फॉन्ट साइज वाढवा
नजर शांत, स्थिर दूरच्या निशाणावर. खांद्याच्या आणि पाठीच्या सर्व शिरा ताणलेल्या. एका हातात सहज पेललेले जवळ जवळ पन्नास पौंडाचे धनुष्य आणि दुसऱ्या हातात बाण. एकही निशाणा साधता येईल ह्याची अजिबात शाश्वती नाही, तरी त्या ध्येयावर नजर! एकदा, दोनदा, तीनदा… बाण त्यांची बाकदार अदृश्य रेष सांभाळत कधी निशाणाच्या उजव्या बाजूला, कधी डाव्या बाजूला तर कधी चक्क निशाणा सोडून भलतीकडेच भरकटणारे. मग एकच बाण सरसरत, त्याची अदृश्य बाकदार रेष तोलून धरत थेट निशाणा भेदतो! बस्स! इथे हा एक क्षण! त्या अगणित तासांमधला… जर बाजूला काढला, तर तो क्षण म्हणजे यश! असं यश ज्याला काळावेळाचे मर्यादित कंस आहेत! असंच यश आपण शोधत असतो, असंच यश प्राप्त करण्यासाठी आपल्याला समाजात आणि आयुष्यात तयार केलं जातं! मात्र हे यश तितकंसं खरं नाही, उपयोगी नाही आणि कौतुकास अजिबात पात्र नाही! हे समजून, पुन्हा पुन्हा जोवर असे अनेक निशाणे भेदता येत नाहीत, निशाणे भेदायचं तंत्र शरीराला, मनाला अवगत होत नाही, जोवर ते तंत्र, त्यातले प्रयत्न, त्यातलं भीषण सौंदर्य मनावर, आपल्या प्रत्येक हालचालींवर कोरलं जात नाही, तोवर सातत्याने प्रयत्न करत राहणं, ते प्रयत्न अव्याहत सुरू ठेवणं… निरपेक्ष मनाने. कारण हा ध्यास यशाचा नसून प्रभुत्वाचा असतो! यशाची सातत्याने पुनरावृत्ती करण्याचं सामर्थ्य म्हणजे प्रभुत्व! अपयशाची तमा न बाळगता, सर्वोत्तमाचा धाक न बाळगता केली जाणारी एककेंद्री साधना म्हणजे प्रभुत्व! कारण प्रभुत्व हा काही एक असा पाडाव नाही, एक अशी जागा नाही, तर ते एक व्रत आहे, व्रत आहे सातत्याचे, प्रामाणिक प्रयत्नांचे आणि यशापलीकडले काही गाठू पाहण्याच्या प्रयासाचे!
यशात जे एक शाश्वत तत्त्व आहे, ते प्रभुत्वात नाही. कारण यशाची मापकं मर्यादित आहेत! महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षेला जेवढे विद्यार्थी एका वेळेस बसतात, त्यांच्यापैकी परीक्षेच्या कालावधीत जो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी उत्तम स्मृती आणि तंत्र वापरून यशस्वी होतो/होते, तो किंवा ती प्रथम येतो/येते. हे यश मर्यादित स्वरूपाचं, अतिशय बहिर्मुख असं असतं. पुन्हा जर अशीच परीक्षा घेण्यात आली तरी तेच विद्यार्थी यशस्वी होतील, याची खात्री देता येत नाही. आपल्याला अशा यशाची सवय ती कायमचीच. कुटुंब, समाज, सामाजिक संस्था, माध्यमं… सगळीकडे ज्या यशाचं भरभरून कौतुक होतं, ज्याच्या आहारी बहुतांश समाज जातो, ते यश किती खुजं आणि फसवं आहे, हे समजून येईपर्यंत पुष्कळदा खूप उशीर झालेला असतो. कारण असं यश केवळ उच्चांक, एक उच्च बिंदू मोजते, नोंदवून ठेवते, मात्र आयुष्य असं एका बिंदूच्या टोकावर तोललेलं नसतंच कधी! तिथे एक संपूर्ण पल्ला असतो, एक प्रवास असतो, त्यात चढ-उतार, यश-अपयश, आनंद-दुःख असं सगळंच लाटांप्रमाणे नित्यनेमाने उसळत असतं. मोठं होण्यात, यशस्वी होण्यात सगळ्यांना स्वारस्य असतं, मात्र जो मार्ग अवलंबून इथवर चालत येतात, तो मार्ग यशाकडे खचित नेतो, किंवा कधी हुलकावणी देतो, मात्र त्या वाटेवरून बरंच पुढं प्रभुत्व असतं, हे फार थोड्या जणांना गवसतं!
ही गल्लत केवळ व्यक्तिगत पातळीवर होते असंही नाही, तर अनेक संस्था, कार्यालयं, बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्या देखील ही चूक करतात. त्यामुळे ही चूक ढळढळीत असूनही अदृश्य असल्यासारखी भासते. एका तिमाहीत किती नफा झाला, एका वर्षात किती खप झाला अशी मर्यादित मापकं जोडली की जे समोर येते ते अगदी निवडून बाजूला काढलेलं यश! मात्र इतर अनेक पातळ्यांवर त्यामुळे जे नुकसान ओढवलं, अथवा झालं/केलं ह्याचा विचार खचितच होतो!
जी गोष्ट व्यावसायिक जगतात तीच व्यक्तिगत आयुष्यात! जीवन यशस्वी असणं म्हणजे तरी काय? लग्न? मुलंबाळं? सामाजिक-आर्थिक स्थैर्य? का अजून काही? अचानक सगळी मापकं डळमळीत होऊ लागतात, जीवनात यशस्वी असं खरोखर कोणीच नसतं, किंबहुना नसू शकतं हे समजू लागतं. आयुष्याच्या अनेक पैलूंपैकी काही पैलूंमध्ये, काही काळापुरते, काही लोक, त्यांचे उच्च बिंदू अनुभवतात, मात्र त्यामुळे ती व्यक्ती संपूर्णतः यशस्वी आहे असे गृहीत धरणं तितकंसं विवेकी नाही! आजच्या काळातले प्रसिद्धी माध्यमातील नट-नटी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, उद्योजक असे कोणीही त्यांच्या उच्च बिंदूवर असतानादेखील त्यांच्या क्षेत्रात त्यांनी कितपत प्रभुत्व मिळवलं आहे, हे तपासणं गरजेचं आहे; किंवा तो उच्च बिंदू सरल्यावर त्याची पुनरावृत्ती करण्याचं सामर्थ्य किती जणांपाशी आहे हेही समजणं उपयुक्त ठरणार आहे.
आपण यशस्वी होण्याकरता जेवढा प्रयास खर्ची घालतो, तेवढा त्यापलीकडे जाऊन प्रभुत्व मिळवण्यासाठी केला तर कदाचित आपली संपूर्ण वाटचाल निराळी होऊ शकते. यशासाठी हपापलेल्या या जगात यापेक्षा मोठं सदसद्विवेकी बंड नसेल. यश आततायी असतं, मात्र प्रभुत्व स्वतःच्या मर्यादांपाशी लीन. प्रभुत्व समंजस, शांत आणि पराकोटीचे चिवट असतं, तर यश हे उथळ, क्षणिक आणि वातूळ असू शकतं. यशात पराभवाला स्थान नाही, तर प्रावीण्याची वाट ही कायमच पराजयातून जाते, हे प्रभुत्व जाणून असतं.
जगाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन देणारं…
सचिन कुंडलकर लिखित नाइन्टीन नाइन्टी
‘नाइन्टीन नाइन्टी’ या ललितलेखांच्या पुस्तकात कुंडलकर संक्रमण काळात वाढलेल्या पिढीचं, सतत वेगाने बदलत राहणाऱ्या काळाचं, शहरांचं चित्रण करतात. जगभर फिरताना आलेले अनुभव, नव्या-जुन्या आठवणी ते या लेखांमधून शेअर करतात ….
खेळाडू, थोर संशोधक, लेखक, उद्योजक हे सगळेच हा फरक अगदी निश्चितपणे जाणतात, ओळखतात आणि अंगीकारतात, त्यातले कोणीच यशाच्या मागे पडत नाहीत, तर प्रभुत्वाच्या मार्गावर अविरत चालत राहतात. मात्र दुर्दैवाने केवळ त्यांचे उच्च बिंदू आपल्यासमोर सतत येत राहतात, किंवा त्या यशातून मिळालेल्या तत्कालिक ऐहिक गोष्टींबद्दल चर्चा होत राहतात. त्यांचे यशाच्या हुलकावणीचे क्षण, थोडक्यात हुकलेल्या संधी आणि खच्चीकरण करणारे अपयश, हे पुष्कळदा पडद्याआड राहून जाते, अथवा सोयीस्कररीत्या दुर्लक्षित केलं जातं. मात्र असामान्य प्रावीण्याची मेख ही त्या सगळ्या प्रवासातच आहे! आयुष्याच्या प्रत्येक वळणावर केवळ यशाची आकांक्षा न बाळगता प्रभुत्वाची कास धरायला हवी, मग एक निराळंच जग आपल्यासमोर येईल; निश्चित येईल!
कारण प्रभुत्वाच्या ध्यासात कोणतेही आदर्शवत, कविकल्पित जगणं नसून, प्रभुत्वाचा ध्यास आपल्याला वर्तमानात राहण्यास उद्युक्त करतो! आज काय केल्याने थोडे अजून प्रावीण्य मिळवता येईल, ह्यासाठी सतत स्वच्छ मार्ग दाखवून देतो! मग तो ध्यास असेल शरीर स्वास्थ्याचा, कोणत्याही कलासाधनेचा, कोणत्याही खेळाचा, उद्योगाचा अथवा व्यक्तिगत उत्क्रांतीचा! ह्यासाठी रोज काहीतरी निश्चित करता येऊ शकते. म्हणूनच मग ह्या वाटेवर अनेकदा यश समोर येते, सरते आणि अपयशदेखील येऊन सरते, मात्र त्या दोन्ही अवस्थेत आपली मन:स्थिती तितकीच तटस्थ, तितकीच समतोल राहते. ह्या पुढे शिकण्यासारखे काही शिल्लक नाही असं प्रभुत्व शिकवत नाही, तर ते शिकवतं की, कितीही शिकलं तरी पुष्कळ शिल्लक राहणार आहेच. म्हणूनच प्रभुत्व हे सर्वार्थाने जगण्याचे प्रतीक आहे, कारण प्रत्येकाच्या जगण्यात कितीही काही झाले तरी काहीतरी शिल्लक राहणार आहेच. आणि त्या अप्राप्यातच जीवनाची लालसा रुजलेली आहे!
– प्राजक्ता पाडगांवकर
रोहन शिफारस
तुमचा सच्चा साथीदार
व्यवसाय किंवा नोकरी-धंद्यातील प्रगतीसाठी…
‘प्रत्यक्ष स्वाध्याय’ करायला लावून स्वत:च्या आत डोकवायला लावणारं हे आगळंवेगळं पुस्तक सगळ्या व्यवासायिकांना, उद्योजकांना आणि नोकरदारांना मौलिक मार्गदर्शन तर करेलच, शिवाय व्यावसायिक जीवनातला ‘तुमचा सच्चा साथीदार’ही होईल !
₹195.00Add to Cart