फॉन्ट साइज वाढवा
“योग्य वयात सगळं झालं की बरं असतं” असा जेव्हा वाक्याचा शेवट होऊ लागतो; तेव्हा हमखास समजावं की कोणत्यातरी लग्नाळू मुला-मुलीला कोणी आस्थेने, मायेने किंवा आगाऊपणे न विचारलेला सल्ला देत आहे.
मुळात हा सगळा होरा दुसऱ्याच एका सामाजिक कर्तव्यपूर्तीची नांदी असतो, तो म्हणजे प्रजननाचा!
समाजाच्या मूळ प्रवाहात; सातत्याने सामाजिक चौकट धरून; मान्यताप्राप्त स्त्री-पुरुष संबंधातून निर्माण झालेली औरस मुले, म्हणजेच संपूर्ण एक पिढी काळाच्या पडद्याआड जातेवेळी, त्यांना पर्याय म्हणून तयार झालेली अशीच आहे.
नगास नग! जेणेकरून संपूर्ण सामाजिक व्यवस्था बिनघोर सुरू राहील. ही व्यवस्था अशीच सुरू राहावी म्हणून काही व्यवस्था निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्यातली एक महत्वाची संस्था म्हणजे ‘लग्न संस्था.’ ह्यातील इतर गृहीतके अशी की, शक्यतो हे जोडपे समधर्मी असावे, समवर्णी असावे आणि समजातीचेदेखील असावे. पुढे असे की, पुरुष हा स्त्रीहून वयाने, उंचीने आणि आर्थिकदृष्ट्या मोठा/उच्च असावा. स्त्रीने कनिष्ठ पद स्वीकारत घर सांभाळावे, मुलं सांभाळावी आणि नोकरी ही केवळ कुटुंबाला हातभार म्हणून करावी. आता गेली अनेक शतकं ही गृहीतकं आणि व्यवस्था बिनघोर काम करत आलेली आहे. मात्र, बदलत्या काळाचे तडाखे ह्याही व्यवस्थेला सोसावे लागणार आहेतच.
समाजाच्या विस्तारणाऱ्या कक्षा, ज्यात आता समलैंगिक संबंध, भिन्न पदरी लैंगिक आणि वैचारिक अस्तित्व असलेल्या व्यक्ती ह्यांचा समावेश होऊ लागला आहे. तसेच स्त्रियांचे शिक्षण, गर्भनिरोधकांचा निर्माण आणि वाढता वापर, कुटुंबाचे बदललेले स्वरूप ह्यातून आता जे निराळे सामाजिक आयाम तयार झाले आहेत, त्याने पूर्वीची बरीच गृहीतकं आता डळमळीत होऊ लागली आहेत. जगभरात लोकसंख्येचे आकडे १९७०पासून हळूहळू मंदावत चालले आहेत. प्रगत देशांत हे आकडे आता वैयक्तिक निवडस्वातंत्र्याचे प्रतीक न राहता, राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय धोरणांचे जनक ठरू लागले आहेत. आणि मग आपण फिरून मूळ मुद्द्याकडे येतो, “मुलं हवीत का?”
राष्ट्र ही संकल्पना जोवर दृढ आहे, समाज आहे त्या पदावर फिरू पाहत आहे, तोवर राजकारणी, समाजकारणी, पारंपरिक कुटुंब पद्धतीचे प्रचारक, ह्यांच्या दृष्टीने, “मुलं हवीत का?” ह्या प्रश्नाचे उत्तर कायम “हो” असेच असणार आहे. मात्र, मुलांना जन्माला घालायची जबाबदारी निसर्गाने स्त्रियांना दिली आहे. त्यामुळे त्यांची मतं, अशा मुलांचा सांभाळ करणारे जोडीदार; ह्यांची मतं, त्यांचे दृष्टिकोन जर समजून घेतले तर अधिक बरे होईल.
हेही वाचून पहा : रोहन शिफारस
हॅपी लग्न डॉट कॉम
लग्न झालेल्या किंवा होऊ घातलेल्या अन् सुखी सहजीवनाच्या शोधात असलेल्या प्रत्येकासाठी…
जर ‘समाजाची पेशी’ म्हणून कुटुंबाकडे बघितले तर असे लक्षात येईल की, ह्या पेशींच्या पातळीवरच अभूतपूर्व असे बदल गेल्या ४०-५० वर्षात घडलेले आहेत. पूर्वीचे एकत्र कुटुंब हळूहळू लयास जाऊन, त्रिकोणी आणि चौकोनी कुटुंबांचीदेखील एक पिढी सरली आहे. आता कुटुंब म्हणजे केवळ एक व्यक्तीदेखील असूच शकते. व्यक्तिकेंद्री समाजात, लग्न, मुलं, हेदेखील काहीशा बाहेरच्या परिघात येतात. म्हणून मग आता महत्त्व आहे ते व्यक्तिगत प्रगतीला आणि स्वास्थ्याला.
अशी एका माणसाची कुटुंबं आजकाल शहराशहरांतून दिसू लागली आहेत. ह्या कुटुंबातील एकुलते एक सदस्य हे उत्तम कमावते असते, स्वतःच्या आवडीनिवडी आणि अभिरुची जपत जगत असते आणि समाजाशी कररूपी नाळेने आणि इतर काही बंधनाने जोडलेले असतेच! ह्याहून थोडी मोठी कुटुंबं आहेत ती दोन स्वतंत्र व्यक्तींची. ह्यात हे दोघे भिन्नलिंगी जोडीदार असू शकतात किंवा समलिंगी. स्वतःचे करिअर, सामाजिक पत आणि ध्येय जपत ही मंडळी उत्तम असे आयुष्य आनंदात व्यतीत करत आहेत. ह्या दोन्ही कुटुंबात कधी कोणते पाळीव प्राणी असू शकतात.
खरेतर ही मंडळी स्वतःचे निराळे असे काही जोरदार बंड उभे करत नाही आहेत, तरी ह्यांचे व्यक्तिगत निर्णय, समाजमनात खोलवर झिरपलेल्या समजुतींवर प्रहार करत असतात. म्हणून पुष्कळदा ह्या लोकांना सामाजिक कटुता, क्रोध अथवा कुचेष्टेला सामोरे जावे लागते. ह्या प्रकारच्या व्यक्तिकेंद्री कुटुंबांची वाढ खुंटावी म्हणून अनेक देशांत विविध कायदे राजरोसपणे करण्यात येतात. समलैंगिक संबंधांना मान्यता नाकारणे, स्त्रियांना गर्भपात करण्यावर निर्बंध लावणे, बलात्कारासारख्या गुन्ह्यांना कठोर शिक्षा न करणे, मुलींना उच्च शिक्षण नाकारणे, विवाहपश्च्यात जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याबाबत कठोर कायदे न करणे इत्यादी. हे कायदे प्रगत देशांत अधिक प्रमाणात आढळतात हेही समजून घेणे आवश्यक आहेच.
ह्या सगळ्याच्या जोडीला, पर्यावरणाचा बिघडता समतोल, वाढत चाललेले वातावरणातील बदल आणि नैसर्गिक आपत्ती; ह्या सगळ्याचा विचार करता, अनेक तरुण मंडळी मूळ कुटुंबसंस्थेच्या व्याख्येतच बदल करू लागली आहेत.
रोहन प्राइम
वाचकांसाठी एक खास सभासद योजना!
‘रोहन प्राइम’ म्हणजे भरघोस सवलती, विशेष कार्यक्रम आणि नाविन्यपूर्ण उपक्रम… फक्त सभासदांसाठी! मेंबरशिप घेतल्यावर रु.१००चे कूपन भेट…. हक्काची २५ टक्के सवलत आणि बरंच काही…
अधिक माहिती जाणून घ्या..
₹250.00Add to cart
तर, अशा बदलत चालेल्या समाजात; अमेरिका, इंग्लड ह्या देशांत आता जवळ जवळ २०टक्के स्त्रिया आहेत ज्यांना मुलं नाही आहेत. ह्या स्त्रियांचे वर्गीकरण चार प्रकारे करता येईल.
पहिला प्रकार : अशा स्त्रिया ज्यांना शारीरिकदृष्ट्या काही मर्यादा असल्याने मुलं होऊ न शकणं.
दुसरा प्रकार : अशा स्त्रिया ज्यांना योग्य असे जोडीदार अथवा संधी न मिळाल्याने मुलं न होणे.
तिसरा प्रकार : अशा स्त्रिया ज्यांनी मुलं होणं पुढे ढकललं, करिअर, कौटुंबिक जबाबदारी इत्यादीमुळे.
चौथा प्रकार : अशा स्त्रिया ज्यांनी स्वतःला मुलं न होऊ देण्याचा निर्णय जोडीदारासोबत, अथवा एकट्याने ठरवून घेतलेला आहे.
ह्या संपूर्ण वर्गीकरणात स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवणं महत्त्वाचं आहे, कारण मुलं होऊ देणं अथवा न होऊ देणं, हा अधिकार सर्वस्वी स्त्रियांचा असायला हवा आहे. आजच्या बदलेल्या काळात जेव्हा स्त्री शिक्षण, वैद्यकीय प्रगती ह्यांच्या जोरावर स्त्रिया पुष्कळ प्रमाणात स्वतंत्र झाल्या आहेत, तेव्हादेखील एकाअर्थी त्या निराळ्या सापळ्यात अडकल्या आहेतच. स्त्रियांची जी वर्षं मुलं होऊ देण्याची आहेत, साधारण २०-३५; ह्याच काळात त्यांना शिक्षण संपवून करिअर सुरू करून ते प्रस्थापित करायचे असते. शिवाय त्याच काळात कदाचित प्रथमतः स्वतःची व्यक्तिगत, लैंगिक आणि शारीरिक ओळख करून घ्यायची असते. त्याच काळात योग्य जोडीदार निवडून त्याच्याशी जुळवून घ्यायचे असते. त्याचबरोबर लग्नामुळे आलेले विस्थापितपण पचवून निराळ्या घरात, राज्यात तर कधी देशात स्वतःचे नवे अस्तित्व उभे करायचे असते. त्यामुळे एकीकडे मुलींवर आणि काही प्रमाणात मुलांवर ह्याच पंधरा वर्षांच्या अवधीत पुष्कळ बदल समोर येतात आणि त्यातील प्रत्येक निर्णयाचे पडसाद, त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर पडणारे असतात. जागतिकीकरणामुळे ह्या पेचांमध्ये भरच पडली आहे. परदेशी नोकरी व्यवसायाच्या संधी, वातावरणातील बदलांमुळे बिघडलेली शेतीची घडी, अनेक देशांतील राजकीय अराजक, जगभरातील नोकरीच्या वेळांमुळे बदलेली शरीरातली तंत्रं, ह्या सगळ्याचे परिणाम प्रत्येक व्यक्तीवर, त्यांच्या निर्णयांवर आणि सरतेशेवटी संपूर्ण मानवजातीवर होत आहेत.
नव्या प्रश्नांना सामोरं जाणारे तरुण, साहजिकच काही गोष्टी सोडून देत आहेत अथवा पुढे ढकलत आहेत. त्यात मग स्वतःचा व्यक्तिगत लैंगिक शोध असेल, अथवा जोडीदाराची सुयोग्य निवड असेल किंवा मुलं होऊ देणं असेल.
मुलं होऊ देणं हे जरी व्यक्तिगत वाटलं, तरी हा निर्णय काही सामाजिक चौकटीत रुजल्यामुळे त्याचे परिणाम सर्वत्र जाणवतात; अधिक करून स्त्रियांना. कोणत्याही पुरुषाला सहसा त्याच्या मुलं असण्यानसण्यावरून फारसे काही बोललं जात नाही. मात्र कोणत्याही अनोळखी स्त्रीला, मग ती कितीही उच्च शिक्षित असो, उच्च पदस्थ असो, तिला हमखास पहिल्या पाच प्रश्नात मुलांबद्दल प्रश्न विचारलाच जातो, आणि नकारार्थी उत्तर दिले तर त्यावर तिला कधी नको असलेली सहानुभूती, अथवा तिच्या प्रति राग, हिणकस विचार अथवा इतर नकारात्मक विचार आपोपाप मिळतात. त्यामागील विचारमाला हीदेखील रंजक आहे. मुलं नाहीत म्हणजे कदाचित ही वंधत्व अनुभवत असेल, म्हणजे ती काही प्रमाणात कनिष्ठ आहे. मुलं नको म्हणजे ही शरीरसंबंधांकडे केवळ मनोरंजन म्हणून बघत असावी. मुलं नको म्हणजे ही पाषाणहृदयी, निष्ठुर अशी असणार. मुलं नको म्हणजे ही स्वार्थी, स्वहित जपणारी, सुखी स्त्री आहे, आणि ते ह्यांना कसं सहन होणार!
मात्र दुसऱ्या बाजूस, ह्याच स्त्रियांच्या मोठ्या गटाकडे, त्यांच्या दुःखाकडे समाज संपूर्णतः कानाडोळा करत असतो. ज्यांना मूल होऊ शकत नाही, अशाना, मुलं दत्तक घ्या, नवीन वैद्यकीय सुविधा, त्यांवर अतोनात पैसा खर्च करून मूल जन्माला घाला, नवीन कोणते अघोरी उपाय सुचवा अथवा स्वतःची मुलं झाल्यापासून आपले आयुष्य कसे पूर्णतः विस्कळीत झाललं आहे, आणि गमतीत असं सुचवणे की आपले मूल काही दिवसांसाठी घरी नेऊन सांभाळा. असे अनेक अनाहूत आणि अतिशय बोचणारे; असंवेदनशील सल्ले देणं हेही समाज करत असतोच. अनेकदा कंपन्यांमध्ये मॅटर्निटी लिव्ह असते, मात्र जर एखाद्या स्त्रीला फर्टीलिटी ट्रीटमेंट घ्यायची असेल अथवा त्यात तिचे मूल तिने गमावलेलं असेल, तर त्यासाठी निराळी कोणतीही सुट्टी दिली जात नाही. हे असं एक खूप मोठं दुःख जेव्हा ह्या स्त्रिया जगत असतात, तेव्हा त्यांनी अगदी खासगीत हे दुःख आपापले निस्तरावे असाच निष्ठुर पवित्रा घेतला जातो.
निराळ्या बाजूला जर कोणी समलैंगिक जोडपे नव्याने कुटुंब उभारत असेल तर त्यांनादेखील समाज सहज मान्यता देत नाही. तीच गत एकट्या मातांची ज्या स्वातंत्र्यपणे एकटीने मुलांचं संगोपन करत आहेत.
गेल्या वर्षभरात जेव्हा जग शंभर वर्षांत पहिल्यांदा उद्भवलेला पँडेमिक अनुभवत होते, तेव्हा अनेक तरुण पालकांचे स्वतःची मुलं सांभाळताना जे मानसिक व शारीरिक हाल झाले; त्यांवर फार थोड्या देशांनी काही मदत पुरवली. समाजात ज्यांना मुलं आहेत, त्यांचा मदत करण्याकडेदेखील कल कमीच आहे. मूल होईतोवर सतत टोमणे मारणारा समाज, मूल झाल्यावर क्वचितच मदतीला येतो. मग त्यात व्यवस्थांचा अभाव असेल – बाल संगोपनाच्या सुविधा असोत, अथवा शहरांत, खेड्यात पुरेशा खेळाच्या बागा, शाळा, शिक्षण संस्था असोत, सगळ्यांच्या बाबत उदासीनता!
ह्या सगळ्याचा विचार करता, मुलं होणं हा पर्याय असला तरी मुलं होऊ दिल्यावर त्यांची सर्वतोपरी काळजी घ्यायची, हीदेखील अतिशय मोठी जबाबदारी आहे. आणि ही पार पडताना जर समाज काहीच हातभार न लावता केवळ नाक खुपसणार असेल तर निश्चित अधिकाधिक स्त्रियांनी आणि मुलींनी हा निर्णय स्वतः अतिशय विचारपूर्वक आणि संयंतपणे घ्यायला हवा आहे.
तसेच समाजानेदेखील आता निराळ्या सामाजिक आणि राजकीय व्यवस्था निर्माण करायला हव्यात, ज्या आकर्षक असतील, सर्वसमावेशक असतील, नव्या प्रकारच्या, सर्व प्रकारच्या कुटुंबांसाठी! मग त्या सोयी असतील सर्वांना मूलभूत भत्ता देण्यासंदर्भात, वृद्ध आणि बाल संगोपनाच्या संदर्भात अथवा विनामूल्य उच्च शिक्षणाच्या संदर्भात! नवे बदल, पूरक बदल घडले तरच समाज दाखवून देईल की त्याला मुलं हवीत. मगच आश्वस्थ होऊन तरुण पिढीलादेखील वाटेल की समाज त्यांच्या निर्णयाला पूरक आहे.
- प्राजक्ता पाडगांवकर
या सदरातले इतर लेख
पुष्कळदा प्रेमातदेखील अगदी मर्यादित, संकुचित दृष्टिकोन असतो. प्रेम एकदाच होतं, लग्न एकदाच होतं इत्यादी… हे सारं धादांत खुळचट विचार आहेत.
या सदरातले इतर लेख
ज्या यशाचं भरभरून कौतुक होतं, ज्याच्या आहारी बहुतांश समाज जातो, ते यश किती खुजं आणि फसवं आहे, हे समजून येईपर्यंत पुष्कळदा खूप उशीर झालेला असतो.
कंपाउंडिगची गंमत
आयुष्यातले दररोज निवडलेले प्रत्येक पर्याय हे चक्रवाढ व्याजासारखे वाढत असतात, त्यामुळे आपल्या वेळेची, फोकसची (एकाग्र चित्ताची) गुंतवणूक अगदी निगुतीने करायलाच हवी!
स्पर्धांपलीकडलं जगणं
आयुष्याच्या अनेक पातळ्यांवर ही अशी स्पर्धा, ईर्षा आपण अगदी क्षणोक्षणी अनुभवत असतो. अर्थात, ती तितकीशी गरजेची गोष्ट आहे का?