WebImages_AnawatWata_motyanchyaVyaparanchaghar

जझीरात अल हमरा (अरबस्तानच्या अनवट वाटा)

फॉन्ट साइज वाढवा

“भुताच्या गावाला येणार का?”

माझ्या ऑफिसमधला माझ्यासारख्याच चित्रविचित्र जागांची भटकंतीकरण्याची आवड असणारा मोहम्मद एके दिवशी अचानक समोर उभा राहिला. त्याच्या हातात दोन-तीन कागद होते. त्याने ते माझ्या हातात ठेवले आणि ‘ब्रेक झाला की बोलू’ असं सांगून तो त्याच्या जागेवर जाऊन बसला. त्या कागदावर ‘अल जझीरा अल हमरा घोस्ट टाऊन, रास अल खैमा’ असं लिहिलेलं होतं आणि त्या जागेची माहिती होती. माझी उत्सुकता चाळवली गेली आणि हातातलं काम बाजूला ठेवून मी ‘गुगल’ची वेबसाईट सुरू केली. जसजशी या विचित्र जागेबद्दल मला माहिती मिळत गेली, तसतशी माझी ती जागा बघायची इच्छासुद्धा प्रबळ व्हायला लागली.

भारतातल्या ‘कुलधारा’ किंवा ‘भानगढ’सारख्या राजस्थानमधल्या ‘झपाटलेल्या’ जागांबद्दल मी खूप वाचलेलं होतं. मध्य प्रदेशातल्या मांडू येथे तर मी ५ दिवस राहूनही आलेलो होतो; पण तशीच एखादी जागा मला युएईमध्ये बघायला मिळेल असा विचार माझ्या मनाला कधीच शिवला नव्हता. थंडीचे दिवस असल्यामुळे ‘जझीरात अल हमरा’चं ऊन विशेष त्रास देणारं नाही, या उद्देशाने मोहम्मदने आमच्या ऑफिसच्या चार-पाच जणांबरोबर ही भटकंती करायचं ठरवलेलं होतं.


हेही वाचून पहा : रोहन शिफारस

ऑफबिट भटकंत

‘कन्डक्टेड टुर्स’ची वेगळी अनुभूती देणारं, थोडं अंतर्मुख करणारं प्रवासवर्णन…

खरेदी करा


त्याच आठवड्याच्या शनिवारी सकाळी सकाळी न्याहारी करून आम्हा सात जणांच्या दोन गाड्या रास अल खैमा अमिरातीच्या दिशेला निघाल्या. ताशी १२० किलोमीटरच्या वेगाने मुख्य महामार्गावरून आम्ही निघालो होतो. का कुणास ठाऊक, पण ‘वेडात दौडले…’च्या शब्दांची उगीच आठवण येत होती. या भुताटकीच्या गावाचे अनेक किस्से (खरे खोटे देवास ठाऊक…) आंतरजालावर वाचलेले होते…. त्यात ‘आम्ही प्रत्यक्ष भूत बघितलं’पासून ते ‘आम्हाला काहीच वाटलं नाही’पर्यंत सगळे अनुभव तिथे गेलेल्यांनी लिहून ठेवले होते. मोहम्मदने या गावाची भरभरून माहिती काढली होती, तेव्हा त्यालाच प्रश्न विचारावा म्हणून मी संभाषणाचा शुभारंभ केला.

तुम्हाला माहित्ये का, या गावात अनेकांना भुतं दिसलेली आहेत.

“या गावाबद्दल सांग ना जरा आम्हाला…”

“जझीरात अल हमरा घोस्ट टाऊन या नावातच आलं ना रे सगळं….”

“अरे, पण या गावाला काहीतरी इतिहास – भूगोल असेल ना?”

“अच्छा तसं…हो आहे ना…” मोहम्मदने सावरून बसत आपल्या माहितीच्या पोतडीतून एकएक दंतकथा बाहेर काढायला सुरुवात केली.

“जझीरात अल हमरा हे गाव खूपखूप जुनं आहे. कधी काळी एका छोट्याशा बेटाचा भाग असलेलं हे गाव साधं मच्च्छिमारांचं गाव होतं रे… आणि जोडीला इथला मुख्य धंदा -मोतीशिंप काढायचा – होताच. अगदी सत्तर -ऐंशी वर्षांपूर्वीपर्यंत हे गाव बऱ्यापैकी गजबजलेलं होतं बरं का… या गावाच्या नावाचा शब्दशः अर्थ होतो ‘लाल रंगाचं बेट.’ लाल रंग म्हणून लगेच रक्त वगैरे विषय मनात नको आणूस, इथल्या वाळूचा रंग लालसर असल्यामुळे या गावाला असं नाव पडलं…”

आमच्या गाड्या आता या गावाच्या वेशीपाशी आलेल्या होत्या. समोर अथांग वाळूचा पसारा, अधूनमधून दिसणारी भग्नावस्थेतली जुन्या अरबी धाटणीची घरं, अर्धवट रंग उडालेल्या आणि गंजलेल्या चार-पाच गाड्या, वर्षानुवर्षे वाळूत पाडून राहिलेल्या होड्या असं काय काय आम्हाला समोर दिसत होतं. मांडूला जुन्या इमारतींच्या भागात असा भकासपणा मी अनुभवलेला होता; पण तरीही तिथे मला रिकामेपणा जाणवला नव्हता. नाही म्हणायला प्राणी, पक्षी आणि पर्यटक तिथे होते… पण हे गाव अक्षरशः अंगावर येत होतं.

गरीब कोळ्याचं घर

१९६८ साली या भागातून स्थानिकांनी काढता पाय घेतला. कारण काय, तर अबू धाबीच्या भागात आलेल्या संपन्नतेमुळे इथल्या रहिवाशांना स्थलांतर करावंसं वाटायला लागलं. मासेमारी करून विशेष उत्पन्न मिळेनासं झालं होतं… मोतीशिंपांचा व्यापार डबघाईला आलेला होता… अशा वेळी कुठूनतरी नवी सुरुवात करायची गरज स्थानिकांना भासायला लागलेली होती. हळूहळू हे गाव ओस पडत गेलं आणि निसर्गाने या गावाचा ताबा घेतला. स्थानिकांनी आपलं किडूकमिडूकबरोबर घेऊन गाव जे सोडलं, ते कायमचं.

अचानक तिथे एक भली मोठी ‘निसान आरमाडा’ येऊन थडकली आणि धूळ उडवत एका बाजूला येऊन विसावली. त्यातून एक मध्यमवयीन अरब मनुष्य बाहेर पडला, तो हातात भला मोठा कॅमेरा आणि लेन्स घेऊन. त्याच्याशी थोडं बोलल्यावर आम्हाला समजलं, की तो मूळचा लेबनॉन देशाचा पण आता ‘हे विश्वची माझे घर’च्या वाटेवर निघालेला एक माहितीपट दिग्दर्शक होता. त्याचं नाव ‘सॅम’ – मूळचा सामीर. त्याने त्या गावाशी निगडित असलेल्या काही खास किश्श्यांचा खजिना आमच्या समोर उघडला.

“तुम्हाला माहित्ये का, या गावात अनेकांना भुतं दिसलेली आहेत. मला अशा ठिकाणांचे माहितीपट बनवायला आवडतं, म्हणून मी आज इथे आलोय. आत्ताच मागच्या आठवड्याचा किस्सा सांगतो – चार-पाच तरुण मित्रांचं एक टोळकं रात्रीच्या वेळी या गावात आलं होतं. त्यांना इथे नुसतंच एक-दोन तास फिरायचं होतं, शेकोटी पेटवून बार्बेक्यू करायचा होता, बहुतेक मोठ्या आवाजात गाणी लावून थोडा धांगडधिंगासुद्धा करायचा असेल… पण त्यांनी इथल्या एका घराच्या समोरच्या अंगणात दगड रचून कोळसे पेटवायला सुरुवात केली, आणि त्यांना विचित्र अनुभव यायला लागले. दोघा -तिघांना घराच्या आतून कोणीतरी त्यांच्याकडे बघत असल्याचा भास झाला….त्यांनी गाणी लावायचा प्रयत्न केला तर सतत खरखर ऐकू यायला लागली….एकाने गावाचे फोटो काढायचा प्रयत्न केला तर डिजिटल कॅमेरा असूनही धुरकट फोटो आले….शेवटी सगळ्यांना झाल्या प्रकारची इतकी भीती वाटली की, त्यांनी तिथून निमूटपणे काढता पाय घेतला. गाडी फिरवली, तेव्हा काही मिनिटांसाठी ती वाळूत अडकलीसुद्धा….त्या तरुणांनी पुढे या अनुभवावर फेसबुकवर लिहिलं होतं. त्यांचा असा ठाम दावा आहे की, या गावात जुन्या गावकऱ्यांचे ‘जिन्ना’ अजून गावाचं रक्षण करायला इथेच राहिलेले आहेत…. “

घराच्या पडवीसमोरचे भग्नावशेष

मोहम्मदला हे सगळं ऐकून चांगलीच मजा वाटली…त्याने मुद्दाम ‘सॅम’ला या गावाबद्दल अधिकची माहिती विचारायला सुरुवात केली. दोघे अरबी असल्यामुळे असेल, पण सॅमसुद्धा त्याच्या विनंतीला मान देऊन आमच्या बाजूला दगडावर बसला आणि एकदम धो धो बोलायला लागला.

“अरे हे गाव आहे मूळचं चौदाव्या शतकात वसलेलं. एकूण तीन टोळ्या इथे तेव्हा होत्या. त्यात ‘झाब टोळी’ – ज्याला कबिला म्हणतात -सगळ्यात प्रबळ. त्यांनी आणि त्यांच्याच वंशजांनी बराच काळ गावाचं प्रमुखत्व सांभाळलं असं म्हणतात. त्यांच्यात थोड्याफार कुरबुरी झाल्या असल्या तरी गावात तशी शांतता होती. असं म्हणतात, की गाव सोडल्यावरही इथले मूळचे गावकरी अधूनमधून गावी येत असत. कदाचित त्यांचेच ‘जिन्ना’ इथे अजून राहात असतील…कारण आजूबाजूच्या स्थानिकांना तुम्ही विचारायला गेलात तर ते रात्री या भागात यायला कधीच तयार होतं नाहीत. इथल्या स्थानिक समजुतींप्रमाणेपूर्वजांच्या जिन्नांना त्रास होईल असं वागायचं नसतं….त्यामुळे ते या भागात विशेष फिरकत नाहीत….”

या सगळ्या गोष्टी सुरस असल्या तरी, या गावाकडे बघून इथे भुतं राहात असतील असं मला काही वाटलं नाही. युरोपमध्ये अशी जागा असती, तर त्यांनी तिथे पर्यटनस्थळ आकाराला आणलं असतं. नाही म्हणायला या गावाच्या आजूबाजूला इथल्या प्रशासनाने पर्यटनाच्या सोयी उपलब्ध केलेल्या आहेत, पण त्या, या गावच्या वेशीवरच्या अल जझीरा अल हमरा किल्ल्याच्याच भागात आहेत. या किल्ल्याच्या परिसरात रास – अल -खैमा अमिरातीचं सरकार दरवर्षी ‘आर्ट फेस्टिवल’ आयोजित करतं.

आम्ही या गावात भटकत असताना आम्हाला इथे एखाद्या जुन्या अरबी गावात जे जे काही असायचं, ते ते सगळं दिसलं. साधी कुडामातीची छोटेखानी घरं इथल्या गरीब गावकऱ्यांची होती, तर दुमजली मोठी घरं इथल्या श्रीमंतांची. त्या ‘श्रीमंत’ घरांना पुढल्या भागात अंगण होतं, पडवी होती, छतावर जायला मातीचे जिने होते आणि लाकडाची नक्षीकाम केलेली दारंसुद्धा होती-अगदी कडी-कोयंड्यासकट. ही घरं इथल्या मोत्यांच्या व्यापाऱ्यांची होती. या घरांच्या भिंतींवर नक्षीकाम होतं.

मध्यमवर्गीयाचं घर

इथे चार -पाच छोट्या छोट्या मशिदीही होत्या…पण गावच्या अगदी टोकाला असलेली ‘अलझाब मशीद’ चांगली मोठी होती. ही मशीद गावची ‘जुम्मा मशीद’ असावी. एक छोटेखानी बाजार गावच्या मधल्या भागात होता. तिथे कुडाच्या झापांखाली तयार केलेले चबुतरे होते. स्थानिक दुकानदार तिथेच आपलं जिन्नस मांडत असावेत. इथले रस्ते घरांच्या आजूबाजूच्या भागातून वेगवेगळ्या दिशेला पांगत होते. या गावाची वेस बऱ्यापैकी मोडकळीला आलेली असली, तरी जुन्या काळात तीवेस तटबंदीसारखी गावाला संरक्षण देत होती हे नक्की. गावाच्या कोणत्याही कोपऱ्यातून किल्ल्याचा उंच गोलाकार मनोरा तेवढा लगेच दिसत होता. अरबी गावाची सगळी वैशिष्ट्य इथे अगदी मुळाबर हुकूम अवस्थेत बघता येत होती. दुपारच्या वेळी आम्ही सगळे जण पोटातल्या भुकेमुळे भानावर आलो, अन्यथा गावात हिंडताना नकळत आम्ही सगळेजण त्या गावचेच होऊन गेलो होतो. सकाळचा थोडा वेळ मनसोक्त छायाचित्रण केल्यावर पुढे तीन-साडेतीन तास तर आम्ही नुसतेच हिंडत होतो. मासेमारी करणाऱ्या आणि मोती विकणाऱ्या साध्यामाणसांचं ते गाव चकचकीत टोलेजंग इमारतींच्या शहरांपेक्षा आम्हाला जास्त जवळचं वाटत होतं.कधी काळी जीवघेण्या उन्हाळ्यात आणि हाडं गोठवणाऱ्या थंडीत इथली माणसं कशी राहिली असतील याची कल्पना करूनही आमच्या अंगावर शहारे येत होते. आमची गाडी जसजशी गावापासून लांब होत गेली, तसतशी त्या गावाने आमच्यावर केलेली जादू कमी व्हायला लागली. गावच्या जिन्नांनी आमच्यावर मोहिनी तर टाकली नसेल ना, असा विचार माझ्या मनाला चाटून गेला आणि त्या कारणाकरता का होईना, पण त्या गावी ‘जिन्ना’ आहेत यावर मला विश्वास ठेवावासा वाटायला लागला.

‘Travel is the only thing on which, the more you spend, the richer you become…. ‘असं कुठेतरी मी वाचलेलं आठवतं… जझीरात अल हमराला भेट दिल्यावर त्या वाक्याचा अर्थ मला नव्याने उमगला.

– आशिष काळकर


रोहन प्राइम

वाचकांसाठी एक खास सभासद योजना!

‘रोहन प्राइम’ म्हणजे भरघोस सवलती, विशेष कार्यक्रम आणि नाविन्यपूर्ण उपक्रम… फक्त सभासदांसाठी! मेंबरशिप घेतल्यावर रु.१००चे कूपन भेट…. हक्काची २५ टक्के सवलत आणि बरंच काही…

अधिक माहिती जाणून घ्या..

250.00Add to Cart


Dalma island

या लेखमालिकेतील लेख

डेल्मा

हे आहे खरं अरबी जग… त्या काचेच्या उंच इमारती, मोठमोठे शॉपिंग मॉल्स ही काही आमची ओळख नाही…

लेख वाचा…


सर बानी यास

“ही साधी भटकंती नाहीये…. आखातातल्या अरब देशात चर्च सापडणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे माहीत आहे का तुला?”

लेख वाचा…



टेहेळणी बुरु

“ही साधी भटकंती नाहीये…. आखातातल्या अरब देशात चर्च सापडणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे माहीत आहे का तुला?”

लेख वाचा…


कसर-अल-मुवेज

डोळे विस्फारून त्या तटबंदीची लांबी बघून मी बशरकडे बघितलं. ‘आता समजलं; अबू धाबी काय आहे ते?’

लेख वाचा…


Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *