लक्षात आलं. आपल्याला जे आवडतं आहे, तेच काम करण्यासाठी- ‘जमेल का’- असं वाटणाऱ्या अनेक गोष्टी प्रयत्नपूर्वक जमवून आणाव्या लागतात, काही कम्फर्ट झोनमधल्या गोष्टी सोडून द्याव्या लागतात, आणि अनेक गोष्टी नव्याने तयारही कराव्या लागतात. या दोघींच्या बाबतीत दोघींची भेट होणं हा एकमेव योगायोग होता, आणि नंतरचा सगळा प्रवास मात्र ठरवून स्वीकारलेली आव्हानं होती.

एकत्र पाहिलेलं स्वप्न

नाशिकमध्ये राहिलेली आणि तिथेच  B. Pharm पदवी घेतलेली अश्विनी, M. Tech आणि  Ph.D Tech बायोप्रोसेस टेकनॉलॉजीमध्ये करण्यासाठी मुंबईला माटुंगा इथे UDCT (आताची ICT) मध्ये गेली, तेव्हाच कदाचित ‘सिराना’चं स्वप्न रुजलं असावं. कारण संशोधनावर मनापासून प्रेम असणाऱ्या मुंबईच्या योगिनीची भेट तिथेच २००७मध्ये झाली, फक्त भेट नव्हे, तर दोघीही आपापलं काम एकाच टेबलवर करत होत्या. प्राणीशास्त्र विषयात मास्टर्स करून योगिनी बायोटेक्नॉलॉजीमध्ये डॉक्टरेट करण्यासाठी तिथेच आली होती. डॉक्टरेट झाल्यावर दोघींचे मार्ग काही दिवसांपुरते वेगळे झाले. अश्विनी पोस्ट-डॉक्टरेटसाठी कॅनडाला गेली होती, तर योगिनीच्या मनात नवीन काही करण्याच्या योजना घोळत होत्या.

अश्विनी आणि योगिनी – एकत्र पाहिलेलं स्वप्न

‘मीड’ची ओळख

कॉलेजमध्ये असल्यापासूनच पर्यावरण आणि मधमाशांच्या अभ्यासात योगिनीला अतिशय रस होता. मधमाशीपालन क्षेत्रात काही वेगळं करण्याची इच्छा होती. त्यामुळे लंडनच्या एका प्राध्यापकांनी तिला जेव्हा ‘मीड’ या पेयाविषयी सांगितलं, तेव्हा तिच्यातली संशोधिका खूश झाली. ही गोष्ट साधारण २०११-१२ची! मध आणि पाणी फर्मेंट करून त्यापासून बनणारं हे पेय! मधुमद्य! बहुतांश लोक त्याला ‘वाईन’च म्हणतात; पण वाईनपेक्षा ते खूप वेगळं असतं. हे ‘हनीमीड’ परदेशांत लोकप्रिय आहे, त्याचं आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्व तिच्या लक्षात आलं. या पेयाला मोठा इतिहास आहे, त्यात मोठी विविधताही आहे.

निराशेचे, हताश होऊन जाण्याचे अनेक क्षण आले. काम पुढे जातंय असं वाटेपर्यंत काहीतरी अडचण येत असे. पण, यावेळी आम्ही दोघींनी एकमेकींना आणि आमचे आई-वडील, नवऱ्यांनी, तसंच माहेर-सासरच्या सगळ्यांनी, मित्रपरिवारानी आम्हा दोघींना प्रचंड धीर दिला, पूर्ण आधार दिला.

आपल्याला काय हवं आहे तो मार्ग योग्य वेळी दिसणं, ही फार महत्त्वाची गोष्ट असते. संधीने दार ठोठवलं तर ते पटकन उघडायलाही अनेकदा धाडस करावं लागतं. योगिनीने ते केलं. तिने घरातच यीस्ट आणि काही मसाल्यांचा वापर करून मधापासून ‘मीड’ तयार केली. मित्रमंडळींना ती आवडली, आणि think bigचा विश्वास मिळाला. पहिली गोष्ट तिने केली, ती म्हणजे ‘मीड’बाबत अधिक बारकाईने संशोधन सुरू केलं आणि दुसरी गोष्ट केली ती थेट कॅनडात असणाऱ्या आपल्या मैत्रिणीला – अश्विनीला फोन केला. तिथलं शिक्षण आणि संशोधन पूर्ण करून स्वतःची फार्मा कंपनी सुरू करण्याचा अश्विनीचा विचार सुरू होता. काही काळ केलेल्या नोकरीचा अनुभव फारसा आनंददायी नव्हता. आता योगिनीने समोर ठेवलेला प्रस्ताव नक्कीच आवडणारा होता. उच्चतांत्रिक शिक्षण आणि संशोधनाचा अस्सल अनुभव या दोन गोष्टींना महत्त्वाची साथ होती, ती कमालीची पॅशन आणि त्यासाठी लागतील ते कष्ट करण्याची! अश्विनी आपलं संशोधनाचं काम आवरून भारतात आली. दोघींनाही त्यांचा ‘तो क्षण’ अचूक सापडला होता. एक लहानसं R&D युनिट २०१५मध्ये त्यांनी सुरू केलं. अभ्यास आणि प्रयोग सुरू झाले. ते यशस्वीही होत होते. झपाटून सुरुवात केलेल्या कामाला उद्योगाचं स्वरूप देण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा किती प्रकारच्या अडचणी येऊ शकतात, याचे धडे मिळायला लागले. अर्थात, हे धडे त्यांच्या कामाचा एक भाग होता. शिक्षण तुम्हाला एक वेगळंच धाडस देतं, परावलंबित्व काढून टाकत, स्वतंत्र बनवतं. योगिनी आणि अश्विनी दोघींनी हा अनुभव घेतला.


१२ व्या शतकातील खाद्यसंस्कृती

आपल्या खाद्यपरंपरेचे महत्त्व आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन सांगणारे, आपल्या जुन्या ग्रंथातील ज्ञान सर्वांपर्यंत पोचवणारे पुस्तक…

खरेदी करा


कायदेशीर बाबी आणि परवानग्यांचा प्रवास

उद्योग सुरू करण्यासाठीच्या कामांची यादी मोठी आणि किचकट होती. अनेक प्रकारच्या परवानग्या मिळवणं, लायसेन्स मिळवणं, त्यासाठी आवश्यक कागदपत्रं जमवणं, वेगवेगळ्या शासकीय खात्यांना भेटून काम करून घेणं ही दमछाक करणारी प्रक्रिया असते. त्या जोडीने महत्त्वाचा प्रश्न होता, तो मध मिळवण्याचा! त्यांच्या उद्योगासाठी काही किलोत नाही, तर काही टनांत त्यांना मध लागणार होता. तो महाराष्ट्रासोबत इतर राज्यांतूनही आणावा लागणार होता; पण मुळात मधापासून मद्यनिर्मितीसाठीच शासकीय परवानगी नव्हती. कारण वाईनच्या व्याख्येत ‘मीड’चा समावेशच नव्हता. त्यासाठी उत्पादनशुल्क मंत्रालयाची परवानगी लागणार होती. परवानगी मिळवण्यासाठी दोघींच्या मनातली कल्पना पटवून देणं आवश्यक होतं. हा उद्योग शेतीला पूरक ठरेल, सस्टेनेबल ठरेल हेही सिद्ध करायला हवं होतं. त्यासाठी मंत्र्यांची  appointment मिळवण्यासाठीच ९ महिने गेले. अश्विनी सांगते, ‘ज्या दिवशी मंत्र्यांची भेट होती, त्यादिवशी, या प्रकल्पात रस असणाऱ्या आणखी दोन मुलांनासुद्धा आम्ही सोबत घेऊन गेलो.‘ह्यामुली काय उद्योग उभारणार’, असं वाटू नये, आमचा मोठा ग्रुप आहे, हे दिसावं म्हणून आम्ही सगळी काळजी घेत होतो. पण प्रत्यक्ष अनुभव सुखद होता. आम्ही दोघी नेमकं काय करणार आहोत, आमच्या भावी योजना काय आहेत, नेमकी अडचण काय आहे, हे सगळं स्वतःच मंत्रीमहोदयांनी (मा. श्री.चंद्रशेखर बावनकुळेसाहेब, महसूलविभाग) विचारून घेतलं. या उद्योगाचं महत्त्व लक्षात घेऊन मधापासून मद्य बनवण्याची परवानगी आम्हाला देण्यात आली. याबाबतचा ‘जीआर’ दोन महिन्यात आला. आता आमची ‘मीडरी’ सुरू होणार होती.’

नवीन आव्हानं आणि जिद्दीचे दिवस

पहिला टप्पा तर सर झाला. पुढचा प्रश्न होता, जागेचा! पुणे ही ‘मीडरी’साठी सोयीची जागा वाटत होती; पण तिथे अनेक महिने शोधूनही हवी तशी जागा मिळाली नाही. अखेरीस दोघींनी नाशिकला जागा घेण्याचा निर्णय घेतला. तिथे अश्विनीचे काही संपर्क होते. ‘या सर्व दिवसांत अनेक निराशेचे, हताश होऊन जाण्याचे क्षण आले. काम पुढे जातंय असं वाटेपर्यंत काहीतरी अडचण येत असे. पण, यावेळी आम्ही दोघींनी एकमेकींना आणि आमचे आई-वडील, नवऱ्यांनी, तसंच माहेर-सासरच्या सगळ्यांनी, मित्रपरिवारानी आम्हा दोघींना प्रचंड धीर दिला, पूर्ण आधार दिला. आम्ही निवडलेल्या रस्त्यावर चालताना हे फार महत्त्वाचं होतं. केवळ त्यामुळेच आम्ही कधीही थांबलो नाही… सतत पुढे चालत राहिलो.’ त्या सांगतात. अश्विनीचं सासर- माहेर नाशिकचं तर योगिनीचं माहेर मुंबई, तिचा नवरा लंडनमध्ये आणि सासर भुवनेश्वरला! अखेरीस जागेच्या दृष्टीने दोघींनी नाशिकमध्ये ‘मीडरी’ उभारायचा निर्णय घेतला. अश्विनीने आपल्या लहान मुलासह आई-वडीलांकडे मुक्काम हलवला. आणि योगिनीच्या मुंबई –नाशिक फेऱ्या सुरू झाल्या. आजच्या उच्च तंत्रज्ञानाच्या काळात ‘जग लहान आहे’, असं म्हंटलं तरी प्रत्यक्षात काम करताना ते किती अवघड असतं, याचा अनुभव या दिवसांत दोघींनी घेतला.


 ‘सिराना’च्या मीडस :

 • मध, पाणी आणि यिस्ट यांच्या अचूक प्रमाणातून मीड बनते. मधातलं नैसर्गिक साखरेचं प्रमाण हळूहळू कमी होत जातं आणि अल्कोहोलचं प्रमाण वाढत जातं. या प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवावं लागतं. स्वच्छतेची फार काळजी घ्यावी लागते.
 • ‘सिराना’च्या मधाला फळांची (फळांचे रस वापरून बनवलेली) किंवा मसाल्यांची जोड देऊन बनणाऱ्या उत्तम चवीच्या ‘मीड्स’ आहेत.
 • जांभूळ आणि डाळिंबाच्या, द्राक्षाच्या चवीच्या मीड्ससोबतच युल स्पाईस ही खास भारतीय मसाले वापरून बनवलेली मीडदेखील लोकांच्या पसंतीला उतरली आहे. (सिरानाची सुरुवातच योगिनीच्या स्वयंपाकघरात मध आणि आलं, दालचिनी, मिरी असे मसाले वापरून केलेल्या प्रयोगातून झाली.)
 • फळांची जोड दिलेल्या मीडस्ना ‘मेलोमेल’ असं म्हणतात.
 • विशेष म्हणजे मेलोमेल साठी लागणारी फळं ५० ते ६० कि.मी. परिसरातल्या शेतकऱ्यांकडून सिराना थेट विकत घेते. ‘Farm to bottle’ हे सिरानाचं ब्रीद आहे.
 • वेगवेगळ्या ठिकाणाहून आणलेला मध आणि फळं यांच्या चवीत फरक असू शकतो.  मधात भेसळ असण्याची शक्यता असते. पण, आपल्या मीडस् च्या दर्जाबद्दल सिराना अत्यंत काटेकोर आहे. त्यामुळे या कच्च्या मालाची गुणवत्ता आधी सिरानाच्या प्रयोगशाळेत आणि नंतर बाहेरच्या प्रयोगशाळेत तपासण्यात येते. ती समाधानकारक आहे, याची खात्री झाल्यावर मगच त्यावर प्रक्रिया सुरू करण्यात येते.
 • उच्च प्रतीचा मध, फळं आणि वाईन बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जातीची द्राक्षं खरेदी करताना सिराना, शेतकरी आणि मधमाशी पालकाचा विचार प्राधान्याने करते.

‘मीडरी’चं काम सुरू झालं, आर्थिक गुंतवणूक बरीच होतीच, पण तरीही एक मोठा निर्णय त्यांनी घेतला, तो म्हणजे, कुणीही तांत्रिक सल्लागार न शोधता सर्व गोष्टी स्वतः लक्ष घालून करून घेण्याचा!  आपल्या शिक्षणाचा उपयोग प्रत्यक्ष कामात करून घेता यायलाच हवा, याबाबत त्या आग्रही होत्या.  फ्लोरिंग वर्क, अत्यावश्यक तांत्रिक गोष्टी, प्लांट आणि मशिनरी उभी करणं, ‘मीडरी’ची रचना, पाईपिंग सगळ्या गोष्टी त्यानी स्वतःच करून घेतल्या. फर्मेंटेशनसाठी tanks तयार करण्यापासून ‘मीड्स’ची MRP ठरवणं, त्याचं लेबलिंग, विक्रीसाठी आवश्यक लायसेन्स सगळ्या गोष्टी त्यांनी पार पाडल्या.  आशिया खंडात, विशेषतः भारतात सर्वाधिक प्रमाणात जी मधमाशी आढळून येते, तिचं नाव आहे –सातेरी– म्हणजेच ‘एपिस सिराना’.  या मधमाशीचं नावच त्यांनी त्यांच्या मीडब्रँडला दिलं– ‘सिराना मीड्स!’ २०१५पासून सुरू असलेला ‘सिराना’चा प्रवास आता प्रत्यक्ष निर्मितीपर्यंत आला तो २०१९मध्ये!

लोकांपर्यत पोचताना

निर्मिती सुरू झाली आणि ठिकठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या वाईन महोत्सवांत दोघींनी भाग घ्यायला सुरुवात केली. ‘मीड’ म्हणजे काय, ती वाईनपेक्षा वेगळी कशी असते, ती कशी प्यायची इथपासून लोकांना त्या माहिती देत.  अल्कोहोलिक पदार्थांची थेट जाहिरात करण्याची परवानगी नसल्याने, असे वाईन फेस्टिव्हल्स हीच त्यांच्यासाठी फार मोठी संधी होती. ती प्रत्येक संधी त्यांनी घेतली.  त्यातून विक्रीचं तंत्र त्यांनी अचूक साधलं.

त्यानंतर अचानक आलेल्या ‘कोव्हिड’ काळात इतर उद्योगांप्रमाणेच काही दिवस ‘सिराना’चं काम ठप्प झालं. पहिले काही दिवस काय करावं हे सुचत नव्हतं; पण गोंधळून शांत बसणाऱ्या दोघीही नाहीत. त्यांनी आपला जनसंपर्क वापरायला सुरुवात केली. अनेकांशी बोलत होत्या. आणि त्यातूनच एक मार्ग दिसला. कृषीखात्याशी फोनवरूनच त्यांनी संपर्क साधला. मध आणि काही फळांपासून आपल्या ‘मीडस’ बनतात त्यामुळे हा कृषीपूरक व्यवसाय आहे, यात शेतकऱ्यांचाही फायदा आहे, हे त्यांनी पटवून दिलं आणि कोव्हिडसंबंधी सर्व काळजी घेऊन व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी मिळवली. त्यांच्या ‘मीडस’ची online विक्री सुरू झाली.


दृष्टिक्षेपात सिराना

 • सिन्नर येथे सिराना मीड्स-निर्मिती सेटअप.
 • पाच हजार लिटर क्षमतेचा एक आणि प्रत्येकी दोन हजार लिटर क्षमतेचे दोन, असे फर्मेंटेशन tanks, मिक्सिंग मशिनरी, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, क्वालिटी कंट्रोल, पृथक्करण यासाठी प्रयोगशाळा.
 • शुद्धीकरण, फिल्ट्रेशन, स्टॅबिलायझेशन, क्लॅरिफिकेशन, कार्बोनेशन, बॉटलिंग, फिजिकल इन्स्पेक्शन ते पॅकेजिंग या टप्प्यांतून मीड बनते. त्या दृष्टीने आवश्यक तो सर्व सेट अप.
 • प्रोसेससिंग दरम्यान तयार झालेल्या सांडपाण्याचा निचरा करण्यासाठीचा प्लांट (इटीपीप्लांट),  चिलिंग युनिट, बॉटल सिलिंग मशिनरी, RO प्लांट.

या दोघींशी बोलत असताना त्यांची जिद्द, त्यांचा कामाचा ध्यास, आणि आपल्या कामाप्रती असणारी सिन्सयारीटी या गोष्टी जितक्या लक्षात येत होत्या, तशीच आणखी एक गोष्ट लक्षात येत होती, ती म्हणजे शिक्षणाचं महत्त्व! शिक्षण तुम्हाला किती स्वावलंबी बनवतं, धाडस देतं,  कितीही कठीण वाटणाऱ्या स्वतःच्या स्वप्नाचं महत्त्व नातेवाईकांना, लोकांना पटवून देण्याचं बळ देतं. कायदेशीर लढाया, परवानग्या मिळवण्यासाठी शासकीय व्यवस्थेशी सतत झुंजणं, टीम तयार करणं आणि आपलं स्वप्न त्यांच्याही मनात रुजवणं, आपल्या कामाचा दर्जा सतत टिकवणं या गोष्टी खरोखरच दमवून टाकणाऱ्या असतात. शारीरिक आणि मानसिकही. पण, त्यातूनही सर्जक आनंद मिळत असतो. सुंदर रंगाच्या, आकर्षक बाटल्यांतल्या सिरानाच्या मीडस् बघताना अश्विनी आणि योगिनीचा तो आनंद काय असेल, हे लगेच लक्षात येतं. अनेक कष्ट आणि चित्र-विचित्र अडचणी झेलल्यावर, एखादी गोष्ट करण्याची तीव्र इच्छा असेल, तर ‘पुरी कायनात’ ती गोष्ट तुम्हाला मिळवून द्यायला मदत करतेच, हे वाक्य मग फक्त फिल्मी उरत नाही.

तुमची पॅशन तुम्हाला गप्प, शांत बसूच देत नाही. जे करायचं आहे ते मनापासून, ध्यास घेऊन आणि काहीही अडचणी आल्या तरी काम सोडायचं नाही, ही गोष्ट या दोघींनी कटाक्षाने पाळली. त्या दोघीही ‘सिराना’ची गोष्ट सांगताना म्हणतात, “Every great love has a story behind it. आमच्या या प्रेमकथेत आम्ही आमच्या अनेक स्वप्नांचा आणि आवडींचा मिलाफ साधला आहे.” ‘सिराना’ हा खरोखरच स्वप्नं आणि कष्टांचा ‘blend’ आहे.

– नीता कुलकर्णी


रोहन प्राइम

वाचकांसाठी एक खास सभासद योजना!

‘रोहन प्राइम’ म्हणजे भरघोस सवलती, विशेष कार्यक्रम आणि नाविन्यपूर्ण उपक्रम… फक्त सभासदांसाठी! मेंबरशिप घेतल्यावर रु.१००चे कूपन भेट…. हक्काची २५ टक्के सवलत आणि बरंच काही…

अधिक माहिती जाणून घ्या..

250.00Add to cart


Shipla Parandekar

या सदरातील लेख…

खाद्यसंस्कृतीची संशोधिका : शिल्पा परांडेकर

महाराष्ट्रातल्या ५०० गावांचा प्रवास एकटीने करून शिल्पाने विस्मृतीत गेलेले, जाऊ पाहणारे शेकडो पदार्थ आणि त्यांच्या कृती समजून घेऊन त्यांची नोंद केली आहे.

लेख वाचा…


मल्हार इंदुरकर – नदीमित्र

मल्हार हा मूळ चिपळूणचा! तिथलाच रहिवासी. त्याच्या घरामागे वशिष्ठी नदी वाहाते. त्यामुळे पाण्याची ओढ त्याला जन्मजात आहे….

लेख वाचा…


Comments(6)

  • हेमंतकुमार चोप्रा

  • 3 years ago

  रोहनची पुस्तके नेहमीच विशेष असतात, वाचकांसाठी असलेल्या योजनांची माहिती घ्यायला आवडेल

  • मृणाल लिमये

  • 3 years ago

  क्या बात है… ??

  • सुजाता भिडे

  • 3 years ago

  अप्रतिम लेख, नीता कुलकर्णी. नवनवीन वाटांवर चालणाऱ्या लोकांविषयीची रंजक माहिती वाचताना नक्कीच खूप प्रेरित वाटतं.

  • Mrunal Limaye

  • 3 years ago

  झक्कास… ??ही सिरीज आवडतेय.

  • सुनील चव्हाण

  • 3 years ago

  Nice article

  • अभिजित वझे

  • 3 years ago

  वाह !! निरगाठ, उकल वगैरे ह्या तंत्रात एकदम छान लिहिलंय. विषय सुद्धा थोडा जिव्हाळ्याचा आहे , त्यामुळे आपसुख संपूर्ण वाचला गेला, आणि मी तर ठरवलंय ह्या उपक्रमाला शक्य तितका हातभार लावणार ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *