फॉन्ट साइज वाढवा

आगामी ९६वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्याला होणार आहे, यावर साहित्य महामंडळानं अखेर शिक्कामोर्तब केलं. साहित्य महामंडळाचं मुख्यालय आता मुंबईकडं आलं आहे आणि आता पुढली तीन वर्षं उषा तांबे मॅडम यांच्याकडं मराठी साहित्याचं कुलमुखत्यारपत्र असणार आहे. साधारणत: ज्या विभागीय साहित्य परिषदेकडं महामंडळाचं अध्यक्षपद असतं, ती परिषद आपल्या भौगोलिक कार्यक्षेत्रात साहित्य संमेलन भरविण्यासाठी आग्रही असते आणि ते रास्तही आहे. त्या हिशेबानं आता मुंबई-ठाणे किंवा कोकणात संमेलन व्हायला हवं होतं. मात्र, तसं न होता, ते एकदम विदर्भात गेलं. याचं कारण विदर्भ साहित्य संघाची शताब्दी होय. विदर्भ साहित्य संघ ही केवळ नागपूर किंवा विदर्भच नव्हे, तर अखिल महाराष्ट्रातील एक प्रमुख आणि जुनी अशी साहित्य संस्था होय. अशा संस्थेची शताब्दी असताना त्यानिमित्ताने आम्हाला संमेलन भरवू द्यावं, अशी आग्रही मागणी वि. सा. संघानं महामंडळाकडं केली होती. महामंडळाचं मुख्यालय मराठवाड्याकडं, म्हणजेच कौतिकराव ठाले पाटलांकडं असतानाच ही मागणी आली होती आणि महामंडळानं या मागणीला तत्त्वत: होकारही दिला होता. त्यानुसार आता हे संमेलन वर्ध्याला (किंवा वैदर्भीय मंडळींच्या भाषेत वर्धेला) होणार आहे. कौतिकरावांना उदगीरला त्यांच्या कार्यकाळातलं अखेरचं संमेलन घेता यावं, म्हणून साहित्य महामंडळाचं मुख्यालय एक महिना अतिरिक्त काळासाठी मराठवाड्याकडं राहिलं. तांबे मॅडमनी तिथंही समजूतदारपणा दाखवला. आता महामंडळानं आधीच्या कार्यकाळात दिलेला शब्द पाळून तांबे मॅडमनी आपला समजूतदारपणा द्विगुणित केला आहे. आता विदर्भ साहित्य संघाचं आदरातिथ्य अनुभवण्याची संधी संपूर्ण राज्यभरातील साहित्यरसिकांना मिळणार आहे. 
वर्धा म्हटलं, की आम्हाला आणि (बहुतेक विदर्भेतर रहिवाशांना) सेवाग्राम आठवतं. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या पावनस्पर्शानं पुनीत झालेल्या या भूमीत होणाऱ्या साहित्य संमेलनाचं अध्यक्ष कोण असणार, याबाबत आता उत्सुकता आहे. विदर्भ साहित्य संघाच्या मनात (आणि अर्थात तांबेबाईंच्या) कोण आहे, यावर सगळं अवलंबून आहे. हे संमेलन जानेवारीत ठेवलंय, ते एक बरं झालं. विदर्भात जाण्यासाठी हिवाळा हाच योग्य ऋतू आहे. विदर्भातलं आदरातिथ्य जोरदार असलं, तरी वर्धा हा सेवाग्राममुळं (तहहयात) दारूबंदी असलेला जिल्हा आहे, याचंही भान साहित्यरसिकांनी ठेवलेलं बरं! अर्थात, साहित्यिक असोत वा साधे रसिक; मैफल रंगवायची तर ते कशीही रंगवू शकतात यात वाद नाही. मात्र, अट्टल रसिकांचे जरा हालच होतील, हे खरं! एकूण मजा येणार आहे.

वर्ध्याला होणारं साहित्य संमेलन हे ९६वं असणार आहे. याचा अर्थ ९७ व ९८वं साहित्य संमेलनही मुंबईकडे महामंडळाचं मुख्यालय असताना होईल. त्यानंतरची तीन वर्षं हे मुख्यालया पुण्याकडं असणार आहे. म्हणजेच ९९, १०० व १०१ अशी तीन अत्यंत महत्त्वाची व मानाची संमेलनं भरविण्याचा मान पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेला मिळणार आहे. कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या डोक्यात हे सगळं असणारच. पुण्याच्या ‘मसाप’च्या ऐतिहासिक माधवराव पटवर्धन सभागृहाचं नूतनीकरण करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आहे. ते काम जवळपास पूर्ण झालं असून, मसापचा हा नवा हॉल अत्याधुनिक स्वरूपात रसिकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही वर्षांत हे काम होणं आवश्यक होतं, ते अखेर झालं आहे. ‘मसाप’च्या त्या ऐतिहासिक सभागृहानं किती तरी साहित्यिक कार्यक्रम बघितले. किती तरी वाद-चर्चा झडल्या. तिथल्या भिंतींवर टांगलेले आतापर्यंतच्या सर्व संमेलनाध्यक्षांचे फोटो त्याचे कायमचे साक्षीदार आहेत. मात्र, त्या छोट्या हॉलची प्रेक्षकसंख्या अगदीच मर्यादित असायची. (जवळपास रोज संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमांना तेवढीही गर्दी नसायची तो भाग वेगळा!) मात्र, काहीही असो, पुण्यातल्या साहित्य रसिकांच्या मनात या वास्तूचं आणि या सभागृहाचं स्थान कायमच प्रेमाचं राहील, यात शंका नाही. आता तो सर्व इतिहास झाला. इमारतीच्या नूतनीकरणासोबतच आणखी काय काय आणि कशाकशाचं नूतनीकरण प्रा. जोशी आणि त्यांची कार्यकारिणी करते हे बघायचं.

‘मसाप’तर्फे दोन वर्षं करोनामुळं लांबणीवर पडलेले साहित्य पुरस्कार मागच्या आठवड्यात पुण्यात समारंभपूर्वक देण्यात आले. ज्येष्ठ हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलं होतं. ‘व्यवस्थेला प्रश्न विचारणे हे साहित्यिकांचे काम’ अशा अर्थाचे भाषण वाजपेयी यांनी या वेळी केलं.  आपले संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांनीही आपल्या भाषणातून नेमके असेच विचार मांडले होते. वाजपेयी यांनी जवळपास तेच मुद्दे पुन्हा अधोरेखित केले. या सोहळ्यात ज्येष्ठ विज्ञान लेखक निरंजन घाटे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, हा सर्वांत छान क्षण होता. घाटे गेली कित्येक वर्षं निरलसपणे आणि निष्ठेनं विपुल लेखन करीत आले आहेत. त्यांच्याइतका बहुप्रसवा लेखक अलीकडच्या काळात सापडणं कठीण. त्यांच्या साहित्यसेवेचा यथोचित गौरव झाला, अशीच भावना उपस्थित रसिकांची होती. बाकी मसापचे इतर वार्षिक पुरस्कार दोन वर्षांचे मिळून देण्यात आल्यानं आता साहित्यशारदेचा दरबार पुन्हा गजबजल्यासारखा वाटतो आहे. मसापतर्फे २० ते २५ प्रकारचे विविध पुरस्कार वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील सर्वोत्कृष्ट साहित्यासाठी दिले जातात. हे पुरस्कार मानाचे असले तरी पुरस्कारार्थींना अधिक रक्कम मिळायला हवी. त्यासाठी रसिक दात्यांनी पुरस्कर्ते म्हणून पुढं यायची आवश्यकता आहे. तसं झालं तर पुरस्कार घेणाऱ्या साहित्यिकांनाही हुरूप येईल.
करोनाकाळानं जवळपास दोन वर्षं थंडावलेल्या साहित्य व्यवहारानं आता पुन्हा जोर धरला आहे. गेल्या आठवड्यात लोकप्रिय लेखिका सुधा मूर्ती याही पुण्यात होत्या. त्यांच्या कार्यक्रमाला लोटलेली तुफान गर्दी ‘चांगल्या साहित्याला व चांगल्या लेखकाला मरण नाही आणि पर्यायही नाही,‘ हेच पुन:पुन्हा अधोरेखित करत होती. हा साहित्यानंद वर्धिष्णू होवो, हीच वर्ध्याच्या संमेलन घोषणेप्रसंगी ईश्वराकडे प्रार्थना

  • श्रीपाद ब्रह्मे
RohanSahityaMaifaljpg-1-1

या सदरातील लेख…

बोल्ड अँड हँडसम

वाचकांच्या मनात ‘पुढे काय होणार?’ हा तीनाक्षरी प्रश्न जन्माला येण्यातच हेरकथांचं, रहस्यकथांचं सार्थक असतं.

लेख वाचा…


लेख झाला का?

साधारणत: मृगाचा पहिला पाऊस पडून गेला, की दिवाळी अंक काढणारी संपादक मंडळी एकदम ‘चार्ज’ होतात.

लेख वाचा…


येणे स्वरयज्ञे तोषावें…

स्वरांच्या या परब्रह्माला साक्षात बघण्याचे, भेटण्याचे अगदी मोजके प्रसंग माझ्या आयुष्यात आले. माझ्या पत्रकारितेच्या पेशामुळंच हे शक्य झालं.

लेख वाचा…


कलेचा आस्वाद कसा घ्यावा?

कुठलीही सूक्ष्म, अमूर्त किंवा तरल भावना जाणण्याचा प्रयत्नच न करणं किंवा त्या गोष्टी हसून, चेष्टेवारी नेऊन सोडून देणं हे सध्या सर्रास होताना दिसतंय.

लेख वाचा…


कलंदराचे कैवल्यगान…

रसिक म्हणून आपल्या मनातला हा घनघोर अंधार ‘मी वसंतराव’ एखादी ज्योत होऊन उजळवतो.

लेख वाचा…


वऱ्हाड निघालंय उदगीरला…

रसिक म्हणून आपल्या मनातला हा घनघोर अंधार ‘मी वसंतराव’ एखादी ज्योत होऊन उजळवतो.

लेख वाचा…


उत्सव बहु थोर होत…

आपल्याला माणूस म्हणून जरा अधिक उन्नत व्हायचे असेल, तर या उत्सवाला पर्याय नाही!

लेख वाचा…


One Comment

    • सुरेशचंद्र पाध्ये

    • 2 years ago

    श्रीपाद,सर्वांच्या मनातले भावच तू छान टिपले आहेस. असाच लिहिता रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *