१९४७ला भारताची फाळणी झाली आणि रसूलनबीच्या सुलेमानमियांनी तिच्या मागे ‘पाकिस्तानला जाऊ या’ची रट लावली. ते तिच्या खनपटीलाच बसले, पण रसूलनबी त्यांना बधली नाही. ‘माझ्या सगळ्या पिढ्या हिंदुस्तानच्या याच मातीत शांत झाल्यात. माझी जिवाभावाची आणि अडीअडचणीला धावणारी माणसं याच मातीत आहेत. मी त्या परक्या भूमीत नि परक्या मातीत येऊन काय करू? आपण इथेच राहू या आणि इथेच देशाची, संगीताची सेवा करू या…’ असं सांगत तिने रसूलनबीने पाकिस्तानला यायला, नवऱ्याला ठामपणे नकार दिला. हा नकार देताना तिला ठाम विश्वास होता, की हा देश आपला आहे, ही माती आपली आहे आणि इथली माणसंही आपली आहेत…

…पण हा देश, इथली माती आणि इथली माणसं खरंच तिची होती? तसं जर असतं, तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गुजरातमध्ये उसळलेल्या पहिल्याच मोठ्या जातीय दंगलीत (१९६९) रसूलनबीचं घर कुणी कशाला पेटवून दिलं असतं? मोठ्या विश्वासाने ती या देशात राहिली होती, पण हा देश मात्र तिच्या विश्वासाच्या लायकीचाच नव्हता, बहुधा! दंगलीच्या घाईगडबडीत जे हाताला लागलं, ते रसूलनबीनं गाठोड्यात बांधलं आणि नेसत्या कपड्यांनिशी अहमदाबाद सोडलं, ते थेट अलाहाबाद गाठलं. नंतर तिचं हक्काचं घर झालंच नाही कधी. छोट्या-मोठ्या झोपड्या आणि अधिक तर रस्त्याचा फूटपाथ हेच तिचं मग निवासस्थान झालं.

तिला गरिबीची सवय नव्हती असं नाही, तिचा जन्मच अतिशय दैन्यावस्था असलेल्या घरात झाला होता. पण तारुण्यात पदार्पण करता करता आपल्या गाण्याने तिने रसिकांना असं काही बेहोश करून टाकलं, की पुढची पन्नासेक वर्षं त्यांना होश आलीच नाही!

घरगुती नाव रसूलनबी असलं, तरी आम जमाना त्यांना ओळखत होता, ते रसूलनबाई म्हणूनच! पूरब अंग की ठुमरी असो, चैती-कजरी असो, किंवा पंजाबी ढंगाचा टप्पा… गाणं रसूलनबाईच्या गळ्यातून अवतरताना, ते इतक्या लडिवाळपणे अवतरत असे, की जणू कुणी रेशमाच्या लड्याच उलगडतंय. मात्र हे गाणं म्हणजे वरवरचं गाणं नव्हतं, किंवा त्या गाण्याला त्यांच्या वयाचा-सौंदर्याचा किंवा मादकतेचा जराही स्पर्श नव्हता. त्या गाण्याला शास्त्र होतं, त्या गाण्याला खोली होती, त्या गाण्याला ऐट होती आणि त्या गाण्यात जरबही होती.

साहजिकच होतं म्हणा ते… वयाच्या पाचव्या वर्षापासून रसूलनबाई गाणं शिकत होत्या. त्यांचा जन्म १९०२चा. उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमधील कछवा बाजार इथला. त्यांची आई अदालतबाई कलावंत घराण्यातलीच. त्यांनाही खूप गाणं यायचं, पण नशिबाने साथ दिली नाही. परिणामी ऐषोआरामी कोठीऐवजी त्यांच्या वाट्याला गरिबीचं जीवन आलं. पण आपल्या लेकीचा गाता गळा त्यांनी अगदी लहानपणीच ओळखला होता. म्हणूनच नकळत्या वयापासून त्यांनी छोट्या रसूलनवर गाण्याचे संस्कार सुरू केले… आणि थोडी जाणती होताच, तिला थेट उस्ताद शमू खान यांची तालीम लावली. सोबतच सारंगीवादक आशिक खान आणि नज्जू खान यांचीही. या तीनही उस्तादांनी छोट्या रसूलनवर अशी काही मेहनत घेतली, की थोड्याच काळात रसूलन एखाद्या जाणत्या गायिकेसारखी गायला लागली. बघता बघता बनारस घराण्याची आन-बान-शान बनली!

बहुधा वय पंधराच्या आतच तिच्या गाण्याचा पहिला जलसा उत्तर प्रदेशातील धनंजय गढच्या शाही दरबारात झाला आणि मग… स्थानिक राजांच्या आमंत्रणांची तिच्या मागे रिघच लागली. एका झटक्यात छोटी रसूलन, रसूलनबाई झाली. मग तिला मागे वळून पाहावंच लागलं नाही. थोड्याच अवधीत रसूलनबाई बनारसमधल्या एका मोठ्या कोठीची मालकीण झाली.

होय, ती कोठेवाली झाली, तवायफ झाली. पण तेव्हा तवायफ किंवा कोठासंस्कृती, म्हणजे गायन आणि नृत्यकलेची चालतीबोलती विद्यापीठं होती. संध्याकाळ होताच कोठ्यांवर शमादानं उजळायची, ती दुसऱ्या दिवशीची पहाट झाल्यावरच मालवली जायची. कोठीवरच्या दिवाणखान्यात रसिक येत-जात राहायचे आणि कला तिथे विहरत राहायची. पण फक्त गाणंच कशाला, समाजात अदबीनं बोलावं कसं, वागण्यात तहजीब कशी सांभाळावी, याचीही ही कोठासंस्कृती वस्तुपाठ होती आणि त्यामुळेच सभ्य घरातल्या मुला-मुलींना ती तहजीब शिकायला कोठ्यावर पाठवायची तेव्हा पद्धतही होती… असो, तर रसूलनबाई एका कोठ्याची मालकीण झाली आणि समाजात तिचा मान-सन्मान वाढला. तिचं गाणं ऐकायला येणाऱ्यांची गर्दी वाढायला लागली, सोबतच तिला संपूर्ण हिंदुस्तानातून गाण्याच्या मैफलींची निमंत्रणंही यायला लागली. उत्तर भारत तर तिने केव्हाच आपल्या पदराखाली घेतला होता…

रसूलनबाई हे नाव तेव्हा बनारस आणि एकूणच आजूबाजूच्या सांस्कृतिक विश्वात एखाद्या किंवदंतीसारखं गाजत होतं. त्यांचं गाणं ऐकायला रसिक जीव पाखडत होते. रसूलनबाईंचं गाणं ऐकण्यासाठी धडपडणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध शहनाईवादक भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँसाहेबांचाही समावेश होता. लहानपणी ते आपल्या मोठ्या भावाबरोबर बनारसच्या बालाजी मंदिरात रियाझ-तालमीसाठी जायचे. या मंदिराच्या मार्गावरच रसूलनबाईंचा कोठा होता. कोठ्यातून बाईंच्या गाण्याचा आवाज आला, की उस्तादजी काहीतरी कारण सांगून भावाचा हात सोडून पळत आणि कोठ्यावर हजेरी लावत. रसूलनबाईंचं गाणं ऐकताना मंत्रमुग्ध होतं. रसूलनबाईंच्या गाण्याची निरखण-परखण करूनच उस्ताद सनईवादनातील भाव, खटका आणि मुरकी शिकले होते म्हणतात! मात्र त्यांची ही लबाडी एक दिवस त्यांच्या मोठ्या भावाने पकडली आणि कोठ्यासारख्या बदनाम ठिकाणी जातो, म्हणून त्यांना चांगलाच दम भरला. एवढंच नाही, तर अशा नापाक ठिकाणी आलं, तर अल्ला नाराज होतो, असंही वर सांगितलं. तेव्हा पटकन उस्तादजी म्हणाले होते – ‘हृदयातून आलेला आवाज कधी पाक-नापाक असतो?’ आणि जमेल तसं, जमेल तेव्हा, उस्तादजी रसूलनबाईंना ऐकत राहिले.

वय वाढत गेलं, तसं रसूलनबाईंचा आवाज आणि गाणंही अधिक परिपक्व होत गेलं. आवाजातील चंचलता जाऊन तिथे ठहराव आला. या ठहरावावर रसिक बेभानपणे झुलू लागले. झुलतच राहिले. रसिक असे कितीही काळ रसूलनबाईंच्या गाण्यावर झुलायला तयार होते; पण अचानक वयाच्या चाळिशी-पंचेचाळिशीच्या उंबरठ्यावर असतानाच रसूलनबाईना कोठ्यावरील अनिश्चिततेचं जीवन नकोसं वाटू लागलं आणि त्यांनी एका क्षणी बनारसमधला आपला नामांकित कोठा सोडला. त्यांनी आपलं शास्त्रपूत गाणं सोडलं नाही, पण मुजरा सोडला…

…आणि त्या बनारसमध्येच एका आडगल्लीत साधेपणाने राहू लागल्या. कोठा सोडल्यावर लगेचच त्यांनी सुलेमान नावाच्या एका स्थानिक बनारस साडीविक्रेत्याशी लग्न केलं. दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला. मात्र त्यांचं लग्न होऊन काही वर्षँ होतायत न होतायत तोच भारताची फाळणी झाली… सुलेमानमिया पाकिस्तानात निघून गेले. रसूलनबाई आणि सुलेमान यांना वझिर नावाचा एक मुलगाही होता, असं म्हणतात. त्यालाही जाताना सुलेमानमिया सोबत घेऊन गेले. त्यानंतर काही काळ रसूलनबाई बनारसलाच होत्या. कोठा सोडला, तरी त्यांचं मैफलींमधलं गाणं सुरूच होतं. आकाशवाणीवरही त्यांना मानाने बोलावलं जात होतं. समाजात त्यांना मिळणारा मान-सन्मान सुरुच होता… पण नंतरच्या काळात बहुधा बनारसचा माहोल बिघडत गेला. आधीचं उदारमतवादी बनारस संकुचित वृत्तीचं झालं आणि त्याच काळात कधी तरी रसूलनबाई बनारस सोडून अहमदाबादला गेल्या. अहमदाबादला त्या अनेक वर्षँ होत्या. तिथून त्यांचे कार्यक्रमाचे दौरेही सुरू होते. सारं सुरळीत सुरू असतानाच, १९६९ला गुजरातमध्ये स्वातंत्र्योत्तर काळातली पहिली मोठी जातीय दंगल उसळली… आणि त्या दंगलीत विरुद्ध बाजूच्या दंगेखोरांनी लावलेल्या आगीत रसूलनबाईंचं घरही जळून खाक झालं. रसूलनबाईंचं घर जळत होतं, तेव्हा खरं तर भारतीय संगीतच जळत होतं.

त्या जळणाऱ्या घराकडे बघून रसूलनबाईंच्या मनात कोणत्या खंती प्रसवल्या असतील, कोण जाणे… नवऱ्याबरोबर पाकिस्तानला गेलो असतो तर बरं झालं असतं, असं त्यांच्या मनात आलं असेल का? कुणास ठाऊक… कदाचित नसेलच, कारण त्यांची रुह हिंदुस्तानच्या या मातीत गुंतलेली होती. अर्थात रसूलनबाईंच्या तेव्हाच्या मनःस्थितीची कल्पना करणं कठीण आहे. किंवा तेव्हा आणि नंतरही रसूलनबाईच्या या परिस्थितीवर कुणी व्यक्त झालेलं आढळत नाही. मात्र प्रसिद्ध शायर आगा शाहीद अलीने १९७३च्या दरम्यान रसूलनबाईवर लिहिलेली ठुमरी आहे आणि ती तिच्या या जाळल्या गेलेल्या घराशी संबंधित आहे. तो म्हणतो-

‘मी तिथून धावत सुटलो

जिथे वाऱ्याचे रक्तलांछित झोत होते

त्या अग्निज्वालांमध्ये

तिच्या गाण्यानेच कुरवाळले मला

मी सांभाळून ठेवलाय,

तिचा कातर होत गेलेला आवाज…’

…पण अहमदाबादच्या या घटनेनंतर रसूलनबाई नावालाच जिवंत होत्या. त्यांच्या जगण्याच्या सगळ्या उर्मी अहमदाबादच्या घराच्या आगीत पार जळाल्या होत्या. केवळ जगायचं म्हणून त्यांनी अहमदाबादमधला गाशा कसाबसा गुंडाळला आणि त्या पुन्हा बनारस नाही, पण अलाहाबादला आल्या. तिथल्या आकाशवाणी केंद्राच्या बाहेरच त्यांनी म्हणे आपला डेरा टाकला.

चहाची टपरी किंवा कसलं तरी वस्तू विकण्याची गाडी त्यांनी टाकली. खरं तर कधी काळी या आकाशवाणी केंद्रावर त्या अतिशय मानाने मिरवल्या होत्या. आकाशवाणी केंद्रात तत्कालीन गायक-गायिकांच्या लावलेल्या तसबिरींमध्ये एक तसबीर रसूलनबाईंचीदेखील होती. असंच एकदा कुणी तरी त्यांना आतमध्ये नेलं, त्यांची लावलेली तसबीर दाखवली. त्या हौसेनं साऱ्यांच्या तसबिरी बघत होत्या. हळूहळू तसबिरीखालची नावं वाचत होत्या. आपल्या तसबिरीखालचं नाव वाचून मात्र त्या थबकल्या आणि त्यांच्या तोंडून पटकन निघून गेलं…‘अरेच्चा, कालौघात सगळ्याच ‘देवी’ झाल्या, मी मात्र ‘बाई’च राहिले.’

त्यांच्या या उद्गारात दुःख-दर्द सारं काही होतं. संगीताची एवढी सेवा केली, एवढं लोकांचं मन रिझवलं, तरी ‘बाईजी’ ही पायरी काही आपण ओलांडू शकलो नाही, ही खंत त्यात होती. पण प्रत्यक्षात खंत त्यांना नाही, आपल्याला वाटायला हवी. कारण आपण कलावंत म्हणून त्यांचा मान राखू शकलो नाही.

अन्यथा… एकीकडे अलाहाबाद आकाशवाणीवर त्यांच्याच मुलायम आवाजातील- लागत करेजवा में चोटफूल गेंदवा ना मारो’ या पूरबी ढंगातील ठुमरीची बरसात होत असताना आणि रसिक श्रोते तिच्यात न्हाऊन निघत असताना

रसूलनबाई त्याच आकाशवाणी केंद्राच्या बाहेर अतिशय उदास वृत्तीने काहीबाही विकताना दिसली नसती!

नाही म्हणायला त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला, पण कलावंत म्हणून सामाजिक स्थान नाही ते नाहीच, मिळालं. अखेर दैन्यावस्थेतच त्यांनी १९७६मध्ये या दुनियेला अलविदा म्हटलं…

…जाऊ दे, आपण कलेचे-कलावंतांचे कदरदान नाही, हेच खरं…!

– मुकुंद कुळे


Sundarabai
या सदरातील लेख…

‘बाई’ सुंदराबाई

बाई सुंदराबाईंनी एवढं वैविध्यपूर्ण गायन केलं, तरी त्यांची आज जनमानसातली ओळख आहे ती, बैठकीची लावणी गाणारी गायिका म्हणूनच!

लेख वाचा…




देवकन्या!

ते केवळ गायन नव्हतं, तो सुब्बुलक्ष्मींचा सतत चाललेला रियाझ होता – आपलं गाणं देवाप्रति पोचवण्याचा!

लेख वाचा…


एकलीच बशिल्ली मेनकाबा

आयुष्याचं उत्तरपर्व गोव्यातील फोंड्याच्या शांतादुर्गा मंदिराजवळ असलेल्या स्नेहमंदिर वृद्धाश्रमात व्यतीत करणाऱ्या प्रसिद्ध गायिका-नर्तिका मेनकाबाई शिरोडकरही अशाच झुरल्या असतील का आपल्या माणसांसाठी?

लेख वाचा…


आर्यगंधर्व

बालगंधर्वांनाही ज्यांच्या लावण्या प्रिय होत्या, त्या कौसल्याबाई कोपरगावकर यांची नावनिशाणीच आज कालपटलावरून पुसली गेली आहे, जणू काही कौसल्याबाई झाल्याच नाहीत…

लेख वाचा…


विद्यासुंदरी

शरीराची गरज असेपर्यंत आश्रय द्यायचा आणि ती भागली की वाऱ्यावर सोडायचं, या पुरुषी वृत्तीचा तिला वीट आला नि संतापानेच तिने निश्चय केला- आता नागरत्नम्माला मोठी कलावंत करायचं !

लेख वाचा…


बैठकीच्या लावणीतलं मानाचं पान

भामाबाईंच्या कलेचं कोणत्याच प्रकारचं दस्तऐवजीकरण आज उपलब्ध नाहीय. परंपरेतील माणसं त्यांचं नाव घेताना आजही कानाला हात लावतात, हेच भामाबाईंचं मोठेपण! 

लेख वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *