‘साहित्य क्षेत्र’ हे सर्जनशील जनांचं, मनांचं क्षेत्र. तेव्हा, या क्षेत्रातील संबंधितांच्या कल्पनाविलासाला खाद्य पुरवणं हे प्रत्येक साहित्यसंमेलनाचं जणू आद्य कर्तव्य होय. या खेपेस वादाचं कोणतं निमित्त घडेल, याविषयीचे अंदाज बांधण्यात सर्जनशील मनं कामाला लागली होती. पण एकतर ‘संमेलनाचे अध्यक्ष’ विनानिवडणूक, एकमताने ठरले आणि इतरही सर्व सुरळीतपणे चालू होतं. तेव्हा या खेपेस ‘विकेट’ मिळणं कठीण दिसतंय, असं सर्व अंदाज वर्तवणाऱ्यांसाठी ‘निराशाजनक’ वातावरण निर्माण झालं होतं. पण हे वातावरण अचानक बदललं. भर उन्हात आकाश दाटून यावं तसं घडलं, आणि वादाचे काळे ढग जमून विजा कडाडायला लागल्या. विद्युतवेगाने वाद निर्माण झाले. या वादनिर्मितीच्या उगमस्थानी कोण याविषयी ‘सर्जनशील जन’ बुचकळ्यात पडले… ‘माहिती आहे, पण बोलता येत नाही’ अशी अवघड स्थिती. संबंधितांनी ‘गुगली’ टाकून त्यांच्या कल्पनाविलासाला चीत केलं. निसरड्या विकेटवर खेळायचं कसं, याविषयी संभ्रम निर्माण करण्यात संबंधित यशस्वी झाले. अशा परिस्थितीत आमच्या अरुणाताई आणि लक्ष्मीकांत देशमुख या उगवत्या व मावळत्या अध्यक्ष-जोडीने नेटाने बॅटिंग केली आणि ‘विकेट’ जाऊ दिली नाही. अधूनमधून शैलीदार स्ट्रोक्स मारून प्रेक्षकांची मनंही जिंकली आणि मॅचही ‘ड्रॉ’ करून दाखवली.
आपण पडलो साहित्य क्षेत्रातले, तेव्हा फेब्रुवारी अंकाचं मनोगत लिहिताना संमेलन हा विषय ओघाने येणारच होता. त्यात यवतमाळचं संमेलन अगदी कालचं म्हणजे १३ जानेवारीला पार पडलं. ‘रोहन साहित्य मैफल’चे प्रकाशक रोहन चंपानेरकर आणि संपादकीय टीमपैकी त्या-त्या महिन्याचा ‘कोऑर्डिनेटर’ यांनी कडक नियम आखून दिले आहेत… संपादकांचे मनोगत १४ तारखेपर्यंत आलंच पाहिजे. तेव्हा ही ‘डेडलाईन’ आणि संमेलनाचा अखेरचा दिवस दोन्ही तंतोतंत जुळून आलं. म्हणून सुरुवातीच्या ‘पॉवर-प्ले’ ओव्हर्स संमेलनासाठी खेळून घेतल्या. अन्यथा या मनोगतासाठी माझ्या मनात वेगळाच विषय घोळतोय… ज्यावर लिहावं असं अंतर्मन बरेच दिवस मला सांगत होतं, तो विषय आहे ‘मैत्री’ आणि साहित्य क्षेत्राशी संबंधित माझे काही जवळचे दिवंगत मित्र, स्नेही… अर्थात, अशोक जैन, डॉ. अरुण टिकेकर आणि श्रीकांत लागू ही तीन बहुपेडी व्यक्तिमत्त्वं. तिघांशीही ओळख आणि नंतर मैत्री किंवा स्नेह हा उणे-अधिक वीस वर्षांचा. तिघंही माझ्यापेक्षा वयाने (८ ते १२ वर्षांनी) मोठे. तिघांनीही माझं वैयक्तिक, सांस्कृतिक जीवन कोणत्या ना कोणत्या प्रकारे संपन्न केलं, प्रगल्भ केलं आहे. त्यांपैकी काहींचं निधन अनपेक्षितपणे झालं असं म्हणता येईल, तर काहींचं निधन मात्र धक्कादायक नव्हतं. आजचं एकंदर दीर्घायुर्मान पाहिलं तर तिघांचंही जाणं अकाली असंच म्हणावं लागेल आणि एवढं निश्चित की, तिघांच्याही जाण्याने जवळच्या मित्रांचं आधीच मर्यादित असलेलं माझं वर्तुळ आता अधिकच आक्रसून गेलं आहे, निस्तेज झालं आहे.
आयुष्यात जवळच्या मित्र-मैत्रिणींचं वर्तुळ असणं ही जीवन संपन्न करणारी गोष्ट आहे. आपलं आयुष्य, व्यक्तिमत्त्व हे जन्माने मिळालेल्या पार्श्वभूमीवर अवलंबून असतं, त्याचप्रमाणे ते आपल्या स्वत:च्या बळावर घडवलेल्या गोष्टींवरही अवलंबून असतं. उपजत गुणांना कष्टाची, निग्रहाची, चिकाटीची, जिद्दीची, प्रामाणिक प्रयत्नांची, बुद्धीच्या योग्य वापराची, योग्य नियोजनाची जोड दिली तर, आपलं आयुष्य प्राप्त परिस्थितीच्या पलीकडे जाऊन विकसित होऊ शकतं. त्याचप्रमाणे हे विकसित होणं आपल्या मित्रपरिवारावरही मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं, असं मला आवर्जून वाटतं. वास्तविक मैत्री ही आपसूक जमून जाते, ती प्रयत्नपूर्वक जमवता येत नाही. किंबहुना प्रयत्नपूर्वक प्रस्थापित केलेले संबंध म्हणजे खरी मैत्री नव्हेच, असंच म्हणावं लागेल. तसं म्हटलं तर, जवळच्या मित्रांचं एकच एक वर्तुळ नसतं. विविध प्रकारच्या मित्रांची विविध वर्तुळं असतात. आदर्श मैत्रीच्या ठराविक व्याख्या आणि त्यामागचं तत्त्वज्ञान कुणी कसंही सांगो, सर्व मित्रांसाठी एकच एक व्याख्या, एकच एक तत्त्वज्ञान लागू होत नाही. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर विविध प्रकारचे, भिन्न प्रकृतीचे मित्र मिळतात आणि त्या-त्या वेळी, त्या-त्या टप्प्यावर आपल्या विकसित होणाऱ्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे विविध मित्र मिळत जाणं, चांगली मैत्री जुळून येणं हे जीवनात आवश्यकही असतं. योग्य वेळी, योग्य व्यक्तीशी मैत्री जमून येणं हे खरं म्हटलं तर आपल्या हातात असतंही आणि नसतंही…
अशोक जैन, अरुण टिकेकर आणि श्रीकांत लागू हे मला माझ्या वयाच्या साधारण पंचेचाळीशीत भेटले. प्रकाशन व्यवसायामुळे झालेल्या या भेटींची वारंवारता जसजशी वाढत गेली, तसतशी एकमेकांच्या स्वभावाची, गुण-दोषांची, आवडी-निवडींची, कार्यशैलींची ओळख होत गेली आणि भेटींचं रूपांतर चांगल्या ओळखीत होत गेलं आणि ओळखींचं रूपांतर मैत्रीत होत गेलं. मैत्रीत होणाऱ्या रूपांतराची गतीही तिघांच्या बाबतीत वेगवेगळी होती. अशोकशी मैत्र खूपच लवकर जमलं, तर टिकेकरांशी सर्वांत कमी वेगाने. याची इतर काही कारणं असली तरी हेही खरं आहे की, दोघांच्या व्यक्तिमत्त्वाचा पिंड अगदी भिन्न होता. दोघंही त्यांच्या क्षेत्रातील मातब्बर व्यक्तिमत्त्वं. त्यांची कार्यशैली, त्यांची ‘वर्तुळं’ दोन टोकांची होती, पण दोघांशीही माझा स्नेह घट्ट होता. अशोकबरोबरच्या नात्याला ‘जिवलग मैत्री’ असं म्हणता येईल, तर टिकेकरांसोबतच्या नात्याला ‘आदरपूर्वक मैत्री’ असं संबोधता येईल. (मी असं म्हटलेलं टिकेकरांनाही मान्य होतं!)
अशोक आणि टिकेकर यांच्या ओळखी; ते अनुक्रमे ‘म.टा.’ व ‘लोकसत्ता’मध्ये संपादकपदावर असल्यापासूनच्या, तर श्रीकांत लागूची ओळख अशोकमुळे झाली. त्याचबरोबर हे तिघंही माझे लेखक किंवा अनुवादक झाले. अशोकने रोहनच्या ‘शास्त्री’ ते ‘फेलूदा’, ‘व्योमकेश बक्षी’ अशा ३०-३५ पुस्तकांचा अनुवाद केला आहे. त्याचे ‘कानोकानी’ आणि ‘अत्तराचे थेंब’ हे त्याच्या प्रतिभेचा, प्रगल्भतेचा, रसिकतेचा दाखला देणारे लेखसंग्रहही मी प्रसिद्ध केले आहेत. त्याचप्रमाणे टिकेकरांचीही ‘कालांतर’, ‘कालचक्र’, ‘Power, Pen and Patronage’ अशी बरीच पुस्तकं मी प्रकाशित केली आहेत. श्रीकांत लागूनेही माझ्यासाठी ‘शिखरावरून…’, ‘केवळ मानवतेसाठी’ अशा काही पुस्तकांचा अनुवाद केला आहे. त्याचे ‘कोंदण’ व ‘अमावस्येचा पूर्णचंद्र’ हे लेखसंग्रहही मी प्रसिद्ध केले आहेत. पण हे व्यावहारिक संबंध मागे पडून त्यांचं जिव्हाळ्याच्या संबंधांत, स्नेहात, मैत्रीत कधी रूपांतर झालं ते कळलंही नाही. अशोक अगदी मोकळा-ढाकळा, हरहुन्नरी. उत्साहाचा जणू धबधबाच. हा धबधबा कधी कधी थोपवावा असं वाटायचं. तो अतिशय संवेदनशील मनाचा होता. तीक्ष्ण बुद्धीचा अशोक मनाच्या एका कोपऱ्यात गंभीरही होता. त्याच्या एकंदर आविर्भावामुळे लोकांच्या नजरेतून हा गंभीर कोपरा कदाचित निसटत असेल; पण मी त्याला खूप जवळून पाहिलं आहे, आणि माझ्याकडून तो कोपरा कधीच निसटला नाही. सर्वत्र संचार करणाऱ्या व्यक्तीला पॅरॅलिसिसने १४ वर्षं घरी जवळपास जखडून ठेवलं, याचं त्याला काही वैषम्य वाटत नसेल? त्याबाबत तो गंभीर नसेल? पण एकदाही त्याने त्याचं प्रदर्शन केलं नाही, की नाराजी प्रकट केली नाही. उलट आपल्यालाच तो हरप्रकारे ऊर्जा देण्याचा प्रयत्न करायचा.
१८ फेब्रुवारी २०१४ रोजी त्याचं निधन झालं. त्याच्या तीन दिवस आधीच मी त्याला भेटलो. तो अत्यवस्थच होता. त्या स्थितीतही वृत्तीने तो ‘नॉर्मल’ अशोक होता आणि तेव्हाही त्याची विनोदबुद्धी शाबूत होती. निरोप घेतानाही त्याच्या नेहमीच्या स्टाईलने तो म्हणालाच…. ‘ओळख ठेवा…!’ अशोकबरोबर धम्माल क्षण जसे घालवले तसेच आमच्यात गंभीर चर्चांचीही सत्रं झाली. आमच्यात प्रेमळ संवाद झाले आणि खटकेही उडाले. वेळोवेळी मी त्याचे सल्ले घेतले, पण त्याला मात्र कुणाचा सल्ला घेणं शक्य नव्हतं…, तर असा हा अशोक म्हणे की ‘ओळख ठेवा’…!
टिकेकरांच्या व्यक्तिमत्त्वातला गंभीर भाग हा जास्त प्रभावी होता. ते अभ्यासू होते आणि त्यात त्यांची चर्याही अभ्यासू अशी. त्यामुळे ते रसिकही आहेत, मिष्किलही आहेत, निरागसही आहेत, भावनाशील आहेत, माणसांत रमणारे आहेत हे कळायला त्यांच्याशी जवळचा स्नेहच जुळावा लागतो. त्यांच्या स्वभावातील असे अनेक पैलू मला जवळून अनुभवता आले एवढं निश्चित. टिकेकरांचं निधन झाल्याचं ऐकून (१९ जानेवारी २०१६) खरोखरीच मोठा धक्का बसला. त्यांच्याबरोबर झालेले प्रवास, भेटी-गाठी, चर्चा, थोडे वाद-विवाद, नेहमीच आठवतात. ते सर्व क्षण आयुष्य खऱ्या अर्थाने ‘श्रीमंत’ करणारे होते.
श्रीकांत लागू अर्थात ‘दाजी’ मला खूपच सिनियर होता व सर्वांत ज्येष्ठही. पण त्याची एनर्जी लक्षात घेतली तर त्याला ‘ऑलवेज यंग’ असं म्हणता येईल. हिरे-मोती व्यवसायातली ही व्यक्ती अशी ‘वल्ली’ असू शकते का? पंचतारांकित पार्टीज, गुबगुबीत शेटजी, मोठे सेलिब्रिटीज यांच्यात रमण्यापेक्षा तो साहित्य, नाटकं, गायन, निसर्ग, ट्रेकिंग, पिठलं-भाकरी यांत रमायचा. सामाजिक काम करणाऱ्या संस्थेशी संलग्न रहायचा. त्या वयातला त्याचा उत्साह, एनर्जी पाहून डॉ. श्रीराम लागू त्याला ‘सुपर ह्यूमन’ म्हणायचे. ‘यंग’ दाजी या मनस्वी व्यक्तीची तब्येत अचानक खालावत गेली आणि ७ मे २०१३ रोजी त्याचं निधन झालं. त्याचा साधेपणा, निरागस बिलंदरपणा, त्याचे प्रेमळ आग्रह सर्व काही विलक्षण होतं.
या तिन्ही व्यक्तिमत्त्वांत अनेक गुणविशेष असले तरी, त्यांच्या वागण्या-बोलण्यात, व्यक्तिमत्त्वांत अनेक विसंगतीही होत्या. पण त्याचमुळे नात्यात ‘मनॉटनी’ येत नाही आणि नाती अधिक दृढ होतात, अशी माझी धारणा आहे. मैत्रीच्या नात्यात तर या जिवंतपणाची ‘पूर्वअट’च असावी…
…जीवनात मृत्यू अटळ आहे. तो कधी येतो काहीच सांगता येत नाही. तेव्हा त्याविषयी दु:ख व्यक्त करायलाच हवं का? ‘आनंद’ चित्रपटात फेमस डायलॉग आहे… ‘बाबू मोशाय, जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिए…’ त्याचाच आधार घेऊन म्हणता येईल की, माझा या तिघांसोबतच्या मैत्रीचा कालखंड प्रदीर्घ होता असं नव्हे; पण तो मला संपन्न करणारा, माझ्या जीवनकक्षा रुंदावणारा तो कालखंड होता एवढं निश्चित.
-प्रदीप चंपानेरकर
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल फेब्रुवारी २०१९
लेखातील ‘तीन बाबू मोशायां’बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी…
पत्रकार, लेखक, संशोधक अरुण टिकेकर यांचा परिचय
टिकेकरांचं व्यक्तिमत्त्व भारदस्त, तर चर्या अभ्यासकाची, गंभीर होती. स्वभावाने ते परखड, तर वृत्तीने अलिप्त होते… पण अशा प्रतिमेपलीकडचेही टिकेकर होते… निरागस, हळुवार, भावुक, चोखंदळ…
अनुवादक, पत्रकार व लेखक अशोक जैन यांचा परिचय
‘रोहन’चे एक ‘कलंदर’ लेखक. पत्रकारिता, अनुवाद, सदर लेखन ते ललित लेखनामध्ये अनेक वर्षं मुशाफिरी केलेला ‘ज्येष्ठ लेखक’ म्हणून परिचित होते.
हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व, लेखक व अनुवादक श्रीकांत लागू यांचा परिचय
सागरसफरीत आनंद लुटणारं, आकाश निरीक्षणात गुंगून जाणारं व धरतीवरील गिरीशिखरं पादाक्रांत करण्याचा रोमहर्षक अनुभव घेणारं श्रीकांत लागू हे एक हा दिलदार–दिलखुलास व्यक्तिमत्त्व होतं..
रोहन शिफारस
अमावस्येचा पूर्णचंद्र
अर्थात ग्रहण-भ्रमण
अमावस्येचा पूर्णचंद्र म्हणजे देशा – विदेशातील विविध छटांमधील ग्रहणं बघण्यासाठी केलेली मनसोक्त भटकंती ! पुस्तकाचे लेखक श्रीकांत लागू यांनी पहिलं सूर्यग्रहण बघितलं होतं- वयाच्या आठव्या – नवव्या वर्षी. त्यावेळी निर्माण झालेल्या कुतूहलापोटी पुढील आयुष्यात लागूंनी अक्षरशः झपाटल्याप्रमाणे अनेक ठिकाणी जाऊन ग्रहणं अनुभवली. त्यांच्या दृष्टीने ग्रहण म्हणजे आकाशात घडणारं अद्भुत नाट्य. ते पाहून डोळ्याचं पारणं फिटतं पण मन मात्र भरत नाही. हुबळी, डायमंड हार्बर, कच्छ, झांबिया, द . आफ्रिका, टर्की, चीन, रामेश्वरम् अशा देश – विदेशातील अनेक ठिकाणी त्यांनी खग्रास सूर्यग्रहणाचा जणू पाठलागच केला! ते स्वत : खगोलशास्त्रज्ञ नाहीत किंवा अंतराळशास्त्रज्ञही नाहीत. तरीही एखाद्या निरागस पण जिज्ञासू वृत्तीच्या मुलाप्रमाणे ते ग्रहणाचं रोमांचपूर्ण वर्णन करतात.
₹125.00Add to cart