फॉन्ट साइज वाढवा

एक अमेरिकन कोडे घालते, जर तुम्हाला कोणी दोन पर्याय दिले : ३ मिलियन डॉलर्स  (साधारण ३० लाख भारतीय रुपये) एक रकमी घ्या  किंवा १ जादुई पेनी (साधारण ७३ भारतीय पैसे) – जिचे मूल्य ३० दिवस दररोज दुप्पट होत आहे – ती घ्या. तर तुम्ही काय निवडाल?

जर ३ मिलियन डॉलर्स निवडलेत, तर एक गोष्ट लागलीच स्वतःपाशी मान्य करून टाका, “माझ्या आयुष्यासाठी, जिथे मी आहे त्या सर्व चांगल्या-वाईट परिस्थितीसाठी, मीच जबाबदार आहे, माझा भूतकाळ, परिस्थिती, कुटुंब, देशाची राजकीय, आर्थिक स्थिती, जात, धर्म, लिंग, शिक्षण असले कोणतेही भेद, अन्याय ह्यांचा ह्यात काडीमात्र वाटा नाही!” 

आणि जर जादुई पेनीचा पर्याय निवडलात तर  ३१व्या दिवशी तुमच्याकडे  ३ मिलियन डॉलर्स नाही तर चक्क  १०,७३७,४१८.२३ डॉलर्स  इतकी रक्कम झाली असेल! अर्थात ही चक्रीवाढ व्याजाची महती सांगण्यासाठी केलेली धडपड निश्चित नाही, मात्र ह्यात आणखी काहीतरी असं आहे, जे आपल्याला सामान्यतः आपल्या आयुष्यात लागू करून घेता येत नाही, अथवा ते शिकवले गेलेले नाहीये!  ही गंमत आहे कंपाऊंडिंगची! 

आपल्या आयुष्यात प्रत्येकासमोर सदोदित, वर दिलेले कोडे निरनिराळ्या वेशात समोर येत असतं, मात्र प्रत्येक वेळी, आपण जादुई पेनीचा पर्याय टाळून, ३ मिलियन डॉलर्सच्या पर्यायाकडे आकर्षित होतो! विश्वास बसत नाही? अगदी खरे आहे! 

वजन वाढणं, ही पुष्कळ लोकांची समस्या असते, किंवा वाचायला हल्ली वेळ मिळत नाही, हीदेखील! दोन्ही समस्यांमध्ये आपण पर्याय कोणते निवडतो? २ महिन्यांत वजन कमी करण्याचे क्लास अथवा आज एका रात्रीत पुस्तक वाचून संपवणे! आणि अर्थात अशा लहरीपणाने होते असे की, वजन काही काळ कमी होते आणि मग पूर्ववत होते किंवा अधिक! आणि जसा दिवस सरतो, पुस्तक वाचायचा उत्साह देखील सरतो! उलटपक्षी जर जादुई पेनीचा पर्याय निवडला तर? रोज फक्त १०० ग्रॅम अन्न कमी खाल्ले तर? रोज फक्त २० मिनिटे व्यायाम केला तर? रोज फक्त २० मिनिटे गजर लावून पुस्तक वाचलं तर?

वजन सहज उतरेल, कायमचं! महिन्याला किमान २ पुस्तकं वाचून होतील! हळूहळू उमजू लागेल, जादू ही त्या पेनीमध्ये नसून सातत्यात  आहे! सातत्यपूर्ण सवयींत आहे!

आयुष्यातले दररोज निवडलेले प्रत्येक पर्याय हे चक्रवाढ व्याजासारखे वाढत असतात, त्यामुळे आपल्या वेळेची, फोकसची (एकाग्र चित्ताची) गुंतवणूक अगदी निगुतीने करायलाच हवी!

कोणत्याही नव्या कामासाठी, आपल्या सगळ्यांना पुष्कळ उत्साह असतो! आता उद्यापासून जिम! पर्वापासून पूर्ण भात बंद – असले वाट्टेल ते आपण बोलून बसतो खरे, मात्र तो सुरुवातीचा उत्साह सरल्यावर, आपण पुन्हा पुन्हा तिथेच येतो! पुष्कळदा असे प्रयत्न केल्यानंतर आपण चक्क त्या गोष्टींचा नाद सोडून देतो! का माहीत आहे? कारण आपण फिरून फिरून पुन्हा तीच चूक करतो! स्वतःच्या इच्छाशक्तीवर विसंबून राहतो! मुळात प्रश्न इच्छाशक्तीचा नसून, नित्यकर्म निर्माण करण्याचा आहे! जसे रोज दात घासतो, तेवढ्या सहज विचार न करता आपण एखादी कृती सातत्याने करू लागलो की मगच आपल्याला कंपाऊंडिंगची खरी जादू अनुभवता येऊ शकेल! 

कंपाऊंडिंगसाठी आपल्याला आपले पेनी कोणते आहेत एवढं फक्त ठरवून घ्यायला हवेत – व्यायाम, आहार नियंत्रण, वाचन, लेखन किंवा इतर कोणतेही! पेनी म्हणजे आपल्या नित्याच्या सवयी! ह्या पेनीच्या जागी तुम्ही काहीही धरू शकता, अगदी जर नवरा-बायकोच्या, पालक-मुलांच्या, कोणत्याही  नात्यात आपण वेळ कमी देतो आहोत अशी सल असेल मनात, तर त्या प्रिय व्यक्तीसाठी दररोज काय करू शकता? एखाद मेसेज, राखून ठेवलेली दहा मिनिटे? आठवड्यातून एकदा घालवलेला १ तास गप्पांचा? काहीही चालेल! फक्त एकदा का एक सवय निर्माण करायला सुरु केली की त्यातून माघार घ्यायची नाही!

मेख त्यातच आहे! रोज रोज काहीही करताना कंटाळा येतो, सुरू करायला नकोसे होते, किंवा मग अगदी टाकणं टाकल्यासारखे आपण काम करू लागतो! तसे न करता जर जाणीवपूर्वक आपण ह्या कृती केल्या तर मग कंपाऊंडिंगचे देव तुमच्यावर मेहेरबान होणार हे निश्चित! 

आणखी एक अतिशय महत्त्वाचे, मगाशी सांगितले तसे, जे जे लोक ३ मिलियन डॉलर्सचा पर्याय निवडतात, त्यांनी खरोखर हे समजून घ्यायला हवे आहे की, त्यांच्या आयुष्यात त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांनी काही मिळवले नसेल अथवा त्याची सल असेल, तर ती ह्यामुळे नाही की त्यांचं नशीब वाईट आहे, ग्रहदशा वक्री आहे, किंवा चुकीच्या पक्षाचे शासन सत्तेत आहे! ही सगळी झाली बहिर्मुख होऊन शोधलेली कारणं, मुळात गोम आहे ती प्रत्येकाच्या नित्यकर्मात! रोज, अगदी दररोज तुम्ही जे जे न चुकता करता, मग तो व्यायाम असेल किंवा ४ कप चहा पिणे असेल, किंवा सलग तासन्तास एका खुर्चीत बसून राहणे असेल! फार काही नाही रोज २ तास फेसबुक, व्हाॅट्सअॅप, इंस्टाग्राम किंवा अजून कोणत्या तरी प्रकारे घालवलेला वेळ असेल, ते सगळं जेव्हा तुम्ही एक आठवडा, एक महिना, एक वर्ष, अनेक वर्षं करत राहता, त्यातून जे व्हायचे तेच तुमचे होते! म्हणजे तुम्ही अगदी सर्वस्वी जबाबदार आहात तुमच्या यश अपयशासाठी! तुम्ही प्रत्येक वेळी एवढं काय त्यात, थोडासा चहा घेतो, थोडीशी  दारू पितो, एकच तास  नेट सर्फिंग करतो, असे ३ मिलियन डॉलर्ससारखे वर वर सोप्पे, आकर्षक पर्याय निवडले, अगदी सातत्याने तर तिथून देखील तेच होते! तुमच्या ह्या सवयीचे कंपाऊंडिंग सुरू! अर्थात ह्या सवयी एका व्यक्तीच्या, एखाद्या समूहाच्या अथवा देशाच्या किंवा समस्त मानवजातीच्या असू शकतात, त्याचे परिणाम कायम चक्रवाढ व्याजासकटच येतात! 


नावीन्यपूर्ण बदल घडवताना

११ भारतीय उद्योजकांनी अशक्य कोटीतल्या गोष्टी शक्य करून दाखवल्या… त्यांचा वेगळ्या वाटेवरचा प्रेरणादायी प्रवास…

अशक्य कोटीतील वाटाव्या अशा गोष्टी शक्य करून दाखवणार्‍या ११ भारतीय कंपन्यांचा वेगळ्या वाटेवरचा प्रवास या पुस्तकात तपशिलात दिला आहे. या उपक्रमांनी नावीन्यपूर्ण बदल घडवले आणि उद्योगजगतातील संदर्भ बदलून टाकले आहेत… त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख देणारे हे नावीन्यपूर्ण पुस्तक सर्वांना निश्चितच रोचक वाटेल, प्रेरणादायी वाटेल…

खरेदी करा


चक्रवाढ फक्त व्याज नसते, तर आयुष्यातले दररोज निवडलेले प्रत्येक पर्याय हे चक्रवाढ व्याजासारखे वाढत असतात, त्यामुळे आपल्या वेळेची, फोकसची (एकाग्र चित्ताची) गुंतवणूक अगदी निगुतीने करायलाच हवी! कारण शेवटी जिथे आपले लक्ष जाते, तिथेच आपले भविष्य जाणार आहे! 

मुळात यशस्वी लोक आणि सामान्य माणूस असा काही भेदच नसतो, कारण आपण सगळेच उत्क्रांतीच्या रेट्यात असे घडलेलो आहोत, तात्कालिक सुखासाठी हपापलेलो! ह्या धोरणाने आपल्या पूर्वजांच्या अनेक पिढ्या तारून गेल्या म्हणून आज आपण सर्व जण इथे आहोत! मात्र ह्या काळात, त्या सवयी सोडवणे कितीही अवघड असले तरी करावेच लागेल! किंबहुना जे ते करू शकतात, जेवढ्या प्रमाणात करू शकतात, जेवढ्या क्षेत्रात करू शकतात, तेच त्या त्या क्षेत्रात यशस्वी ठरतात! लक्षपूर्वक कोणत्याही  खेळाडूच्या, नटाच्या, उद्योजकाच्या रोजच्या सवयींना अभ्यासलं तर हेच दिसेल! जी जी माणसे, ज्या ज्या गोष्टींना त्यांच्या प्रत्येक २४ तासांत महत्त्वाचे स्थान देतात, त्या त्या गोष्टीत ते प्राविण्य मिळवतात! 

वरकरणी अगदी छोटा वाटणारा वेळेचा तुकडा आपण त्यासाठी रोज खर्ची घालत असतो, अगदीच नगण्य वाटावा असा, मात्र जसजसे दिवस सारतात, वर्ष सरतात, तेव्हाच त्या छोट्याशा प्रयत्नांच्या अतिभव्य विशाल रूपाची प्रतीती आपल्याला येऊ लागते!

आपल्या आधीच्या कोड्यात देखील तेच दिसून येते, पेनी दुप्पट होत असताना अगदी  मुदत संपायच्या दोन दिवस अगोदरपर्यंत, आपल्या हातात रक्कम असते, २,६८४,३५४. ५५ डॉलर्स इतकीच- ३ मिलियनपेक्षा कमीच भरणारी! तोवर, अगदी आपल्या संयमाची परीक्षा असते, मात्र ती कंपाऊंडिंगची जादू शेवटल्या दोन दिवसात कुठल्या कुठे घेऊन जाते तीच रक्कम! आहे ना सॉल्लिड मज्जा! कंपाऊंडिंगची!

– प्राजक्ता पाडगांवकर


रोहन शिफारस

बॉर्न टु विन

जिंकण्यासाठी वृत्ती कशी विकसित करावी? आणि वैयक्तिक विकासासाठी तिचा उपयोग कसा करावा? स्वत:च्या वर्तणुकीत बदल करून व्यावसायिक आणि वैयक्तिक नातेसंबंध अधिक निरोगी कसे बनवावे? प्रभावी संवादाचं तंत्र अवगत करून प्रत्येकाला कौटुंबिक, व्यावसायिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या अधिक चांगल्या प्रकारे कशा निभावता येतील? या सर्वाचं मार्गदर्शन झिगलर अनेक उदाहरणं देत करतात. सोबत आकृत्या, तक्ते, टेबल्स यांचा आधारही ते देतात. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी वयाच्या कोणत्याही टप्प्यावर वाचलंच पाहिजे असं पुस्तक…

225.00Add to cart


या सदरातले इतर लेख

यश आणि प्रभुत्व

ज्या यशाचं भरभरून कौतुक होतं, ज्याच्या आहारी बहुतांश समाज जातो, ते यश किती खुजं आणि फसवं आहे, हे समजून येईपर्यंत पुष्कळदा खूप उशीर झालेला असतो.

लेख वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *