फॉन्ट साइज वाढवा

मेंदू हा माझा विज्ञान-साहित्याएवढाच आवडता विषय. ह्या विषयात माझ्याप्रमाणे आवडीने लेखन करणारा लेखक म्हणजे सुबोध जावडेकर. त्यामुळेच आमच्या मैत्रीचा धागा जुळला, घट्ट झाला. त्यांच्या दोन पुस्तकांपैकी एका पुस्तकावर मी लिहिणार आहे; ते म्हणजे ‘मेंदूच्या मनात’. त्याचं दुसरं पुस्तक म्हणजे ‘पुढच्या हाका’. सुबोध विज्ञान-साहित्याला इतर साहित्यातून वेगळं करत नाहीत. ते बरोबरच आहे. त्यामुळे त्यांच्या ‘पुढच्या हाका’तल्या सर्व कथा विज्ञानकथा नाहीत. तसं लिहिलं तरी वाद, न लिहिलं तरी वाद; म्हणून ‘पुढच्या हाका’ बाद.

‘मेंदूच्या मनात’ हे ‘मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउस’ने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. हे पुस्तक अगदी सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. त्यातले लेख आधी ‘सदर’रूपाने ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित झाले होते. त्या सदराचा हेतू जावडेकर यांनी त्यांच्या मनोगतात स्पष्ट केला आहे. ते म्हणतात – “मेंदूची रचना, त्याचे भाग, त्यांची नावं, याबद्दल शक्यतो लिहायचं नाही, असं मी ठरवलं होतं. सगळ्याच भावभावना मेंदूत जन्म घेतात, त्या नक्की कुठल्या भागात निर्माण होतात, त्या भागाला काय म्हणतात, हे समजून सर्वसामान्य वाचकाला काय मिळणार? म्हणून ते टाळून, माणसाच्या उद्भवणाऱ्या भावनांमध्ये मेंदूचे काय व्यापार असतात त्या विषयाला हात घालायचं मी ठरवलं. प्रेम म्हणजे नक्की काय असतं? सूड घ्यावा असं माणसाला का वाटतं? लबाडी करावी असं प्रामाणिक माणसांच्या मनात का येत नाही? आपल्याला कंटाळा का येतो? अशांसारख्या प्रश्नांचा धांडोळा मी घेतला. स्वप्नं का पडतात, बुद्धिमत्ता मेंदूच्या आकारावर अवलंबून असते का, ‘तुमचा मेंदू दोन महिन्यांत तेज करून देऊ’ या जाहिरातदारांच्या दाव्यात कितपत तथ्य असतं, स्मरणरंजनात माणसं इतकी का रमतात, सामान्य लोक अंधश्रद्ध का असतात, अशा गोष्टींचा शोध घ्यायचा प्रयत्न (मी) केला. साध्या साध्या प्रश्नांची उत्तरं द्यायला वृद्धांना बराच वेळ लागतो तो का? बेशुद्धावस्थेत असलेल्या रुग्णाशी संवाद शक्य आहे का? फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर सध्या मुलं तासन् तास घालवतात, त्याचा मेंदूवर वाईट परिणाम होतो का? यांसारख्या वाचकांच्या जिव्हाळ्यांच्या विषयांचा मागोवा घेतला. दृष्टिभ्रम ही डोळ्यांची नाही, तर मेंदूची फसवणूक असते असं म्हणतात. पण खरं तर मेंदू फसत नाही, डोळेच फसतात! त्याबद्दल लिहिलं. जेव्हा आपण नवीन भाषा शिकत असतो, तेव्हा ती भाषेच्या अस्सल उच्चारात शिकण्यापेक्षा शिकणाऱ्याच्या (गावठी) उच्चारात शिकणं जास्त फायदेशीर असतं. आपल्या डोळ्यासमोर घडणारी गोष्ट आपल्या लक्षात येणार नाही, हे कुणालाही अशक्य वाटेल, पण कधीकधी अगदी तसंच घडतं. कारण अनपेक्षितपणे घडणाऱ्या गोष्टी मेंदू टिपू शकत नाही. आपण स्वेच्छेने एखादा निर्णय घेतलाय असं जरी आपल्याला वाटत असलं, तरी ते अनेकदा अर्धसत्य असतं. आपल्या पूर्वस्मृती, त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या भावना आणि आपली मानसिक घडण बऱ्याच वेळा आपल्याला तसा निर्णय घ्यायला भाग पाडत असतात. आपलं निर्णयस्वातंत्र्य आपल्याला वाटतं तितकं अमर्याद नसतं. यासारख्या काही चमत्कारिक वाटतील, अशा गोष्टींचा ऊहापोह सदरातून केला.”

जावडेकरांनी त्या निमित्ताने ‘मेंदू’ या विषयावर भरपूर वाचन केलं होतं, याचा मी साक्षीदार आहे. वरील मजकूर मी त्यांच्याच शब्दात दिला याला एक कारण आहे. मला स्वत:ला ‘मेंदू आणि मानवी मन’ ह्या विषयात स्वारस्य आहे. मी आंतरजाल येण्यापूर्वी मेंदूसंबंधित दोन पुस्तकं लिहिली होती. त्यानंतर मेंदू आणि मानवी कामप्रेरणा, या विषयावर दोन पुस्तकं लिहिली. ‘मन’ या विषयावर लिहिलं. त्यात ‘फेसबुक’ वगैरे विषय नव्हते, कारण मी ही पुस्तकं लिहिली तेव्हा फेसबुक अस्तित्वात नव्हतं. समाजमाध्यमं एवढी बोकाळली नव्हती. जावडेकरांच्या पुस्तकाचा परिचय करून देताना माझ्या मतांचा त्या पुस्तकामधील काही विषयांवर प्रभाव पडू नये, या उद्देशाने मी हे केलं. जावडेकर सोपी, सुलभ भाषा वापरतात. मला काही वेळा नवीन शब्द निर्माण करायची हौस आवरत नाही. यामुळे या पुस्तकाचा परिचय करून देताना विपरीत टीका-टिपणी होऊ नये, ह्या एकमेव हेतूने मी हा मार्ग अवलंबला.

भाषा ह्या विषयावर जावडेकर सरळ सरळ ‘भाषा आणि मेंदू विज्ञान’ असं लिहून मोकळे होतात; हे मला आवडतं, पण जमत नाही. हा आमच्या शैलीतला फरक आहे, ह्याची जाणीव मला होती. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी शक्यतो अद्ययावत संदर्भ वापरले आहेत, पण ते त्या विषयाच्या संशोधनाच्या इतिहास मांडण्याच्या मोहात पडत नाहीत. असं असलं तरी यामुळे मेंदू-संशोधनातल्या काही गमतींना वाचक मुकतो. दुसरं म्हणजे जावडेकर सामान्य वाचकाला मेंदूच्या भागांच्या नावात गुंतवायचं नाही असं म्हणतात, पण काही प्रकरणांमध्ये मेंदूचे चित्र देऊन त्यातले भाग दाखवताना इंग्रजी नावं दाखवतात. ह्या मेंदूच्या चित्रात मेंदूचा कपाळाकडचा भाग कुठला आणि मानेकडचा भाग कुठला हे दाखवायला हवं होतं, हे अनुभवाने मी सांगतो. लोकांच्या ते लक्षात येतंच असं नाही. ब्रोकाचा उल्लेख भाषाविज्ञानात आहे. ह्या ब्रोकाची कहाणी, त्याचबरोबर वेर्निकेबद्दल त्यांनी थोडं लिहिलं असतं तर बरं झालं असतं. याचं कारण या दोन्हीही शास्त्रज्ञांभोवती आख्यायिकांचं वलय आहे. त्याचप्रमाणे पुस्तकात कुठेतरी एखाद्या पानावर मेंदूची दोन चित्रं – एक समोरून दिसणारा मेंदू आणि दोन बाजूने दिसणारा मेंदू दाखवून त्यातले वेगवेगळ्या भावना आणि क्रिया यासंबंधीचे भाग दाखवले असते तर ते उचित ठरलं असतं. असं असलं तरी एकुणात पुस्तक वाचनीय व मननीय.

-निरंजन घाटे

मेंदूच्या मनात / लेखक- सुबोध जावडेकर / मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

  • मला आवडलेली इतर काही पुस्तकं
    • लव्ह इन द टाइम ऑफ करोना / संपा. अनुजा जगताप / रोहन प्रकाशन
    • जग थांबतं तेव्हा / लेखक- गौरी कानिटकर / समकालीन प्रकाशन
    • ग्रंथगप्पा / लेखक- शरद गोगटे / मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
    • एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंती / लेखक- जयप्रकाश प्रधान / रोहन प्रकाशन

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल मे २०२१


रोहन शिफारस

एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंती

पृथ्वीच्या दक्षिण व उत्तर टोकावरच्या थरारक सफरी

पृथ्वीच्या दक्षिण टोकावरील शेवटचं गाव ‘प्युर्टो विल्यम्स’, खलाशांचं कबरस्तान ‘केप हॉर्न’, ९८% बर्फानेच वेढलेलं ‘अंटार्क्टिका’, अवघ्या तीन हजार लोकवस्तीचं ‘फॉकलंड आयलंड’, तर उत्तर टोकावरील ‘आर्टिक सर्कल’, ‘नॉर्दन लाईट्स’चं मनोहारी दर्शन, हिमनगांची जागतिक राजधानी ‘ग्रीनलँड’ आणि लँड ऑफ फायर अँड आईस ‘आइसलँड’… पृथ्वीवरच्या अशा दोन टोकांवरील वेगळ्या दुनियेची सफर जयप्रकाश प्रधान या पुस्तकातून घडवून आणतात. थरारक सफरींचा अविस्मरणीय अनुभव देणारं कथन…

End of the World cover

250.00Add to cart


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *