फॉन्ट साइज वाढवा
काळाचे फासे कधी-कसे पडतील, ते कुणालाच सांगता यायचं नाही. नाहीतर, विसाव्या शतकाचा पूर्वार्ध आपल्या गझल, कव्वाली, ठुमरी, भजन आणि लावणीगायनाने गाजवणाऱ्या बाई सुंदराबाई जाधव यांचा शेवट एवढा शोकात्म का व्हावा! आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वीचं बोरीबंदर किंवा व्हीटी स्टेशन) समोरील एम्पायर बिल्डिंगमधील एक अख्खा मजला जिच्या मालकीचा होता, जिच्या दिमतीला तीन महागड्या गाड्या होत्या, त्या या गानसम्राज्ञीला आयुष्याच्या शेवटच्या क्षणी कुणाच्या तरी मदतीवर विसंबून का राहावं लागावं आणि तिच्या आयुष्याची अखेर कुठल्याशा सरकारी हॉस्पिटलमध्ये तरी का व्हावी… सारंच कल्पनेच्या पलीकडलं!
…पण केवळ शेवटच नाही, बाई सुंदराबाईंचं आयुष्यच कल्पनेच्या पलीकडलं होतं. रूढार्थाने त्या गायनपरंपरा असलेल्या कुटुंबातल्या वा समाजातल्या नव्हत्या. त्यांचा जन्म १८८५ सालचा पुण्याचा. त्यांचे वडील मारोतराव गवंडीकाम करणारे; पण आपल्या लेकीला शिक्षणाऐवजी गाण्याची असलेली आवड त्यांनी हेरली आणि ते छोट्या सुंदराबाईंना घेऊन साताऱ्याला आपल्या गावी गेले. तिथे त्यांच्या माहितीत गोंधळ्यांची काही कुटुंबं होती. त्या काळात देवीचे आणि खंडोबाचे उपासक असलेले गोंधळी-वाघ्यामुरळी देवाची गाणी म्हणण्याबरोबरच, लावणी किंवा तमाशा कलेत गायन-वादनाचं कामही करीत. त्यामुळेच अनेक पारंपरिक लावण्या त्यांना पाठ असत. अशांपैकीच एक असलेल्या दाभाडे गोंधळी यांच्याकडे मारोतरावांनी सुंदराबाईंना गाणं शिकण्यासाठी ठेवलं. तिथे सुंदराबाई लोकपरंपरेतील देवाची गाणी शिकल्याच, शिवाय गायकीच्या अंगाने जाणाऱ्या पारंपरिक लावण्याही शिकल्या.
थोडं जाणतं झाल्यावर मारोतरावांनी सुंदराबाईंना पुन्हा पुण्यात आणलं. कारण लेकीने शास्त्रीय ढंगाचं काही शिकावं, अशी त्यांची इच्छा होती. त्या इच्छेनुसारच पुण्यात सुंदराबाईंना प्रथम शंकरराव घोरपडकर यांनी हिंदुस्तानी संगीताचे धडे दिले. पुण्यातच सुंदराबाईंना ठाकूरदासबुवांकडे भजनाची तालीम मिळाली. मात्र काही दिवसांतच ठाकुरदासबुवा मुंबईला गिरगावातील ठाकूरद्वारच्या गोरा राम मंदिरात सेवेसाठी आले आणि त्यांच्यापाठोपाठ सुंदराबाईदेखील. सुंदराबाईंच्या वडलांनी त्यासाठी ठाकूरद्वार जवळच चिराबाजार येथे एक छोटी खोली भाड्याने घेतली आणि सुंदराबाईंची ठाकुरदासबुवांकडची भजनीतालीम सुरू राहिली. अल्पावधीतच सुंदराबाई सुंदर भजनं म्हणू लागल्या. त्यांची कीर्ती हळूहळू गिरगाव परिसरात पसरू लागली आणि तेवढ्यात ठाकूरदासबुवा आपल्या मूळ गावी इंदूरला कायमसाठी गेले. त्यानंतरच्या काळात मग सुंदराबाईंनी प्रसिद्ध तबलजी धम्मन खाँ, उस्ताद गुलाम रसूल खाँ, केशव भैया अशा अनेकांकडे गायनचं शिक्षण घेतलं. सोबतच त्या उर्दू-हिंदीही मेहनतीने शिकल्या. परिणामी शुद्ध शास्त्रीय संगीतापासून ते ठुमरी-गजल कव्वालीसारख्या उपशास्त्रीय गायन प्रकारावरही त्यांनी हुकूमत मिळवली… आणि नंतरची त्यांची कारकीर्द खऱ्या अर्थाने मुंबईतच घडली नि बिघडलीही…
विसाव्या शतकाचा पूर्वार्ध संगीतासाठी अतिशय पोषक होताच, शिवाय तेव्हाचा गिरगाव परिसर म्हणजे संगीतकलेची पंढरीच. त्यामुळे सुंदराबाईंचा संगीतक्षेत्रात जम बसायला वेळ लागला नाही. बखलेबुवांपासून बालगंधर्वापर्यंत सारेच त्यांच्या गाण्याचे चाहते बनले. बालगंधर्व तर त्यांना बहीणच मानू लागले. त्यातूनच भास्करबुवांच्या आग्रहाखातर सुंदराबाईंनी नंतरच्या काळात गडकरींनी लिहिलेल्या आणि बालगंधर्वांनी सादर केलेल्या ‘संगीत एकच प्याला’ नाटकातील नाट्यपदांना चाली लावल्या.
सुंदराबाईंचं नाव होताच त्यांना देशभरातून गाण्याच्या कार्यक्रमांसाठी बोलावणी येऊ लागली आणि बाईंचे कलकत्ता, हैद्राबाद, बनारस… असे दौरे सुरू झाले. अशा एका हैद्राबादच्या दौऱ्यातच सुंदराबाई, ‘बाई’ सुंदराबाई झाल्या. बहुधा १९२९ साल असावं, हैद्राबादच्या मिर उस्मान अली सिद्दीकी, असफजाह सातवा या निजामाने संगीतमैफलीचं आयोजन केलं होतं. संपूर्ण देशभरातून नाणावलेले गायक-वादक आले होते. निजामासमोर साऱ्यांनी उभ्यानेच आपली कला पेश केली. मात्र एका आवाजाच्या निजाम प्रेमातच पडला आणि त्याने त्या कलावंताला बसून आपली कला सादर करायला सांगितली. एवढंच नव्हे तर त्या कलावंताच्या गायकीतील उर्दू शब्दांचं उच्चारण ऐकून त्याने आपलं काव्य गाण्याची परवानगीही त्या कलावंताला दिली. तो कलावंत म्हणजे – सुंदराबाई जाधव! आणि त्याच वेळी त्या निजामाने म्हणे – सुंदराबाईंना ‘बाई’ हा किताब दिला आणि त्या ‘बाई’ सुंदराबाई झाल्या!!
त्यानंतरच्या काळात सुंदराबाईंच्या यशाचा वारू दौडतच राहिला. १९२१ साली त्यांनी पहिली ग्रामोफोन रेकॉर्ड दिली. कलाकारांचं गायन जतन करून ठेवणाऱ्या ग्रामोफोन रेकॉर्ड्स ही मोठीच क्रांती असल्याचं त्यांनी ओळखलं आणि आपल्या प्रमाणे रेकॉर्ड देण्यासाठी अनेकींना उद्युक्तही केलं. १९४० पर्यंत एच.एम.व्ही., कोलंबिया, रीगल, ओडियन अशा अनेक ग्रामोफोन कंपन्यांतर्फे त्यांच्या तब्बल ७५ रेकॉर्ड निघाल्या. म्हणजे त्यांची तब्बल १५० गाणी तरी ध्वनिमुद्रित झाली. केवळ ध्वनिमुद्रित नाही, तर या शास्त्रीय-उपशास्त्रीय रेकॉर्ड खपल्याही जोरात. त्यामुळेच एच.एम.व्ही.ने चक्क सुवर्णपदक देऊन त्यांचा गौरवही केला होता… हा बाई सुंदराबाईंचा, यशाचा-कीर्तीचा काळ होता. याच काळात त्यांनी तेव्हाच्या बोरीबंदर स्टेशनसमोर असलेल्या एम्पायर इमारतीत एक अख्खा मजला विकत घेतला. जाण्या-येण्यासाठी गाड्याही घेतल्या. सुंदराबाईंचं गाणं दिलखुलास होतं, तसंच त्यांचं वागणंही. कुणाला देता-घेताना त्यांनी कधीच हात आखडता घेतला नाही. कुठेही जायचं-यायचं म्हटलं तर त्यांच्या सोबत त्यांची एक कापडी पिशवी असयाची. त्या पिशवीत बाकी काही असेल-नसेल, पण त्यांची चिजांची वही आणि वाटेत भेटेल त्याला द्यायला खाऊ हमखास असायचा.
…पण बाईंचा हाच स्वभाव त्यांना नडला. कुणी तरी स्वतःची रेकॉर्डिंग कंपनी सुरू करण्यासाठी त्यांना भरीस घातलं आणि त्यात भयंकर नुकसान झालं. भयंकर म्हणजे, आतापावेतो मिळवलेली सारी संपत्ती त्यांना फुंकावी लागली. बाई पुन्हा पूर्वीसारख्याच दोन खोल्यांच्या जागेत राहायला गेल्या. त्यात आता त्यांची अपंग नि आजारी मुलगीही त्यांच्यासोबत होती. पण बाईंची पुण्याई अजून संपलेली नव्हती. ग्रामोफोन कंपन्या, आकाशवाणीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचं स्मरण ठेवूनच तेव्हाच्या बॉम्बे आकाशवाणीचे संचालक झेड. ए. बुखारी यांनी बाई सुंदराबाईंची कार्यक्रम सल्लागार म्हणून नेमणूक केली.
आता जगायचं ते मुलीसाठी, या ध्येयानेच नंतर बाई सुंदराबाई आकाशवाणीवर काम करत राहिल्या. सोबत मिळेल तिथे गायनाच्या सुपाऱ्या स्वीकारत राहिल्या. प्रसंगी त्यांनी गजल-कव्वालीबरोबरच पुण्या-मुंबईत बैठकीच्या लावण्यांचेही कार्यक्रम केले. पुण्यात शुक्रवार पेठ पोलीस चौकीसमोरच्या एका चाळीत त्यांच्या लावण्यांच्या बैठका जमत आणि त्या बैठकांना अनेक नामवंत हजर असत असं म्हणतात. त्याचप्रमाणे मुंबईत गिरगावातील भटवाडीत असलेल्या लक्ष्मीबागेतही त्यांच्या लावण्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. लक्ष्मीबागेतील एका बैठकीत खुद्द केशवराव भोळ्यांनी त्यांना लावण्या म्हणण्याची फर्माईश केली होती. तेव्हा ‘इथे जमलेल्या या सुशिक्षित-सुसंस्कृत लोकांपुढे लावण्या कशा म्हणू?’ म्हणत त्यांनी संकोच व्यक्त केला. तेव्हा केशवरावांनी, अहो तुमच्या लावण्याही शास्त्रीय गाण्याइतक्याच महत्त्वाच्या असल्याचे उद्गार काढले होते. एवढंच कशाला एकदा बाई सुंदराबाईंनी भास्करबुवा बखल्यांकडे, मला तुमचं अस्सल शास्त्रीय गाणं शिकवा म्हणून हट्ट धरला होता. तेव्हा भास्करबुवाही त्यांना म्हणाले होते, की – तुम्हीही आम्हा साऱ्यांसारखं शास्त्रीयच गायला लागलात, तर अस्सल पारंपरिक ठाय लयीतल्या लावण्या कोण म्हणणार? तेही मोठं सांस्कृतिक संचितच आहे की…
लक्षणीय पुस्तकं
अनफर्गेटेबल जगजित सिंग
गझल गायकीच्या दुनियेतील तरल स्वर
सत्या सरन
अनुवाद: उल्का राऊत
जगजित म्हटलं की, कानात आवाज घुमतात गझलांचे…मनाचा ठाव घेणाऱ्या, मन शांत करून जाणाऱ्या आवाजातल्या अनेक गझला ! नेमक्या भावना व्यक्त करत, काही अनपेक्षित सुरावटी गात, कधी पाश्चात्त्य वाद्यांचा आधार घेत जगजितने गझल गायकीचा चेहरामोहराच बदलून टाकला.
सत्या सरन यांनी लिहिलेल्या जगजितच्या या चरित्रात त्याचा विद्यार्थीदशेपासूनचा, स्ट्रगलर ते लोकप्रिय गायक असा प्रवास उल्का राऊत यांनी मराठीत रसाळपणे उलगडला आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने जगजित मैफिलीचं वातावरण भारून टाकत असे. रसिकांच्या डोळ्यांतून अश्रुधारा बरसवणारा जगजित एखादा चुटकुला सांगून त्याच मैफलीत रसिकांना हसायलाही भाग पाडत असे. जगजितचे असे अनेक पैलू या पुस्तकात विविध प्रसंगांतून खुलून येतात. नियतीने जगजित-चित्राला अनेक बरे-वाईट रंग दाखवले. ते दोघं कधी या नियतीला गायनाचा, आध्यात्माचा आधार घेत धिरोदात्तपणे सामोरे गेले, तर कधी कोलमडून गेले.
एक मित्र, मुलगा, वडील, गायक, चित्राचा साथी, नवगायकांसाठी मसीहा अशा अनेक भूमिकांमधून पुस्तकात भेटत जाणारा…अन्फर्गेटेबल जगजित सिंग.
लोककवी साहिर लुधियानवी
जनाभिमुख काव्य, गीतं व जीवनाचा मागोवा
अक्षय मनवानी
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर
‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है…’, ‘जिन्हे ना़ज है हिंद पर वो कहाँ है…’, ‘वो सुबह कभी तो आएगी…’, `तुम न जाने किस जहाँ मे…’, `मांग के साथ तुम्हारा… , `औरत ने जनम दिया मर्दों को…, `फैली हुई है…’, `आसमाँ पे है खुदा…’, `मन रे तू काहे ना धीर धरे…’, `संसार से भागे फिरते हो…’, ‘अल्ला तेरो नाम…’, ‘अभी न जाओ छोडकर…’, यासारखी चित्रपट-गीतं असोत किंवा ‘परछाइयाँ’, ‘ताज महल’, ‘तरहे-नौ’ यांसारख्या कविता आणि ‘तल्खियाँ’, ‘आओ कि कोई ख्वाब बुनें’ यांसारखे कवितासंग्रह असोत, साहिर आपल्या कवितांमधून गीतांचं सर्जन करत राहिले आणि आपल्या गीतांमधून कवितांची प्रतिभा प्रसवत राहिले. कधी त्यांनी सामाजिक वास्तवावर कठोर भाष्य केलं, कधी जीवनाचं तत्त्वज्ञान सांगितलं, तर कधी स्त्री-पुरुष नातेसंबंधांमधले विविध पदर हळुवारपणे उलगडून दाखवले.
या प्रतिभासंपन्न कवीच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्याच्या जीवननिष्ठांचा, गीत-कवितांचा आणि लेखन प्रेरणांचा सूक्ष्म वेध लेखक अक्षय मनवानी यांनी या पुस्तकात घेतला आहे. तसंच अमृता प्रीतमसह अनेकांचा साहिर यांच्यावर कसा प्रभाव पडला याचा शोधही घेतला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रेरणास्रोतांचाही वेध घेतला आहे. अनेक संबंधित व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन मनवानी यांनी विपुल संशोधन केलं आहे. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक मिलिंद चंपानेरकर यांनी या पुस्तकाचा तितक्याच समर्थपणे मराठी अनुवाद साकारला आहे.
आपल्या काव्यप्रतिभेने रसिकांच्या मनात कायमचं घर केलेल्या एका मनस्वी कवीची ही जीवनगाथा… लोककवी साहिर लुधियानवी
रहें ना रहें हम
चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ बहाल करणा-या संगीतकारांची वैशिष्टयं आणि त्यांच्या अजरामर गाण्यातील सौंदर्यस्थळं…
मृदुला दाढे जोशी
हिंदी चित्रपटसृष्टीचा अर्थात चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ…
या कालखंडावर आपली नावं सुवर्णाक्षरांनी कोरणारे संगीतकार कोणते?
प्रत्येक संगीतकाराचा बाज वेगळा कसा? त्याची वैशिष्ट्यं कोणती?
त्यांची अजरामर गाणी कोणती?
त्या गाण्यांच्या चालींची, ऑर्केस्ट्रेशनची वैशिष्ट्यं कोणती?
त्यातील हरकतींचं, केलेल्या प्रयोगांचं महत्त्व काय?
त्यांतील कोणत्या जागा म्हणजे त्या गाण्यांची सौंदर्यस्थळं म्हणता येतील?
एकंदर सांगायचं तर, ही गाणी आपल्यावर
४०-५०-६० वर्षं कसं काय गारूड करू शकतात
हे नेमकेपणे सांगून, रसिकतेने केलेलं विश्लेषण म्हणजेच…
हिंदी चित्रपट संगीताच्या मर्मज्ञ
मृदुला दाढे-जोशी लिखित एक आस्वादात्मक पुस्तक
रहें ना रहें हम…
हितगुजातून उलगडलेली वहिदा रेहमान
एका प्रतिभासंपन्न अभिनेत्रीचा चित्रपट व जीवनप्रवास तिच्याच शब्दांत
नसरीन मुन्नी कबीर
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर
प्रतिभा, आगळं सौंदर्य आणि व्यक्तिरेखा समजून घेऊन त्यात जीव ओतण्याची असामान्य क्षमता व बुध्दिमत्ता या बळावर वहिदा रेहमानने चित्रपटसृष्टीत आपलं विशेष स्थान निर्माण केलं. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात (१९५५-७५) गुरू दत्त, विजय आनंद ते सत्यजित राय यांसारख्या महान दिग्दर्शकांच्या चित्रपटांतून तिने आव्हानात्मक भूमिका साकार केल्या आणि एकप्रकारे ती पर्यायी स्त्री-प्रतिमांसाठी अवकाश निर्माण करणारी अभिनेत्री ठरली. ‘प्यासा’, ‘गाइड’, ‘अभिजान’, ‘मुझे जीने दो’, ‘तीसरी कसम’, ‘खामोशी’ आदी चित्रपटांतील तिच्या सघन-सजीव व्यक्तिरेखा अविस्मरणीय व कायमस्वरूपी ठसा उमटवणार्या ठरल्या… आजकालच्या ‘रंग दे बसंती’ किंवा ‘दिल्ली-६’ पर्यंत तो ठसा कायम आहे.
‘आज फिर जीने की तमन्ना है’ म्हणत पडद्यावर स्त्री-स्वातंत्र्याचा उद्धोष करणारी ही अभिनेत्री पडद्यामागील जीवनाबाबत नेहमीच मितभाषी राहिली. लेखिका नसरीन मुन्नी कबीर यांनी या ज्येष्ठ-श्रेष्ठ अभिनेत्रीला तिच्या भूमिकांबाबत, तिच्या व्यक्तित्वाबाबत आणि तिच्या जीवनप्रवासाबाबत बोलतं केलं आणि त्या बहुस्पर्शी संवादावर आधारित ‘कॉन्व्हर्सेशन्स विथ वहिदा रेहमान’ हे इंग्रजी पुस्तक साकार केलं. त्याच इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी सिध्द केलेला हा मराठी अनुवाद- वहिदा रेहमान…हितगुजातून उलगडलेली!
…आणि खरंच बाई सुंदराबाईंनी एवढं वैविध्यपूर्ण गायन केलं, तरी त्यांची आज जनमानसातली ओळख आहे ती, बैठकीची लावणी गाणारी गायिका म्हणूनच! अर्थात यात त्यांचा मान आहे की अपमान ठाऊक नाही… मात्र बाई सुंदराबाईंनी स्वतःला शास्त्रीय-उपशास्त्रीय गायिका म्हणून सिद्ध केलं होतं आणि तरीही, जन्माने कोल्हाटी वा व्यवसायाने तमासगीर नसतानाही ठाय लयीतील लावण्या म्हणणारी गायिका असं म्हटलं, की सर्वप्रथम बाई सुंदराबाईंचंच नाव तोंडी येतं; याबद्दल बाईंचं कौतुकच वाटतं. ‘कठीण बाई बडोद्याची चाकरी’, ‘तुम्ही माझे सावकार’, ‘कुठवर पाहू वाट सख्याची…’ यांसारख्या बैठकीच्या लावण्यांवर बाई सुंदराबाई जी अदा करायच्या, भावकाम करायच्या, त्याने उपस्थितांच्या भिवया कायम उंचावलेल्याच राहायच्या म्हणे! त्यामुळेच इतर शास्त्रीय-उपशास्त्रीय गायन करत असतानाही बाई सुंदराबाईंनी कधी आपल्या लावणीला अंतर दिलं नाही. अगदी शेवटच्या दिवसांत आकाशवाणीवरही त्यांनी बालगंधर्वांसोबत लावणीचा कार्यक्रम केला.
या त्यांच्या आकाशवाणीच्या नोकरीच्या दिवसांतच एक दिवस कधी तरी त्यांची मुलगी बेबीचं निधन झालं आणि त्यानंतर मग त्यांचं जगण्याचं कारणच जणू संपुष्टात आलं. त्या आतल्या आत मिटत गेल्या. या अखेरच्या काळातच प्रसिद्ध गायिका सुशीलाराणी पटेल त्यांच्याकडे गाणं शिकायला यायच्या. गाणं म्हणण्यापेक्षा, लावणी शिकायला यायच्या… आणि अखेरच्या दिवसांत सुशीलाराणी पटेल यांनीही सुंदराबाईंना मदत केली होती. मात्र त्या अखेरच्या काळात त्यांचा खरा मायेचा गोतावळा होता, तो तत्कालीन बॉम्बे आकाशवाणीवरील कर्मचारी हाच. त्यांनीच त्यांना हॉस्पिटलात सांभाळलं आणि त्यांच्या मृत्युपश्चात त्यांना अखेरचा निरोपही दिला…
…आता बाई सुंदराबाई कुणाला ठाऊकही नाहीत. व्ही. शांताराम यांच्या ‘माणूस’ चित्रपटात शाहू मोडक यांच्या आईचं काम केलेली अभिनेत्री म्हणून त्या कुणाकुणाच्या स्मरणात असतील कदाचित… पण तेवढंच!
– मुकुंद कुळे
(पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव, लोककला-संगीत-साहित्य यांमध्ये विशेष रूची असून त्याबद्दल लेखन केलं आहे.)
विनय नेवाळकर
मन पापी भुला…कातीही वेळा ऐका ..सुंदर..बैठकीतील लावणी ..कोणीतरी शूट करायला हवी होती, माणूस मुळे त्या दिसतात तरी..फार गोड बाई होत्या…
Rohan Prakashan
धन्यवाद! वेबसाइटचा आपण जरुर वापर करावा आणि त्यावरील सुविधांचा आनंद घ्यावा…
-टीम रोहन
Ajay Shrikant Manjrekar
बालगंधर्वांच्या गुरुभगिनी आणि गुरुवर्य भास्करबुवांच्या शिष्या ताराबाई शिरोडकर यांच्या त्या फार संपर्कात होत्या .
Rohan Prakashan
धन्यवाद!
– टीम रोहन
Ashish Sharad Kalkar
मुकुंदजी लेखक म्हणून परिचयाचे आहेतच, पण अशा कमी प्रसिद्धी मिळालेल्या व्यक्तींना प्रकाशझोतात आणण्याचं काम ते करत आहेत याचा आनंद आहे.
पुढच्या लेखांच्या प्रतीक्षेत !
Rohan Prakashan
नक्कीच! मुकुंद कुळे यांच्या लेखांचा हा प्रवास पाक्षिक असून पुढचा लेख शुक्रवारी प्रसिद्ध होईल.
धन्यवाद!
-टीम रोहन