फॉन्ट साइज वाढवा

संयुक्त अरब अमिरातींमधल्या सात अमिरातींमधली एक अमिराती म्हणजे फुजेरा. या अमिरातीचं क्षेत्रफळ जवळजवळ बाराशे चौरस किलोमीटर, म्हणजे दिल्लीच्या केंद्रशासित प्रदेशाच्या क्षेत्रफळापेक्षाही कमी. लोकसंख्या फक्त सव्वा लाखाच्या आसपास.… परंतु, या छोट्याशाशहरवाजा अमिरातीत स्थानिक अरबांच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक खुणा जागोजागीआढळतात. या अमिरातीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य हे की, या अमिरातीचा किनारी भाग ओमानच्या आखाताला लागून आहे. इथून थेट अरबी समुद्रात जायला अतिशय कमी वेळ लागतो. त्यामुळे या अमिरातीत ‘फुजेरा ऑइल इंडस्ट्री झोन’ तयार करून इथल्या राजघराण्याने तेलाचे प्रचंड साठे मावतील इतक्या तेलटाक्या बांधलेल्या आहेत. याच कंपनीसाठी एक काम करण्याच्या निमित्ताने मी सर्वप्रथम या अमिरातीत पाऊल टाकलं आणि कामानिमित्त तिथे आठवडाभर थांबायचा योग आल्यावर तिथल्या अनेक जागा बघण्याची संधी मला मिळाली.

“फुजेराच्या बाजारात येतोस का?” मी ज्या ‘फुजेरा ऑइल इंडस्ट्री झोनफोईझ’च्या प्रोजेक्टवर काम करत होतो, त्याच प्रोजेक्टसाठी फोईझतर्फे जो प्रोजेक्ट मॅनेजर काम करत होता, त्याने शुक्रवाच्या सुट्टीच्या दिवशी सकाळी सकाळीमला विचारलं. हा प्रोजेक्ट मॅनेजर – संतोष नायर केरळचा होता. फुजेराला सात-आठ वर्षं राहून त्याने फोईझमध्ये वरचा हुद्दा मिळवलेला होता.

या अमिरातीच्या बऱ्याच वेगवेगळ्या जागी तो गेलेला होता. त्याच्याबरोबर भटकंती करण्याची संधी मी नक्कीच सोडणार नव्हतो. फुजेराचा बाजार म्हणजे एखादं छानसं ‘सुपरमार्केट’ असेल असा माझा अंदाज होता; पण त्या जागेने तो पार धुळीस मिळवला.

‘हजार’ डोंगर रांगांच्यासमोर आणि फुजेरा शहराच्या मुख्य रस्त्याला लागून असलेल्या एका मोकळ्या जागेत आपल्याकडच्या खेडेगावांमध्ये जसा बाजार असतो, तशा प्रकारचं हे ‘मार्केट’ बघून मला आश्चर्यचाधक्का बसला. याला ‘फ्रायडे मार्केट’ म्हणून ओळखलं जात असलं, तरी आठवड्याचे सातही दिवसते सुरु असतं. “हे बघ, या इथे या सगळ्या गाड्या उभ्या आहेत ना, त्या इथल्या शेतकरी लोकच्या आहेत.” संतोष मला सांगत होता. “उत्तरेकडच्या अमिरातींमध्ये विशेष पाऊस पडत नाही; पण इथे फुजेराला बऱ्यापैकी पाऊस पडतो. इथल्या जमिनीत पाणी आहे. इथे परंपरागत शेती करणारे अनेक जण आहेत. त्यांच्या बागांमध्ये फळं, भाज्या वगैरे पिकतात. खजूर तर पिकतातच.

त्यांचे मदतनीस मग सगळं घेऊन गाडीत भरतात आणि घेऊन येतात या बाजारात. इथे बोली लावून भावसुद्धा करतं येतो…” त्याने पंधरा दिरहॅम किलो किमतीच्या कलिंगडाचा भाव घासाघीस करून चार दिरहॅम किलो; इतका खाली आणून दाखवला आणि कलिंगड घेऊन माझ्याकडे विजयी आविर्भावात बघितलं.

शेकडो वर्षांपासून याच जागी भरणारा हा बाजार म्हणजे अलिबाबाची गुहा होती. इथं छोट्या छोट्या दुकानांमध्ये सुईपासून ते जिवंत शेळ्या मेंढ्यांपर्यंत काहीही मिळू शकतं. मातीच्या सुबक पारंपरिक भांड्यांच्या शेजारी एखाद्या हलवायची मिठाई (अरबी धाटणीची) सजवलेली असू शकते,तर आपल्याकडचे तगडे बोकड विकायला आलेल्या एखाद्या बलुची विक्रेत्याच्या शेजारी पर्यटकांनाकपडे विकणाराही उभा असलेला दिसू शकतो. या बाजारात हातात ‘करक टी’ नावाने ओळखला जाणारा दुधाचा भारतीय पद्धतीचा चहा पीतपीत आम्ही मनसोक्त भटकलो.

“इथे जे पाणी आलंय ना विकायला, ते ज्या गावातून येतं त्या गावाचं नाव आहे ‘मसाफी’. तिथे गोड्या पाण्याचे नैसर्गिक झरे आहेत, जे फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. मसाफी या नावाचा अर्थच आहे ‘शुद्ध पाणी’. “बघायचंय का मसाफी गाव?” संतोषच्या या आमंत्रणाला नाकारणं अर्थातच अशक्य होतं. या गावाकडे आम्ही निघालो तेव्हा ‘हजार’ डोंगररांगांमधून जाणाऱ्या वळणावळणाच्या रस्त्यावरून गाडी चालवताना वेळ छान जात होता. दोन्ही बाजूंना ठिसूळ, करडे राखाडी डोंगर, त्यांच्यावर अधूनमधून दिसणारं गवत, खाली दरीमध्ये दिसणारी ‘फार्म हाउसेस’ आणि त्यांच्या आजूबाजूला असणारी खजुराची झाडं; असा देखावा डोळ्यांना सुखावणारा होता. दुबई- शारजाच्या सपाट वाळवंटी देखाव्यांपेक्षा हे दृश्य खूपच वेगळं होतं. मसाफी गावामधून रास-अल-खैमा आणि फुजेरा या दोन अमिरातींची सीमारेषा जातं असल्यामुळे हे गाव दोन्ही अमिरातींमध्ये दुभंगलेलं आहे.हे गाव ‘वादी हम’च्या मुखाशी वसलेलं आहे. पाऊस पडल्यावर डोंगरातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह ज्या पात्रातून वाहतो, ते कोरडं झालं की त्याला ‘वादी’ असं संबोधतात. पाऊस पडला की काही काळापुरती ही वादी पाण्याने भरते, मग पुन्हा कोरडी होते. या गावात एक छोटेखानी किल्लासुद्धा आहे, ज्यात पाणी वाहून न्यायच्या पन्हाळी -फलाज बघायला मिळतात. या किल्ल्यातून पूर्वीच्या काळी मसाफीच्या गावावर स्थानिक कबिल्याचे सैनिक पहारा देत. त्यांच्याकडे त्या काळच्या अतिशय महत्त्वाच्या खजिन्याच्या चाव्या होत्या, तो खजिना म्हणजे बारमाही उपलब्ध असलेलं पिण्यायोग्य पाणी.

