फॉन्ट साइज वाढवा

बैठक सजलेली असते. मऊशार गादीवर पांढरी शभ्र चादर अंथरून, वर तबियतीने पेश येण्यासाठी लोड-तक्क्यांचा इंतजाम झालेला असतो. गाद्या-गिरद्यांसमोर एका तबकात मोठ्या नजाकतीने विड्यांची चळत रचलेली असते. तर दुसऱ्या तबकात काळजात खोलवर जखम करणाऱ्या मोगऱ्याचे बेधुंद वळेसर. साजिंद्यानी वाद्यं सुरात जुळवून ठेवलेली असतात. हुकूम झाला, की फक्त सूर छेडायचाच अवकाश असतो.

एक अजीबसा माहौल आकाराला येत असतो. काळजात तीव्र कळ उमटवणारी, पण त्याच वेळी हवीहवीशी हुरहुर प्रत्येकाच्या मनाला लागून राहिलेली असते. हा नजारा खरं तर रोजचाच. अन् तरीही रोज पहिलेपणाचाच अनुभव देणारा.

‘खास’ गाणं ऐकण्यासाठी बैठक ठरवणाऱ्या रसिकाची वाट बघणं सुरू असतं. थोड्याच वेळात तो रसिक येतो आणि बैठकीला सुरुवात होते. तबला-पेटीचे सूर घुमू लागतात आणि सोबत बाईंचा दाणेदार-पेचदार आवाज उमटू लागतो. तबला-पेटीच्या सुरेल सुरांनाही मागे टाकणारा-

‘सुकुमार बाई गुलाबाच्या फुला

बाई घराकडे चला

विनंती मी करते…

का कठीण केली माया मनामध्ये झुरते…

तुम्ही हिना मी दवण्याची काडी

बाई विषयाची गोडी

लागली तुम्हा फार

बारा वर्षे गेला पाऊस, जमीन करा गार…

आणखी एक सांगते मजा

खाली तुम्ही निजा

वरून मी झुकते

का कठीण केली माया मनामध्ये झुरते…’

…या पहिल्याच बाणात रसिक गारद होतो. ही नुस्ती लावणी नसते. तो भावनेचा जाळ असतो. बाई फक्त तोंडानेच गाणं म्हणत नसतात. त्या शरीरानेही बोलत असतात.

एकाच वेळी गाणं आणि त्या गाण्याच्या भावाबरहुकुम डोलणारं शरीर याची जणू जुगलबंदीच सुरू असते. मग रसिक जितका रंगेल-जाणकार तितकी बाईंची गाण्याची-अदेची जुगलबंदी रंगत जाते. त्यांच्या गाण्याची आणि शरीराची ही दिलखुलास अदा रसिकाला पागल करायला पुरेशी असते. या गाण्याने-अदेने तो वेडावतो, खुळावतो. कधी नादीही लागतो. पुन्हा पुन्हा बैठकीच्या लावणीला येत राहतो. हे यश फक्त बाईंच्या सौंदर्याचं नसतं. त्या सादर करत असलेल्या बैठकीतील लावणीच्या सौंदर्याचंही असतं. म्हणजेच बाईंच्या कलेचं, शरीराची अदा आणि चेहऱ्यावरच्या भावकामाचं.

बाई… या ‘बाई’ म्हणजे मोहनाबाई म्हाळुंगेकर. मी त्यांना पुण्याच्या आर्यभूषण तमाशा थिएटरमध्ये भेटलो होतो, तेव्हा त्यांचं वय होतं फक्त एकावन्न. पण तेव्हाही बाईंचं वय गिणतीत घेण्याचं काम नव्हतं. कारण त्या वेळीही त्यांचं बैठकीच्या लावणीचं गायन आणि त्यावरचा अभिनय सारंच रसिकांना घायाळ करणारं होतं. बाई नऊवारी लुगडं नेसून एक पाय मुडपून बसून बसल्या होत्या आणि मला खुणावत म्हणाल्या होत्या- ‘तुम्ही हिना मी दवण्याची काडी…’ तेव्हा मला त्या खरोखरच दवण्याची काडी वाटल्या होत्या… आणि माझ्याही नकळत माझ्या मुखातून बाईंच्या गाण्याला-अभिनयाला उत्स्फूर्त दाद निघून गेली होती.

बैठकीच्या लावणीत नृत्याला वाव असतो, पण तो फार क्वचित. कारण बैठकीची लावणी ही रागदारी थाटाची असल्यामुळे गायिकेला गाण्यावरची पकड ढिली पडून चालत नाही. त्यासाठी तिला दमसास राखावाच लागतो आणि म्हणूनच उभं राहून नाचून शरीराला थकवण्यापेक्षा ती बसून गाणं म्हणून आपल्या बैठकीतूनच नृत्याविष्काराचा अनुभव रसिकाला देते.

हे बसून लावणी सादर करणं आणि त्याला साजेसा अभिनय करणं ही मोठी कसोटीची गोष्ट असते. कारण हे करताना गायिकेला एकाच वेळी गाणं आणि अभिनय दोन्हीचा समतोल राखावा लागतो. बैठकीच्या लावणीच्या परिभाषेत गायिकेच्या शारीरअभिनयाला अदा म्हटलं जातं. तर चेहऱ्याद्वारे तिने प्रकट केलेल्या अर्थाला भावकाम म्हणतात. आजवर लावणीपरंपरेत कौसल्याबाई कोपरगावकर, गोदावरी पुणेकर, भामाबाई पंढरपूरकर, यमुनाबाई वाईकर अशा ज्या मोठमोठ्या लावणीगायिका होऊन गेल्या. त्या सर्व जणी या गान व अभिनय कलेत एकदम निपुण होत्या. एवढ्या की त्यांचं वास्तवातलं वय वाढलं, तरी गाण्यातलं त्याचं वय कायम कोवळंच असायचं. ही जादुगिरी गाण्याबरोबरच मुख्यतः त्यांच्या अभिनयाची असायची. आपल्या पूर्वसुरींची ही जादुगिरी मोहनाबाईंना नेमकी साधलीय. म्हणूनच आपल्या हातात असलेला लावणीनृत्याचा नि गाण्याचा तोल व ताल त्या कधी बिघडू देत नाहीत.

खरं तर गाण्यातल्या अभिनयाला वाव मिळावा, म्हणून बैठकीच्या लावणीची मांडणीही तशीच केलेली असते. उदाहरणार्थ शास्त्रीय मैफलीत गायक आपल्या रियाजाची, आपल्या तयारीची झलक दाखवण्यासाठी अवघड ताना घेऊन पुन्हा लीलया समेवर येण्याच कसब करून दाखवतो. तसंच बैठकीची लावणी गाणारी गायिका एका विशिष्ट ओळीची आवर्तनं घेऊन त्या ओळीतला आशय नानाविध प्रकारे अभिनीत करून दाखवते. भामाबाई पंढरपूर अशा अभिनयातलं एक मानाचं पान होतं. आज मोहनाबाई तीच परंपरा चालवताहेत म्हटलं, तर वावगं ठरणार नाही. एवढी मोहनाबाईंची गाण्यावर आणि गाण्यातला आशय थेट अदा व भावकामाने व्यक्त करण्यावर हुकमत आहे.

…म्हणून तर एकदा भामाबाई पंढरपूरकर, यमुनाबाई वाईकर आणि लक्ष्मीबाई कोल्हापूरकर अशा तीन-तीन लावणीसम्राज्ञी सोबत असतानाही मोहनाबाईंनी आपल्या कलेची अशी काही चुणूक दाखवली होती की, तेव्हा रसिक पुरते वेडे झाले होते. तेव्हा दिवंगत विलासराव देशमुख सांस्कृतिक मंत्री होते. शासनाच्या वतीनेच मुंबईतल्या एका सभागृहात खास बैठकीच्या लावणीचं आयोजन करण्यात आलं होतं. भामाबाई, यमुनाबाई, लक्ष्मीबाई या तिघी जणी म्हणजे बैठकीच्या लावणीतली बापमाणसं. साहजिकच रसिकांवर छाप पाडण्यासाठी आधी या तिघींनी बैठकीच्या लावल्या सादर केल्या. त्या एवढ्या जोरदार झाल्या की, प्रेक्षक अक्षरशः खुळावले. मोहनाबाई तेव्हा लहान असल्यामुळे त्यांना सगळ्यात शेवटी बैठकीची लावणी सादर करण्याची संधी मिळाली. एवढ्या बुजुर्ग गायिकांनतर मोहनाबाई व्यासपीठावर आल्या खऱ्या… पण त्यांना बघताच उपस्थित रसिकजन चक्क रंगमंचापासून मागे सरकले. आधीच्या अनुभवी आणि धीट बायांनंतर ही नवखी तरुणी काय गाणार? असा भाव त्यांच्या नजरेत होता. तो नजारा बघून मोहनाबाई सुरुवतीला क्षणभर नाराज झाल्या. पण लगेच त्यांनी धीटपणे समोर बघितलं आणि बैठकीची लावणी सुरू केली-

‘अहो भाऊजी मी कोरा माल

मुखी विडा लाल

नरम गोरे गाल वर तीळ झळझळी

जशी फुलली चाफ्याची कळी गं… बाई गं…’

…आणि चमत्कार घडला. बाईंची सुरुवातच एवढी दमदार झाली होती, की मागे सरून बसलेली रसिक मंडळी त्यांची पहिली लावणी संपण्याआधीच रंगमंचाच्या पुढे येऊन बसली.

या मैफलीत मोहनाबाईंनी शहरी रसिकांना आपल्या गाण्याने वेडं केलं, तेव्हा त्यांचं वय होतं अवघं पंचवीस-सव्वीस. पण घरातूनच गाण्याची आणि अदेची त्यांना मिळालेली तालीमच एवढी जबरदस्त होती, की बाई गायला बसल्यावर त्यांचं गाणं आणि त्यावरचा नखरा वेगवेगळा काढणं अशक्यच होऊन जावं. मोहनाबाईंचं मूळ गाव लातूरपासून अठरा किलोमीटर अंतरावर असलेलं म्हाळुंगे. त्यांचं वडिलोपार्जित घर आजही म्हाळुंग्यात आहे. मी बाईंना भेटलो होतो, तेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं, पण जवळजवळ पंच्याहत्तरीच्या घरात असलेल्या त्यांच्या मातोश्री राजाबाई हयात असतात. विशेष म्हणजे लेकीला गाण्यातलं-अदेतलं काही अडलं-नडलं तर त्यासंबंधी मार्गदर्शन करायलाही तेव्हा राजाबाई उत्सुक असायच्या. मोहनाबाई आईचं बघूनच सारं शिकल्या. त्यांचे आई-बाबा दोघेही जलसा सादर करायचे. वेगवेगळ्या गावातल्या यात्रा-जत्रांत तंबुतून आपला कार्यक्रम सादर करायचे. त्यांचे वडील उत्तम ढोलकीवादक होते. तर आई केवळ लावण्याच नाही, तर उर्दू गझलाही सुंदर म्हणायची. लहानपणापासून म्हणजे तिसऱ्या वर्षापासूनच मोहनाबाईंनी आईचं गाणं आणि नाच सारं काही आत्मसात करायला सुरुवात केली होती. कार्यक्रम संपायला रात्रीचे दोन-तीन वाजायचे. पण मोहनाबाई एकटक कार्यक्रम बघत बसायच्या.

मोहनाबाई आईचंच बघून गाणंवगैरे शिकल्या, तरी गाणं कोणत्या पद्धतीने म्हणावं, ते सादर कसं करावं आणि गाण्यातला भाव रसिकांच्या मनात रुजविण्यासाठी आधी आपण स्वतःच आपल्या मनात तो भाव जागृत कसा करावा, हे सारं त्यांना त्यांच्या वडिलांनी शिकवलं होतं. वादक असल्यामुळे ते लयीला एकदम पक्के होते. त्यामुळे लहान वयातच त्यांनी आपल्या मुलीकडून म्हणजे मोहनाबाईंकडून गाणी पक्की करून घेतली होती.

मोहनाबाईंच्या आई-वडिलांची कला तर मोठी खरीच, पण त्या ज्या समाजातून आल्या होत्या, तो ‘कळवात’ समाजच खर जबरदस्त. अस्सल कलावंत समाज. आपल्याकडे जसा कोल्हाटी समाज नाच-गाण्यासाठी प्रसिद्ध, तसाच हा मुस्लिमांतील कलावंत समाज. तो कंचनी, कलावंतीण, कळवात अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. महाराष्ट्रात तमाशा किंवा लावणी कलेत जसं कोल्हाटी समाजाचं मोठं योगदान आहे, तसंच योगदान या कळवात समाजाचंही आहे. एक अगदी ठळक ओळख सांगायची म्हणजे, शाहीर साबळे ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या आपल्या कार्यक्रमात एक पारंपरिक गाणं म्हणायचे- ‘रुणुझुण वाजंत्री वाजती, वाजंत्री वाजती…’ तर या ओळीची पुढची ओळ होती- ‘म्होरं कळवातणी नाचती, कळवातणी नाचती’. या गाण्यातील कळवातणी, म्हणजे कळवात समाजातील कलाकार महिला.

गायन-वादनाची कला कळवात समाजाच्या एवढी हाडीमासी रुजलेली असते, की त्याशिवाय त्यांना दुसरं काही सुचतच नाही. साहजिकच हाच कलावंताचा वारसा घेऊन मोहनाबाई आल्या आणि घरातूनच कलेचा असा वारसा मिळाल्यामुळे, वयाच्या अवघ्या आठ-नवव्या वर्षीच मोहनाबाई तयारीने नाचू आणि गाऊ लागल्या. तर स्वतःचं नाव असलेल्या फडावर वयाच्या चौदाव्या वर्षीच उभ्या राहिल्या. त्यांच्या फडाचं नाव होतं- ‘राजा-मोहना म्हाळुंगेकर संगीत पार्टी’.

या संगीतपार्टीचीही एक गंमत होती. प्रत्यक्षात मोहनाबाईंच्या जन्माआधीपासूनच या नावाने ही संगीतपार्टी सुरू होती. तेव्हा संगीत पार्टी तर सुरू करायची होती, पण कुणाचं जोडनाव घ्यावं, हे मोहनाबाईंच्या आईला उमगत नव्हतं. कारण तिच्या जोडीला दुसरं कुणी नव्हतंच आणि तमाशाकलेत तर सगळ्या पार्ट्या जोडनावानंच प्रसिद्ध. तेव्हा मोहनाबाईंच्या आई आणि वडिलांनी असं ठरवलं की, आपण आता एक सोयीचं जोडनाव पार्टीला देऊ या नि मुलगी झाली की तेच तिचं नाव ठेवू या. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या पार्टीचं नाव ‘राजा-मोहना म्हाळुंगेकर पार्टी’ असं ठेवलं आणि मोहनाबाईंच्या जन्माआधीच त्यांचं नाव नक्की झालं.

पण तेव्हा आणि आताही मोहना हे नाव एवढं अनकॉमन होतं नि आहे की, आजही केवळ त्या नावाकडेच आधी आपलं लक्ष आधी वेधलं जातं. कारण मुलाचं मोहन हे नाव सर्रास ठेवलं जातं. पण मुलीचं मोहना नाव ठेवण्याची प्रथा आपल्याकडे आजही नाही. मात्र मोहना हे आईबापाने ठेवलेलं नाव मोहनाबाईंनी खरोखरच सार्थक केलं. ‘रसिकांना मोहवणारी ती मोहना’ अशीच त्यांची सर्वत्र ख्याती झाली. वयाची पन्नाशी उलटली तरी ती ख्याती उणावलेली नव्हती. त्याच वेळी त्यांना आलेला एक अनुभव पाहण्यासारखा आहे. मोहनाबाईंचा रोजच्या प्रमाणेच आर्यभूषणला खेळ सुरू होता. वर रंगमंचावर त्यांच्या संगीतबारीतल्या मुली नाचत होत्या… आणि त्या खाली प्रेक्षागृहातच बसल्या होत्या. खेळ बघायला एक ऐन पंचविशीतला मुलगा आला होता. पण रंगमंचावरच्या तरुण मुलींचा नाच बघण्यापेक्षा तो एकसारखा आधी मोहनाबाईंकडे आणि मग त्या मुलींकडे बघत होता. असं बराच वेळ सुरू होतं. शेवटी न राहवून तो बाईंजवळ गेला नि म्हणाला- ‘बाई रागावू नका. पण त्या समोर नाचणाऱ्या मुलींपेक्षा आजही तुम्हीच सुंदर दिसता. तुम्ही आता एवढ्या सुंदर दिसताय, तर तरुणपणी किती सुंदर असाल?’ बाई त्याचं हे बोलणं ऐकून चक्रावूनच गेल्या. हे कोवळं पोर काय बोलतंय काय म्हणून त्या थोड्या चिडल्याही. अर्थात ते वरवरचं होतं. पन्नाशीची उमर गाठल्यावरही कुणी सुंदर म्हणत असेल, तर ते कुठल्या स्त्रीला आवडणार नाही? पण मोहनाबाईंच्या मनात खरं तर आपल्या सौंदर्याचीच भाती बसली होती.

त्याची एक मोठीच हकिकतच आहे. गावोगाव फिरत तमाशा थिएटरमधून नाचणं हे लहानपणापासूनच त्यांच्या वाट्याला आलेलं. त्यात त्यांनी कधीच कमीपणा मानला नाही. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावात आई आणि धाकट्या बहिणींबरोबर त्या नाच-गाणं करत राहिल्या. आपली कला त्या कलेच्याच पातळीवर रसिकांपर्यंत आब राखून पोचवत राहिल्या. एवढ्या वर्षांत कधीच त्यांच्यावर अवघड प्रसंग ओढवला नाही. या वाटचालीत त्यांच्या सौंदर्याला भुलून लग्नाची मागणी घालणारे ततर त्यांना अनेक जण भेटले. पण मोहनाबाईच कधी कुणाला भुलल्या नाहीत. पण ऐन भरात असताना जे घडलं नाही, ते त्यांच्या बाबतीत वयाच्या पस्तिशीत घडलं. त्या एका तालेवार असामीच्या प्रेमात पडल्या. म्हणजे ती असामी प्रेमात पडली आणि मग मोहनाबाईंनीही होकार भरला. त्या वेळी खरंतर त्यांना सगळ्यांनी विरोध केला होता. पण प्रेमाच्या मोहाने मोहनाबाई गाणं-नाचणं सारं सोडून त्याच्यामागे गेल्या. त्यानं तसा आधारच द्यायचं कबूल केलं होतं. बाईंना वाटलं पुरुषांच्या जगात हाच एकमेव पुरुष. पण जीवाभावाच्या माणसांतून त्या त्याच्याबरोबर गेल्या नि नंतर सगळं विपरितच घडलं. त्याने मोहनाबाईंना जवळजवळ कोंडूनच ठेवलं. त्याचं बाईंवर प्रेम होतं, पण ते इतकं आततायी की त्यातून त्याने त्यांच्या हिंडण्याफिरण्यावरच बंधनं आणली. घरातून बाहेर पडायचं नाही. कुणाला तुझे पाय दिसता कामा नयेत. कुणाला तुझी पाठ दिसता कामा नये… अशी किती तरी. तब्बल सात वर्षं मोंहनाबाई प्रेमाच्या या नजरकैदेत अडकून पडल्या. त्या सात वर्षांत त्या आपलं गाणं-नाचणंच नाही, तर चालणंही विसरल्या. कारण कायम घरातच असल्यामुळे पायांचं चालण्याचं वळणच तुटलं. चालायला लागल्या की, त्याचे पाय एकमेकांतच गुरफटायचे. शेवटी ही परिस्थिती त्यांनी कशीबशी घरच्यांना कळवली आणि त्यांनी मग त्यांची सुटका केली. त्यानंतर दोन महिने त्यांच्या बहिणी रोज सकाळी त्यांच्या हाताला धरून दोन किलोमीटर चालवत न्यायच्या. चालण्याच्या रोजच्या व्यायामामुळे मग सहा महिन्यांनी त्या अगदी नीट चालायला लागल्या.

ती सात वर्षं आपल्या आयुष्यातून कायमची पुसली गेली तर किती बरं, असं मोहनाबाई त्या वेळी सांगत होत्या. पण त्या अनुभवानंतर मोहनाबाई अधिक खमक्या झाल्या आणि पुन्हा थिएटरवर आत्मविश्वासाने उभ्या राहिल्या. अर्थात त्यांना पुन्हा उभं राहण्याची संधी दिली ती, आर्यभूषण तमाशा थिएटरचे मालक माजिदशेठ तांबे यांनी. त्यांनी मोहनाबाईंना धीर दिला, विश्वास दिला. कारण त्यांनी मोहनाबाईंची कला पाहिलेली होती. त्यांच्या आर्यभूषण थिएटरमध्ये पठ्ठे बापूरावांच्या पवळापासून ते कौसल्याबाई, भामाबाई, हिराबाई अवसरीकर अशा अनेक नामवंत लावणीकलावंतांनी आपली कला सादर केलेली होती आणि त्यामुळे थिएटरचा नावलौकिकही वाढलेला होता. एवढ्या कलावंतांची कला जवळून पाहणारे माजिदशेट तेव्हा आवर्जून म्हणाले होते- मोहनाबाई म्हणजे या परंपरेतलंच अस्सल रत्न आहे!

कलावंत म्हणून मोहनाबाईंमधल्या त्या अस्सलतेची साक्ष एवढ्या वर्षात अनेकदा मिळालेली आहे. एका कार्यक्रमात त्यांची बैठकीची लावणी ऐकून-पाहून खुद्द श्रीदेवीने भेट घेऊन त्यांची पाठ थोपटली होती. तर दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी ‘अपना उत्सव’च्या वेळी बाईंच्या लावणीचा आवर्जून आस्वाद घेतला होता. अर्थात असे कौतुकाचे प्रसंग बाईंच्या वाट्याला खूपच आलेत. पण त्याना त्यापेक्षा आपल्या कलेचं मोल अधिक वाटतं. विशेषतः बैठकीच्या लावणीचं. कारण फडावरची लावणी कुणीही करू शकतं. पण बैठकीची लावणी करण्यासाठी गाणं आणि मन दोन्ही परिपक्व लागतं. बाई म्हणतात, तेच आज कुणाला जमत नाही.

निवडक रसिकांच्या बैठकीत बसून धिम्या, पण दमदार आवाजात आजवर पेश होत आलेली महाराष्ट्राची बैठकीची लावणी खरं तर इरसाल. कारण बैठकीच्या लावणीला येणार पब्लिक विशिष्ट हेतू मनात ठेवूनच येतं. त्यांच्या मनीची इच्छा पूर्ण करण्यासाठीच बैठकीतल्या लावण्या अश्लील-चावटच असतात आणि तरीही बैठकीची लावणी आजवर आपला आब राखून राहिलेली आहे. आपलं घरंदाजपण तिने टिकवून ठेवलं आहे. यामागे तिची सत्त्वशीलता आहे. रसिकांच्या मागे धावून तिने रसिकांचं अंधानुकरण केलं नाही. उलट रसिकांना हवं ते देतानाही तिने आपली मर्यादा कधी सोडली नाही. त्यामुळेच फडाच्या लावणीला बाजारू स्वरूप येत असतानाही बैठकीची लावणी आजही आपलं कलामूल्य जपून आहे. बैठकीच्या लावणीचं हे कलामूल्य जपण्याचं काम गोदावरीबाई, भामाबाई, यमुनाबाई, गुलाबबाई यांच्यानंतर मोहनाबाईंनी एखाद्या तपस्विनीप्रमाणे केलं. केवळ व्यवसाय म्हणून नाही एक कला म्हणूनच त्यांनी बैठकीच्या लावणीकडे पाहिलं आणि प्रत्येक वेळी बैठकीत छान मुरकी कशी घेता येईल, याचा सातत्याने विचार केला…

आता त्यांनी साठी ओलांडलेली आहे आणि तमाशा-लावणीची बैठक तर त्यांनी केव्हाच सोडून दिलेली आहे. नाही म्हणायला कला त्यांच्या अंगात मुरलेली आहे. मोहनाबाईंनी हाक द्यायची खोटी की ती सरसरून वर येईल. पण बाईंनी तिचा आता तरी समाधानानं निरोप घेतलेला आहे. मात्र उद्या वाटलंच आणि खरोखरच बैठकीच्या अस्सल लावणीची सलामी द्यायची वेळ आली, तर पुन्हा रंगमंचावर यायला मोहनाबाई पुढे-मागे पाहणार नाहीत, याची खात्री आहे!

– मुकुंद कुळे

RohanSahityaMaifaljpg-1-1
Sundarabai
या सदरातील लेख…

‘बाई’ सुंदराबाई

बाई सुंदराबाईंनी एवढं वैविध्यपूर्ण गायन केलं, तरी त्यांची आज जनमानसातली ओळख आहे ती, बैठकीची लावणी गाणारी गायिका म्हणूनच!

लेख वाचा…




देवकन्या!

ते केवळ गायन नव्हतं, तो सुब्बुलक्ष्मींचा सतत चाललेला रियाझ होता – आपलं गाणं देवाप्रति पोचवण्याचा!

लेख वाचा…


एकलीच बशिल्ली मेनकाबा

आयुष्याचं उत्तरपर्व गोव्यातील फोंड्याच्या शांतादुर्गा मंदिराजवळ असलेल्या स्नेहमंदिर वृद्धाश्रमात व्यतीत करणाऱ्या प्रसिद्ध गायिका-नर्तिका मेनकाबाई शिरोडकरही अशाच झुरल्या असतील का आपल्या माणसांसाठी?

लेख वाचा…


आर्यगंधर्व

बालगंधर्वांनाही ज्यांच्या लावण्या प्रिय होत्या, त्या कौसल्याबाई कोपरगावकर यांची नावनिशाणीच आज कालपटलावरून पुसली गेली आहे, जणू काही कौसल्याबाई झाल्याच नाहीत…

लेख वाचा…


विद्यासुंदरी

शरीराची गरज असेपर्यंत आश्रय द्यायचा आणि ती भागली की वाऱ्यावर सोडायचं, या पुरुषी वृत्तीचा तिला वीट आला नि संतापानेच तिने निश्चय केला- आता नागरत्नम्माला मोठी कलावंत करायचं !

लेख वाचा…


बैठकीच्या लावणीतलं मानाचं पान

भामाबाईंच्या कलेचं कोणत्याच प्रकारचं दस्तऐवजीकरण आज उपलब्ध नाहीय. परंपरेतील माणसं त्यांचं नाव घेताना आजही कानाला हात लावतात, हेच भामाबाईंचं मोठेपण! 

लेख वाचा…


बैठकीच्या लावणीतलं मानाचं पान

थोड्याच काळात रसूलन एखाद्या जाणत्या गायिकेसारखी गायला लागली. बघता बघता बनारस घराण्याची आन-बान-शान बनली! 

लेख वाचा…


बैठकीच्या लावणीतला टवटवीत ‘गुलाब’

…आणि अवघ्या बारा-तेरा वर्षांच्या गुलाबबाई ‘गुलाबबाई संगमनेरकर संगीतबारी’च्या मालकीण झाल्या.  

लेख वाचा…


जगन्नाथाची शेवटची धर्मपत्नी

…ती होती पुरीच्या जगन्नाथाची शेवटची देवदासी, त्याची अखेरची धर्मपत्नी… 

लेख वाचा…


गौरीअम्मा : कलेची गंगोत्री

तरीही आमच्या कलाजगताला गौरीअम्माविषयी फार काही ठाऊक नाही. असणार तरी कसं म्हणा? शेवटी गौरीअम्मा बोलूनचालून एक देवदासी तर होती…  

लेख वाचा…


विद्याधरीबाई : बनारसची शानो शौकत!

मुळात विद्याधरीबाईंच्या स्वभावात जात्याच मार्दव होतं. त्यामुळे गाणं असो वा व्यवहारातलं वागणं ते कधी एकमेकांपासून दूर गेलं नाही.  

लेख वाचा…


मुद्दुपलनी आणि तिचं शृंगारकाव्य…

भारतीय शृंगार साहित्यात मुद्दुपलनीचं ‘राधिका सांत्वनमु’ हे शृंगारकाव्य आगळवेगळं आहे, कारण ते पुरुषाऐवजी एका स्त्रीने लिहिलेलं आहे. 

लेख वाचा…


देवदासी नृत्याची तारणहारव्य…

देवदासीआटम ते भरतनाट्यम हे परिवर्तन होताना, मूळ कलावंतसमाजाचं अस्तित्वच पुसलं गेलं.. 

लेख वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *