‘योगाचार्य’ पुस्तकातील निवडक भाग

वृद्धिंगत होणारी ख्याती

बॉम्बे आणि पुण्यातले गुरुजींचे वर्ग आता जोरात सुरू होते. विद्यार्थ्यांची संख्या वाढत होती. बार्झो, धन, सॅम आणि फ्रेनी या जुन्या शिक्षकांच्या जोडीला आता मधु तिजोरीवाला यांची भर पडली होती. मधुभाईंनीही वर्गात प्रवेश घेतला होता. व्यवसायाने सॉलिसिटर असणाऱ्या मधुभाईंनी त्यांचा नित्याचा बॅडमिन्टनचा खेळ सोडून दिला होता आणि ते नेमाने योग करू लागले होते. अय्यंगारांच्या आयुष्याचा तेही लवकरच अविभाज्य भाग बनले.
तसंच अद्याप वयाने लहान असणारे, पण नंतर दहा वर्षांनी शिक्षक बनलेले – जवाहर बंगेरा, आदिल आणि जहांगीर पालखीवाला, अनाहिता, टीना आणि डायना या मोतीवाला भगिनी आणि कॉली दस्तूरची मुलगी नवाझ ही तरुण पिढी देखील होती.

रमामणी अय्यंगार मेमोरियल योग सेंटरसाठी जागा मिळवून देण्यात मधु तिजोरीवाला यांची फार मोठी मदत अय्यंगारांना झाली. नंतर त्यांनीच ‘लाइट ऑन योग’ ट्रस्ट सुरू केला. सुरुवातीच्या काळातील या शिक्षकांसोबत अय्यंगार महाबळेश्वर किंवा माथेरान अशा ठिकाणी योग-सुट्टीसाठी जात असत. त्यांना गरमी आवडत नसे. त्यामुळे या आरंभीच्या काळातल्या विद्यार्थांबरोबर ते मे महिन्यात शक्यतो बाहेर जाण्याचा प्रयत्न करत.
अशाच एका सहलीच्या वेळी ते केट पॉइंटला गेले. तिथे एका ठिकाणी पर्यटकांनी पुढे जाणं धोकादायक असल्याने कठडे घातले होते. पण गुरुजी त्यावर चढून पलीकडे गेले. जवाहर आणि बिरजूसोबत त्यांनी तिथला एक छोटा कडा चढून पाहिला. पण त्यांचं समाधान झालेलं नव्हतं. तिथे शेजारी कड्याचं टोक होतं. जेमतेम दोन बाय दोन फूट उंचीचं. गुरुजी तिथे जाऊन उभे राहिले. ही जागा इतकी अरुंद होती की, सोबत असणारे जवाहर आणि बिरजू अलीकडे खालीच उभे राहिले. गुरुजीच फक्त तिथे मावू शकत होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी तिथे चक्क शीर्षासन केलं. इकडे खाली उभं राहून हे दिव्य पाहणाऱ्या दोन्ही शिष्यांचा जीव अक्षरश: कंठात गोळा झाला होता. दोघेही ओरडून गुरुजींनी हे अघोरी साहस करू नये म्हणून ओरडून विनवत होते. जागा इतकी अरुंद होती की, पारंपरिक पद्धतीने त्यांना डोक्यावर शरीराचा भार उचलणं जमणार नव्हतं. आपल्या कोपरांच्या बाजूला पाय ठेवून त्यांनी हलकेच वर नेत तोल सांभाळला. जमीन खडकाळ होती आणि खाली थेट खोल दरी होती. त्यांचं धोतर तर आसन केल्यानंतर आडव्या दिशेत उडत होतं. यावरूनच त्या दिवशी वाऱ्याचा वेग किती तुफान असेल, याची कल्पना येत होती. नंतर त्यांनी इतरही काही आसनं केली. खाली उभे राहिलेले हे दोन्ही विद्यार्थी या धाडसाचे साक्षीदार होते. पण दोघेही मनातून पुरते भेदरून गेले होते.
समोरच्या दुसऱ्या कड्यावरून एक विद्यार्थी या प्रकाराचे फोटो काढत होता. सोबत आपल्या कुत्र्याला घेऊन आलेला एक अमेरिकन विद्यार्थीदेखील होता. तो जोरजोरात ओरडून विनवणी करत होता, “तुम्ही पडलात, तर तुमचा केवळ जीव जाईल; पण आम्ही मात्र आमच्या गुरूंना गमावून बसू.” त्यानंतर अनेक वर्षं महाबळेश्वर इथला हा केट पॉइंट त्यांच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात राहिला. तिथे एक पाटीदेखील लावण्यात आली होती – ‘याच ठिकाणी अय्यंगार यांनी एकदा शीर्षासन केलं आहे.’

BKS-Iyengar

सारे पुण्याला परत आले. या धाडसाचा साक्षीदार असणाऱ्या आदिल पालखीवाला याने त्यांना कुतूहलाने विचारलं, “इतकी कमी जागा असताना तुम्ही हे धाडस कसं करू शकलात? ज्या स्थितीमध्ये पराकोटीच्या संतुलनाची गरज होती, ते आसन कसं केलंत?” अय्यंगारांना नेहमीच कोड्यात बोलायला आवडत असे. आताही त्यांनी तसंच उत्तर दिलं. ते म्हणाले, “माहीत असणारं आणि माहीत नसणारं!” आदिल या उत्तराचा अर्थ असा सांगतो, “तुम्हाला जे ठाऊक आहे त्यावर सारं लक्ष केंद्रित करा. म्हणजे मग जे तुम्हाला ठाऊक नाही, त्याचा त्रास होणार नाही.”
अय्यंगारांबरोबर बार्झो आणि तिजोरीवाला यांनी १९७० साली काश्मीरमधील अमरनाथ यात्रा केली. या यात्रेसाठी त्यांनी एखाद्या लहान मुलाच्या उत्साहाने कशी तयारी केली होती, ते बार्झोची मुलगी सूनु तारापोरवाला हिला आठवतं. त्याच वेळी कॅडबरीने चिकट कॅरॅमल असणारं फाइव्ह स्टार हे चॉकोलेट बाजारात आणलं होतं. प्रवासात खाण्यासाठी त्यांनी या फाइव्ह स्टारचा भला मोठा बॉक्सच आणला होता. परत आले तेव्हा तिघांना त्याचा वीट आला होता. प्रवासासाठी निघणार इतक्यात अय्यंगारांना काहीतरी हवं होतं. ती वस्तू त्यांच्या बॅगेत होती आणि तिला त्यांनी स्टीलचं कुलूप घातलं होतं. दुर्दैवाने त्याची किल्ली त्यांच्या हातून हरवली होती. काय करावं हे कुणालाच कळत नव्हतं. निघायला वेळ तर अगदीच थोडा राहिला होता. सुदैवाने त्या दिवशी बार्झोचा मुलगा इराच; याने या पेचातून मार्ग काढला. तो ऐन वेळी आपल्या आईची हेअरपिन घेऊन आला. त्याला कुलूप काढता येईल का याबाबत सारेच साशंक होते. पण काही क्षणांतच या तरुण मुलाने ते कुलूप तोडलं आणि अय्यंगारांच्या हातात ठेवलं. गुरुजी हे बघून थक्क झाले. तोवर नातेवाइकांनी दुसरं कुलूप आणून दिलं आणि अखेरीस मंडळी या यात्रेच्या प्रवासाला जाण्यास सज्ज झाली.
विमानाने ते श्रीनगरला पोचले. तिथे हाउसबोटीत त्यांनी काही दिवस मुक्काम केला. ते राहत होते तिथे लोकांची गर्दी होती. ते सुट्टीवर होते, तरीही अय्यंगारांचा पहाटे उठायचा आणि योगाचा सराव करण्याचा नेम काही चुकला नाही. त्यामुळे नाइलाजाने त्यांच्या विद्यार्थ्यांनादेखील उठून झोपाळलेल्या डोळ्यांनी त्यांच्या जोडीने आसनं करावी लागत होती.
सर्वसाधारणपणे श्रावण महिन्यात ही यात्रा लोक सुरू करतात. भुरभुरत्या पावसाचे हे दिवस. डोंगररांगांवर धुकं असतं. पहलगामपासून १६ किमी अंतरावर असणाऱ्या चंदनवाडी या ठिकाणापासून रस्ता अधिकाधिक चढणीचा होऊ लागतो. या रस्त्यावर एकतर फक्त चालत किंवा घोड्यावर बसूनच जाता येऊ शकतं. त्यापुढे खुद्द अमरनाथ गुहेपर्यंत ३० किमीचा अतिशय उभा चढ असणारा अवघड रस्ता चालत पार करावा लागतो. गुहेत बर्फाच्या शिविंलगाच्या रूपात भक्तांना शिव दर्शन देतात.
या चालत जाण्याच्या लांब रस्त्यावर इतरांच्या पायांत जुने वापरलेले, म्हणजेच सरावाचे बूट होते. अय्यंगारांनी मात्र नवीन बूट आणले होते. पहिल्या काही अंतरावरच त्यांना त्या बुटांमुळे फार त्रास झाला. त्यांना बूट चावत होते, तरीही ते झपाझप वेगाने चालत इतरांच्या खूप पुढे असत, असं मधुभार्इंना आठवतं.

  • योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार यांचं चरित्र
  • रश्मी पालखीवाला
  • अनुवाद : नीता कुलकर्णी

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल फेब्रुवारी २०२०


हे पुस्तक खरेदी करण्यासाठी…

योगाचार्य

बी.के.एस. अय्यंगार यांचं चरित्र

रश्मी पालखीवाला या अय्यंगारांच्या निकटवर्तीयांपैकी एक होत. या पुस्तकात त्यांनी अय्यंगार यांच्या जीवनातले चढ-उतार, त्यांचे स्वभावविशेष उत्कटतेने चितारले आहेत, तसंच योगसाधनेकडे पाहायचा गुरुजींचा दृष्टिकोन आणि त्यामागचं त्यांचं तत्त्वज्ञानही विशद केलं आहे. जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत योगसाधना हा ध्यास असलेल्या हाडाच्या योगशिक्षकाचं चरित्र… /p>

300.00Add to Cart


गुरुजींची इतर पुस्तकं…

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *