काहीशी वेगळ्या शैलीची मराठीतील ही तीन पुस्तकं नव्या पायवाटेची चाहूल देणारी आहेत. चांगली किंवा र्वाइट हे त्या पायवाटेवर गर्दी किती होते त्यावर अवलंबून आहे. ‘काळजुगारी’, ‘हाकामारी’ या लघुकादंबऱ्या व ‘परफेक्टची बाई, फोल्डिंगचा पुरुष’ व ‘तिळा दार उघड’ या दोन दीर्घकथा. ही ती तीन पुस्तकं,एकाच संचात प्रकाशित झालेली. लेखक आहेत हृषीकेश गुप्ते.
नव्या पिढीच्या भाषेत लिहिणारे नव्या पिढीतीलच म्हणता येतील असे मराठीत जे काही मोजकेच लेखक आहेत, त्यात हृषीकेश यांचं नाव गाजतं आहे. वरील कादंबऱ्या व कथांची नावं वाचल्यास त्यांचं लिखाण कसं असेल हे लक्षात येईल. ‘दंशकाल’, ‘चौरंग’ ही त्यांच्या आणखी काही पुस्तकांची नावं. तीही अशीच काहीशी वेगळी, विचित्र वाटणारी.
‘गूढ नाही पण गहन’, ‘भय नाही पण भयासारखं’ व ‘रम्य नाही पण मोहवणारं’ असं काहीतरी हृषीकेश यांच्या लिखाणात असतं. ही तीन पुस्तकंही त्याला अपवाद नाहीत. शाश्वत असे एखादे तत्त्व व मग त्या तत्त्वाभोवती वेटोळे घालत किंवा कधी सोडवत गुंफलेलं कथानक या पद्धतीचे लेखन हृषीकेश करतात.
‘काळजुगारी’ या कादंबरीत वरवर पाहता ही जुगारी जगाची गोष्ट वाटते, पण त्यात काही आदीम तत्त्वं आहेत. व्यवस्था, तिच्यातील बदल, त्याची गरज, ते कसे होतात, होतात की नाही, याभोवती कादंबरीतील काली, त्याचा बा, आई, अब्बाकर, कपाळावर जोकरचं गोंदण, जुगार खेळण्याची स्पर्धा, त्यातले राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धक, या भोवती कादंबरी फिरते व व्यवस्था म्हणजे काय ते स्पष्ट करते.
‘फोल्डिंग…’ व ‘तिळा…’ मध्येही असंच आहे. स्त्री हीच कशी सगळ्याची प्रेरणा असते. हे पतंग उडवण्याच्या स्पर्धेचं निमित्त करून सांगितलं आहे. यातली पात्रं वागतात विचित्र, पण त्यांच्या भावना सर्वसामान्य आहेत. मॅनेजर, त्याची आई, बाइंडर, चहावाला व तो आणि ती यातून कथा उभी राहते व बरेच काही सांगते. ‘तिळा…’मध्ये पौगंडावस्थेचे प्रत्ययकारी चित्रण आहे. पण ते तर, हलके, भावपूर्ण असं उगीच खोटंखोटं नाही, तर नेमक्या व प्रभावी शब्दांत केलेलं आहे.
‘हाकामारी’ ही लघुकादंबरी त्यातल्या त्यात नेहमीच्या सरावाच्या वाचनात असते तशा भाषेतील आहे. तिचा गाभा मात्र तसाच चकवा देणारा किंवा गुंतवून ठेवणारा आहे. स्वत:ला डिटेक्टिव्ह म्हणवून घेणारा लेखक व संध्या, कांता, निशा, नाना, आई अशी काही पात्रं यांतून गोष्ट पुढे सरकते व एका वेगळ्याच शेवटाजवळ थांबते.
अशा वैचित्र्यपूर्ण लेखनाविषयी खुद्द लेखकाला काय वाटतं? मुख्य मुद्दा भाषेचा. हृषीकेश सांगतात, ‘अशी भाषा काही मी ठरवून वापरत नाही. मी भरपूर वाचन करत आलो, करत असतो. त्यातूनच कदाचित भाषेचा हा पोत निर्माण झाला असावा.’ भाषाच नाही तर कथा किंवा कादंबरीचा गाभा, ज्याला प्लॉट म्हणतात तोही विचित्र असाच असतो. यावर हृषीकेश यांचं म्हणणं, ‘तेही ठरवून केलेलं नाही. अगदी सहज येतं ते. म्हणजे असा जुगार असावा, की त्यात जिंकलं की जगाचे सगळे प्रश्न सुटून जावेत हे माझं अनेक वर्षांचं स्वप्न आहे तेच मग कथेत आलं. मनात असंच काहीतरी असतं व ते अचानक उसळी मारून बाहेर येतं व त्याचीच कथा किंवा कादंबरी होऊन जाते.’
पुस्तकांविषयीच, पण थोडे वेगळेच!
लेखकाकडून लेखनात काही नावीन्य यावं म्हणून प्रयत्न होत असतातच, पण प्रकाशकही पुस्तकांसाठी नवनवे प्रयोग करत असतात. अशाच एका नव्या प्रयोगाविषयी… छे! इतका मोठा ठोकळा! आणि तो कधी वाचायचा? कोणतंही पुस्तक पाहिलं की मनात येणारा हा प्रश्न! त्याला उत्तर मिळत नाही आणि मग पुस्तक खरेदी करायचं, वाचायचं सगळंच राहून जातं. उत्तर न मिळणाऱ्या या व अशाच आणखी काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न एका प्रकाशक संस्थेने केला व त्यातून एक नावीन्यपूर्ण, अभिनव प्रकार आकाराला आला. यात पुस्तकाचा आकार हाच एक वेगळा विचार नाही, तर त्यामध्ये अनेक गोष्टी दडल्या आहेत.
रोहन प्रकाशनने अलीकडेच प्रकाशित केलेल्या एका पुस्तकाच्या अनुषंगाने पुस्तकांबाबत फक्त लेखक, वाचकच नाही तर प्रकाशकही बारकाईने विचार करतात याचं प्रत्यंतर आलं. दोन लघुकादंबऱ्या, दोन दीर्घकथा असा ऐवज तीन वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये पण एकाच संचात, असा हा प्रकार आहे. पुस्तकांचा आकार व पृष्ठं हा अनेकांना वाचन प्रक्रियेतील एक फार मोठा अडथळा वाटतो. तसेच किंमत, पुस्तक हाताळताना ते बरोबर ठेवतानाही बऱ्याच जणांची अडचण होत असते. त्याशिवाय वर उल्लेख केलेला इतकं मोठं पुस्तक वाचायचं कधी, हा प्रश्न! रोहनच्या या नव्या पुस्तकाने या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. वाचकांनाही हा प्रकार पसंत पडताना दिसतो आहे. पूर्वी पॉकेटबुक निघायची. हे दिसायला तसं असलं तरी प्रत्यक्षात तसं नाही. कारण याची निर्मितीमूल्यं अतिशय उच्च दर्जाची आहेत. एकूण तीन पुस्तकं आहेत. ती एकाच संचात म्हणजे कार्डशिटच्या चांगल्या पाकिटात मिळतात. त्यांचा आकार हा छोट्या पुस्तिकेसारखा आहे.
म्हणजे, एरवीचे पुस्तक हँडबॅगमध्ये वगैरे ठेवायला अडचणीचं होतं. यांचं तसं नाही. तीनही पुस्तकं या एका संचात अगदी सहजपणे कोणत्याही हँडबॅगमध्ये अगदी सहज बसतील अशी आहेत. प्रत्येकाची पृष्ठसंख्या १००च्या थोडी पुढ-मागे, म्हणजे तीनही पुस्तकांची मिळून सगळी पाने ३२५ आहेत. एकत्रित किंमत ३०० रुपये, वेगवेगळी घेतली तर किंमत थोडी जास्त म्हणजे ३६० रुपये आहे.
रोहन प्रकाशनाच्या रोहन चंपानेरकर यांनी फार विचारपूर्वक हा संच तयार केला आहे. विचारपूर्वक म्हणजे, लेखकापासून ते पानांच्या संख्येपर्यंत व किमतीपासून ते त्याच्या निर्मितीमूल्यांपर्यंत. वाचकाला पुस्तक खरेदी करताना, ते स्वत:जवळ ठेवताना, वाचायला घेताना काय काय हवं असतं याचा अभ्यास करून त्यांनी काही निष्कर्ष काढले. त्यानुसार आकार हँडी असावा, पृष्ठसंख्या कमी असावी, एकाच लेखकाचे, एकाच वेळी बरंच काही वाचायला मिळावं, किंमत कमी असावी, अशा वाचकांना हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यात उतरवल्या आहेत. तीन पुस्तकांसह पाकिटालाही वेगळं मुखपृष्ठ आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी त्यातही आकर्षकतेबरोबरच सुसंगतपणाही राहील याची काळजी घेतली आहे.
-राजू इनामदार
(सौजन्य : दै. लोकमत ‘मंथन’ पुरवणी )
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल मे २०२०
हृषीकेश गुप्ते संग्रहिका खरेदी करण्यासाठी…
३ पुस्तकांत… २ लघुकादंबऱ्या, २ दीर्घ कथा
स्थलकालाची रोचक, अद्भुत आणि रम्य सफर
घडवणारी, मराठी रूपककथांच्या दालनात
मोलाची भर घालणारी लघुकादंबरी… काळजुगारी
पारंपरिक कथांचे रचनाबंध वापरून
स्त्री-पुरुष संबंधांतले आदिम पदर उलगडणाऱ्या
दोन अनोख्या दीर्घ कथा…परफेक्टची बाई फोल्डिंगचा पुरुष
गूढ रहस्याच्या परिघाभोवती क्रौर्य आणि करुणेचे
अस्तर ल्यालेली, अंताला सर्वकालिक सामाजिक आशयाच्या
वेगळ्या उंचीला पोहोचवणारी लघुकादंबरी…हाकामारी
₹360.00Read more
रोहनचे सर्जनशील लेखक
हृषीकेश गुप्ते यांचा परिचय वाचा…
गूढ-अद्भुतता, चित्रमय, प्रासादिक व ओघवती भाषा या लेखनवैशिष्ट्यांमुळे गुप्तेंचं लेखन खिळवून ठेवतं.