मोबाइल इंटरनेटमुळे गूगल सर्च असं म्हणताच वाट्टेल ती माहिती तुमच्या डोळ्यापुढे चमकत राहते. झुरांगनं इंटरनेटवरनं लदाखची माहिती मिळवायला सुरुवात केली. ती बरीचशी ‘तिथं कसं जा? काय पाहा? काय त्रास होतो? काय काळजी घ्या?’ अशी पर्यटनयुक्त होती. ‘कसं जा?’ यामध्ये त्याला इंट्रेस्ट होता. तो उत्साहाने ती माहिती वाचायला लागला. जायचे पर्याय असे होते, संपूर्ण आरामदायक पण खर्चिक असा विमानप्रवास. संपूर्ण कष्टदायक पण स्वस्त असा रेल्वे ± बसप्रवास. थोडा आराम नि थोडे कष्ट पण तसा खर्चिक असा विमान ± खाजगी गाडीचा प्रवास. झुरांगनं संपूर्ण कष्टदायक प्रवास अंगावर घेतला. हा प्रवास करण्याचा काळ जून ते सप्टेंबर एवढाच असल्याने तो जुलैत अंबालाला जाण्यासाठी रेल्वेत बसला. जायच्या आधी त्याला सुचेताताईनं अनिताची ‘प्रोजेक्ट लदाख’ची सुटकेस दिली. त्यात त्याला काय हाती लागलं – विविधरंगी दगड, अँड्र्यू हार्वेचं लदाखचं प्रवासवर्णन, हेलेनाचं ‘एन्शंट फ्यूचर्स’ नावाचं पुस्तक, अनिताच्या नोट्स, तिचा लेख, तिथले नकाशे, डायरी, मानेचे व इतर फोटोग्राफ्स, लोब्झांगच्या फाडलेल्या फोटोचे तुकडे, याकच्या लोकरीची काळी शाल, पांढरे-हिरवे-जांभळे असे दगड. कोरीव काम केलेली छोटीशी घंटा. ती त्यानं वाजवून बघितली. टंऽऽऽ असा नाद त्यातनं बाहेर पडला. झुरांगनं डोळे मिटले.
झुरांग जाणार म्हणून तो नि गौरी हॉटेलात गेले होते. झुरांगची चलबिचल चालली होती. तो तिला म्हणाला, “मी तुला विसरू शकत नाही.” त्यावर गौरी म्हणाली, “डोंट वरी. तिकडे गेल्यावर विसरून जाशील. आपलं नाही जमणार तर त्यामागे लागण्यात काय अर्थ आहे? फोकस ऑन युअर जर्नी.” झुरांग एकदम गप्पच बसला. जाताना तिनं त्याला एक डायरी भेट दिली. नवीन वर्षाच्या वेळी जे डायरीचं पीक येतं ना, त्यात घेतलेली. उत्कृष्ट बांधणी. आत हँडमेड कागद. या डायऱ्यांची सर्वच्या सर्व पानं कधी भरत असतील का? त्यात कोणाला लिहावंसं वाटत असेल? बरीचशी पानं कोरीच राहत असतील. कधी कधी काहीच न सांगणारी ही कोरी पानंच मस्त वाटतात. त्यात स्वत:ला शोधायचं आव्हान असतं. झुरांगच्या डायरीचंही तेच झालं. रेल्वेत बसल्या बसल्या तो लिहायला लागला. गौरीनं त्याला त्याची ही शोधयात्रा शब्दबद्ध करायची कल्पना सुचवली होती. “माणसांच्या गप्पा, वेगवेगळे आवाजही रेकॉर्ड करून ठेव, झुरू.” मग त्यासाठी रेकॉर्डिंगचं अॅपही मोबाइलवर डाऊनलोड करून दिलं.
गाडी दौंडपर्यंत पोचली नाही, तर लगेच त्याचं दारात उभं राहून आवाज रेकॉर्ड करणं सुरू झालं. रेल्वेचा आवाज. प्रवासाची सुरुवात. त्याला काय मराठीत सुचायला लागलं. मग लगेच आत आला. सॅकमधनं डायरी काढली. त्यावरनं हात फिरवला. पेन हातात घेऊन खिडकीतनं बघत बसला. जरा वेळानं इंग्लिशमध्ये लिहू लागला. त्याचं मराठीत भाषांतर असं-
२३ जुलै २०१७
झुरांग अनिता म्हणजे मी. रेल्वेत बसून सफरीस निघालोय. एका दूरवरच्या रम्य प्रदेशात मला जायचंय. त्याची ओढ लागलीये. अनिताई तिकडे दोनदा गेली होती. तिनं तिकडे जाऊन बराच अभ्यास केला. खूप फिरली. बरंच लिहिलं. म्हणून मी पण अनिताईसारखीच डायरी लिहिण्याचा प्रयत्न करणारे. ती तिकडेच कायमची हरवून गेली. कसली तरी बेचैनी मनात दडलीये. ती तिथेच असेल का अजूनही? बाबा भेटेल का? मी तिथं का चाललोय? कोणासाठी? मनापासून बाबाची ओढ आहे, की त्या रम्य वेगळ्या प्रदेशाबद्दल उत्सुकता आहे? पुण्यात तसंही काही उरलं नाहीये. तोच जॉब. तेच घर. त्यापेक्षा तिकडे काहीतरी मस्त मिळेल म्हणून चाललोय का मी?
धाड्.. बोगीचं दार आपटलं. मी मघाशी त्याच दारात उभा होतो. दारातनं बाहेर बघत होतो. दूरवर रेल्वेचं तोंड होतं. नि मागे मागे मी. खूप मागे. धाड्धाड्धाड नुस्ता आवाज. डोकं बाहेर काढलं. माझे केस उडून गेले तर. जाऊ देत. काय फरक पडतो. वारा भरून घे. वारा नाका-डोळ्यांत. वारा चिरतोय एकेक अवयव. झोकदार वळण घेतलं रेल्वेने. मीही वळलो. मी खूप खूप मागे. माझ्या शेजारी टीसी येऊन बसलाय. अनेक कागद एकास एक जोडलेले. त्याला वेगळे करायचेत एकेक. टर्क..टर्रक सपासप एकेक कागद वेगळा होतो. कागदांवर नावं छापलीयेत. लांब सापासारख्या रेल्वेगाडीत भरलेल्या माणसांची नावं. जनरल डब्यातली माणसं वाऱ्यावर. बाकी सर्वांची नावं, वयं, कुठून कुठे जाणार, आधार नंबर, फेसबुक प्रोफाईल? नाही. फक्त तिकीट नि आधार-सरकारी नियम. झुरांग अनिता म्हणजे मी. माझं तिकीट आहे. बाकी काही विचारू नकोस.
खिडकीत गच्च अंधार दाटून आलाय. मधनंच चार-पाच दिवे. मधनंच स्टेशन. कुठे थांबणार हे सर्व? कुठे थांबणार मी? रेल्वे थांबली की थांबेल? तू रेल्वेच्या ताब्यातेस. ती तुला सोडून जाणार परत मागे. तू एकटा निघून जाणार पुढे. कुठे? भव्य पर्वतरांगेच्या पलीकडे. झोपावं तोवर. वरचा बर्थ. अंधार अंधार… धडधड हलणं.
झुरांगच्या डायरीचं हे एकच पान भरलं. कारण ती डायरी तो येडा रेल्वेतच विसरला. गाडी फक्त दोनच तास उशिराने धावत पहाटे पाचला अंबाला स्टेशनात उभी राहिली. तेव्हा त्याची झोप चाळवली गेली. तो घाबरून उठला. मग धीरच सुटला. कशीतरी सॅक उचलली. शाल घेतली नि धडपडत उतरला. मग तिकीट काढलेल्या स्टेशनपर्यंतच जायचं असतं. नाहीतर रेल्वेतली माणसं सोडत नाहीत. दंड भरावा लागतो. तो कुणाच्या तरी खिशात जातोच.
झुरांग जरा वेळ स्टेशनातच बसला. हवेत उकाडा होता. हातातली शाल सॅकमध्ये कोंबली. मग त्याच्या लक्षात आलं की, डायरी-पेन-पाण्याची बाटली या वस्तू रेल्वेला दान झालेल्या आहेत. एकदम त्याला दाही दिशा काळवंडून गेल्यासारख्या वाटल्या. गौरीची जबरदस्त आठवण आली. तसाच बसून राहिला. बराच वेळानं उठून चालू लागला. बिसलेरीची स्वच्छ पाणी पिण्याची जाहिरात न आठवल्याने त्यानं पाण्याच्या टाकीशी घाणीत पडलेली जरा चांगली वाटणारी बाटली उचलून पाणी भरून घेतलं. बाहेरच बसेस उभ्या होत्या. त्यांतली एक पकडून तो चंडीगढला गेला. शहरात फिरायची इच्छा नसल्याने स्टँडवरच बसून होता. तसंही मनालीची बस कधीही लागू शकते. म्हणून तो त्या चकाचक स्टँडवरच वाट पाहत बसला. विचित्र घुसमट. आभाळ भरून आलं होतं, पण पाऊस पडत नव्हता. उकडत होतं. तहान तहान. पाणी प्यायलं. प्रचंड भूक. परोठा खाल्ला. पुन्हा बसची वाट…
- झुरांगलिंग
- लेखक : हृषीकेश पाळंदे
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल जानेवारी २०२०
ही कादंबरी खरेदी करण्यासाठी…
झुरांगलिंग
एकदा काय झालं, पुण्यनगरीतल्या त्याच त्या रूटीनला वैतागून मी दूर हिमालयाच्या मुख्य रांगेच्याही पलीकडच्या रम्य प्रदेशात गेलो. हा लदाखी प्रदेश रूक्ष, बोडक्या मातकट पर्वतांचा. हिवाळ्यात तयार होणाऱ्या शुभ्र हिमगालिच्यांचा, खळाळ वाहणाऱ्या नद्यांचा, दरीतल्या हिरवाईचा, डोक्यावर असणाऱ्या गर्द निळ्याभोर आभाळाचा आणि त्याखाली ध्यानस्थ बसलेल्या बुद्धाचा! तिथे मी खूप दिवस मुक्काम ठोकला. सामान्य टुरिस्ट म्हणून गेलो नसल्याने मनसोक्त भटकत असतांना मी एक गोष्ट ऐकली. मग झालं काय की, त्या गोष्टीतल्या घटनांच्या प्रवाहाचा माग काढता काढता त्यात अनेक प्रवाह मिसळत गेले. म्हणजे अनिता-लोब्झांग, झुरांग-निस्सू, मेमेले…अशा जिवंत माणसांचा, अवलोकितेश्वर-तारादेवी या देवांचा आणि लिंग केसरसारख्या आख्यायिकांचाही! या प्रवाहात मी पाहिलेलं, न पाहिलेलं, माझ्या डोक्यातलं, मनातलं..असं सगळंच वाहत वाहत आलं. थोडक्यात काय तर, या लेखकदेवानी एक गोष्टच विणून टाकली वाचकदेवासाठी… अस्तित्वातल्या आणि नास्तित्वातल्या घटनांची… झुरांगलिंग !
₹300.00Read more
युवा लेखक, कादंबरीकार हृषीकेश पाळंदे यांचा परिचय
चंगळवादाची झापडं लावून बसलेल्या जगात तो मिनिमलिस्ट जीवनशैलीनी जगू बघतोय . बुद्धाने सांगितलेल्या मध्यमार्गावर सध्या तो बरंच काही वाचतोय, त्यावर उलटसुलट विचार करतोय.