ती पाच माणसं होती. पाचही जणांचा पोशाख समान होता. प्रत्येकाने अंगावर पिवळसर रंगाचा कुर्ता घातला होता. अंगाखाली पंजाबी लोक घालतात तसा काळ्या रंगाचा पायजमा होता. गळ्यात मोठाल्या मण्यांच्या माळा होत्या. पोरगेल्याशा दिसणाऱ्या नुकत्याच वयात येऊ पाहणाऱ्या त्यांच्या एका साथीदाराचा अपवाद वगळता चौघांनाही दाढ्या होत्या. अंगापिडाने एखाद्या पूर्ण वाढ झालेल्या घोड्यागत दिसणारा त्यांचा म्होरक्या पुढे झाला आणि त्याने कंबरपट्ट्यात अडकवलेला सुरा बाहेर काढून बाच्या मानेसमोर धरला. ‘‘पत्ती दे दे,’’ त्याच्या स्वराला त्याने हातात धरलेल्या सुऱ्याचीच धार होती. बाने एका हाताने कालीच्या खांद्याला धरत दुसऱ्या हाताने त्याला जवळ खेचलं. बाच्या हाताला सुटलेला घाम आणि कंप कालीला स्पष्ट जाणवला. सुराधाऱ्याने एक नजर त्याच्याकडे टाकून मग पुन्हा बाकडे पाहिलं. ‘‘मुझे बच्चा नही चाहिये. तुझे पता है ऐसे घिनौने काम हम लोग नही करते. मगर पत्ती ना मिले तो…’’ सुराधाऱ्याने हेतूपूर्वक वाक्य अर्धवट सोडलं.
‘‘माझ्याकडे पत्ते नाहीत. किलवरची राणी माझी बायको घेऊन पळून गेली.’’ बाच्या या वाक्यावर सुराधारी गडगडाटी हसला. एखादा मस्तवाल हत्ती खिंकाळावा तसा. मग म्हणाला, ‘‘एखादी गुप्त बातमी सांगावी तशी ही खबर मला सांगू नकोस. चंदू जुगाऱ्याची बायको त्याला मिळालेल्या प्रवेशपत्त्यांपैकी एक पत्ता घेऊन पळून गेलीय ही वार्ता जगभरातल्या प्रत्येक जुगाऱ्याच्या कानापर्यंत एव्हाना पोहोचलीय. जुगाऱ्यांच्या विश्वात तू एक विनोद ठरला आहेस. या प्राचीन स्पर्धेच्या प्रवेशपत्त्यांची चोरी आजवर झालेली नाही असं नाही; पण ती छळकपटाने, रक्तपाताने झालेली आहे. जिच्यासोबत पंधरा वर्षं संसार केला अशा लग्नाच्या बायकोने ती चोरी करावी ही गोष्ट तुझ्यासाठीच नव्हे, तर उभ्या पुरुषजातीसाठी लांच्छनास्पद आहे.’’ सुराधाऱ्याचे शब्द ऐकून बाच्या चेहऱ्यावर एक कडवट रेघ उमटली. त्या रेघेवर कडवटपणासोबत विषाद, वैषम्य आणि वेदनाही होती.
‘‘मला तो दुसरा पत्ता हवा आहे. दुसरा पत्ता,’’ सुराधाऱ्याने स्वरातली धार आणि धमकी वाढवत विचारलं.
‘‘दुसरा पत्ता?’’ बा काहीही न कळल्या स्वरात म्हणाला. ‘‘मागल्या काळजुगारी स्पर्धेत चंदू जुगाऱ्याला दोन प्रवेशपत्ते मिळाले होते ही गोष्ट सगळ्यांना ठाऊक आहे.’’
‘‘बरेचदा अफवा सर्वश्रुत होतात,’’ बा निर्विकार चेहऱ्याने उत्तरला आणि सुराधाऱ्याने मघापासून बाला खेटून उभ्या असलेल्या त्याचं बकोट धरून त्याला स्वत:कडे खेचलं. ‘‘दुसरा पत्ता?’’ एका हाताने त्याचं बकोट धरून दुसऱ्या हातातला सुरा बाच्या मानेवर रोखत दाढीधाऱ्याने विचारलं. ‘‘दुसरा पत्ता माझ्याकडे नाही.’’ बाच्या स्वरातला कंप त्याला स्पष्ट जाणवत होता. सुराधाऱ्याने बाच्या मानेसमोरचा सुऱ्याचा हात काढून तो सुरा कालीच्या मानेवर रोखला. ‘‘आम्हाला दोघांनाही मारून तो पत्ता तुला मिळणार नाही.’’ बाच्या स्वरात आता आर्जव होतं, एक दयेची भीक होती. ‘‘थांब. दोन मिनिटं माझं ऐकून घे.’’ असं म्हणत बा पुढे झाला आणि बाने सुराधाऱ्याने हातात पकडलेलं कालीचं बकोट सोडवून घेतलं. समोर अचानकच उद्भवलेल्या त्या भयकारी प्रसंगामुळे छोट्या कालीचं सर्वांग एव्हाना कंप पावू लागलं होतं. बाने पुढे होत कालीच्या कपाळावर आपली तर्जनी आपटली आणि तो सुराधाऱ्याला म्हणाला, ‘‘इथे. इथे आहे तो पत्ता.’’ सुराधाऱ्याच्या चेहऱ्यावरचे भाव तत्काळ बदलले. मघापासूनचे आक्रमक आणि हिंसक भाव चेहऱ्यावरून नाहीसे होऊन एक प्रकारचे वेगळेच कुतुहलमिश्रित भाव त्याच्या चेहऱ्यावर अवतरले. सुराधाऱ्याने सुरा कंबरपट्ट्यात खोचला. त्याच्या डोळ्यात आता उत्सुकतेचा ताण स्पष्ट दिसत होता. विलग झालेल्या ओठांतून दिसणाऱ्या दातांमध्ये थुंकीचा तंतू लोंबकळत होता. सुराधारी खाली वाकला आणि गुडघ्यांवर बसत छोट्या कालीच्या कपाळाकडे पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावरचे उत्सुक भाव हळूहळू विलयाला गेले आणि एका वेगळ्याच आश्चर्यमिश्रित उत्कंठेचे भाव चेहऱ्यावर पसरले. ती निव्वळ उत्कंठा नव्हती. त्यात भय आणि अस्वस्थताही मिसळली होती. सुराधाऱ्याने हलक्या हातांनी कालीच्या कपाळाला स्पर्श केला आणि मग एखाद्याने कसबी कासाराने तांब्यापितळेच्या भांड्यावर टिचकी मारावी तशी त्याने कालीच्या कपाळावर टिचकी मारली. एखाद्या धातूच्या पातळ पत्र्यावर टिचकी मारली असता जशी ध्वनिनिर्मिती व्हावी तसा ध्वनी निर्माण झाला. सुराधारी उत्तेजित होऊन मागे मान वळवत किंचाळल्यागत ओरडला, ‘‘गिलौरी दे. गिलौरी.’’ सुराधाऱ्याचे साथीदार बुचकळ्यात पडल्यागत एकमेकांकडे पाहू लागले. क्षणभर कुणालाच काही कळेना. एक जण पुढे येत सावधपणे म्हणाला, ‘‘उस्ताद, गिलौरी तो नही है अभी.’’ सुराधाऱ्याचा हात बसल्या-बसल्याच कंबरेला खोचलेल्या सुऱ्याकडे जात असतानाच बा थरथरत्या स्वरात म्हणाला, ‘‘माझ्याकडे आहे आरसा. दाखवू?’’ सुराधाऱ्याने मान हलवली आणि बाने पुढे होत पत्र्याची ट्रंक उघडून एक छोटा तळहाताएवढा लांबरुंद लाकडी चौकट बसवलेला आरसा काढला. सुराधाऱ्याचं उभं शरीर आता कंप पावत होतं. त्याच कंपपावल्या हातांनी बाकडून आरसा घेत सुराधाऱ्याने तो कालीच्या कपाळापुढे धरला. आरशात पडलेलं प्रतिबिंब पाहून सुराधारी अविश्वासाने पुटपुटला, ‘‘मातारानी की सौगंध. ऐसा नजारा मेरी सात पुश्तोने ना देखा था!’’ बऱ्याच काळापासून भीतीने घट्ट मिटलेले डोळे कालीने हलकेच उघडले तेव्हा त्याला सुराधाऱ्याने हातात धरलेल्या आरशात त्याच्या कपाळावर आब्बाकर चाचाने गोंदलेला जोकरचा पत्ता स्पष्ट दिसला…
- काळजुगारी
- हृषीकेश गुप्ते
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल फेब्रुवारी २०२०
खरेदी करण्यासाठी…
काळजुगारी
काली स्वतःला आरशात पाहतो. कपाळाच्या मधोमध त्याला दिसतो जोकर! मरण्याआधी त्याच्या बाबानेच हा जोकर त्याच्या कपाळावर गोंदून जणू काही त्याच्या नशिबाचा रस्ता आखून ठेवलेला… आणि हा रस्ता जात होता कित्येक वर्षांनी होणाऱ्या काळजुगारी स्पर्धेत! जगाची व्यवस्था बदलण्याची संधी असलेल्या कालीचं नशीब या स्पर्धेत उजळेल की त्याच्या बाबासारखाच तोही नुसताच परत येईल? मराठी साहित्यातील रूपककथांच्या दालनात मोलाची भर घालणारी लघुकादंबरी..
₹170.00Add to Cart
आघाडीचे कथा-कादंबरीकार हृषीकेश गुप्ते यांचा परिचय
गूढ-अद्भुतता, चित्रमय, प्रासादिक व ओघवती भाषा या लेखनवैशिष्ट्यांमुळे त्यांचं लेखन खिळवून ठेवतं.
‘हृषीकेश गुप्ते संग्रहिका’बद्दल ‘लोकमत’मध्ये आलेला लेख
भावनांचा गूढगर्भ शब्दाविष्कार (राजू इनामदार)
‘गूढ नाही पण गहन’, ‘भय नाही पण भयासारखं’ व ‘रम्य नाही पण मोहवणारं’ असं काहीतरी हृषीकेश यांच्या लिखाणात असतं. ही तीन पुस्तकंही त्याला अपवाद नाहीत. शाश्वत असे एखादे तत्त्व व मग त्या तत्त्वाभोवती वेटोळे घालत किंवा कधी सोडवत गुंफलेलं कथानक या पद्धतीचे लेखन हृषीकेश करतात.