“इथे जे पाणी मिळतं ना, तेच ‘मसाफी मिनरल वॉटर’ आणि आता फक्त त्याच पाण्याला स्थानिक प्रशासनाने ‘खोल जमिनीतून मिळणारं नैसर्गिक ‘शुद्ध पाणी’ अशी संज्ञा वापरायला परवानगी दिली आहे.” जमिनीखालच्या पाण्यामुळे इथे पिकणाऱ्या भाज्या आणि फळं अतिशय चविष्ट असतात. हे गाव पूर्वीच्या काळी फुजेराच्या किनारी भागातून यूएईच्या अंतर्गत भागात जाण्याच्या एकमेव मार्गावर वसलेलं असल्यामुळे ते अगदी तीस-चाळीस वर्षे आधीपर्यंत अतिशय महत्त्वाचं मानलं जाई. पुढे रस्ते बांधले गेले, बोगदे बांधून डोंगरांच्या आतून महामार्ग तयार झाले आणि या गावाला पर्याय निर्माण झाले…” आम्ही दोघे तिथल्या एका ‘फार्म हाऊस’च्या आवारात गेलो, तर तिथल्या अरबी मालकाने अगत्याने आम्हाला त्याची खजुराची बाग, भाज्यांचा मळा आणि दारासमोर बांधलेले त्याच्या मालकीचे चार उंट दाखवले. त्याच्याबरोबर आम्ही त्याच्या बागेत बसून छान अरबी पद्धतीच्या केशर घातलेल्या काळ्या चहाचाही आस्वाद घेतला.संतोष आणि मी तिथून निघालो, ते थेट फुजेराच्या ‘ऐन -अल मधब पार्क’मध्ये येऊन थांबलो. या जागी नैसर्गिक गरम पाण्याचे झरे आहेत, अशी माहिती संतोषने मला पुरवल्यावर माझं कुतूहल जागृत झालं.”इथल्या उष्ण वातावरणामुळे जमिनीखालचं पाणी गरम होतं आणि त्याचे नैसर्गिक उष्ण झरे वाफेच्या दाबामुळे वर येतात. या पार्कमध्ये असेच झरे आहेत, ज्यात सल्फर आहे. त्या पाण्याचे औषधी गुणधर्म इथल्या भागात खूप पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. अजूनही अनेक पर्यटक खास त्यासाठीच इथे येतात…..”

RohanSahityaMaifaljpg-1-1

पार्कमध्ये पुरुष आणि स्त्रियांसाठीचे वेगवेगळे भाग तयार करून तिथे झऱ्यांचं उष्ण पाणी वळवून स्थानिक प्रशासनाने या पार्कमध्ये नैसर्गिक ‘स्पा’ तयार केला आहे. दुबईप्रमाणे प्रत्येक गोष्टीला चकचकीत नेत्रदीपक पद्धतीने लोकांपुढे ‘पेश’ करण्याचं कसब मात्र फुजेराच्या प्रशासनाकडे नाही, कारण इतक्या मह्त्त्वाच्या नैसर्गिक पर्यटनस्थळाकडे म्हणावं तितकं लक्ष कोणीच दिलेलं नाही….

त्या दिवशीचा माझा सर्वाधिक उत्कंठावर्धक अनुभव म्हणजे बैलांची झुंज. संतोषने मला एका मोठ्या मैदानाच्या कडेला नेऊन माझी या प्रकाराशी ओळख करून दिली.

“१७-१८व्या शतकात इथे पोर्तुगीज लोक आले, आणि त्यांनी आपल्या संस्कृतीच्या या पाऊलखुणा इथे ठेवल्या…बैलांची झुंज फुजेराच्या स्थानिकांना अतिशय आवडते. दर शुक्रवारी बरोब्बर पाच वाजता इथे त्या झुंजींचा थरार अनुभवायला मिळतो. पंधरा-वीस मिनिटात इथे किती लोक जमतील ते तूच बघ.”

खरोखर माझ्या डोळ्यांसमोरून स्थानिकांचे ट्रक मोकळ्या जागेत येऊन उभे राहिले. त्याचे मागचे दरवाजे उघडले गेले आणि आतून चांगले धष्टपुष्ट, दणकट असे बैल बाहेर आले. त्यांना दोरखंडांनी बांधून चार/पाच लोक मैदानाच्या दिशेला घेऊन आले. ते बैल इतके फुत्कारत होते की चुकूनही त्यांच्यापैकी एखादा सुटला तर किती जणांचा जीव धोक्यात येईल ही कल्पना मनाला चाटून गेलीआणि मी थोडासा अस्वस्थ झालो…पण तसा प्रकार झाला नाही.’सुलेमान’ आणि ‘अली’नावाच्या दोन बैलांचा खरं तर सांडांचा पहिला सामना चांगलाच रंगला. दोघे सांड पूर्ण ताकदीने एकमेकांवरचाल करून गेले की लोकांमधून कल्ला ऐकू यायचा. मध्ययुगीन काळात शोभेल असा तो सोहळा माझ्यासारख्याला नाही म्हंटल तरी थोडासा चमत्कारिक वाटत होता, पण त्याची एक वेगळी मजासुद्धा होतीच. अर्ध्या तासात तीन झुंजी बघितल्यावर अखेर मी संतोषला तिथून निघायची विनंती केली. समोरच्या एका टेबल खुर्चीवर तोपर्यंत सांडांवर पैजा लागत होत्या आणि लोक दहा ते शंभर यापैकी कितीही दिरहॅमच्या पैजा लावत, आपण पैसे लावलेल्या सांडाच्या नावाने आरडाओरडा करत होते. हा सगळा प्रकार इथल्या ‘संस्कृतीचा’ भाग होता.

त्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्त होत असताना मी संतोषबरोबर हॉटेलमध्ये परतलो, तो संबंध दिवसाच्या चित्रविचित्र अनुभवांची शिदोरी घेऊन. बाजारापासून सुरू झालेल्या त्या भटकंतीची सांगता सांडांच्या झुंजीसारख्या हिंस्त्र प्रकाराने झालेली असली, तरी त्या सगळ्यात या चिमुकल्या अमिरातीचं अंतर्बाह्य दर्शन मला घडलेलं होतं. एकीकडे फोईझसारखी अतिशय प्रगत अशी तेलसाठ्याच्या व्यवसायातली कंपनी तर दुसरीकडे खजुराच्या बागेत आरामात ‘केसर चहा’ पीत मजेत दिवस घालवणारे स्थानिक अरब, अशा अतिशय विसंवादी गोष्टी अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या फुजेराबद्दल माझ्या मनात वेगळाच आदर निर्माण झाला. संतोषचा निरोप घेत असताना त्या हॉटेलच्या एका भिंतीवर लिहिलेल्या एका सुभाषिताने माझं लक्ष वेधून घेतलं…’ Cities give you friends, towns give you family but villages make you part of their family by befriending you!’ माझ्या फुजेराबद्दलच्या भावनांना इतकं समर्पक शब्दात मलाही मांडता आलं नसतं!Dalma island

या लेखमालिकेतील लेख

डेल्मा

हे आहे खरं अरबी जग… त्या काचेच्या उंच इमारती, मोठमोठे शॉपिंग मॉल्स ही काही आमची ओळख नाही…

लेख वाचा…


सर बानी यास

“ही साधी भटकंती नाहीये…. आखातातल्या अरब देशात चर्च सापडणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे माहीत आहे का तुला?”

लेख वाचा…टेहेळणी बुरु

“ही साधी भटकंती नाहीये…. आखातातल्या अरब देशात चर्च सापडणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे माहीत आहे का तुला?”

लेख वाचा…


कसर-अल-मुवेज

डोळे विस्फारून त्या तटबंदीची लांबी बघून मी बशरकडे बघितलं. ‘आता समजलं; अबू धाबी काय आहे ते?’

लेख वाचा…


जझीरात अल हमरा

‘अल जझीरा अल हमरा – घोस्ट टाऊन, रास अल खैमा’ असं लिहिलेलं होतं आणि ते वाचून माझी उत्सुकता चाळवली गेली…’

लेख वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *