फॉन्ट साइज वाढवा

अनेकदा समाजात आपण अनेक गोष्टींवर सोयीस्कर मौन धारण करतो. पुष्कळदा सामाजिक नियम असल्यागत लोक त्यांची कधीच वाच्यता करताना दिसत नाहीत. यामध्ये अनेक विषय असतात, केवळ परंपरेच्या ओझ्याने मौन धरलेलं असू शकतं किंवा अज्ञानामुळे. पण अनेकदा असे विषय माध्यमांकडून, विचारवंतांकडून आणि समाजाकडून उपेक्षिले जातात. आणि मग त्यावाचून बरेच अडते हे निश्चित! अशा विषयांना वाचा फोडणारं सदर : नितळ.

१९३८ साली ब्रिटिश नाटककार, पॅट्रिक हॅमिल्टन ह्यांनी एक नाटक लिहिलं : ‘गॅसलाईट’. त्यात एका सुप्रसिद्ध ऑपेरा गायिकेची निर्घृण हत्या करण्यात येते आणि खुनी तिचे दागिने घेऊन लंपास होतो, मागे काहीही मागमूस न ठेवता! नाटकात समोर येतात ती दोन पात्रं, बेला आणि जॅक हे दांपत्य. संपूर्ण नाटकात बेलाला कसे भास होत आहेत, ती कशी विसरभोळी, खोटारडी आणि वेडी होत चालली आहे जॅक बेलाला पटवत राहतो. अधूनमधून तिच्याशी लाडिक वागतो तर कधी तिच्यासमोर चक्क मोलकरणीशी सलगी करू पाहतो. हरेक प्रकारे तो तिला परत परत हेच पटवत राहतो की, तिला दिवसभर भास होतात. तिला ऐकू येणारी पायरव, तिला जाणवणारी गॅसबत्तीच्या प्रकाशाची तीव्रता… सगळंच कसं फक्त तिला वाटतं आहे, इतरांच्या मते सगळे सुरळीत सुरु आहे…

हे नाटक आता एवढ्या वर्षांनंतर का महत्त्वाचं आहे? कारण ‘गॅसलाईट’ या नाटकावरून मानसशास्त्रात याच नावे संकल्पना उदयास आली. मानवी नातेसंबंधात देखील अनेकदा असे प्रकार घडतात, ज्यातून एखाद्या व्यक्तीचे पूर्ण मानसिक खच्चीकरण होते. पुष्कळदा असंदेखील होतं, की त्या व्यक्तीच्या आत्मविश्वासाला खोल तडा जातो, स्वतःवरची खात्री संपुष्टात येते आणि जेव्हा हे सगळं समजू लागतं तोवर पुष्कळच उशीर झालेला असतो. हा एकंदर सत्तेचा एक डावपेच असतो, एखाद्यावर अधिपत्य गाजवण्यासाठी अनेकदा नात्यात गॅसलाईटिंगचा वापर केला जातो. हे प्रियकर-प्रेयसी, पती-पत्नी , पालक-पाल्य, विद्यार्थी-शिक्षक अशा अनेक नात्यांत घडू शकतं, घडतं, घडत राहील!

आता मात्र हा प्रकार मानवी नात्याच्या मोठ्याच परीघाला बाधत आहे. राजकीय, सामाजिक अशा पातळ्यांवरदेखील गॅसलाईटिंग होत आहे. त्यामुळे जनमानसाचा पुष्कळदा गोंधळ उडतो, सद्सद्विवेक आणि समोरची परिस्थिती ह्यांचा मेळ बसेनासा होतो. अशा वेळी, ज्यांच्या मनात अनेक शंका उपस्थित होतात, ज्यांना गोंधळात पडायला होते, ‘नेमकं बरोबर काय’ असं वाटू लागतं, त्यांच्यासाठी काही या सदरातून काही मूलभूत विचार मांडायचा हा प्रयत्न. जेणेकरून स्वतःपुरते निराळे असे काही ठरवायला, जगायला मोकळीक मिळावी! या सदरामुळे वाचकांची सोयीस्कर मौन-तीरापासून ते विवेकी प्रश्नतीरापर्यंत ‘नितळ’ यात्रा घडावी आणि गॅसलाइटिंगचे अनेक प्रकार समजून घेता यावेत हीच सदिच्छा!

– प्राजक्ता पाडगांवकर

या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
नितळ


या सदरातला पहिला लेख

यश आणि प्रभुत्व

ज्या यशाचं भरभरून कौतुक होतं, ज्याच्या आहारी बहुतांश समाज जातो, ते यश किती खुजं आणि फसवं आहे, हे समजून येईपर्यंत पुष्कळदा खूप उशीर झालेला असतो.

लेख वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *