फॉन्ट साइज वाढवा

एक सुस्तावलेली संध्याकाळ… टीव्हीसमोर बसून सर्फिंग सुरू असतं. चॅनेल बदलता बदलता मध्येच दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी लागते. सवयीने ती बदलणार, एवढ्यात लताबाईंचे (लता मंगेशकर) अलवार स्वर कानावर पडतात. हात थबकतो. बाई उत्कटतेने नि आर्ततेने गात असतात-

राजसा जवळी जरा बसा

जीव हा पिसा, तुम्हाविन बाई

कोणता करू शिणगार,

सांगा मज काही, राजसा…

हा तुम्ही करून दिला विडा

टिचला माझा चुडा, कहर भलताच

भलताच रंगला काथ, लाल ओठात…राजसा…

…एका परमोच्च बिंदूवर लावणी संपते. चित्त थाऱ्यावर येतं. पण तेव्हाच ध्यानात येतं, आपण लताबाईंच्या आवाजात लावणी नुस्ती ऐकत होतो; त्या काही समोर गाताना दिसत नव्हत्या. मग एवढं तल्लीन होऊन आपण पाहत काय होतो? ही फक्त बाईच्या आवाजातली जादू होती? खचितच नव्हती.

ती जादू होती गुलाबबाई संगमनेरकर या प्रख्यात लावणी-कलावंताची. लताबाई पडद्यामागे लावणीतला जो आशय-विषय गाण्यातून मांडत होत्या. तोच आशयविषय गुलाबबाई आपल्या देहबोलीतून, चेहऱ्यावरच्या भावकामातून दर्शकांपर्यंत पोचवत होत्या. गुलाबबाई नाचत नव्हत्या की बसल्याजागी शरीराची वाकवळणंही घेत नव्हत्या. पण डोक्यावर पदर घेऊन, एकाच जागी बसून, केवळ शरीराने आणि चेहऱ्याने त्या जे काही बोलत होत्या; त्यातून लावणीतला आशय जिवंत होत होता. नुस्ता जिवंत होत नव्हता, पाहणारा तो आशय भोगत होता.

दूरदर्शनने लताबाईंचा ‘आजोळची गाणी’ असा एक कार्यक्रम केला होता. त्यात लताबाईंनी खानदेशी रंगा-ढंगाची गाणी गायली होती. त्यातच ही लावणी होती. खानदेशचेच कवी ना.धों. महानोर यांनी लिहिलेली आणि ती पडद्यावर अभिनीत करण्यासाठी खास गुलाबबाईंना आमंत्रित करण्यात आलं होतं. कारण गुलाबबाई संगमनेरकर तेव्हा बैठकीच्या लावणीतलं खानदेशातलं मानाचं पान होतं. जवळजवळ तीस-चाळीस वर्षं गुलाबबाईनी खानदेशवर एखाद्या अनभिषिक्त सम्राज्ञीसारखं राज्य केलं. खानदेशात ढोलकी फडाचे तमाशे किंवा संगीत बाऱ्यांची कमी नव्हती. पण बाईंच्या गाण्यात आणि त्यावरच्या भावकामात जे नमक होतं, ते कुणात नव्हतं. ‘राजसा जवळी जरा बसा’ या गाण्यातही त्याचीच झलक पाहायला मिळाली. त्या वेळी बाईंनी भावकामाचं घडवलेलं दर्शन भल्याभल्यांच्या तोंडात मारेल, असं होतं. तो नखरा, तो लटका राग, प्रेमातलं ते समर्पण… गुलाबबाई लावणीवर भावकाम करत नव्हत्या. त्या जणू ती लावणीच होऊन गेल्या होत्या.

…आणि आजवर गुलाबबाईंची ही खासियत कायम आहे. आज त्या पुण्यात मुलं-नातवंडांसह शांत-समाधानाने राहतायत. पण क्वचित कुणी भेटायला आलं आणि लावणीचा विषय निघाला की, बाई बेफाम रंगून जातात. मग त्यांना स्थळ-काळाचं नि वयाचंही भान राहात नाही. वय तरी त्यांचं फार कुठे हो, अवघं नव्वदीच्या घरात! पण बाई अशा सुटतात की, लावणीवर लावणी सुरू राहते. भेटायला आलेला त्यांच्या या अस्सल बैठकीच्या लावणीच्या जाळाने गारद होतो. परत कुठेही अश्लीलता नाही. सगळं काही आपली नि समोरच्याची अदब राखून. गुलाबबाई तर म्हणतात, ‘अहो अभिनय अश्लील कसा असेल? शुद्ध अभिनय कधीच अश्लील नसतो. शब्द आणि शब्दांतून व्यक्त होणारा आशय अश्लील असू शकतो. पण तो आशय नृत्यातून-भावकामातून सादर करताना पाहाणाऱ्याला संकोच वाटणार नाही, याचं भान कलावंताने ठेवायला हवं. मुख्य म्हणजे आपण अभिनय करतोय, याचंच भान प्रत्येक कलावंताला असायला हवं. म्हणजे कुठलाही तोल सुटत नाही. मग लावणीतला आशय अश्लील असो वा आणखी कसला!’

गुलाबबाई म्हणजे आता लावणीचं एक चालतं-बोलतं घराणंच झाल्या आहेत. त्यांच्या या घराणेदार गायकीचा अंदाज त्यांच्याशी गप्पा मारताना सहज येतो. कारण लावणीबरोबरचा त्यांचा प्रवासही तब्बल ऐंशी वर्षांचा झालाच की! वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा लावणीचा ‘ल’ गिरवला. साहजिकच आज वयाच्या नव्वदीच्या उंबरठ्यावर त्या लावणीचं विद्यापीठ झाल्यात. पण या विद्यापीठानेही भरपूर साहिलंय-पाहिलंय आणि त्यातूनच स्वतःला घडवलंय. शास्त्रीय संगीतात-नृत्यात गुरू-शिष्य परंपरा अभिमानाने सांगितली जाते. पण तशीच परंपरा लोककलेतही असते आणि गुरूच्या लहरी स्वभावाचे चटके लोककलावंतानाही सोसावे लागतातच. पण ज्याप्रमाणे शास्त्रीय कलांत गुरूचं मोठेपण नाकारलं जात नाही, तद्वतच ते लोककलावंतही नाकारत नाही. गुलाबबाई तर आपल्या गुरूंची नावं आदराने घेतात, मग त्यांच्याकडून आलेले अनुभव कसे का असेनात! हे अनुभव प्रत्यक्ष गुलाबबाईंच्या तोंडून ऐकताना मजा येते. केवळ हे अनुभवच नाही, तर आपल्या एकूणच आयुष्याबद्दल बोलताना त्या खूप मोकळेपणाने बोलतात. मग ते बोलणं सुखाविषयी असो वा दुःखाविषयी. प्रसंग मानाचा असो वा अपमानाचा. बाई हातचं राखून बोलत नाहीत. याची सुरुवात अर्थातच त्यांच्या जन्मापासून-आईवडिलांपासून होते.

बाई सांगतात, ‘माझा उमेदीचा काळ खानदेशात गेला, तरी मी मूळची नगर जिल्ह्यातल्या संगमनेरची. म्हणून मी गुलाब संगमनेरकर! आमचं खरं आडनाव थोरात. पण आमचं घराणं तमासगिराचं. म्हणून ज्या गावचा जन्म, त्या गावाचंच आडनाव आम्हाला चिकटतं. माझी आई शांताबाई दगडू साळ्याच्या तमाशाच्या फडात नाचायची. दगडू काकांचा फड नावाजलेला. पण तेव्हा पैसा फार मिळायचा नाही. हा फड महाराष्ट्रात सर्वत्र तमाशा घेऊन फिरायचा. जिथे आई तिथे मी, असा माझाही प्रवास सुरू असायचा. तो तमाशा बघतच बालपण सरलं नि जाणतेपण आलं. सात वर्षांची झाले नि आईच्या मनात आलं- ‘पोरीला तमाशा फडात ठेवायला नको. तमाशा फडापेक्षा संगीतबारी बरी. तमाशा फडासारखं मोठं खटलं नसल्यामुळे तिथे जीव थोडा सुखात असतो.’ म्हणून आईने सातव्या वर्षीच संगमनेरजवळच बेलापूर नावाचं गाव आहे, तिथल्या ‘सरूबाई-ताराबाई बेलापूरकर पार्टी’त नेलं. आईने त्यांना विनंती केली की, पोरीला तुमच्या पार्टीत ठेवा. काही शिकवा. तर सरूबाई लगेच म्हणाली- ‘पोरीला ठेवून घेते. पण वीस वर्षांचा करार लिहून दे.’ माझी आई भिरभिरलीच हे ऐकून. ती गुमान तिथून निघून आली.’

‘अहो अभिनय अश्लील कसा असेल? शुद्ध अभिनय कधीच अश्लील नसतो. शब्द आणि शब्दांतून व्यक्त होणारा आशय अश्लील असू शकतो. पण तो आशय नृत्यातून-भावकामातून सादर करताना पाहाणाऱ्याला संकोच वाटणार नाही, याचं भान कलावंताने ठेवायला हवं. ‘

वीस वर्षं म्हणजे का थोडी वर्षं होती?’ गुलाबबाई आपल्यालाच सवाल करतात. त्यावर आपण ‘नाही’ अशी मान डोलावतो. आपल्याही नकळत त्या आपल्याला त्यांच्या आयुष्याशी जोडून घेतात. मग त्यांची कथा आपलीच होऊन जाते. सरूबाईच्या उफराट्या अनुभवामुळे शांताबाई घाबरून गेल्या नाहीत. त्या आपल्या फडाच्या पुण्याच्या मुक्कामी गुलाबबाईंना बरोबर घेऊन गेल्या आणि तिथे ‘आर्यभूषण’ तमाशा थिएटरचे मालक अहमदशेठ तांबे यांच्या पुढ्यात त्यांना उभं केलं. ‘शेठ माझ्या मुलीला गाणं शिकवायला कुणाकडे तरी ठेवा,’ असं सांगून शांताबाईंनी अहमदशेठना गळच घातली. शेठ आपलं काम करतील हे त्यांना ठाऊकच होतं नि तसंच झालं. ‘आर्यभूषण थिएटर’मध्ये गुलाबबाईंच्या पायात पहिल्यांदा घुंगरू बांधले गेले आणि त्या थिएटरमधल्याच सुगंधाबाई सिन्नरकर संगीतबारीत बाईंच्या नाच-गाण्याच्या शिक्षणाची सुरुवात झाली. त्या पार्टीत लाला गंगावणे नावाचे तबलजी होते. ते बाईना मनापासून शिकवयाचे. पण बाईंचं हे शिक्षण जेमतेम दोन-तीन महिनेच चाललं. कारण लवकरच शांताबाईचा फड नाशिक मुक्कामी हलला. मात्र नाशिक मुक्कामीच गुलाबबाईच्या कलागुणांना पैलू पडले. अर्थात पैलू पाडणारं दुसरं कुणी नव्हतं. बाई स्वतःच सारं काही आत्मसात करत गेल्या. अन् तरीही ज्यांच्याकडून आपण ही कला उचलली, त्या वनुबाई शिर्डीकर यांना त्याचं श्रेय द्यायला त्या विसरत नाहीत. त्या म्हणतात, ‘आई फडाबरोबर नाशिकला आली आणि तिने मला वनुबाई शिर्डीकर यांच्या संगीतबारीत ठेवलं. वनुबाई नावाजलेल्या कलावंत होत्या. त्यांचं गाणं-नाचणं लाजवाब होतं. मी जवळजवळ वर्ष-दीड वर्ष तिथे होते. या काळात मी तिथे भरपूर काम केलं. त्यांची भांडी घासणं, धुणी धुणं, अगदी त्या नाचून आल्यावर त्यांच्या पायातली घुगरंही मलाच काढावी लागत. या बदल्यात त्यांनी मला शिकवलं मात्र काही नाही. उलट त्यांची नाचगाण्याची प्रॅक्टीस सरू असली, तर त्या मला तिथे फिरकूही देत नसत. पण तरीही त्यांची कला मी उचलली. जिथे त्यांचं नाचणं पाहायला मिळेल, गाणं ऐकायला मिळेल, तिथे तिथे मी पाहात-ऐकत गेले. घडत गेले. मग त्यांच्याबरोबर रात्री रंगमंचावर कार्यक्रमाला उभी राहायचे, तेव्हा माझं नाच-गाणं बघून त्यांना आश्चर्य वाटायचं. पण मीही काही कळू द्यायचे नाही. मात्र मी तेव्हाच मनात खूणगाठ बांधली होती की, वनुबाई आपल्याशी कशाही वागल्या, तरी आपण त्यांना काही बोलायचं नाही; पण एक दिवस त्यांच्याएवढी मोठी कलाकार होऊन दाखवायचं. गुरुची कला गुरुलाच परत करायची.’

…आणि योगायोगाने तसंच घडून आलं. वनुबाईचं जे कार्यक्षेत्र, त्या खानदेशातच गुलाबबाई नावारूपाला आल्या. वनुबाईच्या पार्टीत गुलाबबाई दीड-दोन वर्ष होत्या. पण या काळात त्यांनी संगीतबारीच्या तमाशासाठी जे-जे आवश्यक असतं, ते सारं आत्मसात केलं. छक्कड लावणी, चौकाची लावणी असे लावण्यांचे वेगवेगळे प्रकार बाई इथेच शिकल्या. त्याशिवाय इथल्या मुक्कामतल्या अनेक आठवणी बाईंनी आपल्या कनवटीला बांधून ठेवलेल्या आहेत. अगदी घट्ट. कारण तोच त्यांच्या आयुष्यातील शिकण्या-सवरण्याचा काळ होता. यातलीच एक आठवण त्या डोळ्यांत पाणी आणून सांगतात, ‘आमची परिस्थिती तेव्हा अगदीच बेताची होती. आई तमाशात काम करायची. पण त्यात फार पैका मिळायचा नाही. एक दिवस वनुबाई आईला म्हणाली की, लेकीला एक चांगलं लुगडं घेऊन दे. पण आईला ते शक्यच नव्हतं. तिने वनुबाईलाच विनंती केली, की तुमचंच एखादं जुनं लुगडं द्या तिला. यावर वनुबाई चिडली. तिने माझ्याकडे काही नाही, असं लगेच सांगून टाकलं. तमाशात नेसावं लागणारं लुगडं नऊवाराहून खूप मोठं म्हणजे जवळजवळ बारा वाराचं असतं. तेव्हा लुगडं घेण्याएवढे पैसे नव्हते आईकडे. म्हणून मग तिने कशीबशी एक पाच रुपयांची चुनडी घेऊन मला दिली. आठवाराच्या दांडाच्या लुगड्याला खानदेशात चुनडी म्हणतात. मी रोज सकाळी ही चुनडी धुवायचे आणि संध्याकाळी तीच नेसून बारीवर नाचायला उभी राहायचे. तिला घड्या पडू नयेत म्हणून दोन सपाट दगडांखाली ठेवायचे किंवा तांब्यात निखरे घेऊन तिला इस्त्री करायचे. वनुबाईकडे असेपर्यंत मी ही चुनडी वापरली. आता महागडी लुगडी वापरते. पण तेव्हा ती चुनडी घेताना आईला किती कष्ट पडले असतील, या आठवणीने आजही रडायला येतं.’

पण वनुबाईकडचं हे शिक्षण गुलाबबाईंच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. अगदी स्वतःच्या नावाची संगीतबारी काढण्यापर्यंत. नाशिकच्या या मुक्कामीच गुलाबबाईंच्या नावाची बारी सुरू करण्याचा निर्णय त्यांच्या वडिलांनी घेतला. कारण वनुबाईंनी गुलाबबाईंना खूपच त्रास द्यायला सुरूवात केली होती आणि शांताबाईही दगडू साळ्याच्या तमाशात सर्वत्र फिरून कंटाळल्या होत्या. त्यामुळे त्यांनाही त्यांच्या मालकांचं म्हणणं मान्य झालं. त्याबरोबर गुलाबबाईंच्या वडिलांनी मुंबईला जाऊन प्रसिद्ध अजमेरसिंग यांच्या दुकानांतून पाचशे रुपयांत तबला-पेटी, ढोलकी अशी महत्त्वाची सारी वाद्यं विकत आणली आणि अवघ्या बारा-तेरा वर्षांच्या गुलाबबाई ‘गुलाबबाई संगमनेरकर संगीतबारी’च्या मालकीण झाल्या. या संगीतबारीत एकमेव गुलाबबाईच नाचणाऱ्या होत्या. त्यांची आई मागे उभी राहून गाणं म्हणायची आणि बाई पुढे नाचायच्या. पण इथून बाईच्या स्वतंत्र कलाकारकिर्दीला सुरुवात झाली.

स्वतःची संगीतबारी सुरू केल्यावर बाईंच्या वडिलांनी पहिलाच कार्यक्रम कोल्हापुरात कवठेकर थिएटरात लावला. त्या वेळी अनेक नामांकित पार्ट्या या थिएटरात होत्या. पण तरीही थोड्याच अवधीत बाईंच्या नावा-रूपाचा बोलबाला झाला आणि बाईंच्या कार्यक्रमाला गर्दी जमू लागली. त्या वेळी कोल्हापुरात संस्थानी वातावरण होतं. अनेक सरदार-जहागिरदार घोड्यावरून तमाशाला येत. त्यातल्या एका जहागिरदाराची आठवण बाई आजही रंगवून सांगतात, ‘एक रूपानं फाकडा, पण वयानं मोठा असलेला जहागिरदार माझ्या गाण्याला आवर्जून यायचा. कुणीही जीव ओवाळून टाकावा, असाच होता तो. त्याला कसलं दुःख होतं, ठाऊक नाही. पण जेव्हा कधी यायचा, चांदीच्या कलदार रुपयांची ओंजळ माझ्या ओंजळीत रिती करायचा. या ओंजळीत चांदीच्या रुपयांबरोबरच कधी मोगऱ्याच्या कळ्या असत, तर कधी गुलाबाच्या पाकळ्या. ओंजळ रिती झाल्यावर म्हणायचा, ‘तेवढं आमचं ते भावगीत म्हणा की!’ त्याच्या आवडीचं एक भावगीत होतं. बहुधा ते कुठल्या तरी सिनेमातलं असावं. आता ते पूर्ण आठवत नाही. पण त्याचे शब्द काहीसे – ‘सखये प्रेमपत्र पहिले, सखी गं प्रेमपत्र पहिले’ असे होते.’

कोल्हापुरात एखादी नवी संगीतबारीची पार्टी आली, की श्रीमंत-सावकारांबरोबर अनेकदा वेगवेगळे कलावंत, निर्माते-दिग्दर्शकही हजेरी लावायचे. असेच एकदा प्रसिद्ध दिग्दर्शक भालजी पेंढारकर गुलाबबाईंचा कार्यक्रम बघायला आले होते. बाईंना तेव्हा त्यांचं नाव-गाव ठाऊक नव्हतं. त्या नेहमीप्रमाणे नाचल्या-गायल्यादेखील. बाईचं वय तेव्हा फार नव्हतं. साधारण-चौदा पंधराचीच उमर असेल. पण त्या वयातही त्यांनी नाचण्याची-गाण्याची जी समज दाखवली. त्याने भालजी खूश झाले. त्यांनी लगेच बाईंच्या वडिलांशी संपर्क साधला आणि ‘मीठभाकर’ सिनेमासाठी हिला नायिका म्हणून मला द्याल का, असं त्यांना थेट विचारलं. बाईंच्या वडिलांनी त्यासाठी तिच्या आईशी बोलावं लागेल, असं भालजींना सांगितलं आणि उद्या तुम्हाला सांगतो, असं म्हणाले. पण तो दुसरा दिवस कोल्हापुरात उजाडलाच नाही. भालजी चित्रपटासाठी मुलीला मागतायत म्हटल्यावर, शांताबाईनी एकच थयथयाट केला. एकदा सिनेमात पोरगी गेल्यावर ती आपल्याला पुन्हा भेटणार नाही, या भीतीने त्यांनी मालकांच्या मागे लागून रात्रीच आपल्या पार्टीचा गाशा गुंडाळला आणि थेट पंढरपूर गाठलं. दिवस उजाडायची वाटही त्यांनी पाहिली नाही.

खरंतर गुलाबबाईंसाठी ती एक सुवर्णसंधी होती. तसं झालं असतं, तर आज गुलाबबाईंचं आयुष्य काही वेगळंच असतं. पण जे झालं त्याचं गुलाबबाईंना जराही वाईट वाटत नाही. त्या म्हणतात, ‘आईचं मन ते. घाबरलं असेल त्यावेळी. शिवाय आजच्यासारखी सिनेमा क्षेत्राची जाण तेव्हा लोकांना होती कुठे? शेवटी माझी ताटातूट होऊ नये म्हणूनच तिने तसा निर्णय घेतला होता. मग तिला नाव कशाला ठेवू आणि माझं काय वाईट झालं? सगळंच चांगलं झालं की!’

एकापरीने ते खरंच आहे. गुलाबबाईंचं सिनेमात नाव झालं नाही. पण आज बैठकीची लावणी सादर करणाऱ्या बुजुर्ग कलावंत म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात नाव आहे. आज त्या नियमित कार्यक्रम करत नाहीत. पण कुठे जाणकारांचा कार्यक्रम असेल, लोककला संमेलन असेल किंवा लोकसाहित्याच्या अभ्यासकांचं चर्चासत्र असेल, तर बाई आपल्या बैठकीच्या लावण्यांचा असा झळाळ उभा करतात की, पाहणारे अभ्यासक-रसिक गार होऊन जातात. काही वर्षांपूर्वी अकलूजच्या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेत त्यांना बोलावलं होतं. तीन दिवस तरण्या-ताठ्या मुलींचं नाचगाणं सुरू होतं. तिसऱ्या दिवशी खास आग्रहास्तव गुलाबबाई रंगमंचावर आल्या. सोबतीला त्यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या पांडुरंग घोटकर यांना बोलावलं. कारण दोन्ही संगीतबारीतली जुनी खोडं. दोघांनाही एकमेकांचे डावपेच चांगलेच ठाऊक. नावाजलेले ढोलकीपटू असलेल्या घोटकरमास्तरांनी बाईंच्या धीम्या लयीतल्या गाण्यासाठी तबल्यावर ठाय लयीतला ठेका धरला आणि बघता बघता बाईंनी धमाका केला-

सोडा मनगट हात धुते… जिवलगा

इच्छा असेल तर, स्वयंपाक राहू देते…

सोडा मनगट हात धुते… जिवलगा

इच्छा असेल तर, महाली समया लाविते…

सोडा मनगट हात धुते… जिवलगा

जिवलगा पलंगी बिछोणा टाकते…जिवलगा

…गुलाबबाई एकेका ओळीवर वेगवेगळं भावकाम करत असं काही खेळत होत्या, की बघणाऱ्याची सुधबुध हरवून जावी. सभागृहातले रसिक बाईंच्या त्या अदाकारीने असे काही नादावले की, लावणी संपली तरी टाळ्या वाजवण्याचं भानही त्यांना राहिलं नव्हतं. बैठकीच्या लावणीतली अस्सल चीज ते प्रथमच बघत होते. मात्र स्थळ-काळाचं भान आलं, तेव्हा टाळ्यांचा असा काही कडकडाट झाला की, थिएटर हादरून गेलं.

ही बाईंची एकप्रकारची आयुष्यभराची पुंजीच आहे. सिनेमाचं विश्व जवळ येऊन दूर गेलं. पण लावणी कलेचं क्षेत्र आजही त्यांच्या पदरात आहे. म्हणूनच आईने तडकाफडकी कोल्हापूर सोडल्याचं दुःख गुलाबबाईंना नाही. उलट पंढरपूरला गेल्यावरच त्यांना लावणीचा अस्सल खजिना गवसला. गुलाबबाईंची पार्टी पंढपूरला गेली, तेव्हा ख्यातनाम लावणीकलावंत गोदावरीबाई पुणेकर यांचाही मुक्काम तिथल्या एका दिवाणखान्यात होता. गोदावरीबाई दिवाणखानाच करायच्या आणि त्यांची बैठकीची लावणी ऐकायला अनेक मातब्बर मंडळी यायची. कारण तेव्हा गोदावरीबाई म्हणजे लावणीतलं मानाचं पान होतं. त्यांच्याकडच्या पारंपरिक बैठकीच्या लावण्या म्हणज एकेक अस्सल चिजा होत्या. त्यांची ही कीर्त ऐकूनच शांताबाई आपल्या लेकीला म्हणजे गुलाबबाईंना घेऊन त्यांच्याकडे गेल्या आणि काही महिने त्यांना त्यांच्या दिवाणखान्यातच ठेवलं. त्यानंतर जोपर्यंत गोदावरीबाईंचा दिवाणखाना पंढरपुरात होता, तोपर्यंत गुलाबबाई त्यांच्याकडे शिकत होत्या. अर्थात हे शिकणं म्हणजे शिष्याने आपणहून पाहून पाहून ग्रहण करणं होतं. पण गुलाबाईंनी ते मन लावून केलं. कारण आपल्या या गुरुकडे लावणीचं अक्षय आणि अक्षुण्ण धन आहे, याची जाण गुलाबबाईंना थोड्याच अवधीत आली होती. मग गोदावरीबाई बैठकीत बसतात कशा, गातात कशा, भावकाम करतात कशा, मानेला-नाकातल्या नथीला हळुवार हिसडा देतात कशा… हे सारं गुलाबबाईंनी बघून ठेवलं. पुढे तेच त्यांना उपयोगी पडणार होतं, नव्हे तेच त्यांना आजवर उपयोगी पडलं आणि अजून पडत आहे. म्हणूनच आपल्या या गुरूची आठवण जागवताना गुलाबबाई सांगतात, ‘गोदावरीबाईंइतकी हुकमी गायिका आणि गाण्यावर तेवढंच हुकमी भावकाम करणारी गायिका मी दुसरी पाहिलेली नाही. गोदावरीबाईंकडे या लंब्याचवड्या लावण्यांचा ठेवा होता. बाई रात्री बाराला एक लावणी सुरू करायच्या, ती दुसऱ्या दिवशी दुपारी बाराला तोडायच्या. सतरा-अठरा कडव्यांची लावणी असायची. अशी घोळवून-आळवून म्हणायच्या की, पब्लिक पागल व्हायचं. पण बाईंचा दरारा मोठा. कुणी आगळिक करायला धजावायचं नाही. अश्लील लावण्या ऐकाव्या आणि त्यावरचं भावकाम पाहावं, तर त्या गोदावरीबाईंचंच. अश्लील लावण्या कशा म्हणाव्यात. भक्तिभाव असलेल्या लावण्या कशा म्हणाव्यात. हे मला त्यांनीच शिकवलं. गुरू म्हणून त्यांचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही.’

पण गुलाबबाईंना गोदावरीबाईंचं मार्गदर्शन फार काळ मिळालं नाही. कारण गोदावरीबाईंचा पुण्यात स्वतःचा दिवाणखाना होता. त्यामुळे तो सोडून त्या बाहेर फार काळ रमायच्या नाहीत. फक्त अधेमधे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणच्या दिवाणखान्यात तीन-चार महिने हजेरी लावून यायच्या. पंढरपूरलाही त्या अशाच आल्या होत्या. पण त्यांची ही पंढरपूरभेट गुलाबबाईसाठी मौलिक ठरली. त्यांच्या आयुष्याला दिशा देऊन गेली.

गोदावरीबाई गेल्यावरही गुलाबबाई पंढरपुरात वर्ष-दीड वर्ष होत्या. पण हा काळ त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने उजळणीचा होता. गोदावरीबाईंनी दिलेलं दान घासूनपुसून अधिक लखलखीत करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. त्यामुळेच पंढरपूरचा हा मुक्काम त्यांना फार आर्थिक स्थैर्य देणारा ठरला नाही. पण पुढे गुलाबबाई आपल्या अदाकारीने पुरा महाराष्ट्र गाजवणार होत्या, त्याची त्यांची तयारी पंढरपुरातच पूर्ण झाली. कारण नंतरच्या काळात गुलाबबाईंनी पुणे, मुंबई, नागपूर असे मोठमोठे दौरे केले आणि गेल्या तिथे तिथे त्यांनी आपल्या नावाची मुद्रा उमटवली. नागपूरच्या मोरभवनात त्यांनी संगीतबारीचा कार्यक्रम केला, पुरतं नागपूर खुळावलं. मुंबईच्या पिलाहाऊसला त्यांची पार्टी लागली आणि भल्याभल्यांची भंबेरी उडाली. तेव्हा प्रत्येक थिएटरमध्ये संगीतबारीच्या किमान चार पार्ट्या तरी असायच्या. प्रत्येक पार्टीत गाणाऱ्यांची नि नाचणारणींची कमी नसायची. कारण बहुतेक पार्ट्या नावारूपाला आलेल्या असायच्या. पण ‘गुलाबबाई संगमनेरकर पार्टी’त गुलबबाई एकट्याच असायच्या. पण अनेकींना पुरून उरायच्या. कारण गोदावरीबाईंनी दिलेली लावणीची अस्त्रं त्यांच्या भात्यात असायची. मात्र कुठे कुठे अस्सल प्रतिस्पर्ध्याशी गाठ पडायची. ‘हनुमान थिएटर’मध्ये गुलाबबाईंची पार्टी होती, तेव्हाच तिथे यमुनाबाई वाईकर यांचीही पार्टी होती. जसं गोदावरी पुणेकर हे बैठकीच्या लावणीचं एक घराणं, तसंच यमुनाबाई वाईकर हेदेखील एक घराणं. यमुनाबाईंच्या संगीतबारीला रसिकांची तोबा गर्दी व्हायची. कारण यमुनाबाई गाण्यात आणि भावकामात लोणच्यासारख्या मुरलेल्या. अशा वेळी सुरुवातीला गुलाबबाईना यमुनाबाईंसारख्या वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या व्यक्तीचं दडपण असायच्या. पण यमुनाबाई दिलदार स्वभावाच्या होत्या. त्यांनी छोट्या गुलाबचं नेहमीच कौतुक केलं. गुलाबबाई सांगतात, ‘कलेचं क्षेत्र असं असतं की, तिथे आपलं अस्सल ते कुणी कुणाला द्यायला मागत नाही. पण यमुनाबाईंना हनुमान थिएटरमधल्या वास्तव्यात माझं काही चुकलं, तर मला समजावून सांगितलं. ‘हा अदा असा कर, असं भावकाम कर’ असं त्या आवर्जून सांगायच्या. त्यामुळेच मला त्यांच्याबद्दलही कायम आदर वाटत आलाय. किंबहुना गोदावरीबाई पुणेकर, भामाबाई पंढरपूरकर, यमुनाबाई वाईकर यांच्याच तर पावलावर पाऊल टाकून मी चाललेय.’

गुलाबबाईंचं हे म्हणणं म्हणजे ‘सोला आना सच’ आहे. कारण आज खड्या लावण्यांची जोरदार परंपरा पाहायला मिळते. पण बैठकीच्या अस्सल लावण्या सादर करणारी कलावंतमंडळी पाहायला मिळत नाहीत. त्यातही परंपरेनं चालत आलेलं भावकामाचं अस्सल वैभव तर अजिबातच दिसत नाही. मुख्य म्हणजे भावकाम सोडा, त्यांना गाता येता येत नाही. बैठकीच्या लावणी सादर करणाऱ्या पूर्वीच्या महिला कलावंत स्वतः गायच्या आणि त्यावर अदा करायच्या. बैठकीच्या लावणीची खासीयत हीच आहे, की तिथे गाण्याचा आणि भावकामाचा तोल एकाच्याच हाती असावा लागतो. पण एवढंच नाही, आजच्या लावणीकलावंतांना काहीच ठाऊक नसतं, असं सांगून गुलाबबाई म्हणतात, ‘बैठकीची लावणी कशी सादर करायची, याचंही एक शास्त्र आहे. जमिनीवर बसून लुगड्याचा डोईवर टोपपदर घ्यायचा. पाय मागे मुडपून बसायचं नाही. डावा पाय अंगाजवळ घेऊन उजवा पाय पुढे मोकळा सोडायचा. ही बैठकीच्या लावणीसाठी एकदम उत्तम पोज. यात बाई कशी एकदम घरंदाज आणि खानदानी वाटते. लावणी ही कला खानदानी आहे नि तशीच सादर व्हायला हवी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बैठकीची लावणी असली, तरी पायात घुंगरू हवेत. नाचण्यासाठी नव्हे, गाण्याला ठेका देण्यासाठी. हा ठेका पुढे सोडलेल्या उजव्या पायातल्या घुंगरांनी पकडायचा असतो. खरंतर बैठकीच्या लावणीला ठेका द्यायला पेटीवाला किंवा तबलेवाला असतो. पण कधी कधी गाणारणीला चकवा देण्यासाठी तबलजी आडवं वाजवतो. त्यामुळे ती गडबडून जाण्याची शक्यता असते. अशा वेळी गाणाऱ्या बाईने सावध असावंच लागतं. वाजवणाऱ्याने मुद्दाम चुकीचं वाजवलं, तरी गाणाऱ्या बाईने आपल्या पायाने पकडलेल्या ठेक्याने उत्तम गायलाच हवं. पण आजकालच्या मुलींना बैठकीच्या लावणीचे हे कायदेकानू ठाऊक नसतात.’

बैठकीच्या लावणीचे, किंबहुना एकूणच लावणीकलाप्रकारचे नीतीनियम नीट समजूनउमजून घेतल्यामुळेच गुलाबबाईंनी पुढे जेव्हा खानदेशात पाऊल ठेवलं, तेव्हा त्यांचं अमाप स्वागत झालं. कलेमुळे बाईंचं नाव एव्हाना महाराष्ट्रभर पसरलं होतंच. ते ऐकूनच खानदेशातले तत्कालीन तंबूतल्या तमाशाचे प्रसिद्ध मालक आनंदराव महाजन यांनी गुलाबबाईंना खानदेशचं निमंत्रण दिलं आणि गुलाबबाई तिकडे गेल्या. गुलाबबाईंचं खानदेशातलं हे पाऊल त्यांना आणि रसिकांना दोघांनाही लाभदायी ठरलं. महाजन यांच्या तंबूतमाशाचं खानदेशात मोठं नाव होतं. त्यांचे तमाशाचे सतत दौरे सुरू असत.

या यात्रे-जत्रेतल्या आणि सण-उत्सवातल्या दौऱ्यांमुळे गुलाबबाई खानदेशातल्या गावागावात पोचल्या. मग त्यांची संगीतबारी एवढी नावारूपाला आली की, खानदेशकरांनी त्यांना माघारी येऊच दिलं नाही. नंतरच्या काळात त्यांनी महाजन यांचा तंबूही सोडला आणि जळगावच्या प्रसिद्ध हैदरी थिएटरमध्ये स्वतःचा जम बसवला. संगमनेरच्या गुलाबबाई मग एवढ्या खानदेशी झाल्या, की त्या उठता बसता सहज बोलायला लागल्या, ‘पावना तुले कोनतं गानं पाह्यजे रं भो?’

खानदेशातला गुलाबबाईंचा हा मुक्काम तब्बल तीस-पस्तीस वर्षांचा होता. म्हणूनच खानदेशचा विषय निघाला की, बाई गतकातर होतात. म्हणतात, ‘खानदेशनंचं खऱ्या अर्थानं माझी कला फुलवली नि जोपासली. वयाच्या पंचविशी-तिशीत तिथं गेले आणि पंचावन्न-साठ वर्षांची म्हातारी होऊनच तिथून बाहेर आले. मला एकूण सहा मुलं झाली. तीन मुलगे नि तीन मुली. पैकी पाच मुलं तिथेच जन्माला आली. माझ्या आईवडिलांचा मृत्यूही तिथेच झाला. खानदेश जणू माझी कर्मभूमीच झाली. उभ्या महाराष्ट्रात जे कमावलं नाही, ते मी खानदेशात कमावलं. मान-पान-प्रतिष्ठा सारं काही मिळालं. अगदी भरून पावले मी. तिथून पुण्याला माघारी आले ते, समाधानानंच. म्हणूनच खानदेशबद्दल मी कायम कृतज्ञच आहे.’

खानदेशातल्या कलाप्रेमींनी गुलाबबाईंच्या कलेला एवढी भरभरून दाद दिली, की काही वर्षांत बाईंनी धुळ्यात स्वतःचं तमाशा थिएटर सुरू केलं. अनेक नामवंत पार्ट्यांना आपल्या थिएटरात बोलावलं. पण या थिएटरच्या उद्घाटनालाच एक स्थानिक पोलीस इन्स्पेक्टर चव्हाण याने घोळ घातला. उद्घाटनाची तारीख जाहीर झालेली. पण सर्व काही व्यवस्थित असतानाही त्या इन्स्पेक्टरने लायसन द्यायला नकार दिला. आता काय होणार, अशी परिस्थिती निर्माण झालेली असतानाच एक माणूस देवदुतासारखा बाईंच्या मदतीला धावून आला. तो माणूस म्हणजे धुळ्याचे तत्कालीन आमदार गुलाबराव दहिवदकर. गुलाबबाई सांगतात, ‘गुलाबरावांनी मला बहीण मानलेलं होतं. माझी कला त्यांना ठाऊक होती. त्यामुळे जेव्हा त्यांच्या कानावर गेलं, की इन्स्पेक्टर माझी अडवणूक करतोय, तेव्हा ते मदतीला धाऊन आले. म्हणाले, ‘बोर्डावर लिही की गुलाबराव दहिवदकर यांच्या हस्ते तमाश थिटरचं उद्घाटन’ म्हणजे कोण परवानगी देत नाही, ते मी पाहातो. आणि तसंच झालं. माझ्या मालकीच्या तमाशा थिएटरचं उद्घाटन सुरळीत पार पडलं.’

पण बाईंचं हे तमाशा थिएटर फार काळ चाललं नाही. कारण तमाशा थिएटर चालवायचं, तर सोबतीला बाप्येमाणसांची मोठी फौज पाहिजे. पण गुलाबबाईंच्या संगीतबारीत तसं कुणीच नव्हतं. त्यामुळे स्थानिक गुंडबाजी आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमापासून डुख धरून राहिलेला पोलीस यांच्यामुळे आपल्या आश्रयाला आलेल्या एखाद्या पार्टीला त्रास होऊ नये म्हणून अखेर गुलाबबाईंनी ते थिएटर बंद केलं आणि थोड्याच कालावधीत त्या खानदेशातला सारा खटला गुंडाळून पुण्यात आल्या.

आता बाई पुण्यात निवांत आहेत. मुलं त्यांच्या-त्यांच्या संसरात मार्गी लागलीत. कोरियोग्राफर असलेला त्यांचा धाकटा मुलगा रवीचं अलीकडेच निधन झालं. त्याच्या जाण्याने बाई काहीशा खचल्यात. पण आजही लावणी कलेचा विषय निघाला, की गुलाबबाईंच्या चेहऱ्यावर ‘गुलाब’ फुलतात; नव्हे, त्यांची ज्ञानेंद्रिये ताजीतवानी होतात… आणि मग कुठे काही खटकलं की त्या अधिकाराने लगेच समोरच्याला हटकतात. मग तिथे स्वतःची मुलं असोत वा इतर कुणी…

काही वर्षांपूर्वीचाच प्रसंग-ठाण्यात लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला अनेक मोठे पाहुणे आले होते. आयोजकांनी गुलाबबाईंनाही पाहुण्या म्हणून आणि ज्येष्ठ कलावंत म्हणून पहिल्या रांगेत सन्मानाने बसवलं होतं. कार्यक्रम सुरू झाला. एकेक कलावंत येऊन आपली कला सादर करून जात होता. थोड्या वेळाने रंगमंचावर गुलाबबाईंची मुलगीच आली- वर्षा संगमनेरकर.  त्यांनी स्वतःच लावणी म्हणून तिच्यावर नाचायला सुरूवात केली आणि एका क्षणी गाता गाता त्यांचा दमसास राहिला नाही. तरीही त्या गाणं म्हणण्याचा प्रयत्न करायला लागल्या, तेव्हा गुलाबबाई खालून प्रेक्षकांतूनच कडाडल्या, ‘वर्षा, गाणं बंद कर. सूर धरता येत नसेल, तर सोडून दे’ आणि वर्षाताईंनी तिथेच आईची क्षमा मागितली. त्या निमूट खाली आल्या. कारण गुलाबबाई केवळ त्यांच्या आई नाहीत, गुरूही आहेत.

याच प्रसंगाबद्दल बोलताना गुलाबबाई म्हणतात, ‘आजच्या पिढीला आपली मर्यादा आणि ताकद कळत नाहीत. गाणं असो, नाच असो, आपली मर्यादा आपल्याला ठाऊक हवी. दम लागल्यामुळे जर सूर धरता येत नसेल, तर वर्षाने तो सोडून द्यायला हवा होता. पेटीवाला होता ना, त्याने तो ओढून धरला असता. पण आजच्या तरुण कलाकारांना हेच कळत नाही.’

पण जे नव्या पिढीतील कलाकारांना कळत नाही नि वळतही नाही, ते नव्वदीच्या

उमरीतही गुलाबबाईंना सहज जमतं. म्हणूनच भेटायला आलेला बैठकीच्या लावणीचा दर्दी असला, त्याला या कलेबद्दल खरोखर आस्था असली, तर बाई लगेच बसल्या जागीच पदर डोईवरून सावरून घेतात नि म्हणतात-

नका धरू राया, मनामधी अढी,

तुम्हा लावा दाराला कडी

वय पंचविशीचा तोरा,

थाट पहिलवानकीचा न्यारा

डोळे टपोरे, बाई डोळे टपोरे, रंगेल गडी

अहो राया तुम्ही लावा दाराला कडी…

… मग बाईंच्या या अचानक झालेल्या माऱ्याने समोरच्याला सावरायलाही वेळ मिळत नाही!

  • मुकुंद कुळे
RohanSahityaMaifaljpg-1-1

Sundarabai
या सदरातील लेख…

‘बाई’ सुंदराबाई

बाई सुंदराबाईंनी एवढं वैविध्यपूर्ण गायन केलं, तरी त्यांची आज जनमानसातली ओळख आहे ती, बैठकीची लावणी गाणारी गायिका म्हणूनच!

लेख वाचा…




देवकन्या!

ते केवळ गायन नव्हतं, तो सुब्बुलक्ष्मींचा सतत चाललेला रियाझ होता – आपलं गाणं देवाप्रति पोचवण्याचा!

लेख वाचा…


एकलीच बशिल्ली मेनकाबा

आयुष्याचं उत्तरपर्व गोव्यातील फोंड्याच्या शांतादुर्गा मंदिराजवळ असलेल्या स्नेहमंदिर वृद्धाश्रमात व्यतीत करणाऱ्या प्रसिद्ध गायिका-नर्तिका मेनकाबाई शिरोडकरही अशाच झुरल्या असतील का आपल्या माणसांसाठी?

लेख वाचा…


आर्यगंधर्व

बालगंधर्वांनाही ज्यांच्या लावण्या प्रिय होत्या, त्या कौसल्याबाई कोपरगावकर यांची नावनिशाणीच आज कालपटलावरून पुसली गेली आहे, जणू काही कौसल्याबाई झाल्याच नाहीत…

लेख वाचा…


विद्यासुंदरी

शरीराची गरज असेपर्यंत आश्रय द्यायचा आणि ती भागली की वाऱ्यावर सोडायचं, या पुरुषी वृत्तीचा तिला वीट आला नि संतापानेच तिने निश्चय केला- आता नागरत्नम्माला मोठी कलावंत करायचं !

लेख वाचा…


बैठकीच्या लावणीतलं मानाचं पान

भामाबाईंच्या कलेचं कोणत्याच प्रकारचं दस्तऐवजीकरण आज उपलब्ध नाहीय. परंपरेतील माणसं त्यांचं नाव घेताना आजही कानाला हात लावतात, हेच भामाबाईंचं मोठेपण! 

लेख वाचा…


बैठकीच्या लावणीतलं मानाचं पान

थोड्याच काळात रसूलन एखाद्या जाणत्या गायिकेसारखी गायला लागली. बघता बघता बनारस घराण्याची आन-बान-शान बनली! 

लेख वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *