फॉन्ट साइज वाढवा
उदयगिरीचा कवतिकगंधित ‘धूप’ तुला दाविला…
स्वीकारावी माफी आता, न येता या संमेलनाला…
कुठूनसं हे गाणं ऐकू येऊ लागलं आणि अस्मादिकांची अगदी समाधी लागली. गार पाण्याचे हबकारे तोंडावर बसल्यावर लक्षात आलं, की हे स्वप्नातलं गाणं आहे. जाग आली तर कुमार गंधर्व आपलं ‘मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला…’ गात होते. तरीही त्यातल्या ‘धूप’मुळं हिंदीतल्या ‘धूप’ची आठवण आली आणि तेवढ्या सकाळीही घाम फुटला. मग लक्षात आलं, आपण स्वप्नात उदगीरला जाऊन आलो. कशासाठी हा प्रश्नच उद्भवत नाही – साहित्य संमेलनासाठीच!
बघा ना! वैशाखासम भासणाऱ्या आणि भाजणाऱ्या, चैत्रातल्या रणरणत्या उन्हात मराठवाड्याच्या दक्षिणेस, तेलंगण व कर्नाटकाच्या हद्दीत उदयगिरी, अर्थात उदगीर नगरीत मराठी सारस्वतांचा मेळा भरतो आहे. येत्या वीकान्तास तीन दिवस मराठी साहित्य संमेलनाचा नुसता गल्बला माजणार आहे. आमचे ‘साहित्यसुलतान’ कवतिकराव ठाले पाटलांच्या मराठवाडी आग्रहामुळं अखेर हे संमेलन मराठवाड्याच्या, म्हणजेच संतांच्या पवित्र भूमीत घेण्याचं ठरलं. मार्च किंवा एप्रिलमध्ये हे संमेलन होणार म्हणजे होणारच, असं ठाले पाटलांनी एवढ्या निक्षून सांगितलं, की शेजारच्या तेलंगण व कर्नाटक या राज्यांनीही घाबरून तिकडंही मराठी साहित्य संमेलनांचा फड लावलाय, म्हणे! आमच्या कवतिकरावांचं थोडंसं ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’मधल्या बबन्यासारखं आहे. तो कसं, ‘विंग्रजीत पत्र लिहायचं म्हणजे जे मनामंदी येईल ते ठोकून द्यायचं दनादना… हाय काय…’ या तत्त्वाला जागून सगळ्या गोष्टी फाडफाड करत असतो, तसं आमचे कवतिकरावही कुणाचीही अजिबात भीडभाड न बाळगता, ‘जे मनामंदी येईल ते’ फाडफाड बोलून टाकत असतात.
ते काहीही असलं, तरी साहित्य संमेलन हा प्रकार आपल्याला आवडतो. आता उदगीरला जायला जमेल की नाही, हे काही माहिती नाही. मात्र, ग्रामीण महाराष्ट्रात होणारी सगळीच्या सगळी संमेलनं तुडुंब गर्दीची आणि यशस्वी झाली आहेत, यात शंका नाही. अर्थात नगर, परभणी, सातारा, परळी इथल्या संमेलनांच्या वेळी बडे बडे साहित्यिकही हजेरी लावायला होते. आता तेवढं मोठं नाव असलेले साहित्यिकच उरलेले नाहीत, असं वाटू लागलंय. म्हणजे बघा, नगरच्या संमेलनात साक्षात विंदा करंदीकर साध्या झब्बा-पायजम्यात आणि खांद्याला शबनम लावून ग्रंथदिंडीत चाललेले बघितले आहेत. त्यामानानं गेल्या २५ वर्षांत साहित्य संमेलनांचे अध्यक्ष आणि तेथे येणारे लोकप्रिय साहित्यिक यांचं प्रमाण घटतच गेलेलं दिसतंय. ते डोंबिवलीतलं ‘अक्षय’ संमेलन तर अगदीच पडलं होतं. त्याआधी पिंपरीत झालेलं ‘पीडीपी’ संमेलन मात्र जोरदार झालं होतं. करोनाकाळानंतर अगदी आत्ता, डिसेंबरात नाशिकमध्ये झालेल्या संमेलनातही साहित्यप्रेमींचा उत्साह परतून आल्याचं दिसलं होतं. त्याच उत्साहाच्या जोरावर कवतिकरावांनी उदगीरच्या या ‘हॉट’ संमेलनाचा घाट घातलेला दिसतो.
हे संमेलन आमच्या ना. य. डोळे सरांच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात रंगणार आहे, हे ऐकून आनंद जाहला. बाकी एवढ्या उन्हात तिथं जायचं कसं, या विचारानं महाराष्ट्रदेशीच्या अनेक बिऱ्हाडांतल्या ‘व्यंकटभाऊजी’ आणि ‘वहिनीं’मध्ये ‘काय हुईल, कस्सं हुईल…’ असे विचार डोक्यात ‘बुंगा’यला सुरुवात झालीय, अशी वार्ता कानी आहे. उदगीरमध्ये राहायची व्यवस्था काय, पाण्याचं काय, काही लोक लातूर किंवा नांदेडमध्ये राहणार अशी चर्चा आहे त्यात आपलं तर नाव नसेल ना, अशा एक ना दोन अनेक शंकांचा भुंगा बहुतेकांच्या डोक्यात पिंगा घालू लागला आहे. संमेलनाध्यक्ष मा. भारतराव सासणे सरांची अवस्था ‘काशिनाथ’सारखी झाली असणार, याविषयी आपल्या मनात मुळीच शंका नाही. एवढं सगळं संमेलनाचं वऱ्हाड त्यांनाच घेऊन जायचंय. त्यात संमेलनाचे ‘जानराव’ हे थेट राष्ट्रपतीच असल्यानं या संमेलनात खऱ्या अर्थानं ‘जान’ आली आहे, हे नाकारून चालणार नाही. कवतिकरावांचा उत्साह काही सांगता येत नाही. उदगीरच्या रस्त्यांवर ग्रंथदिंडीत त्यांनी कोत्तापल्ले-सासणे यांना फुगडी घालायला लावतीलच ते! गेली काही वर्षं उद्घाटनाला मा. शरदचंद्रजी पवारसाहेब नसतील, तर तो ‘फाउल’ धरला जातो. त्यामुळं साहेब आहेतच. गोव्याचे ज्ञानपीठ विजेते साहित्यिक दामोदर मावजो हेदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीवरून गोमंतकात वादाच्या गजाली झडायला सुरुवात झालीच आहे. मात्र, काही झालं तरी कवतिकरावांनी मावजोंना ‘आवजो’ म्हणत हिरवा कंदील दिल्यानं ते येणारच आहेत.
संमेलनाची कार्यक्रमपत्रिका आणि त्यातल्या परिसंवादाचे विषय बघितले, तर गेल्या काही वर्षांत बहुतेक वेळा यातले परिसंवाद किंवा त्यातले विषय ऐकून झाले आहेत, हे लक्षात येईलच. दुसऱ्या दिवशी राजन गवस यांची मुलाखत होणार आहे. विनोद शिरसाठ यांच्या ‘साधने’मुळं ती ‘दणकट’ होईल, यात शंका नसावी. तरुण कादंबरीकारांशी संवादाचा एक कार्यक्रम आहे, तो ऐकण्याजोगा वाटतो आहे. त्यात प्रवीण बांदेकर, रमेश इंगळे उत्रादकर, मोनिका गजेंद्रगडकर, आसाराम लोमटे, प्रसाद कुमठेकर आणि युवा साहित्य अकादमी विजेते प्रणव सखदेव यांच्यासोबत गप्पा रंगणार आहेत.
रविवारचा तिसरा दिवस राष्ट्रपतींच्या उपस्थितीमुळे विशेष ठरेल. यापूर्वी सांगलीच्या संमेलनात तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आल्या होत्या. (त्यामुळे मावळते संमेलनाध्यक्ष अरुण साधू यांना भाषणास वेळ न दिल्याने ते सूत्रे प्रदान करण्यासाठी तिथे गेलेच नव्हते. यंदा नारळीकर सरांना न येण्यासाठी हे एक चांगलं कारण आहे खरं!) असोच.
बाकी संमेलन सुरू व्हायच्या आधी दोन दिवस उदगीरमध्ये खरा दणका होईल तो अजय-अतुल यांच्या संगीत रजनीचा. संमेलनाची सुरुवात खऱ्या अर्थानं ‘झिंगाट’ होणार आहे. दुसऱ्या दिवशी एका वाहिनीवरील लोकप्रिय हास्य कार्यक्रमातली ‘नेहमीची यशस्वी’ मंडळी येणार असल्यानं उदगीरमधली त्यांची चाहते मंडळी खूश होतील. बाकी काही नसलं, तरी संमेलन ‘वाजलं’ पाहिजे, यात कुणाच्या मनात शंका नसावी.
हे संमेलन पार पडलं, की मे महिन्यात साहित्य महामंडळाचं कार्यालय मुंबईकडं जाईल. मराठवाड्याचं ‘कवतिक’ संपेल आणि पश्चिम दिशेवर ‘उषा’काल सुरू होईल. तोवर आपण ‘बुंग ऽऽऽ’ म्हणत संमेलनाच्या उत्तरपूजेची वाट बघायची…
– श्रीपाद ब्रह्मे
या सदरातील लेख…
वाचकांच्या मनात ‘पुढे काय होणार?’ हा तीनाक्षरी प्रश्न जन्माला येण्यातच हेरकथांचं, रहस्यकथांचं सार्थक असतं.
साधारणत: मृगाचा पहिला पाऊस पडून गेला, की दिवाळी अंक काढणारी संपादक मंडळी एकदम ‘चार्ज’ होतात.
स्वरांच्या या परब्रह्माला साक्षात बघण्याचे, भेटण्याचे अगदी मोजके प्रसंग माझ्या आयुष्यात आले. माझ्या पत्रकारितेच्या पेशामुळंच हे शक्य झालं.
कुठलीही सूक्ष्म, अमूर्त किंवा तरल भावना जाणण्याचा प्रयत्नच न करणं किंवा त्या गोष्टी हसून, चेष्टेवारी नेऊन सोडून देणं हे सध्या सर्रास होताना दिसतंय.
रसिक म्हणून आपल्या मनातला हा घनघोर अंधार ‘मी वसंतराव’ एखादी ज्योत होऊन उजळवतो.