फॉन्ट साइज वाढवा

दुबईमध्ये साधारण चार-पाच वर्षं राहिल्यावर आणि दुबईच नव्हे, तर इतरही अमिरातींची भटकंती केल्यावर मला इथल्या लोकांचा आणि जागांचा चांगला परिचय झालेला होता. माझ्यासारखे भटके सवंगडी मिळाल्यामुळे नवीन नवीन जागा शोधून तिथे मुद्दाम वाट वाकडी करून जायची सवय लागलेली होतीच… त्यामुळे बरेचदा सुट्टीचे दिवस (आणि रात्री) आम्हा भटक्यांचा मुक्काम घराबाहेरच असायचा.

इथला उन्हाळा मात्र आमच्या या भटकंतीची कधी कधी परीक्षा घ्यायचा. पंचेचाळीस – पन्नासच्या अध्येमध्ये रेंगाळणाऱ्या तापमानात बाहेर फिरणं अशक्य व्हायचं. अशा वेळी बरेचदा पाय वळायचे इथल्या मोठमोठ्या ‘मॉल’च्या दिशेला. हे मॉल कितीही चकचकीत आणि भपकेबाज असले, तरी तिथे एक-दोन वेळा गेल्यावर कंटाळा यायचा. शिवाय ‘विंडो शॉपिंग’ची विशेष सवय नसल्यामुळे मॉलमध्येही बरेचदा एखाद्या पुस्तकांच्या दुकानातच माझे तास-दोन तास जायचे. माझ्या मित्रमंडळींमध्ये मी सहज हे सगळं बोलून गेलो आणि आमच्यातल्या एका ‘भटक्या’ने मला माझ्या समस्येवरचा अचूक तोडगा सुचवला.

दुबईच्या जुन्या भागात – ज्याला आज बर दुबई आणि देरा म्हणून ओळखलं जातं – बघण्यासारख्या अनेक छोट्या छोट्या जागा असल्याचं मला माझ्या या मित्राकडून कळलं. त्याने या दोन भागांमध्ये भरपूर भटकंती केलेली असल्यामुळे मी त्यालाच माझ्याबरोबर यायची गळ घातली आणि त्यानेही मान्य केलं.… हा माझा मित्र बेरात मूळचा तुर्किश पण तीन पिढ्यांपासून शेजारच्या जॉर्डनमध्ये स्थायिक झालेला ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती… पेशाने अभियंता आणि मनाने ‘भटक्या विमुक्त’. या मनुष्याची दिवसाची सुरुवात आणि शेवट व्हायचा ‘तुर्किश कॉफी’ने. शिवाय दिवसभरात सहा- सात वेळा कॉफीची आवर्तनं असायचीच. ही तुर्किश कॉफी भलतीच ‘स्ट्रॉंग’ असते.… मी त्याच्याबरोबर सकाळी सहज म्हणून त्या कॉफीचा एक घोट घेतला आणि मला ब्रह्मांड आठवलं. माझी अवस्था बघून बेरात मोठ्यांदा हसला…

“तुम्ही भारतीय आणि चिनी लोक चहावाले, तुम्हाला कॉफी झटका देणारच….आणि ही तर खास ‘डिकॅफ’ पद्धतीची कडक कॉफी आहे. हा छोटासा कप भरून कॉफी प्यायली की मेंदू असा ताजातवाना होतो, की तासंतास काम करायचा उत्साह येतो….”

“अरे तुम्हाला असेल सवय अशा कॉफीची पण आम्हाला नाही रे जमत हे सगळं.… तोंड इतकं कडू झालंय की उद्यापर्यंत कशाचीही चव कळणार नाही बहुतेक…”

“असं म्हणतोस? चल तर, आपल्या भटकंतीचा ‘बिस्मिल्ला’ मी इथल्या कॉफी संग्रहालयापासूनच करतो. छोटेखानी कॉफीचं दुकान आहे इथे, पण इतकं सुरेख संग्रहालय तयार केलंय, तिथे त्या दुकानाच्या मालकाने, की दोन-तीन तास सहज जातील आपले. शिवाय कॉफी नावाच्या पेयाची सगळी कुंडली तुला तिथे समजू शकेल.… चल…”

आम्हा दोघा भटक्यांची पावलं बर दुबईच्या ‘अल फाहिदी’ भागाकडे वळली. हा भाग दुबईच्या महानगरपालिकेने निगुतीने जपलेला दुबईचा जुना भाग म्हणून प्रसिद्ध आहे. इथे असलेल्या जुन्या कुडाच्या घरांची डागडुजी करून या भागाचा त्यांनी ‘हेरिटेज एरिया’च्या रूपात कायापालट केलेला आहे. इथे छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये आणि चार-सहा घरांच्या वळचणीला असलेल्या चौकांमध्ये उगीच आपणही भटके बदाऊनी अरब झाल्याचा भास होतो. याच गल्ल्यांच्या भूलभुलैयातून आडोशाने चालत चालत बेरात मला एका जुन्या घरासारख्या वास्तूसमोर घेऊन आला. मातीने लिंपलेल्या भिंतीवर ‘कॉफी म्युझियम’ असं इंग्रजीत आणि अरबी भाषेत लिहिलेलं दिसलं नसतं तर या वास्तूच्या आत वस्तुसंग्रहालय असेल याचा पुसटसाही अंदाज बघणाऱ्याला आला नसता!

मुख्य प्रवेशद्वार अगदी आठ-नऊ फुटीच उंच होतं, पण त्याचे दोन भाग केलेले होते. एक भाग अर्धा लाकडी आणि अर्धा काचेचा होता, ज्यातून आतलं थोडंफार दिसेल इतपत प्रकाश आत झिरपत होता. बाहेरून विशेष काही समजत नसल्यामुळे आत पाय ठेवताना या जागेबद्दल मला चांगलंच कुतूहल वाटायला लागलेलं होतं. बेरात बहुतेक इथे अनेकदा आला असावा, कारण त्याला बघून तिथला एक जण त्याला सलाम करत पुढे आला आणि दोघांनी अगदी शाळूसोबत असल्यासारखी एकमेकांना मिठी मारली. थोडा वेळ अरबी भाषेत त्यांच्यात संवाद झाले आणि अखेर त्यांचा मोर्चा माझ्याकडे वळला. त्याचं नाव मोहम्मद अब्बास.

“या माझ्या मित्राला कॉफीबद्दल सांग रे जरा.… हा भारतीय आहे, चहा पिणारा…”

“अरे हो.… हा आशियाई पडला ना….” अब्बासने हसत हसत दुजोरा दिला.

“सांग याला, जगात फक्त दोन पेयांनी मनाला तरतरी येते.… एक कॉफी आणि दुसरी वाइन…”

काही काळ थट्टा मस्करी झाल्यावर अब्बासने मला कॉफी म्यूझियमची ओळख करून द्यायला सुरुवात केली. हे म्यूझियम दोन मजली आहे. हे दोन्ही मजले म्हणजे कॉफी या विषयाचा माहितीकोषच.… खालच्या मजल्यावर अरेबियन, इजिप्शियन, इथिओपियन अशा वेगवेगळ्या देशांच्या कॉफीच्या बिया आणि त्यांच्या गुणधर्मांची माहिती आहे. वेगवेगळ्या देशांच्या कॉफीचा सुवास वेगवेगळा असतो हे मला इथे पहिल्यांदाच कळलेलं होतं.… शिवाय प्रत्येक देशाची कॉफीच्या बिया भाजून त्याची पूड करण्याची पारंपरिक पद्धतही आहे हेही माझ्यासाठी नवं होतं.

“बिया भाजायच्या पद्धती वेगळ्या आणि त्यातून तयार होणारा कॉफीचा ‘अरोमा’ – सुवासही वेगळा. वाळूमध्ये बिया भाजल्या की सगळ्या बाजूने त्या व्यवस्थित भाजल्या जातात.… पण इथिओपियामध्ये बिया मातीतही भाजल्या जातात. जुन्या काळी मातीच्या, धातूच्या किंवा दगडाच्याही कढयांमध्ये बिया भाजल्या जायच्या. त्या हाताने दळून त्यांची बारीक पूड करून पूर्वीचे लोक पिशव्यांमध्ये किंवा पखालींमध्ये भरून ठेवायचे.… कालांतराने त्यांना समजलं की, कॉफीचा वास आणि चव टिकून राहायला काचेची भांडी उपयोगी पडतात…” अब्बासने काही जुनी भांडी मला दाखवली. कॉफी प्यायचे छोटेखानी कप, सुरया वगैरे बघून मी हैराण झालो. या पेयावर इथल्या लोकांचं किती प्रेम आहे हे मला व्यवस्थित कळलेलं होतं.

वेगवेगळ्या देशांच्या ‘कॉफी कल्चर’बद्दलही इथे भरभरून माहिती होती. कॉफी हा शब्दच मुळात ‘काहीया’ या अरबी शब्दापासून आलेला आहे असं अरबी लोकांचं मत आहे. काहीया म्हणजे भूक दडपणारा. या शब्दापासून पुढे खास कॉफीसाठी तयार झालेला ‘काहवा’ हा अरबी शब्द तुर्कांनी ‘काहवे’ म्हणून उचलला आणि डच लोकांनी या शब्दाचा अपभ्रंश म्हणून आपल्या देशात रुजवलेला ‘कोफी’ हा शब्द पुढे इंग्रजांनी ‘कॉफी’ म्हणून इंग्रजीत आणला. युरोप, अरबी देश, आफ्रिका खंडातले देश आणि पुढे त्यांनी पुढे जिथे जिथे वसाहती केल्या त्या त्या देशातही ते कॉफी घेऊन गेले.

कॉफीच्या या सगळ्या घराण्यांचा मूळपुरुष इथिओपिया देशातला. शेळ्या-मेंढ्या चरायला घेऊन गेलेल्या मेंढपाळांना एका विशिष्ट झुडपांची फळं खाल्ल्यावर आपली जनावरं ताजीतवानी होतात हे ध्यानी आल्यावर त्यांनी आधी ही फळं आणि नंतर त्याच्या बिया आपल्या आहारात समाविष्ट केल्या. नवव्या शतकात कालदी (की खालिद) नावाच्या मेंढपाळाने सर्वप्रथम या बियांचे गुणधर्म ओळखले. अरबी लोकांकडे ‘अब्द-अल- कादिर’ नावाच्या एका हस्तलिखितात ओमर नावाच्या एका येमेनी शेखाचा उल्लेख आहे.… त्याने कॉफीची फळं खाल्ली, नंतर त्याच्या बिया चघळल्या, त्या भाजून बघितल्या, पाण्यात उकलल्या आणि अखेर त्याला कॉफी हे ‘पेय’ तयार करण्याची कृती समजली असं त्या हस्तलिखितात लिहिलेलं आढळतं. गंमत म्हणजे या कॉफीच्या सेवनाने ताजंतवानं व्हायला होतं म्हणून ज्या गावातून त्याला हाकलून दिलेलं होतं त्या गावच्या गावकऱ्यांनी त्याला सन्मानाने बोलावून चक्क संतपद दिलं होतं !

या कॉफीच्या सेवनाचा पुढे पुढे युरोपमध्ये इतका अतिरेक झाला होता की त्यावरून युद्धाचे प्रसंगही आले होते असं मला अब्बासने सांगितल्यावर मी सर्द झालो. अगदी एकोणिसाव्या-विसाव्या शतकातही आफ्रिकेच्या वेगवेगळ्या भागांवर आपलं साम्राज्य प्रस्थापित करताना कॉफीची पैदास होणारे प्रदेश मिळवण्यासाठी युरोपीय देश जीवाचा आटापिटा करत होते. इंडोनेशिया, मलेशिया अशा आशियाई देशांमध्येही त्यांनी कॉफीचं वेड पसरवलं. इंडोनेशियामध्ये ‘कोपी लुवाक’ नावाने प्रसिद्ध असलेली आणि जगातल्या सर्वाधिक महागड्या कॉफींपैकी एक असलेली कॉफी तयार करण्याची पद्धत ऐकून तर मी चक्रावून गेलो. तिथल्या जंगलातल्या ‘पाम सिवेट’ नावाच्या खारीसारख्या दिसणाऱ्या प्राण्यांनी कॉफीची फळं खाऊन विष्ठा केल्यावर त्या विष्ठेतून पडणाऱ्या कॉफीच्या न पचलेल्या बिया तिथले लोक जमा करून आणतात आणि त्या भाजून, दळून त्याची कॉफी बनवतात. त्या प्राण्याच्या पोटात बियांवर झालेल्या प्रक्रियांमुळे या कॉफीला वेगळी चव येते म्हणे!

“आमच्या पद्धतीने छान बैठकीवर बसून कॉफी पिऊया चल,” अब्बासने आम्हाला पहिल्या मजल्यावरून खाली ‘मजलिस’मध्ये नेलं. अरबी मजलिस म्हणजे जमिनीवर गालिचे आणि गाद्या अंथरून तयार केलेली ऐसपैस बैठक. अब्बास आणि बेरात पट्टीचे कॉफी पिणारे. त्यांनी एका वाळू भरलेल्या पितळी वाडग्यातून कॉफी तयार करण्याची खास ‘धुपाटणी’ आणली. लालबुंद निखारे भरलेली एक शेगडी बाजूला जमिनीवर ठेवली. त्याच्यावर ते पितळी भांडं ठेवून वाळू चांगली तापू दिली. तीन-चार मोठे चमचे भरून ‘तुर्किश कॉफी’ पूड त्या धुपाटण्यांमध्ये टाकून त्यात पाणी ओतलं आणि त्या वाळूत त्यांनी ती धुपाटणी खोचली. काही वेळात खळखळून उकळलेली गर्द काळसर तपकिरी कॉफी फसफसून वेळ आली. छोट्याशा कपांमध्ये त्यांनी ती छान गाळून घेतली.

चहाची सवय असणारा आणि प्रसंगाला अनुसरून दूध घातलेली साधी कॉफी पिणारा मी आणि इतकी ‘भयंकर’ कॉफी पिणारे माझे हे दोन मित्र म्हंटलं तर इतके विसंवादी होतो, की बघणाऱ्याला आश्चर्य वाटलं असतं.… पण आमच्या गप्पा हा आम्हाला जोडणारा समान दुवा होता. भारताच्या दक्षिण भागात – मुख्यतः केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांच्या भागात कॉफी कशी प्यायली जाते, तिथले लोक त्यात वेलची, लवंग, दालचिनी असे मसालेही कसे घालतात आणि दुधाची ‘फिल्टर कॉफी’ एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात उंचावरून टाकत तिथले लोक कशा पद्धतीने ‘फेसाळवतात’ हे ऐकून त्या दोघांना मजा वाटली. ‘कॅपुचिनो’ , ‘लाते’ , ‘मोका’ वगैरे नावांनी मिळणाऱ्या ‘इटालियन’ पद्धतीच्या कॉफीची चव कशी मिळमिळीत असते यावर मात्र आम्हा तिघांचं एकमत झालं.

कॉफी संग्रहालयाच्या तीन-चार तासांच्या या भेटीनंतर कॉफीमुळे नव्हे, तर तिथे झालेल्या गप्पांमुळे मी ताजातवाना झालो होतो. दुबईच्या एका छोट्याशा कोपऱ्यात निवांत पहुडलेल्या या संग्रहालयामुळे मला कॉफीच्या दुनियेची चांगलीच ओळख झाली आणि त्या निमित्ताने अब्बाससारखा नवा गप्पिष्ट मित्रही मिळाला होता. चहावरचं माझं प्रेम जरी कायम असलं, तरी कॉफीशीही आता माझी सलगी व्हायला लागलेली होती. अजूनही बरेचदा मनात आलं की, माझी पावलं अल फाहिदी भागाकडे वळतात, त्या मातीच्या भिंतींवरची अक्षरं समोर येतात, आत अब्बास नसतो, बरोबर बेरात नसतो, पण त्यांच्या आठवणी आणि ती ‘मजलिस’ मात्र तशीच असते. त्या गाद्यांवर बसून दुधाची साधी कॉफी पिता पिता बरेचदा पुन्हा एकदा गप्पांचे फड जमल्यासारखं वाटायला लागतं आणि मेंदू ताजातवाना व्हायला लागतो.

“Coffee is a beverage that puts one to sleep when not drank” हे तिथेच वाचलेलं वाक्य मला प्रत्येक वेळी नवं वाटतं, कारण प्रत्येक वेळचा कॉफीचा कपही नवा असतो.… नाही का?

– आशिष काळकर

RohanSahityaMaifaljpg-1-1

Dalma island

या लेखमालिकेतील लेख

डेल्मा

हे आहे खरं अरबी जग… त्या काचेच्या उंच इमारती, मोठमोठे शॉपिंग मॉल्स ही काही आमची ओळख नाही…

लेख वाचा…


सर बानी यास

“ही साधी भटकंती नाहीये…. आखातातल्या अरब देशात चर्च सापडणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे माहीत आहे का तुला?”

लेख वाचा…टेहेळणी बुरु

“ही साधी भटकंती नाहीये…. आखातातल्या अरब देशात चर्च सापडणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे माहीत आहे का तुला?”

लेख वाचा…


कसर-अल-मुवेज

डोळे विस्फारून त्या तटबंदीची लांबी बघून मी बशरकडे बघितलं. ‘आता समजलं; अबू धाबी काय आहे ते?’

लेख वाचा…


जझीरात अल हमरा

‘अल जझीरा अल हमरा – घोस्ट टाऊन, रास अल खैमा’ असं लिहिलेलं होतं आणि ते वाचून माझी उत्सुकता चाळवली गेली…’

लेख वाचा…


फुजेरा

शेकडो वर्षांपासून याच जागी भरणारा हा बाजार म्हणजे अलिबाबाची गुहा होती. इथं छोट्या छोट्या दुकानांमध्ये सुईपासून ते जिवंत शेळ्या मेंढ्यांपर्यंत काहीही मिळू शकतं.’

लेख वाचा…


वासित वेटलँड सेंटर

दलदल असो वा वाळवंट, मनात आणलं तर कुठेही काहीही तयार करता येऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही जागा!

लेख वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *