WebImages_PenGoshti27622

Reading Time: 9 Minutes (948 words)

फॉन्ट साइज वाढवा

मराठी रंगभूमीला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. वेगवेगळी नवी नाटकं येत आहेत. उत्तम चालताहेत. दोन वर्षांच्या कठीण काळानंतर रंगभूमीला हे हवेहवेसे दिवस पुन्हा लाभले आहेत. प्रायोगिक नाटकांनाही बहर आला आहे, तसंच मुख्य प्रवाहातील नाटकांतही वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. अशा नाटकांविषयी लिहिणं, अधिकाधिक लोकांनी ती पाहावीत यासाठी त्यातलं आपल्याला काय भावलं हे सांगणं हे प्रत्येक नाट्यरसिकाचं कर्तव्यच आहे, असं मला वाटतं. याच भावनेतून या वेळी पाहिलेल्या एका आगळ्या नाटकाविषयी सांगावंसं वाटतं. हे नाटक आहे – पुनश्च हनीमून!

संदेश कुलकर्णी लिखित-दिग्दर्शित हे नाटक बघण्याचा योग नुकताच आला. खूप दिवसांनी एक अतिशय तीव्र संवेदनांचं, नाट्यमय घडामोडींचं अन् टोचणी लावणारं नाटक बघायला मिळालं. काही कलाकृती साध्या-सोप्या, सरळ असतात. काही कलाकृती गुंतागुंतीच्या आणि समोरच्या प्रेक्षकाकडून काही अपेक्षा ठेवणाऱ्या असतात. अशा ‘डिमांडिंग’ कलाकृती पाहायला नेहमीच मजा येते. आपल्या बुद्धीला काम देणारी, मेंदूला चालना देणारी आणि पंचेंद्रियांना हलवून सोडणारी कलाकृती अनुभवण्याने एक आगळा बौद्धिक ‘हाय’ मिळतो. ‘पुनश्च हनीमून’ ही कलाकृती तसा ‘हाय’ निश्चित देते. याबद्दल संदेश कुलकर्णी यांचं सर्वप्रथम अभिनंदन. ते स्वत:ही या नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत आणि त्यांच्यासोबत अमृता सुभाष व अमित फाळके आहेत. हे तिघंही रंगमंचावर अक्षरश: नजरबंदी करतात. 

‘पुनश्च हनीमून’ या नावातच स्पष्ट आहे तशी ही एका दाम्पत्याची कथा आहे. यात ते पुन्हा एकदा हनीमूनसाठी माथेरानला गेले आहेत. त्यांना १२ वर्षांपूर्वीचंच हॉटेल, तीच खोली हवी आहे. ते तिथं जातात आणि सुरू होतो एक वेगळा मनोवैज्ञानिक खेळ! हा खेळ सोपा नाही. यात माणसांचं मन गुंतलं आहे. अस्थिर, विचित्र, गोंधळलेलं, भांबावलेलं; पण तितकंच लबाड, चलाख, चतुर अन् धूर्त मन! हे मनोव्यापार समजून घेताना समोर येतो तो काळाचा एक दुभंग पट! त्यामुळं स्थळ-काळाचा संदर्भ सोडून पात्रं विविध मितींमध्ये ये-जा करू लागतात आणि आपलंही मन हा चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न करू लागतं. पात्रांच्या मनासारखाच विचार आपणही करू लागतो आणि एका क्षणी तर समोरची पात्रं आणि आपण यातलं अंतरच नष्ट होतं. एकाच वेळी दुभंग, पण आतून जोडलेलं असं काहीतरी अद्भुत तयार होतं.
नाटकाची नेपथ्यरचना या दृष्टीने पाहण्यासारखी आहे. आपण काहीतरी तुटलेलं, दुभंगलेलं, हरवलेलं पाहतो आहोत, याची जाणीव पहिल्या दृश्यापासूनच होते. एका काचेच्या खिडकीचे तिरके दोन भाग दोन दिशांना दिसतात. हा तडा पहिल्या क्षणापासून आपल्या मनाचा ताबा घेतो. समोर एक मोठं घड्याळ आहे. त्यात कुठलेही काटे नाहीत. (पुढं संवादात दालीच्या घड्याळाचा संदर्भ येतो.) साल्वादोर दालीपासून आरतीप्रभूंपर्यंत आणि ग्रेसपासून दि.बा. मोकाशींपर्यंत अनेक संदर्भ येतात. हे सारेच जगण्यातल्या अपयशाविषयी, माणसाच्या पोकळ नात्यांविषयी, काळ नावाच्या पोकळीविषयी आणि या पोकळीतच आपापल्या प्रेमाचा अवकाश शोधणाऱ्या सगळ्यांविषयी बोलत असतात. त्यातला प्रत्येक संदर्भ कुठेतरी काळजाला भिडतो आणि काटा मोडून जातो.

संदेश कुलकर्णी यांनी हे नाटक लिहिताना प्रयोगात नाटकातील सर्व शक्यता आजमावण्याचा विचार केला आहे. त्यात कायिक-वाचिक अभिनयापासून ते नेपथ्यापर्यंत आणि चटकदार संवादांपासून ते प्रकाशयोजनेपर्यंत सगळा विचार केलेला दिसतो. नेपथ्यात केलेल्या अनेक स्तरांचा वापर या दृष्टीने पाहण्यासारखा आहे. प्रमुख दोन पात्रं सोडून यात आणखी दोनच पात्रं आहेत. ती दोन्ही पात्रं एकाहून अधिक भूमिका करतात. खरंतर प्रमुख दोन पात्रंही एकाहून अधिक पात्रं साकारत असतात. त्यांच्या मनाची दुभंग अवस्था पाहता, तीही एकाच शरीरात दोन व्यक्ती वागवत असतात. या दोघांच्या नात्यात नक्की काहीतरी बिनसलंय. लेखक असलेल्या नायकाला त्याची कादंबरी लिहिण्यासाठी एकांत हवा आहे, तर न्यूज अँकर असलेल्या त्याच्या पत्नीला एकांत किंवा शांततेपेक्षा आणखी काहीतरी हवंय. दोघांचंही काही तरी चुकलंय आणि हे नाटकात येणारं पहिलं वाक्य – ‘आपण वाट चुकलोय’ – नीटच सांगतं. नंतर नायिकेचा पाय घसरतो इथपासून ते नायक बोलताना शब्दच विसरतो इथपर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांचं हे तुटलेपण, दुभंगपण लेखक अधोरेखित करत जातो. 
अवकाश, काळ व मिती या तिन्ही गोष्टी आपण आयुष्यात एका समन्वयानं उपभोगत असतो. किंबहुना या तिन्ही गोष्टी कायम ‘इन सिंक’ असतात असं आपण गृहीत धरलेलं असतं. मात्र, माणसाच्या मनाचे जे अद्भुत खेळ सुरू असतात त्यात या तिन्ही गोष्टींचा समन्वय बिघडू शकतो किंवा पुढे-मागे होऊ शकतो. समोरचा माणूस आपल्या मितीत, आपल्या अवकाशात आणि आपल्या काळात असेल तरच संवाद संभवतो. या नाटकातली पात्रं वेगळ्या मितीत, वेगळ्या अवकाशात आणि वेगळ्या काळात जगत आहेत, हे बघून आपल्या पाठीतून एक भयाची शिरशिरी लहरत गेल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर विचार येतो तो आपल्या स्वत:चा. आपणही अशाच ‘इन सिंक’ नसलेल्या अवकाश-काळ-मितीत वावरत आहोत हा विचार येतो आणि भीती वाटते. ‘पुनश्च हनीमून’ नाटक आपल्याला या भीतीसोबतच शेवटी एका दिलाशाची सोबत देते आणि तो सकारात्मक शेवट बघून खरं तर हुश्श व्हायला होतं.
संदेश कुलकर्णी आणि अमृता या खऱ्या आयुष्यातल्या जोडप्यानेच यातल्या नायक-नायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत. दोघांनाही ‘हॅट्स ऑफ’! याचं कारण या भूमिका केवळ शारीरिकदृष्ट्या दमवणाऱ्या नाहीत, तर त्या मानसिकदृष्ट्याही प्रचंड दमवणाऱ्या आहेत. मात्र, या जोडीनं रंगमंचावर अक्षरश: चौफेर संचार करून त्या अवकाशावर, त्या काळावर व तिथल्या मितींवर आपली सत्ता निर्विवादपणे प्रस्थापित केली आहे. अनेक प्रसंगांत या दोघांना टाळ्या मिळतात, तर अनेकदा आपण केवळ नि:शब्द होतो. या दोघांच्या अभिनयक्षमतेला न्याय देणारं हे नाटक आहे, यात वाद नाही. सोबत अमित फाळके आहे आणि त्यानंही त्याच्या सगळ्या भूमिका अगदी सहज केल्या आहेत. दीर्घकाळाने अमित रंगमंचावर आला आहे आणि त्याचा वावर फारच सुखद व आश्वासक आहे. आणखी एक अशितोष गायकवाड नावाचा कलाकार यात आहे. त्यानंही चांगलं काम केलंय. या नाटकाला पार्श्वसंगीत दिवंगत नरेंद्र भिडे यांचं आहे. ते अतिशय प्रभावी आहे. नेपथ्य मीरा वेलणकर यांचं आहे, तर वेषभूषा श्वेता बापट यांची आहे.
सुमारे १२ वर्षांपूर्वी प्रथम हे नाटक रंगमंचावर आलं होतं. तेव्हा मी ते पाहिलं नव्हतं. मात्र, आता हा प्रयोग बघायला मिळाला याचा आनंद आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी हे नाटक जरूर बघा.

– श्रीपाद ब्रह्मे



या सदरातील लेख…

बोल्ड अँड हँडसम

वाचकांच्या मनात ‘पुढे काय होणार?’ हा तीनाक्षरी प्रश्न जन्माला येण्यातच हेरकथांचं, रहस्यकथांचं सार्थक असतं.

लेख वाचा…


लेख झाला का?

साधारणत: मृगाचा पहिला पाऊस पडून गेला, की दिवाळी अंक काढणारी संपादक मंडळी एकदम ‘चार्ज’ होतात.

लेख वाचा…


येणे स्वरयज्ञे तोषावें…

स्वरांच्या या परब्रह्माला साक्षात बघण्याचे, भेटण्याचे अगदी मोजके प्रसंग माझ्या आयुष्यात आले. माझ्या पत्रकारितेच्या पेशामुळंच हे शक्य झालं.

लेख वाचा…


कलेचा आस्वाद कसा घ्यावा?

कुठलीही सूक्ष्म, अमूर्त किंवा तरल भावना जाणण्याचा प्रयत्नच न करणं किंवा त्या गोष्टी हसून, चेष्टेवारी नेऊन सोडून देणं हे सध्या सर्रास होताना दिसतंय.

लेख वाचा…


कलंदराचे कैवल्यगान…

रसिक म्हणून आपल्या मनातला हा घनघोर अंधार ‘मी वसंतराव’ एखादी ज्योत होऊन उजळवतो.

लेख वाचा…


वऱ्हाड निघालंय उदगीरला…

रसिक म्हणून आपल्या मनातला हा घनघोर अंधार ‘मी वसंतराव’ एखादी ज्योत होऊन उजळवतो.

लेख वाचा…


उत्सव बहु थोर होत…

आपल्याला माणूस म्हणून जरा अधिक उन्नत व्हायचे असेल, तर या उत्सवाला पर्याय नाही!

लेख वाचा…


साहित्यानंद वर्धिष्णू होवो… (‘पेन’गोष्टी)

आता विदर्भ साहित्य संघाचं आदरातिथ्य अनुभवण्याची संधी संपूर्ण राज्यभरातील साहित्यरसिकांना मिळणार आहे.

लेख वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *