फॉन्ट साइज वाढवा

मला गावांची जशी ओढ वाटते, तसं मला शहरांचंही प्रचंड आकर्षण आहे. या शहरांना स्वतःवरती एक वेगळाच नाज आसतो. चेन्नई बऱ्यापैकी बघून झालं होतं, ते आकळलं होतं अशातला भाग नव्हता, पण अपरिचित व्यक्तीशी पहिली ओळख झाल्यावर निघताना ते दोघे एकमेकांत उरतात तसं ते माझ्यात उरलं. वर्तमानातील शहर पाहिलं उद्या इतिहासातलं शहर मी पाहणार होतो- ‘महाबलीपुरम’!

चेन्नईहून पहाटे ‘अड्यार’ बस स्टॉपला गेलो. सहाच्या दरम्यान मला महाबलीपुरमची बस मिळाली. इथे त्याला मल्लमापुरमही म्हणतात. दीड तासाचा हा अविस्मरणीय रस्ता आहे. ECR (East Coast Road) असं त्या महामार्गाला म्हणतात. मी मुद्दामून सांगीन की पहाटेच या रोडवरून सफर करा, जी मी ठरवून करत होतो. का? कारण हा रस्ता समुद्राला समांतर आहे, तुम्ही आत्ताही मॅपमध्ये हा रस्ता बघितलात तरी तो सरळच्या सरळ तुम्हाला दिसेल, तशा रस्त्यावर तुमची बस/गाडी/बाईक ट्रॅफिक अजिबात नसल्यामुळे सुसाट सुटते आणि डावीकडे समुद्रातून सूर्यमहाराजांना हळूहळू जाग येते. हे फारच विलक्षण आहे यावर तुम्ही विश्वास ठेवा. असा प्रवास अनुभवत मी आठपर्यंत ५५ किमीवर असलेल्या महाबलीपुरमला पोहोचलो. इथे राहायचा बेत नव्हता. एकदोन ठिकाणी मी माझी बॅकपॅक ठेऊन मोकळ्या हातांनी आणि खांद्यांनी भटकता येतंय का याचा प्रयत्न केला, परंतु भाषा मर्यादेमुळे ते ओझं माझ्या खांद्यावरच राहिलं.

इथे बघण्याची तीन ठिकाणं आहेत- सी-शोअर टेम्पल, पंच रथ आणि केव्ह टेम्पल्स. पण हे बघायला आपल्याकडे संपूर्ण दिवस हवा. सातव्या शतकात बांधलेली ही द्रविड पद्धतीची वास्तुशिल्पं आहेत. त्या काळी ही पल्लव राजांची राजधानी होती. आज हे ठिकाण युनोस्कोच्या वर्ल्ड हेरीटेजमध्ये समाविष्ट आहेत. ही सगळी ठिकाणं सरकारी वेळेनुसार उघडण्याच्या वेळेतच मी नेमका पोहोचल्यामुळे मला गर्दी मिळाली नाही. तिथेच गाडीवर वाफाळलेल्या गुबगुबीत पाच इडल्या चापल्या आणि खांद्यावरच्या बॅगेचे वजन विसरण्याचा प्रयत्न करत मी फिरायला सुरुवात केली.

सर्वप्रथम जावे सी-शोअर टेम्पलला. या सगळ्या ठिकाणी या वास्तूंना टेम्पल जरी म्हटलं तरी यातलं कुठलंच ठिकाण मंदिर नाही. याचं कारण म्हणजे ते बनवताना जरी मंदिर म्हणूनच बनवायला सुरुवात झाली असली, तरी मंदिर पूर्ण होण्याकरिता काही गोष्टी अपेक्षित असतात त्या अपूर्ण राहिल्यामुळे यांना तो दैवी वास्तूचा दर्जा देता आला नाही. त्यामुळे लोक इथे पादत्राणं घालून बिनधास्त आत-बाहेर वावरताना दिसतात. समुद्र किनाऱ्यावरची वास्तू म्हणून सी-शोअर टेम्पल. या मंदिराच्या आवारात तो प्रसिद्ध महाबलीपुरम डान्स फेस्टिवल भरतो, मी गेलो तेव्हा तो सुरू होता.

इथून मला जायचं होतं पंच रथ बघायला. रिक्षावाल्यांची अवाजवी मागणी धुडकावून मी सरळ दीड किमी चालत हे ठिकाण गाठलं. मध्ये चालताना मला एक वृद्ध चिनी जोडपं भेटलं, त्यांना एक स्थानिक फळ विक्रेत्यानं ती फळं घेण्यावरून भंडावून सोडलं होतं, त्यांचं त्याच्यापासून एक भारतीय या नात्यानं संरक्षण केलं, बहुधा त्यांनी मला चिनी भाषेतून दुवा दिल्याही असाव्यात. या पंचरथाच्या ठिकाणी मात्र जिथे बाहेर तुम्हाला तपासलं जातं तिथे मला बॅग तपासण्यासाठी उघडायला सांगितली. त्या पोलिसांना मी त्याहून सोपा मार्ग सांगितला, म्हटलं ही भलीमोठी बॅग तुम्ही तपासणार त्यापेक्षा मी ती इथेच ठेवतो, फिरून येतो, निघताना घेऊन जातो. त्यांनाही त्यांचा त्रास वाचवल्याचा आनंद झाला, मला दीड किमी चालल्यानंतर बॅग खांद्यावरून उतरल्याचा आनंद झाला. इथे पाच पांडवांचे चार आणि एक द्रौपदीचा रथ दगडांत कोरलेला आहे, लोकांना ही त्यांची मंदिरं वाटतात, तसं ते नाहीये. युधिष्ठिर, अर्जुन, भीम, द्रौपदी यांना एक-एक अलिशान रथ दिला गेलाय, नुकुल-सहदेव मात्र एकात ऍडजस्ट करतायत. नेहमी या दोघांवर अन्याय का होतो? महाभारतापासून त्यांना योग्य ते फुटेज मिळालं नाही असं का कुणास ठाऊक मला सारखं वाटत आलंय. इथे एक सुंदर कोरलेला हत्ती आहे, तो मला फार आवडला, त्याला टेकून मग फोटोच काढला. तिथे एक-दीड तास छान जातो.

पंचरथ पाहिल्यानंतर बाहेरची बॅग पुन्हा घेतली, कर्मचाऱ्यांचे आभार मानले. आता गुहांतील मंदिरांचा समूह आहे तो बघायचा होता. इथे कुटुंबांसोबत, वेगवेगळ्या परदेशी ग्रुप्ससोबत गाइड्स असतात. एकट्याला त्यांना हायर कारणं परवडत नाही (कुणाला परवडत असेल तर माझी काही हरकत नाही). तेव्हा सरळ न लाजता अशा कुटुंबात, परदेशी समूहात मिसळून जावं हा या समस्येवर उत्तम उपाय असतो. जर कुणी तिरप्या नजरेनं बघितलं तर थोडा वेळ वेगळी मूर्ती न्याहाळावी आणि नंतर चार सेकंदांनी पुन्हा त्या माहितीकडे कान आणि मन देऊन सारं श्रवण करावं, फार फार तर निघताना त्यांना मनोभावे शुभेच्छा द्याव्यात. यात कसलीही लाज आहे असं मला वाटत नाही. आणि अशी लाज किंवा भीती ज्याला वाटते तो कधीही असा प्रवास करू धजणार नाही. ही माहिती ऐकणं गरजेचं का आहे? हे ती ऐकल्यानंतर कळतं. त्या मूर्तींमध्ये, शिल्पांमध्ये सूक्ष्म बारकावे असतात, अनेक कथा असतात ज्या आपल्या नंग्या डोळ्यांना दिसत नाहीत, कळत नाहीत. त्यासाठी सोबत माहीतगार असावा लागतो. त्याच्या ज्ञानातून माहितीचं दालन खुलं होतं आणि आपल्या नजरेची दृष्टी होते. हा बराच मोठा पट्टा आहे.

इथे खाली-खाली आलं की ‘कृष्णाज बटर बॉल’ नावाचा एक अफाट प्रकार आहे. लहानशा टेकडीच्या उतरंडीवर एक भला मोठा खडक दोन वीत जागेवर अधांतर उभा आहे. हे खरंच आश्चर्य आहे. माझ्या फोटोंत तुम्हाला तो बघता येईल. बाहेर पडताना अर्जुन पेनेंस नावाचं एक शिल्प आहे. व्हेल माशाच्या पाठीसारखा हा खडक २७ मीटर लांब आणि ९ मीटर उंच. यावर शेकडो शिल्प कोरली आहेत. अर्जुनाची यात कथा आहे. हत्तीची भलीमोठी शिल्पं आहेत. हा प्रकार तुमचे डोळे दिपवून टाकतो. या संपूर्ण शिल्पाकृतीसमोर मधे कुणी न येता आपला एक फोटो यावा असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. मलाही तसं वाटलं. मी एका फॉरेनरच्या हातात मोबाइल देऊन अक्षरशः जमेल तितक्या नम्रतेने फ्रेममध्ये येणाऱ्या लोकांना बाजूला केलं आणि फोटो काढून घेतला. या सोलो प्रवासात सेल्फी व्यतिरिक्त इतरांकडून स्वतःचे फोटो काढून घ्यायला एक विनंती कौशल्य लागतं, ते मला आता चांगलंच अवगत झालंय असं म्हणायला हरकत नाही. छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला प्रवास शिकवतो.

या शेवटच्या ठिकाणच्या एका एकांत गुहेत मी विसावलो, केसावरून पाणी ओतलं, थंड झालो. बॅग ठेवून थोडी विश्रांती घेतली आणि त्या वर्षी एका वर्तमनपत्रातून सुरू असलेल्या ‘प्रिय प्रिय’ सदरातील शेवटचा ‘पसायदान’ हा लेख याठिकाणी पूर्ण केला, संपादकांना पाठवला. तुम्हाला गंमत वाटेल. हे सदर ‘स्वीकारलं आहे’ याचा फोन त्या मागच्यावर्षी मी बदामीला असताना आला होता आणि वर्ष संपताना पुन्हा एकदा सोलो ट्रीपवर असतानाच मी या सदराला पूर्णविराम देत होतो. प्रवास ही कुणी व्यक्ती नाही, परंतु ती अनेक गोष्टींची माणसासारखी साक्षीदार होत असते असा माझा अनुभव आहे. महाबलीपुरम हे तामिळनाडूला नाही तर संपूर्ण भारताला पडलेलं सुंदर स्वप्न आहे. ते मी संपूर्ण दिवस जगलो होतो. बसमध्ये चढताना खांद्यावरच्या बॅगेचं वजन थोडं अधिक जाणवलं, बहुधा त्यात आठवणींचा समावेश झाला असावा.

चेन्नई हे वर्तमानातील शहर आणि महाबलीपुरम हे इतिहासातलं शहर एका रात्रीच्या फरकाने मी बघत होतो. महाबलीपुरम आणि चेन्नई दोघांत ५५ किमीचं अंतर, नव्हे नव्हे दोघांत शेकडो वर्षांचं अंतर आहे. पृथ्वी ज्या समग्रतेने स्वतःभोवती आणि सूर्याभोवती युगानुयुगे फिरतीये, त्या दृष्टीने हे अंतर काही क्षणांचही नाही, पण माणूस नावाच्या टिंबाचा विचार केला, तर हा पट्टा मोठा आहे. ECR वरून जेव्हा तुम्ही प्रवास करता, तेव्हा जो डाव्या बाजूला पहाटे सूर्य उगवतो, जो समुद्र खळाळतो, तो तेव्हाही होता, आत्ताही आहे आणि आणखीन काही वर्षांनी जर हे जग सारं मानवाच्या अपेक्षांना छेद देत सुरळीत सुरू राहिलं, तर नक्कीच त्या काळातही माणसांना हे सारं तिथेच दिसेल.

लौकिक सोयीसुविधा, लोकसंख्या या घटकांवर आपण सगळी वर्गीकरण करत राहतो. हजारो वर्षांनी महाबलीपुरम नावाचं शहर जे त्या काळातल्या एका राज्याची राजधानी होतं, ते काळाने ५५ किमी मागे सरकलं. या विचाराला तसं म्हटलं तर अर्थ आहे आणि नाहीसुद्धा. पृथ्वीचा प्रवास सुरू आहे, आपला तिच्या निमित्ताने होतोच आहे, परंतु तरीही ही बदलणारी शहरं बघायला, गावं-खेडी अनुभवायला आपण बाहेर पडलं पाहिजे, नाहीतर चेन्नई-महाबलीपुरम किंवा न्यूयॉर्क-सिडनी सगळं सारखंच. या शहरांच्या असण्याचं आपण साक्षीदार झालं पाहिजे, त्यांचं दिसणं आपण सेलिब्रेट केलं पाहिजे….

– आदित्य दवणे

या सदरातील लेख…

‘गोकर्ण’: एक अस्पर्शित जादूनगरी! (एकला ‘सोलो’रे)

अचानक एका मैत्रिणीनं येऊन विचारलं, ‘You coming to Paradise beach?’ या बीचचं नावच मी पहिल्यांदाच ऐकलं…

लेख वाचा…


माणुसकीचे त्यांचे चेहरे!

– कर्नाटकातल्या छोट्याशा गावात एका शाळेच्या सहलीत मी ‘पोरा सम पोर’ होऊन मिसळून गेलो. बदामीला जायचं होतंच, पण मी अनभिज्ञ असलेलं ‘महाकुट मंदिर’ याच सहलीमुळे बघता आलं.

लेख वाचा…


जान है तो जहान है! (कलगा-पुलगा-तुलगा)

– मी त्या नदीवरील पुलावरती मांडी घालून दुखावलेला हात दुसऱ्या हातात घेऊन बसून राहिलो. हा हात मध्ये नसता, तर त्याच्यामागे पोट होतं! 

लेख वाचा…


अनेगुंडी : एक अद्वितीय सफर!

-त्या खडकांवरील अनघड चित्रांवरून हात फिरवताना मला अबोल-सर्जनशील पूर्वजांना स्पर्श केल्याचा भास झाला, पण त्यापूर्वीचा प्रवास म्हणजे एक दिव्य होतं! 

लेख वाचा…


बद्रीनाथ : एक नियोजित बुलावा

-थंडी कडाडून वाढली आणि मंदिराशेजारील गरम पाण्याच्या कुंडांनी आम्हाला हाक दिली. दोघांचे डोळे एकमेकांकडे बघताना लकाकले. 

लेख वाचा…


आचवलांचा फॉर्म्युला आणि वेरूळ-कैलास!

-मंदिराच्या चारही बाजूंनी असणाऱ्या गुहांत भरताचे राज्यारोहण, कृष्णजन्म आणि असे अनेक पौराणिक प्रसंग रेखाटलेले आहेत. जे आपण बघताना, समजून घेताना इतके गुंगून जातो की आपलेच नकळत शिल्प होते, भान हरवते! 

लेख वाचा…



एका बोअरिंग प्रवासाची इंटरेस्टिंग कथा!

-श्री अरविंदांच्या समाधी दर्शनासाठी गेलो आणि गेल्या दोन दिवसांच्या कंटाळ्याचा क्षण एका क्षणात नाहीसा झाला. 

लेख वाचा…




गोकर्ण-उडपी एक ‘गीत-प्रवास’!

-कुडले बीचवर मी लग्नाआधी साजरा केल्या जाणाऱ्या हळदी समारंभाची माहिती गुगलवर शोधत बसलो. 

लेख वाचा…



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *