फॉन्ट साइज वाढवा

आयुष्यभर एकमेकांशी वैर, रुसवे-फुगवे धरून बसणाऱ्या माणसांची मला कमाल वाटते. त्यांना आतून नक्की काय रोखत असतं, काय मागे धरून ठेवतं याची उत्सुकता वाटते. अजिबात प्रवास न करणारी अनेक माणसं बुद्धीनं कायम खुजी आणि स्थानिक राहिलेली मी पहिली आहेत. त्यांचे छोटे-छोटे प्रश्नही ते उगीच विशाल करतात आणि ते सर करण्यात त्यांची जिंदगी निघून जाते. सोलो किंवा कुठलाही डोळसपणे केलेला प्रवास आपली दृष्टी व्यापक करतो, म्हणून प्रवास महत्त्वाचा आहे. 

मात्र सोलो प्रवास तुम्हाला माणसांची खरी किंमत पटवून देतो. एखादा आत्ता आपल्या सोबत हसत-खेळत होता, ते स्टेशन मागे पडलं आणि तो आता आपल्या सोबत नाहीये, किंबहुना भविष्यात कधी असेल, दिसेल याचीही शक्यता नगण्य… तेव्हा जोपर्यंत तो सोबत असेल, आपल्या तनामनाला इजा पोचत नसेल, तर तो जसा आहे त्याच्याशी जुळवून आनंद घ्यावा, गोष्टी खटकल्या, नाही पटल्या तर त्या तेवढ्यापुरता मानून सोडून द्याव्या आणि आयुष्यात पुढे जावं, हे तत्त्वज्ञान हा एकट्यानं केलेला प्रवास शिकवत राहतो. अर्थात सोलो भटकंतीत भेटणारी माणसं आणि आयुष्यात कायम सोबत करणारी माणसं त्यांच्या आपल्या सोबतच्या असण्यात मोठा फरक आहे, पण तरीसुद्धा हा असा प्रवास- घरात, कार्यालयात, समाजात भेटणाऱ्या माणसांसह बांधलेली हीसुद्धा अशाश्वताची गाठ आहे, तेव्हा ‘सोडून दे, दुखवू नकोस, पुढे जा…’ हे आतल्याआत सुचवत राहतो. 

वर मी म्हटलं खरं की सोलो भटकंतीत एकदा भेटलेला माणूस परत भेटेल, दिसेल याची शक्यता नगण्य असते, पण एकदा हंपीला भेटलेला प्रदीप मला ऋषिकेशला पुन्हा भेटल्याचा माझा इतिहास आहे. त्याचं झालं असं, की मी हंपी गावाच्या पलीकडे असणाऱ्या हिप्पी आयलंडवर राहायला गेलो असता, त्या ठिकाणी एक प्रायव्हेट (एका व्यक्तीपुरता) तंबू दोन दिवसांसाठी घेऊन राहिलो होतो. तिथेच संध्याकाळी प्रदीप भेटला. हा मूळचा ऋषिकेशचाच, व्यवसायाने आचारी! महिना डिसेंबरचा असल्यामुळे या काळात ऋषिकेशला प्रवाशांची मंदी असते, तेव्हा हे आचारी जिथे चलती असते, तिथे चार-पाच महिने काम करून पुन्हा स्वतःच्या गावी परततात. स्वतःच पोट भरण्याकरिता या आचाऱ्यांना इतकी दगदग दरवर्षी करावीच लागते, याला पर्याय नसतो. तसाच फिरण्याकरिता नव्हे तर पोटाकरिता आलेल्या प्रदीपशी बोलता-बोलता त्याच्याशी माझी तार जुळली आणि हा मित्र झाला. मी जिथे तंबू ठोकून राहिलो होतो, तिथेच त्याला अचाऱ्यांच्या खोलीत एक चादर-उशी त्या रात्री पुरता मिळाली होती. दोन दिवसांत तो काम शोधायला सुरुवात करणार होता. ही वर उल्लेख केलेली आचाऱ्यांच्या भटकंतीची सिस्टीम मी याच्याच कडून समजून घेतली, त्यानं ती तक्रारीचा त मला जाणवू न देता ‘भाई करना पडता है!’ म्हणत सांगितली, मी आश्चर्यचकित होत गेलो. 

दुसऱ्या दिवशी माझ्या नियोजनानुसार मी सायकल रेंट करून दिवसभर हुंदडलो. पण त्या दिवसाचा प्रवास सुरू करताना मला एका पाऊलवाटेवर प्रदीप भेटला. मी त्याला ‘कहासे?’ असं विचारताच त्यानं तिथे एका टेकडीवर असणाऱ्या हनुमानाच्या मंदिराविषयी सांगितलं. हे ठिकाण हनुमानाचं जन्मस्थान मानतात. हा पहाटे तिथे जाऊन आत्ता परतत होता. हनुमान आपला एकदम फेवरेट देव, अगदी लहानपणापासून माझा त्याच्याशी कनेक्ट, जणू आवडता सुपरहिरो, तेव्हा संध्याकाळी आपण तिथे जाऊ हे ठरवलं आणि प्रवास सुरू केला. प्रदीपमुळे हे ठिकाण कळलं. संध्याकाळी चारच्या सुमारास सायकल खाली पार्क करून टेकडीवर चालत पोचलो. साडेसहापर्यंत तिथून अविस्मणीय असा सूर्यास्त पहिला आणि राहण्याच्या ठिकाणी परतलो. का कुणास ठाऊक मला सूर्यास्त पाहायला आवडतात, मग ते टेकडीवरनं असो की समुद्रकिनऱ्यावरनं…

तर मी तंबूत परतलो, प्रदीप भेटला आणि आम्ही दोघं रात्रीचं जेवण करण्याकरिता बाहेर पडलो. या वेळी प्रदीप हा माणूस म्हणून किती मजेशीर आहे ते मला आकळू लागलं. इथे हंपीच्या या बाजूला इराणी तरुण-तरुणी अनेक दिसतात. ते भारतात येतात, चांगले तीन-चार महिने, काही एक वर्ष राहण्यासाठी. आल्यानंतर हे भारतभर फिरतात, आनंद उपभोगतात आणि पुन्हा मायदेशी मार्गस्थ होतात. यातले काही फिरताना अर्थातच ऋषिकेशला केव्हा न केव्हा जाऊन, राहून आलेले असतात. इथे जेवणासाठी आम्ही जे हॉटेल निवडलं तिथे काही तरुणी होत्या त्यांच्याशी प्रदीप त्याच्या मजेशीर इंग्रजीमध्ये संभाषण करू लागला. त्यासुद्धा तितक्याच त्याच्याशी फ्रँक झाल्या, कारण ऋषिकेशमध्ये या त्याच्याच हॉटेलमध्ये राहिल्या होत्या. मी ती सगळी गंमत माझ्या नजरेतून टिपत होतो. प्रदीपचं त्यांच्या जवळ जाऊनही जवळ न जाणं मोठं गमतीशीर होतं. त्याचा आनंद देऊन-घेऊन झाल्यानंतर जेव्हा तो टेबलवर परतला तेव्हा त्यानं मला या मुलींच्या ऋषिकेश मधल्या गमती ऐकवल्या, त्यांच्या मूर्खपणाचे किस्सेच त्यात अधिक होते. मीसुद्धा ते मजा घेत ऐकत राहिलो. आता उद्या प्रदीप पहाटेच उठून निघून जाणार होता. मी एक दिवस आणखीन तिथे राहणार होतो. अखेर प्रदीपला निरोपाची मिठी मारली आणि ऋषिकेशला त्याचं हॉटेल विचारून, त्याचा नंबर घेऊन आम्ही आपापल्या ठिकाणी झोपायला गेलो. सकाळी प्रदीप निघून गेला होता. 

प्रवासातल्या माणसांविषयी सांगतोय, तेव्हा याच प्रवासात इथल्या अश्मयुगीन चित्र असणाऱ्या अनेगुंडी केव्हमध्ये घुसखोरी करण्यासाठी मिळालेली एका जर्मन मित्राची साथ मी याआधीच्या लेखात लिहिली आहे. आपण ती जरूर वाचा. हंपीनंतर मध्ये काही ट्रिप्स झाल्या, आणि दोन-एक वर्षांनी मी ऋषिकेशला गेलो. इथेही रिव्हर राफ्टिंग करताना माझा एक क्षणिक ग्रुप झाला होता. पण या सगळ्या प्रवासात प्रदीप माझ्या लक्षात होता. त्याचा नंबर माझ्याकडे सेव्ह होता. हल्ली काही जण वर्षभरात छंद लागल्या प्रमाणे मोबाईलचे नंबर बदलतात, तेव्हा प्रदीपने गेल्या दोन वर्षांत तो बदलला असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. तेव्हा प्रयत्न करून बघू म्हणत मी त्याला फोन लावला आणि अहो आश्चर्यम् त्याला तो लागला आणि त्याहून महत्त्वाचं त्यानं तो उचलला. मी माणसं लक्षात ठेवतो, तेव्हा माझ्या तो लक्षात असणं साहजिक होतं, पण त्याला थोडे संदर्भ दिल्यानंतर त्यालाही मी आठवलो. ऋषिकेश एक वेगळी अनुभूती देणारं गाव आहे. इथे यावं, निवांत एखाद्या मठात किंवा हॉस्टेलमध्ये राहावं, फिरावं, अध्यात्माच्या बाता कराव्यात, राफ्टिंग मध्ये स्वतःला धुऊन काढावं, गंगेत इतरांच्या पापांत स्वतःची काही असतील तर पापं मिसळून शुद्ध व्हावं, मित्र करावेत, लक्ष्मण-राम झुल्यावरून चालण्याची मजा घ्यावी, नदीकाठी बसावं, गांगामैयाची आरती अनुभवावी, हवं तर इथे-तिथे भटकून यावं आणि मस्त होऊन घरी परतावं. मी हे सारं केलं. आणि यातच प्रदीपने दिलेल्या त्याच्या कॅफेचा पत्ता हुडकून त्याच्या पायरीशी पोचलो. 

वरती प्रामाणिकपणे कामं करणारा प्रदीप ती सोडून मला भेटायला आला. त्यानं आपुलकीनं मला त्याच्या कॅफेत बसवलं, काचेच्या ग्लासमध्ये चहा पाजला, अधिक आदर दर्शवताना व्हीड ऑफर केली, त्याला मी नाही म्हटलं तेव्हा तो म्हणाला, ‘आपने अबतक शुरू नही की? हंपीमें भी आपने मना किया था…!’ यावर मी फक्त हसलो, तोसुद्धा मनापासून हसला. आमच्या गप्पा झाल्या, तो अधेमध्ये कॅफेमध्ये येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना अटेंड करत होता, त्याची तीही लगबग मी बघत होतो. हंपीमध्ये भेटलेला हा आणि आताचा हा, माणूस एक असला तरी त्याच्यात फरक बराच होता, चांगला होता, दोन वर्षांत या तेवीस-चोवीस वर्षाच्या प्रदीपला बहुदा अनेक बरेवाईट अनुभव आले असावेत असा कयास मी मनात बांधला जो नंतरच्या गप्पांमधून खरा ठरला. लोक अपार कष्ट करतात, जीवनाशी झगडतात, पण हार मानत नाहीत, हे माणसाचं वैशिष्ट्य मला विलक्षण वाटतं. मी आता निघणं अपेक्षित होतं. हॉस्टेलवर माझा नवा मित्र माझी वाट बघत होता. तेव्हा प्रदीपला पुन्हा एकदा अलविदा करताना, ‘फिर मिलेंगे चलते चलते’ असा डायलॉग मारला आणि दुसऱ्यांदा निरोपाची मिठी मारून बाहेर पडलो. इजा-बिजा झाला आता भेटीचा तिजा कुठल्या गावात होतो हे बघायचं. 

या सदरतला हा समारोपाचा लेख! भेट दिलेल्या ठिकाणांविषयी लिहिताना, आता त्या तिथे भेटलेल्या माणसांविषयी लिहिण्यापर्यंत हा लेखन प्रवास येऊन पोचला. मी जवळ-जवळ प्रत्येक लेखात तिथलं प्रवास वर्णन लिहिताना सोबतच्या माणसांविषयी काहीतरी लिहिलं आहेच. त्यापैकी आज आत्ता या घडीला, पत्तदकलला भेटलेले शाळेचे शिक्षक आठवतात ज्यांनी मला त्याच्या शाळेच्या सगळी सोबत बस सफर घडवली, पहाटे साडेचारच्या सुमारास बदामी बस स्टँडवर सोडणारा चहावाला आठवतो, मला ऋषेकेशमध्ये भेटलेला भालचंद्र उर्फ भालू आठवतो जो विसाव्या वर्षी भारतभ्रमण करायला निघाला होता, मला सुकृती, आनंद, सुरभी सगळे – सगळे पुन्हा आठवतात, पुन्हा पुन्हा आठवतात. मला असं फार मनापासून वाटतं की सोलो मुशाफिरीविषयी लिहिणं म्हणजेच माणसांविषयी लिहिणं आहे, कारण त्यांच्याशिवाय ती पूर्ण होऊच शकत नाही. 

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, या क्षणिक भेटणाऱ्या माणसांमुळे नंतर जीवनात सलग सोबत असणाऱ्या माणसांचं मोल कळतं. प्रवासातील माणसं एक दिवस भेटून मार्गस्थ होत असतील तर बकीची जरा अधिक दिवस, वर्षं सोबत राहतात, पण त्यांनाही आणि आपल्यालाही ती अनिवार्य ताटातूट कधी ना कधी सहन करावीच लागणार असते. मग कसले रुसवे-फुगवे, राग-लोभ धरून बसायचे? प्रश्न मोठेच असतील तर त्यांची गाठ डोळ्यांत तेल घालून सोडवावी, नसतील तर ‘बिग डील…’ म्हणून, सगळं सोडून सरळ प्रवासामध्ये प्रवाही व्हावं…! नाही का…!!

  • आदित्य दवणे

या सदरातील लेख…

‘गोकर्ण’: एक अस्पर्शित जादूनगरी! (एकला ‘सोलो’रे)

अचानक एका मैत्रिणीनं येऊन विचारलं, ‘You coming to Paradise beach?’ या बीचचं नावच मी पहिल्यांदाच ऐकलं…

लेख वाचा…


माणुसकीचे त्यांचे चेहरे!

– कर्नाटकातल्या छोट्याशा गावात एका शाळेच्या सहलीत मी ‘पोरा सम पोर’ होऊन मिसळून गेलो. बदामीला जायचं होतंच, पण मी अनभिज्ञ असलेलं ‘महाकुट मंदिर’ याच सहलीमुळे बघता आलं.

लेख वाचा…


जान है तो जहान है! (कलगा-पुलगा-तुलगा)

– मी त्या नदीवरील पुलावरती मांडी घालून दुखावलेला हात दुसऱ्या हातात घेऊन बसून राहिलो. हा हात मध्ये नसता, तर त्याच्यामागे पोट होतं! 

लेख वाचा…


अनेगुंडी : एक अद्वितीय सफर!

-त्या खडकांवरील अनघड चित्रांवरून हात फिरवताना मला अबोल-सर्जनशील पूर्वजांना स्पर्श केल्याचा भास झाला, पण त्यापूर्वीचा प्रवास म्हणजे एक दिव्य होतं! 

लेख वाचा…


बद्रीनाथ : एक नियोजित बुलावा

-थंडी कडाडून वाढली आणि मंदिराशेजारील गरम पाण्याच्या कुंडांनी आम्हाला हाक दिली. दोघांचे डोळे एकमेकांकडे बघताना लकाकले. 

लेख वाचा…


आचवलांचा फॉर्म्युला आणि वेरूळ-कैलास!

-मंदिराच्या चारही बाजूंनी असणाऱ्या गुहांत भरताचे राज्यारोहण, कृष्णजन्म आणि असे अनेक पौराणिक प्रसंग रेखाटलेले आहेत. जे आपण बघताना, समजून घेताना इतके गुंगून जातो की आपलेच नकळत शिल्प होते, भान हरवते! 

लेख वाचा…एका बोअरिंग प्रवासाची इंटरेस्टिंग कथा!

-श्री अरविंदांच्या समाधी दर्शनासाठी गेलो आणि गेल्या दोन दिवसांच्या कंटाळ्याचा क्षण एका क्षणात नाहीसा झाला. 

लेख वाचा…गोकर्ण-उडपी एक ‘गीत-प्रवास’!

-कुडले बीचवर मी लग्नाआधी साजरा केल्या जाणाऱ्या हळदी समारंभाची माहिती गुगलवर शोधत बसलो. 

लेख वाचा…महाबलीपुरम – पुरातनातील राजधानी!

-महाबलीपुरम हे तामिळनाडूला नाही तर संपूर्ण भारताला पडलेलं सुंदर स्वप्न आहे. 

लेख वाचा…आळंदी : एका वारकऱ्याने दाविली हो वाट!

-एकदा पुण्यात प्रवेश केला की मग मी आनंदातच असतो, मला छान वाटतं! 

लेख वाचा…माणसं प्रवासातली… प्रवाहातली… (भाग १) (एकला सोलो रे)

-तुम्ही जेव्हा एकट्यानं प्रवास कराल, तेव्हा तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल की, सगळं जग आपल्यासोबत वाहतं आहे. 

लेख वाचा…One Comment

    • दीक्षित

    • 2 years ago

    व्वा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *